Thursday, August 6, 2020

-२०- गोष्टीवेल्हाळ

 (व्हिक्टर ह्यू मन्रो उर्फ ‘साकी’ च्या ‘The Storyteller’ या कथेचा स्वैर स्वैर अनुवाद)

टळटळीत उन्हाची दुपार होती. अर्थातच त्यामुळे मध्य रेल्वेची महाराष्ट्र एक्स्प्रेस धावत असली तरीही तो डबा तापलेलाच होता. आतली हवादेखील इंजिन सोडत असलेल्या वाफेसारखी धपापत होती. पुढचं स्टेशन, मिरज, यायला अजून एक तास तरी होता. तशी डब्यात इन मीन पाच माणसं होती. एक छोटा मुलगा, एक छोटी मुलगी, एक तिच्याहून छोटी मुलगी, मुलांची मावशी की आत्त्या; आत्त्याच असावी बहुतेक, कोपऱ्यातल्या खिडकीजवळच्या सीटवर बसलेली. आणि हो, त्याच रांगेतल्या, पण दुसऱ्या कोपऱ्यातल्या सीटवर बसलेला एक मध्यमवयीन माणूस. तो काही त्यांच्या नात्यातला वगैरे नव्हता. होता कुणीतरी त्र्ययस्थच. ती तीन मुलं मात्र तो आख्खा डबा त्यांच्याच मालकीचा असल्यासारखी वावरत होती डबाभर. डब्यात आणखी एक प्रवासी होता, एक माशी ! किती हाकलली तरी जात नव्हती खिडकीतून बाहेर. मुलांचं आणि आत्त्याचं संभाषण होत होतं पण अगदी जुजबी, बहुतेक करून आत्याचं ‘नको’ आणि मुलांच ‘पण का?’ अशाच स्वरूपाचं होतं. छोट्या मुलाचा प्रयत्न त्या माशीला हातातल्या उशीचा रपाटा मारून ठार करायचा होता. पण त्या प्रयत्नात सीट आणि उशी, दोन्हीवरची धूळ मात्र उसळत होती. “शिऱ्या, नको रे.” आत्त्या सांगायची.

अखेर एकदा तिनं पूर्ण वाक्यात हुकुम सोडला, “इथं या सगळे. बाहेर बघा बरं खिडकीतून.”

मुलं अनिच्छेनंच खिडकीजवळ आली. मुलानं पहिला प्रश्न केला, “तो मेंढपाळ मेंढ्यांना हाकलून का नेतोय कुरणातनं”

“अरे, तो त्याना भरपूर गवत असलेल्या दुसऱ्या शेतात नेणार असेल.” आत्त्या म्हणाली.

“पण आत्त्या, या कुरणातपण कितीतरी गवत आहे. सगळ्याभर गवतच तर आहे !”

“अरे, दुसऱ्या कुरणातलं गवत इथल्यापेक्षा जास्ती चांगलं असेल. म्हणून.” आत्त्यानं केविलवाणा प्रयत्न केला.

“कशावरून आणि का चांगलं असेल ते याच्यापेक्षा?” दुसरा प्रश्न लगेच हजर होताच.

“ठीक आहे, ठीक आहे. त्या म्हशी बघितल्यात?” दुसरा केविलवाणा प्रयत्न. सगळीकडेच तर गाई नि म्हशी दिसत होत्या पण आत्त्या नवीन काही तरी दाखवत आहोत अशा आविर्भावात बोलली.  

“पण आधी दुसऱ्या कुरणातलं गावात जास्त चांगलं का ते सांग ना.” श्रीरंग उर्फ शिऱ्याचं पालुपद सुरु झालं.

पाचवा प्रवासी असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर आतां आठ्यांचं जाळं दिसायला लागलं. ‘किती कोरडा, सहानुभूती नसलेला माणूस अहे हा !’ आत्त्याच्या मनात विचार आला. दुसऱ्या कुरणातल्या गवताचा प्रश्न कसा सोडवायचा हे मात्र तिच्या डोक्यात येत नव्हतं काही केल्या.

