Wednesday, October 16, 2019

- १५ - मिस्टी

(गी द मोपासाच्या ‘Misti’ याच नावाच्या कथेचा मुक्त अनुवाद.)

मला तेव्हा त्या चिटमुऱ्या हसतमुख बाईमध्ये स्वारस्य होतं. विवाहित होती ती. अर्थातच. कारण तुम्हाला माहित आहे. मला अविवाहित नखरेल पोरींची भीति वाटते.  जी कुणाचीच नसूनही सगळ्यांची असू शकते अशा पोरीवर जीव लावण्यात काय हशील ? आणि हो, नैतिकतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी जिव्हाळा म्हणजे काही व्यावहारिक देवाणघेवाण नसते. नाही म्हटलं तरी जरा तिटकाराच वाटतो मला त्याबद्दल.
 
विवाहित स्त्रियांशी  मैत्री करण्यात जे आकर्षण वाटतं माझ्यासारख्या फ्रेंच अविवाहित तरुणाला त्यात एक खास बात असते. अशा विवाहित स्त्रीमुळं त्या तरुणाला एक घर मिळतं. आनंदी घर, ज्यात प्रत्येकजण त्याची काळजी घेतो अगदी नको तितकी. तिच्या नवऱ्यापासून ते तिच्या घरातल्या नोकराचाकरांपर्यंत. त्याला त्या घरात प्रेम मिळतं, मैत्री मिळते, माया मिळते, जेवणखाण आणि कधी कधी डोक्यावर छतही ! सगळं काही येतं त्यात. जीवनातला अपरिमित आनंद असतो तो. शिवाय स्वातंत्र्य ! कसली बांधिलकी नाही. कंटाळा आला की निरोप घेऊन दुसरीकडे जाता येतं. कधी उन्हाळ्यात एखाद्या खेड्यातल्या कामगाराच्या घरातल्या  भाड्याच्या  छोट्या खोलीत तर कधी, अगदी महत्वाकांक्षी असाल तर, हिवाळ्यात एखाद्या शहरी टुमदार बंगल्यातला स्वयंपूर्ण जाप्त्यात.
 
याशिवाय माझा आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे विवाहित स्त्रीबरोबरच मी तिच्या नवऱ्याबरोबरही मैत्री करू शकतो. कधी कधी तर असंही होतं की तिचा नवरा, कितीही ओबडधोबड व्यक्तिमत्वाचा, साधासुधा माणूस असला तरी मला तो आवडू शकतो आणि कदाचित त्याच्या सुंदर असलेल्या बायकोबद्दल मला चीडही वाटू शकते. त्यातही नवरा हुशार, बुद्धिमान असला म्हणजे तर माझं त्याच्याशी चांगलं जुळतं. आणि मग माझा त्या स्त्रीबरोबर वाद जरी झाला तरी  तिच्या नवऱ्याशी मी भांडत नाही. अशातून मी अनेक चांगले दिलदार मित्र मिळवले आहेतच शिवाय बायकांपेक्षा पुरुषांचं असणारं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. बाई धोक्याचे अवसर निर्माण करू शकते, तुम्हाला दोष देण्यात मागं पुढं बघत नाही. पण उलटपक्षी पुरुष, जरी त्याला तक्रार करायला जागा असली तरीही तो तुम्हाला तुम्हीच त्याच्या घराचा तारणहार असल्यासारखी वागणूक देतो आणि म्हणतो, “मेर्सी बोकू, मॉन् अॅमी ! (फार आभारी आहे, माझ्या मित्रा !)”.
 