दोन्हीपैकी जास्त छोट्या असलेल्या मुलीनं आपलं मन रमवायला दुसराच मार्ग शोधून काढला. “मामाच्या गावाला जाऊया” हे गाणं मोठ्यानं गायला सुरुवात केली तिनं. ही फक्त पहिलीच ओळ पाठ येत होती तिला. पण आपल्या या अपुऱ्या माहितीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचं ठरवलं असावं तिनं. ही एकच ओळ ती पुन्हापुन्हा, सुरांची ओढाताण करत, पण अगदी ठामपणानं गात राहिली. माणसाला वाटलं कुणीतरी तिच्याशी पैज लावलीय की ती ही ओळ मोठ्यानं दोन हजार वेळा ‘गाऊ’ शकणार नाही. आणि तो ती पैज हरणार याचीच आता जास्त शक्यता दिसायला लागली होती.

“इकडं या. मी आता गोष्ट सांगणार आहे तुम्हाला.” माणसानं दोन वेळा दृष्टिक्षेप केलेला लक्षात येऊन आत्त्या मुलांना म्हणाली.

मुलं नाखुशीनंच तिच्या जवळ सरकली. गोष्टी सांगण्यात ती वाकबगार आहे असा काही त्यांचा गैरसमज नसावा.

आत्त्यानं हळू, बारीक आवाजात गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुलं मधूनमधून तिला चीड येण्यासारखे प्रश्न विचारून गोष्टीत व्यत्यय आणत होती. गोष्ट अगदी सपाट, मुलांना कंटाळवाणी वाटेल अशी, एका महा सद्गुणी लहान मुलीची होती. मुलगी अतिशय चांगली, सद्वर्तनी, आपल्या चांगुलपणामुळे सर्वांशी मैत्री जोडणारी अशी होती. एकदा एका उन्मत्त, उधळलेल्या बैलाने तिच्यावर हल्ला केला असताना कित्येक लोक ती चांगली मुलगी असल्यामुळे तिच्या रक्षणाला धावून जाऊन तिला वाचवतात असा गोष्टीचा शेवट होता.

“ती मुलगी सद्गुणी नसती तर लोक तिला वाचवायला गेले नसते का?” दोन छोट्या मुलींपैकी मोठी होती तिनं विचारलं. खरं तर सहप्रवासी माणसाच्याही मनात हाच प्रश्न उमटला होता.

“तसं नाही. गेले असते, पण त्याना ती आवडत नसती तर इतक्या ताबडतोब धावत नसते गेले.” आत्त्यानं गोष्टीचा बचाव केला.

“अगदी बकवास गोष्ट ! इतकी बकवास गोष्ट मी अजूनपर्यंत कधी ऐकली नव्हती.” छोट्यातली मोठी मुलगी उद्गारली.

“मी सुरुवात थोडीशी ऐकली, पण बकवास म्हणून पुढं लक्षच दिलं नाही.” छोटा मुलगा श्रीरंग म्हणाला.

छोट्यातल्या छोट्या मुलीनं काहीच शेरा मारला नाही. कारण तिनं केव्हाच गोष्टीतलं लक्ष काढून घेऊन “मामाच्या गावाला जाऊया” हे धृपद आळवायचं चालू केलं होतं.

“चटकदार अशी गोष्ट सांगणं तुम्हाला जमतंय असं दिसत नाही.” सहप्रवासी म्हणाला. 

“मुलांना समजेलही आणि आवडेलही अशी गोष्ट सांगणं खरंच कठीण असतं.” आत्त्यानं त्या माणसाचा अनपेक्षित शेरा ऐकून कोरडेपणानं आपल्या बचावाचा प्रयत्न केला.

“मला नाही वाटत तसं.” माणूस उत्तरला.

“मग तुम्ही सांगा ना त्याना तशी एखादी चटकदार गोष्ट.” आत्त्यानं आव्हान दिलं.

“हो, हो. तुम्ही सांगाल गोष्ट आम्हाला ?” छोट्यांतल्या मोठ्या मुलीनं विचारलं.

माणसानं सुरुवात केली, “हो. सांगतो ना. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा एक छोटीशी मुलगी होती, भारती नावाची. अतिशय गोड आणि सद्गुणी मुलगी होती ती......”

मुलांमध्ये उत्पन्न झालेला उत्साह मावळायला सुरुवात झाली. कुणीही सांगत असलं तरी गोष्ट पहिलीसारखीच कंटाळवाणी असणार असं वाटायला लागलं.

“.... सांगितलेली सगळी कामं करायची, नेहमी खरं बोलायची, आपले कपडे स्वच्छ ठेवायची, दूध आवडीनं प्यायची, नियमितपणे अभ्यास करायची, शिवाय ती अतिशय नम्र होती.”