ते जाऊ द्या. तर ही माझी नवी मैत्रीण, एमा, सोनेरी केसांची, हसतमुख, चटपटीत, धार्मिक, अंधश्रध्द, भोळी, लहरी, पण तरीही समोरच्याला अगदी पहिल्या भेटीतच आकर्षित करू शकणारी अशी होती. आणि हो, चुंबन घेण्यातली तिची अदा म्हणजे तर?....काय सांगू? आजवर माझ्या संपर्कातल्या कुणाही स्त्रीकडे तशी जीवघेणी अदा नव्हती. पण हे, किंवा तिची मुलायम नितळ त्वचा, हेच काही माझ्यासाठी आकर्षण नव्हतं. तिचा हात माझ्या हातात घ्यायला मला फार आवडायचं. आणि तिचे डोळे. त्यांतून ती जो कटाक्ष टाकायची तो समोरच्याला हळुवारपणे कुरवाळतो आहे असा भास द्यायचा. कधी कधी मी तिच्या गुढग्यावर निवांत डोकं ठेवायचो आणि तीही मान झुकवून हलकंस, अनाकलनीय पण मोहक स्मित करत न बोलता माझ्याकडे एकटक बघत रहायची. तिचे नितळ, अथांग निळे डोळे जसं काही माझ्या डोळ्यातून माझ्या अंतर्मनात प्रवेश करून प्रेमाच्या नशेत त्याला भारावून टाकत. स्वर्गीय आनंद असायचा तो माझ्यासाठी.
 
एमाचा नवरा एका मोठ्या सार्वजनिक बांधकाम कंपनीमध्ये गुणवत्ता तपासनीस होता. कामामुळं त्याला बऱ्याचदा फिरतीवर जायला लागायचं. मग आम्हाला त्या संध्याकाळी मोकळ्या मिळायच्या. कधीकधी ती तिच्या घरातल्या सोफ्यावर मांडी घालून बसायची आणि मी एका बाजूने तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडायचो. दुसऱ्या मांडीवर तिचा आवडता मोठा काळा बोकोबा बसलेला असायचा हक्कानं. त्या बोक्यावर तिचा फार जीव होता. ‘मिस्टी’ नाव होतं त्याचं. मिस्टीच्या फुलारलेल्या मऊ रेशमी केसात माझी आणि एमाची बोटं फिरताफिरता परस्परांना स्पर्श करायची आणि काही क्षणांकरता गुंतून रहायची. मिस्टी कधी कधी माझ्या जवळ सरकायचा आणि त्याचं उबदार पोट माझ्या गालांना लागून रहायचं. त्याचा एक पंजा कधी माझ्या तोंडावर किंवा डोळ्यावर येऊन स्थिरावायचा तेव्हा क्षणभर त्याची नखं पापण्यांना टोचायची पण मग लगेच मिस्टी पंजा दूर करायचा.
 
कधी संध्याकाळी मी आणि एमा बाहेर फिरायला जायचो. अशा वेळी उपनगरातल्या एखाद्या उपाहारगृहात काही तरी खाऊन यायचो. किंवा जेवण तिच्या घरी करून एखाद्या बऱ्यापैकी पण फार महाग नसलेल्या पब मध्ये जायचो, कॉलेजची मुलं मुली जातात ना? तसल्या. सिगारेटींच्या धुरातून वाट काढत आम्ही बारच्या टोकाला असलेल्या टेबलापाशी दोन लाकडी खुर्च्यांवर बसायचो. धुराच्या वासाशी स्पर्धा करत येणारा तळलेल्या मासळीचा वास आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यांचा वास या सर्वांचं मादक मिश्रण तिथं दरवळत असायचं. आलेली गिऱ्हाइकं मोठमोठ्यानं बोलत हातातल्या छोट्या ग्लासातून रम, नाहीतर व्हिस्की, कॉनियाक अशांतली कोणती तरी दारू पीत असायची. बायका बहुतेक नसायच्या. त्यामुळे आश्चर्यचकित झाल्यासारखे मोठे डोळे करून बघणारा वेटर आमच्यासमोर चेरी ब्रँडीचे दोन ग्लासेस आणून ठेवायचा.  थोडी थंडीनं काकडत असलेली, थोडी संकोचलेली एमा मग चेहऱ्यावरची जाळी एका हाताने नाकापर्यंत वर करायची आणि दुसऱ्या हातातल्या ग्लासमधून छोटासा घोट घ्यायची. अशा वेळी ब्रँडीतली चेरी दोन बोटांनी उचलून खाताना आणि घेतलेल्या घोटाची जळजळीत अनुभूती घेताना आपण काहीतरी गंमतीशीर खोडी करतो आहोत असा मिश्कील भाव तिच्या डोळ्यात उतरायचा.
 
तेवढं पेय झाल्यावर ह्ळूच पुटपुटून म्हणायची, “चल, निघूया आपण.” आणि मग आम्ही जाण्यासाठी उठायचो. पीत बसलेल्यांच्या टेबलांमधून जाताना ती पायाकडं बघत पटापट चालायची. बसलेले पियक्कड निराशेनं आमच्याकडे -म्हणजे जास्त करून तिच्याकडे- कटाक्ष टाकायचे. बाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकायची एमा, जशी काही एखाद्या मोठ्या दिव्यातून ती सहीसलामत सुटली आहे ! आणि शहारल्यासारखं करून मला विचारायची, “समज त्यातल्या कुणी एखाद्यानं माझ्याबद्दल अपशब्द वापरला असता तर काय केलं असतंस तू?” मी म्हणायचो, “काय म्हणजे? मी त्या बोलणाऱ्याचं थोबाड फोडलं असतं.” आणि ती आश्वस्त होऊन माझा हात हातात घ्यायची, आपल्यासाठी हा माणूस त्या दांडगट माणसांशी दोन हात करतो आहे हे चित्र मनोमन डोळ्यांपुढं आणून.
 
आणि एक दिवस असेच मी आणि एमा, आम्ही दोघे, मॉन्तमार्त्रेमधल्या बार मध्ये बसलो असताना रंगीबेरंगी पण लक्तरात जमा होतील असे कपडे घातलेली एक म्हातारी बाई आत आली. तिच्या हातात भविष्य वर्तवायची जीर्ण टॅरट कार्डे होती. एमाला बघून ती बाई आमच्याकडे आली आणि भविष्य सांगते म्हणायला लागली. एमा तर भोळी होतीच, त्यामुळं कशावरही तिचा पट्कन् विश्वास बसायचा. मग काय, तिची उत्सुकता लगेच चेहऱ्यावर दिसायला लागली. तिनं त्या बाईसाठी जवळची खुर्ची ओढून तिला बसायला सांगितलं. तोंडाचं बोळकं, बुब्बुळांवर लाल रेषांचं जाळं झालेल्या म्हातारीनं टेबलावर आपली मळकटलेली कार्डे मांडायला सुरुवात केली. त्यांच्या तीन चळती बनवल्या,  पुन्हा एकत्र केली, आणि परत काही तरी अगम्य शब्द पुटपुटत ती मांडली. एमा भयचकित मुद्रेने ते अगम्य शब्द ऐकत होती. उत्सुकता आणि अधीरता या दोन्ही गोष्टी तिच्या चेहऱ्यावर उमटत होत्या.
 
थोड्या वेळानंतर म्हातारीनं अतर्क्य घटना, आनंद, मुलं, प्रवास, पैसा, कज्जे, एक काळा माणूस, कोणाचं तरी परत येणं, मृत्यू इत्यादी गोष्टी असलेलं भविष्य सांगायला सुरुवात केली. “कुणाचा मृत्यू? कधी? कशा प्रकारे?” एमानं म्हातारीवर प्रश्नांची सरबत्ती केली.
 
म्हातारी बोलली, “बाई, या प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद या कार्डांमध्ये नाही. तू उद्या माझ्या घरी ये, मग मी कॉफी बियांच्या मदतीनं सगळं काही सांगेन. कॉफी बिया कधी चुकत नाहीत.”
 
एमानं माझ्याकडे बघितलं, म्हणाली, “उद्या जाऊया? जाऊया नं. प्लीssज?. आता मला खूप काळजी वाटायला लागली आहे.”
 
मी हसलो. एमाचा हात हातात घेत म्हणालो, “जाउया, तुला एवढं वाटत असेल तर.”
 