“दिसायलापण सुंदर होती का ती?” छोट्यातल्या मोठ्ठीनं विचारलं.

“अंss... तुम्हां दोघींइतकी सुंदर नक्कीच नव्हती. पण अगदी भयंsकर चांगली होती ती!” माणूस म्हणाला.

अचानक गोष्ट आवडायला लागली मुलांना. कमालीची चांगली असण्याला ‘भयंsकर चांगली’ म्हणायची कल्पनाच अफलातून वाटली होती त्यांना. त्यामुळं आत्त्याच्या गोष्टीपेक्षा या ‘काका’ची गोष्ट खरी धरायला हरकत नव्हती त्या चिमण्या जिवांची.

“इतकी चांगली नाs, की चांगलेपणाबद्दल अनेक पदकं मिळाली होती तिला. आणि ती ती पदकं नेहमी आपल्या फ्रॉकवर लटकवायची. त्यातलं एक पदक होतं आज्ञाधारक असण्याबद्दलचं, दुसरं होतं वक्तशीरपणाबद्दलचं आणि तिसरं होतं सद्वर्तणुकीबद्दलचं ! चांsगली मोठ्ठी होती ही तीन पदकं. त्यामुळं भारती ती पदकं फ्रॉकवर लटकवून चालत असताना एकमेकांवर आपटून छानसा आवाज करायची. गावातल्या दुसऱ्या कुणाही मुलीकडं, किंवा मुलाकडंसुद्धा, इतकी पदकं नव्हती. त्यामुळं सगळ्यांना वाटायचं की भारती नक्कीच अतिशय चांगली मुलगी असणार म्हणून.”

“भयंssकर चांगली !” श्रीरंग म्हणाला.

“हो ना ! सगळे लोक तिच्या चांगलं असण्याबद्दल नेहमी बोलत असायचे. मग तिथला  राजा होता नं? त्याच्या मुलाला म्हणजे राजपुत्राला भारतीबद्दल कळलं. आणि त्यानं ठरवलं की इतक्या चांगल्या मुलीला आपण बक्षिस म्हणून आठवड्यातून एक दिवस आपल्या खासगी बागेत फिरायची परवानगी देऊया. बाग होती एका मोठ्या डोंगरावरच्या वनात. वनही मोठ्ठं होतं नि बागही खूप मोठ्ठी, आणि फार छान होती. त्यामुळं राज्यातल्या इतर कुणालाही बागेत फिरायला सक्त मनाई होती. तरी भारतीला बोलावलं म्हणजे मग हा तर भारतीचा मोठ्ठाच सन्मान होता नं ?”

 “बागेत मेंढ्या होत्या?” श्रीरंगनं विचारलं

 “नाही. तिथं एकही मेंढी नव्हती.”

 “मेंढ्या का नव्हत्या?” श्रीरंगकडून हा प्रश्न लगेच विचारला जाणं साहजिकच होतं.

 आत्त्याला हसू आलंच. पण तिनं ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही.

 “मेंढ्या नसायला तसंच कारण होतं रे,” माणसानं उत्तर दिलं. “त्या राजपुत्राच्या आईला नं एकदा स्वप्नात दिसलं होतं की आपला मुलगा मेंढीच्या धक्का देण्यामुळं नाहीतर डोक्यावर घड्याळ पडून मरणार आहे. म्हणून मग त्या राजपुत्रानं आपल्या बागेत मेंढ्या ठेवल्या नाहीत आणि घड्याळही ठेवलं नाही.”

 आता आत्याबाईला जरासं कौतुक वाटलं.

 “मग तो राजपुत्र मेला का मेंढीमुळं, नाहीतर घड्याळामुळं.” श्रीरंगनं विचारलं.

 “छे. तो अजून जिवंत आहे. तेव्हा ते स्वप्न खरं होणार की नाही याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही रे. हं तर सांगायचं म्हणजे बागेत मेंढ्या नव्हत्या. पण अरे त्यांच्याऐवजी डुकरं मात्र पाळलेली होती हं राजपुत्रानं तिथं. कळपच्या कळप होते डुकरांचे आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं पळत असायची इकडून तिकडं नि तिकडून इकडं.”

 “कसल्या रंगाची होती ती?”

“पांढऱ्या तोंडाची काळी होती, काळ्या ठिपक्यांची पांढरी होती, सबंध काळी होती, पांढरे चप्पे आणि भुरा रंग असलेली होती, आणि शिवाय पूर्णपणे पांढऱ्या रंगाची पण होती.” इथं गोष्टीवेल्हाळ ‘काका’ मुद्दाम थोडा वेळ थांबला. बागेतली ही श्रीमंती मुलांच्या मनात चांगली ठसवून द्यायची होती त्याला. मग पुन्हा सुरुवात केली सांगायला: “भारतीला मात्र खूप वाईट वाटलं बाग बघून. कारण माहीत आहे? बागेत फुलंच नव्हती कसलीही. तिनं तर आपल्या आईला अगदी डोळ्यात पाणी आणून वचन दिलं होतं की ती राजपुत्राच्या बागेतलं एकही फूल तोडणार नाही म्हणून. तिला तर हे वचन पाळायचंच होतं. पण फुलंच नाहीत त्यामुळं वचन पाळणार कसं?”

“पण बागेत फुलं का नव्हती?”

“कारण डुकरांनी ती खाऊन टाकली होती ना सगळी! माळ्यानं राजपुत्राला सांगितलं होतं, एक तर डुकरं ठेवायची, नाहीतर फुलं ठेवायची; दोन्ही एका वेळी बागेत राहू शकणार नाहीत. राजपुत्राला डुकरं आवडायची. म्हणून मग त्यानं फुलांच्या ऐवजी डुकरं ठेवायचा निर्णय घेतला.”

व्वा. राज्यातल्या इतर लोकांना राजपुत्राचा हा निर्णय तेव्हा मान्य झाला नसेल पण आत्ता या गाडीत मात्र तो खूपच आवडला असं दिसलं.

“आणि बरं का, आणखीन पण चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या बागेत. छोटी छोटी तळी होती आणि त्यात होते सोनेरी, निळे, हिरवे मासे. बाजूला खूप मोठमोठी झाडं होती. त्यांच्यावर सुंदर सुंदर रंगीबेरंगी पोपट बसलेले असायचे, काही विचारलं तर पटकन्  बोलायचे ते. आणि गोड गुणगुणणारे पक्षीही होते. ते त्या काळातली लोकांची आवडती गाणी गुणगुणत असायचे सतत. भारती आता मजेत फिरून बाग बघायला लागली. तिच्या मनात विचार आला, ‘मी जर आत्ता आहे तशी कमालीची चांगली, गुणी मुलगी नसते तर मला ही सुंदर बाग बघायला मिळाली नसती.’ आणि तिनं आनंदानं स्वत:भोवती गिरकी घेतली. त्याबरोबर तिची ती पदक एकमेकांवर आपटून किणकिणली. ‘हो ग बाई, कित्ती सद्गुणी आणि म्हणूनच किती भाग्यवान आहेस तू !’  असंच म्हणाली असतील ती. आणि तेव्हढ्यात, .......”

“काय झालं तेव्हढ्यात?”

“तेव्हढ्यात एक भयंकर क्रूर असा लांडगा आला तिथं. बागेमधल्या एखाद्या डुकराची संध्याकाळच्या जेवणासाठी शिकार करायला म्हणून.

 “कसल्या रंगाचा होता लांडगा?” मुलांनी उत्सुकतेनं विचारलं.

“चिखलाच्या रंगाचा. काळी काळी जीभ आणि हिरवट घारे डोळे. अगदी क्रूर ! बागेत आल्याबरोबर त्याला दिसली ती आपली भारती. तिचा फ्रॉकच इतका स्वच्छ आणि शुभ्र पांढरा होता की अगदी दूरवरूनसुध्दा तो दिसून यायचा.  भारतीचं आता लांडग्याकडं लक्ष गेलं आणि तो आपल्याकडंच बघतो आहे हे लक्षात आल्याबरोबर ती घाबरून गेली. कशाला आपण या बागेत आलो असं वाटायला लागलं तिला. धूम ठोकली तिनं. पण लांडगाही तिच्या मागं लागला, लांब पल्ल्याच्या उड्या घेत तो तिला गाठायलाच आला जवळजवळ. भारती जीवाच्या आकांताने पळत सुटली ती काटेरी झुडपांच्या समूहामध्ये जाऊन पोचली. एका दाट झुडपात कशीबशी शिरून लपली. काटेरी फांद्यांतून तो लांडगा वास घेत घेत तिला शोधू लागला. त्याची जीभ आता बाहेर लोंबत होती, तोंड उघडल्यामुळे टोकदार दात दिसत होते आणि त्याच्या डोळ्यांतून राग जसा काही ओतत होता. भारतीची घाबरून हबेलहंडी उडाली. तिच्या मनात विचार आला, ‘काय म्हणून मला अवदसा सुचली आणि मी इतकी सद्गुणी झाले? नसायला पाहिजे होते इतकी चांगली. म्हणजे मी आज इथं बोलावली न जाता आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते.’