म्हातारीनं तिच्या घराचा पत्ता सांगितला. बुत्तेस शोमाँ स्टेशनच्या मागे कुठेतरी ती रहात होती. आम्ही दुसऱ्या दिवशी  तिच्या घरी गेलो. तिचं घर म्हणजे सहाव्या मजल्यावर पोटमाळ्यावरची गचाळ खोली होती. एक पलंग, दोन खुर्च्या, अनाकलनीय प्रकारच्या वस्तू विखुरलेल्या, भिंतीत ठोकलेल्या खिळंयांवर लटकणाऱ्या कसल्याकसल्या जडीबुटीच्या, मण्यांच्या माळा, जनावरांची कातडी, टेबलावर रंगीबेरंगी द्रव भरलेल्या बाटल्यांबरोबरच एक पेंढा भरलेलं काळं मांजर ठेवलेलं होतं. डोळ्यांच्या जागी बसवलेल्या कांचगोट्यांमुळं ते ‘भुताटकीच्या खोलीतला सैतान’ असावं असाच ग्रह करून देत होतं.
 
एमाची  त्याच्याकडं नजर जाताच ती मट्कन् खुर्चीत बसली आणि किंचाळलीच, “ओ: ! बघ बघ, अगदी आपल्या मिस्टीसारखंच दिसतंय की हे.” आणि प्रश्नार्थक मुद्रेने बघणाऱ्या म्हातारीला म्हणाली, “माझ्याकडे अगदी असंच दिसणारं मांजर पाळलंय मी”.
 
म्हातारी गंभीरपणे म्हणाली, “तुझं कुणावर प्रेम असेल तर तू ते मांजर घरात ठेवू नकोस.
 
भ्यालेल्या एमानं विचारलं, “का? असं का?”
 
म्हातारी तिच्याजवळ बसली, तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, “बाई गं, माझं आयुष्यच विस्कटून गेलंय याच्यामुळं !”
 
एमाची उत्सुकता चाळवली. म्हातारीच्या जवळ सरकत तिनं तिला आग्रह केला काय घडलं होतं ते सांगायचा. शेवटी म्हातारी तयार झाली.
 
“माझं खूप प्रेम होतं या मांजरावर. अगदी धाकट्या मी भावावर केलं असतं तसं. तेव्हा मी तरुण होते, एकटीच रहायची. शिवणकाम करायची. माझ्या एका शेजाऱ्यानं दिलं होतं मांजर मला. बोका होता. त्याला नावही दिलं होतं मी लाडानं, ‘मूताँ’ म्हणून हाक मारायची मी त्याला. मूताँ हुशार होता, शांत होता.  माझा लळा लागला होता त्याला. मी उभी असले तर सारखं म्यांव, म्यांव करत माझ्या पायात घुटमळत असायचा. बसले की पट्कन् उडी मारून माझ्या मांडीवर येऊन बसायचा. रात्री तर पलंगावर माझ्या पांघरुणात घुसूनच झोपायचा मला बिलगून.
 
“मग एक दिवस एका तरुण माणसाशी ओळख झाली माझी. चांगला होता तो, सभ्य होता. कापड व्यापाऱ्याकडं नोकरी करायचा. तीनएक महिने आम्ही केवळ एकमेकांचे मित्र असेच वावरलो. पण तुम्हालाही माहित असेल, असले निर्धार कधी ना कधी गळून पडतातच ते. हळू हळू मला आवडायला लागला तो. प्रेम बसलं माझं त्याच्यावर. त्यालाही वाटायचं की आर्थिक दृष्ट्या आम्ही दोघांनी एकत्र राहावं. तसं बरोबरच होतं ते. मग एके दिवशी संध्याकाळी मी त्याला माझ्या घरी बोलवलं. तसा अजून पक्का निर्णय होत नव्हता माझा, तरीही तेव्हा एक संध्याकाळ त्याच्यासोबत घालवावी असं मला प्रकर्षानं वाटलं.
 