 त्या झुडपाचा स्वत:चाच वास इतका उग्र होता की त्यात त्या लांडग्याला भारतीचा वास काही आला नाही. आणि ते झुडुपही इतके दाट होते की त्यात तिला शोधून काढायला लांडग्याला खूप वेळ लागला असता. म्हणून मग बहुधा त्यानं तिचा माग काढायचा सोडून देण्याचा विचार केला असावा. तिच्यापेक्षा एखादे लुसलुशीत अंगाचे डुकराचे पिल्लूच मिळवलेले बरे असा विचार करून तो लांडगा तिथून जायला निघाला.  लांडगा इतका जवळ असल्याचं जाणवून भारती भीतीनं थरकापत होती. त्यामुळं तिच्या आज्ञाधारकपणाचं पदक सद्गुणांच्या आणि वक्तशीरपणाच्या पदकांवर आपटून आवाज व्हायला लागला. तो आवाज लांडग्यानं ऐकला. जायला निघालेला लांडगा थबकला आणि पुन्हा झुडपात नाक खुपसून भारतीला शोधायला लागला. आता पदकांचा आवाज जवळून ऐकू येत असल्याचं लांडग्याला जाणवलं आणि त्यानं चपळाई करून पंजा मारला. त्याच्या नख्या भारतीच्या पदकांना अडकल्या आणि लांडग्यानं भारतीला खेचून झुडपाच्या बाहेर ओढलं...........”

“मग? पुढं काय झालं? सांगा ना काका.”

“मग काय होणार? लांडग्यानं भारतीला फाडून खाल्लं. दुसरं काय? फ्रॉकच्या चिंध्या, तिचे बूट आणि तिची ती तीन पदकं, बस्स इतकंच उरलं बाकी!”

“आणि मग लांडग्यानं डुकराचं लुसलुशीत पिल्लू पण खाल्लं?” छोट्यातल्या छोटीनं विचारलं.

“छे छे. ती सगळी डुकरं पळून गेली.”

“व्वाव, कित्ती छान ! गोष्ट सुरवातीला कायतरीच वाटली पण शेवट एकदम मस्त !” छोट्यांतली छोटी.

“आजवर मी ऐकलेल्यांपैकी सर्वात छान, अतिशय सुंदर गोष्ट !! छोट्यांतली मोठ्ठी, ठामपणे म्हणाली.

“खरं तर मी ऐकलेली ही एकमेव सुंदर, भयंssकर सुंदर गोष्ट !” श्रीरंग उर्फ शिऱ्या.

नकारघंटा फक्त आत्त्यानं वाजवली, “अत्यंत चुकीची गोष्ट ! मुलांना सांगण्यासारखी अजिबात नाही ! कित्येक वर्षांपासून काळजीपूर्वक आम्ही त्यांच्यात भरत असलेल्या चांगल्या भावनांना सुरुंगच लावलात.”

गाडी मिरज स्टेशनात शिरली.

“तसंही असेल कदाचित”, आपलं सामान गोळा करत असलेला ‘गोष्टीवेल्हाळ काका’ म्हणाला, “पण प्रवासात तुम्ही जे करू शकला नाहीत ते मी केलं. मुलांना तब्बल दहा मिनिटं मी एका जागी खिळून रहायला लावलं ! चला, निघतो आता.”

फलाटावर उतरता उतरता त्याच्या मनात आलं, ‘बिच्चारी आत्त्या! पुढचे सहा महिने तरी ही कार्टी तिला ‘असल्या चुकीच्या गोष्टी’ सांग म्हणून पिडत रहातील.’

*****

Tuesday, August 4, 2020

-१९- भुताला बढती

(लीओ टॉलस्टॉय या महान रशियन लेखकाच्या Promoting a Devil या लघुकथेचे मुक्त मुक्त रूपांतर) 

एका शेतकरी होता. पण होता गरीबच. एक छोटा जमिनीचा तुकडा होता त्याच्या मालकीचा. थोडा भाग टेकडीच्या उतारावरचा आणि थोडा सपाट पाणथळीचा असं होतं त्याचं शेत. त्या दिवशी तांबडं फुटता फुटताच निघाला होता शेत नांगरायला. न्याहारीसाठी कारभारणीनं रात्रीच्या जेवणातला उरलेला भाकरतुकडा आणि कांदा दिला होता. शेतात पोचल्यावर त्यानं अंगातली बंडी काढली तिच्यात ती न्याहारी गुंडाळून एका झुडपात ठेवली आणि बैलाला नांगराला जुंपून कामाला लागला. सकाळचं ऊन तापायला लागल्यावर त्याचा बैल दमला आणि तो स्वत:ही. भूक लागली. तशी त्यानं बैलाला मोकळा करून चरायला सोडून दिलं आणि आपण झुडपाजवळ जाऊन बंडी आणि न्याहारी घ्यायला गेला. 

आधी अंगावरला  घाम पुसावा म्हणून त्यानं बंडी उचलली. न्याहारी काढून ठेवायला गेला तर होती कुठं न्याहारी? भाकरी नि कांदा दोन्ही गायब. बंडी झटकली, इकडं तिकडं बघितलं पण न्याहारी खरंच गायब झालेली. अरेच्या,  गेली कुठं माझी न्याहारी?’ शेतकरी विचारात पडला.

काय आक्रीतच म्हणायचं की,” तो स्वत:शीच पुटपुटला, “आपण तर कुणालाच इथं आलेलं बघितलं नाही. मग कुणी नेली असेल भाकरी? जाऊ द्या झालं. आलं असेल कुणीतरी भुकेलेलं आपलं लक्ष नसताना आणि नेली असेल त्यानं भाकरी भूक लागली म्हणून.

खरं तर  भाकरी नेली होती एका भुतानं. शेतकरी नांगरत असतानाच ते तिथं येऊन झुडपामागं लपलं होतं. उद्देश काय? तर शेतकरी जे अपशब्द बोलेल ते ऐकायचे आणि त्याचं ते पाप आपल्या मालकाला - म्हणजे प्रधान पिशाच्चाला सांगायचं, हे काम होतं त्याचं.

शेतकऱ्याला न्याहारी कुणीतरी नेल्याचं तसं वाईट वाटत होतं खरं. पण जाऊ दे झालं, असेल कुणीतरी भुकेजलेला गरीब बापडा. आपण काही एक दिवस सकाळी भाकरी खायला मिळाली नाही तर मरणार नाही. त्या गरिबाला गरज होती. खाऊ दे. भलं होऊ दे बिचाऱ्याचं.असं म्हणून मग तो जवळच्या झऱ्यावर गेला, पोटभर पाणी प्याला, जरा वेळ सावलीत लवंडला आणि मग उठून पुन्हा नांगर जुंपून कामाला लागला.

भुताची मात्र निराशा झाली. शेतकऱ्याला पाप करायला भाग पाडू शकलं नव्हतं ते. आता सैतानाकडं जाऊन काय सांगणार?

जायला तर पाहिजेच होतं. मग ते प्रधान पिशाच्च्याकडं गेलं आणि आपण कशी ती भाकरी चोरली पण शेतकरी शिव्याशाप द्यायच्या ऐवजी भलं होऊ दे बिचाऱ्याचंकसं बोलला  ते सविस्तर सांगितलं.

प्रधान पिशाच्च रागावलं. म्हणालं, “अरे मूर्खा, त्या माणसानं तुला हरवलं. यात चूक तुझी आहे. कळत नाही तुला? अरे जर सगळेच शेतकरी आणि त्यांच्या बायका अशा प्रकारे वागायला लागल्या तर आपला कारभारच आटोपला ! असं व्हायला नकोय. परत जा आणि कसून प्रयत्न कर. आणि हे बघ, मी तुला तीन वर्षांची मुदत देतो. तेवढ्यात जर तू त्या शेतकऱ्याला मार्गावर आणलं नाहीस तर तुलाच मी देवांच्या पवित्र पाण्यात बुडवून टाकीन. याद राख.