“आल्या आल्या संयमानं, मर्यादा ठेवून वागला तो आणि तरीही माझ्याबद्दलचं आकर्षण त्याच्या नजरेत दिसून यायला लागलं. माझ्या हृदयाचेही वाढलेले ठोके मला ऐकू यायला लागले. आणि एकदम त्यानं मला कवेत घेत माझं चुंबन घेतलं. त्याच्या मिठीत मी स्तब्ध्द झाले. सुखाची भावना मनात उमटली माझ्या आणि मी डोळे मिटून घेतले. पण एवढ्यात किंचाळी मारून त्यानं माझ्याभोवतीची मिठी सोडली. त्या धक्क्यानं मी डोळे उघडले तेव्हा दिसलं काय ? तर मूताँनं त्याच्या चेहऱ्यावर झडप घातली होती आणि एकादी कापडाची बाहुली ओरबाडून फाडावी तसा त्याचा चेहरा नख्यांनी ओरबाडत होता. ओरखड्यांतून रक्ताचे ओघळ वाहात होते. मी मूताँला ओढून बाजूला करायचा प्रयत्न करायला लागले तर तो मला काही केल्या आवरेना. मिशा फेंदारत गुरगुरून चावलाही मला तो. कसंतरी खेचून, उघड्या असलेल्या खिडकीतून मी त्याला बाहेर भिरकावलं.
 
माझ्या मित्राच्या जखमा साफ करायला मी गेले तर त्याचे दोन्ही डोळे ओरबाडल्यामुळं जायबंदी झालेले दिसले. लगोलग त्याला जवळच्या दवाखान्यात नेलं तेव्हा कळलं की दोन्ही डोळ्यांनी आता तो बघू शकणार नव्हता. जन्माचा आंधळा झाला होता तो. त्यानंतर मी त्याला माझ्या घरीच रहायला ठेवून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण त्यानं मानलं नाही.  किंबहुना मला टाळायलाच लागला होता तो. आणि अखेर हाय खाऊन जेमतेम वर्षभरातच वारला.
 
“मूताँचं काय झालं म्हणता? उंचीवरल्या खिडकीतून बाहेर पडल्यामुळं पाठ मोडून जागच्या जागीच गतप्राण झाला होता तो.  बिल्डिंगच्या वॉचमननं त्याचं कलेवर आणून दिलं मला. फार वाईट वाटलं मला. काही झालं तरी माझा जीव होता त्याच्यावर. आणि त्यानं जे काही केलं ते माझ्यावरल्या प्रेमामुळंच केलं असावं. होय ना ? म्हणून मग मी त्या कलेवरात पेंढा भरून घेतला आणि ते इथं ठेवलं.”
 
म्हातारी नि:शब्द झाली. मूताँच्या डोक्यावरून हात फिरवत बसून राहिली.
 
म्हातारीच्या या कहाणीनं भारावून गेलेल्या एमानं मग आपल्या भविष्याबद्दल, त्यात असणाऱ्या कोणाच्या तरी संभाव्य मृत्यूबद्दल शब्दही काढला नाही. म्हातारीच्या हातात पाच फ्रँक्स ठेवून आम्ही तेथून निघालो.

दुसऱ्या दिवशी एमाचा नवरा फिरतीवरून परत येणार असल्यामुळं पुढचे बरेच दिवस मी तिच्या घराकडे फिरकलो नाही. नंतर जेव्हा गेलो तेव्हा मिस्टी कुठं दिसला नाही. आश्चर्य वाटून मी चौकशी केली. तेव्हा ती म्हणाली:

मिस्टी मी देऊन टाकला माझ्या एका मैत्रिणीला. घरात त्याच्या असण्यामुळं मला काळजी वाटायला लागली होती.”

"काळजी? तुला? कशाची?” मी अचंबा वाटून विचारलं.उत्तरादाखल तिनं माझं दीर्घ चुंबन घेतलं आणि कानात कुजबुजली:“तुझ्या या डोळ्यांची ! प्रियकरा.”