त्या कल्पनेनेच भूत पार घाबरलं. परत पृथ्वीवर जाऊन काय करावं असा विचार करत बसून राहिलं. बराच वेळ डोकं खाजवल्यानंतर त्याला एक अफलातून कल्पना सुचली. स्वत:चं रूप बदलून त्यानं शेतमजुराचं रूप घेतलं आणि त्या शेतकऱ्याकडं जाऊन त्याच्या शेतात मोलमजुरीचं काम मागून घेतलं.

पहिल्या हंगामात त्यानं शेतकऱ्याला शेताच्या पाणथळ भागात मका लावायला सांगीतलं. ते वर्ष कमालीच्या उन्हाळ्यानं भाजून निघालं. पाऊस पडला नाही. बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांची पिकं करपून गेली. फक्त या शेतकऱ्याचं पीक मात्र पाणी मिळाल्यानं भरघोस पिकलं. त्याच्या वर्षभराच्या गरजेपेक्षा जास्त मका पिकला.

दुसऱ्या वर्षी भुतानं शेतकऱ्याला शेतातल्या टेकडीवरील जमिनीत, उतारावर, मका लावायचा सल्ला दिला. ते वर्ष अतिवृष्टी घेऊन आलं. बाकी सगळ्यांची पिकं कुजून गेली पण या शेतकऱ्याचं पीक मात्र पाण्याचा निचरा झाल्यानं तरारून फुलून आलं. कणसांमध्ये चांगले टपटपीत दाणे भरले. त्या वर्षीदेखील गरजेपेक्षा खूपच जास्त मका मिळाला. त्या जास्तीच्या मक्याचं काय करायचं हे शेतकऱ्याला समजेना.

मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला.

भुतानं प्रधान पिशाच्च्याकडं जाऊन आपल्या कामाचा सविस्तर वृत्तांत दिला. मागल्या वेळेच्या चुकीची भरपाई पूर्णपणे केल्याची फुशारकीही मारली. प्रधान पिशाच्च्यानं स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायचं ठरवलं. ते शेतकऱ्याच्या घरी स्वत: अदृश्य स्वरूपात गेलं. तिथं शेतकऱ्यानं आपल्या मित्राना दारूपानासाठी बोलावलेलं होतं. त्याची बायको त्या सगळ्यांना दारूचे पेले भरून देत होती. अचानक एकाला भरलेला पेला देताना तो हिंदकळला आणि दारू सांडली. शेतकरी भडकला. बायकोला रागावून ओरडला, “काय गं? आंधळी झालेस का? नीट चालता येत नाही? ही किंमती दारू आहेडबक्यातलं पाणी वाटलं की काय तुला असं भुईवर सांडायलाआं ?”

भुतानं प्रधान पिशाच्च्याला कोपरखळी दिली, “बघितलंत? हाच माणूस होता ना जो आपल्या वाटणीची भाकरी हरवली तरी नाराज झाला नव्हता?”

शेतकरी अजूनही बायकोवर गुरकावत स्वत: दारूचं वाटप करायला लागला. तेव्हा एक गरीब शेतकरी, ज्याला आमंत्रण नव्हते असा, कामावरून घरी परत जाता जाता आत आला. सगळ्यांना हसून नमस्कार करून बसला. शेतीतल्या दिवसभराच्या कामाने थकलेला होता आणि आपल्यालाही घोटभर दारू मिळेल प्यायला अशी इच्छा होती त्याच्या मनात. वाट बघत राहिला. पण घरमालक शेतकऱ्यानं त्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि वर पुटपुटला, “कुणीही आगंतुक आला तर मी काय त्याला माझी दारू द्यायची? जमणार नाही.

हे दृश्य बघून प्रधान पिशाच्च्याला आनंद झाला. पण भुतानं डोळा मारून त्याला सांगितलं, “जरासं थांबा. बघा पुढं काय होतंय ते.

आलेले सगळे पैसेवाले मित्र आणि स्वत: शेतकरी भरपूर प्याले आणि एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लागले. ते सगळं ऐकून प्रधान पिशाच्च आणखीच खुश झालं. भुताला शाबासकी देत म्हणालं, “अरे हे लोक असेच पीत राहिले आणि एकमेकाला नावं ठेवत बसले तर लवकरच त्यांच्या मनावर आपला कबजा होईल.

एवढ्यानं काय होतंय ? अजून पुढं बघा. अजून एक एक पेला रिचवू द्यात, मग बघा कसे वागायला लागतील. आता कुठं कोल्ह्यासारखं लबाडीचं पण सावधगिरीनं बोलतायत. जरा वेळानं मग त्यांच्यातली जनावरं जागी होतील. तेव्हा आणखी मजा येईल.

सगळ्या मंडळींनी आणखी एकेक पेला रिचवला. मग त्यांचं बोलणं मोठ्या आवाजात लांडग्यासारखं आणि शिवीगाळीचं व्हायला लागलं. प्रधान पिशाच्च बघत राहिलं आणि मनोमन खुश होत राहिलं. हे एक नंबरचं काम झालं बघ.

पण भुताची खात्री होती परिस्थिती अजून हाताबाहेर जाणार याची. थांबा, थांबा. याचा कळस व्हायचाय अजून. अजून एक फेर होऊ द्या दारूचा. मग बघा. यांची डुकरंच होतील.

मग पेयपानाचा तिसरा फेर सुरु झाला. आणि सगळेच एकमेकावर लांडग्यासारखं गुरगुरत, दुसऱ्याचं ऐकता अकारण शिवीगाळी करत हातापायीवर येऊन एकमेकाना मारहाण करायला लागले. आपला शेतकरी स्वत:देखील त्यात सामील झाला आणि पिटला गेला चांगलाच.

आता पार्टी संपायला आली. मित्रमंडळी घारी जायला निघाली. कुणी एकेकटे गेले तर कुणी दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेत, गळ्यात गळे घालत, ‘तू माजा भाऊ, मी तुजा भाऊअसं बरळत निघाले. शेतकरी त्या सगळ्याना निरोप देऊन बाहेरपर्यंत पोचवायच्या प्रयत्नात स्वत: एका चिखलाच्या खड्ड्यात पडला आणि तिथंच डुकरासारखा लोळत राहिला.

प्रधान पिशाच्चाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

वारे पठ्ठे !,”  भुताची पाठ थोपटत ते म्हणालं. फार भारी काम केलंस गड्या तू. हे असं अफलातून पेय बनवून तू मागे केलेल्या चुकीचं परिमार्जन केलंस खरं. पण मला सांग हे जे काही पेय आहे त्यात काय काय मिसळलं होतंस तू? मला वाटतंय सगळ्यात आधी कोल्ह्याचं रक्त घेतलं असशील ज्यामुळं ही माणसं लबाड झाली, त्यात तू समभाग लांडग्याचं रक्त मिसळलं असशील, म्हणून ती क्रूर बनली आणि सगळ्यात शेवटी तेवढ्याच प्रमाणात घातलंस डुकराचं रक्त. त्याच्यामुळं त्याचं वागणं डुकरासारखं झालं. होय ना?”

नाही,” भूत म्हणालं. मी असं काहीच मिसळलं नाही. एवढंच केलं की शेतकऱ्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त धान्य मका - कसं मिळेल ते बघितलं. मुळात जनावरांचे गुण माणसाच्या रक्तात असतातच. पण जोपर्यंत त्याला आवश्यक असेल इतकंच धान्य तो पिकवतो तोपर्यंत हे गुण सुप्त असतात. आणि ते सुप्त असतात तोपर्यंत माणूस त्याच्या हरवलेल्या भाकरीसाठी अस्वस्थ होत नाही. पण जेव्हा त्याच्याकडे जास्तीचं धान्य मका - उरतो तेव्हा तो त्यापासून अनावश्यक असे चैनीचे  पदार्थ  बनवून जिभेचे चोचले पुरवायला बघतो. त्याच चोचल्याना मी  मार्ग दाखवला दारू पिण्याचा. आणि मग जेव्हा शेतकऱ्यानं देवाच्या देणगीपासून म्हणजे मक्यापासून दारू बनवाला आणि प्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या शरीरात असलेलं कोल्ह्याच्ं, लांडग्याचं आणि डुकराचं अशी सगळी रक्तं जागी झाली आणि त्यांनी माणसाच्या रक्तावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. माझी शंभर टक्के खात्री आहे, जोपर्यंत माणूस असा नशेचे पेय - दारू - पीत राहील तोपर्यंत तो असा पशूच बनत राहील.

प्रधान पिशाच्च्यानं भुताचं कौतुक केलं, त्याची पूर्वीची चूक माफ केली, आणि शिवाय त्याला भूतभूषणया मानाच्या पदावर बढतीही दिली.

 

 ***