Monday, July 29, 2019

-८- भिकारी

 (अंतोन चेकॉव्हच्या The Beggar या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
 
[अंतोन पावलोविच चेकॉव्ह (२९ जानेवारी १८६० – १५ जुलाई १९०४) हा रशियन अग्रगण्य नाटककार आणि कथालेखक होता. त्याने चार अभिजात नाटके लिहिली. आणि त्याच्या उत्कृष्ट कथांना वाचकांकडून, समकालीन लेखकांकडून आणि समीक्षकांकडूनदेखील  गौरवले गेले. व्यवसायाने चेकॉव्ह हा वैद्यकीय डॉक्टर होता. तो म्हणायचा, “वैद्यकीय ज्ञान ही माझी प्रिय पत्नी आहे आणि साहित्यिक ज्ञान ही प्रेयसी.”]  
 

“दया करा मालक, गरीब, भुकेल्या माणसावर दया करा. तीन दिवस झाले पोटात काही गेलं नाही मालक, कुठं धर्मशाळेत झोपायला जायचं म्हटलं तरी लागणारा रुपाया माझ्याजवळ नाही. देवाशप्पथ मालक, मी चांगल्या घरचा माणूस आहे हो. पाच वर्षं शाळामास्तर होतो एका खेड्यात. पण माझ्या वाईटावर असलेल्या लोकांनी संगनमत करून मला काढून टाकलं शाळेतनं. खोटी साक्ष दिली माझ्या विरुध्द हो त्यांनी आणि माझी नोकरी गेली बघा. आख्खं वर्ष झालं मी बेकार आहे. मालक, दया करा.”
 
लाकूडवखारवाल्या साखरपेकरानी घरात प्रवेश करत असताना मागं वळून बघितलं. अंगावरच्या कपड्यांची लक्तरं झालेला, दारुच्या नशेत असल्यासारख्या डोळ्यांचा आणि दाढीच्या वाढलेल्या खुंटांमधून करपलेले गाल दिसत असलेला माणूस फाटकाबाहेर उभा राहून हात पुढं करून बोलत होता. साखरपेकराना त्या भिकाऱ्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं. 


“आता मला नोकरी सांगून आलीय बघा मालक साताऱ्यात. पण तिकिटाला पैसे नाहीत माझ्याजवळ,” भिकाऱ्यानं पुन्हा विनवलं, “शरम वाटतेय हो मागायला, पण इलाजच नाही दुसरा मालक.” 

साखरपेकरानी त्याला आपादमस्तक न्याहाळलं. एका पायात वहाण तर दुसऱ्यात फाटका बूट, तुमानीचा एक पाय अर्ध्या चड्डीसारखा फाटलेला तर दुसरा पोटरीपर्यंत येणारा, कळकट दिसणारा माणूस बघून त्याना एकदम आठवलं कुठं बघितलं होतं त्याला आधी ते.  

“काय रे, कालच मला भेटला होतास ना अंबाबाईच्या देवळाजवळ?,” ते म्हणाले. “आणि तेव्हा शाळामास्तर असल्याचं नव्हता बोललास, शाळेतनं काढून टाकलेला विद्यार्थी आहे असं म्हणाला होतास. होय ना?” 

नाही, नाही मालक. खरं नाही ते,” चपापलेला तो भिकारी सांगायला लागला, “मी खरंच शिक्षक आहे. हवं तर मी तशी कागदपत्रं दाखवतो तुम्हाला पुरावा म्हणून.” 

“बस्स बस्स ! खोटारडा आहेस तू. नक्की तूच होतास तो, शाळेतनं काढून टाकलेला मुलगा आहे असं काल मला सांगणारा. बोल, खरंय की नाही?,” साखरपेकर म्हणाले, “छे: ! लाज कशी नाही वाटत तुला लोकाना असं फसवायला? थांब, पोलिसात तक्रारच देतो तुझ्याविरुध्द. गरीब, भुकेलेला असलास म्हणून काय झालं? अशी निर्लज्ज फसवाफसवी?” साखरपेकरांनी एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि आत जायला वळले.  

भिकाऱ्यानं फाटकाच्या खांबावर हात ठेवला आणि एखाद्या घाबरलेल्या सश्यानं बघावं तशी नजर लावत म्हणाला, “नाही मालक, मी खोटं नाही सांगत. माझ्याकडं कागद आहेत हो.” 

“कोण विश्वास ठेवील तुझ्यावर? गावकऱ्यांनी कीव करावी म्हणून मास्तर काय, विद्यार्थी काय, काही वाट्टेल ते बनशील. महा लबाड, फसवा आहेस. शी !” भिकाऱ्याची लबाडी साखरपेकरांना जिवापाड प्रिय असलेल्या तत्वांच्या विरुध्द होती. दयाळू, गोरगरिबांना मदत करण्यात हात आखडता न घेणाऱ्या, कनवाळू साखरपेकरांच्या कोमल हृदयाला त्या भिकाऱ्याच्या फसवेगिरीमुळं यातना होणं साहजिकच होतं.  

भिकाऱ्यानं जरा वेळ आणाशपथा घेत आपण खरं बोलत असल्याचं पटवून द्यायचा प्रयत्न केला आणि अखेर मान खाली घालून म्हणाला, “खरं आहे तुमचं मालक. मी शाळामास्तर नाही नि विद्यार्थीही नाही. खोटं होतं ते. मी एक बेवारशी गायक आहे. आमचा गाणाऱ्यांचा एक कंपू होता. मी गायचो त्यात. पण मग दारूचं व्यसन लागल आणि मग सगळ्यांनी मला बेवडा, बेवडा म्हणत कंपूतून हाकलून लावलं. भीक मागण्यावाचून काही दुसरा मार्गच उरला नाही मला मालक. खरं सांगून कुणी विश्वास ठेवत नव्हतं माझ्यावर. तेव्हा मग खोटं बोलायची सवय लागली. आता खोटं बोलल्याशिवाय राहवतच नाही मला. खरं बोलून उपाशी रहायचं, डोक्यावर छप्पर नाही, झोपायला जागा नाही असं जिणं जगायचं! त्यापेक्षा खोटं बोलून लोकांच्या सहानुभूतीतून जुजबी का होईना, प्राप्ती होते तिच्यावर जगायची सवय लावून घेतली. तुम्ही म्हणता ते खरं आहे मालक, पण काय करू?”      

“काय करू म्हणून मलाच विचारतोस?” साखरपेकर जवळजवळ किंचाळलेच, “काम कर. मूर्ख माणसा, काम कर आणि त्यातून कमाई कर.” 

“ठाऊक आहे मला ते मालक. काम केल्यावर कमाई होते. पण.... मला काम कुठं मिळणार हो?” 

“दीड शहाण्या, म्हातारा झाला नाहीस अजून, चांगला धट्टाकट्टा आहेस, तरुण आहेस. शोधलंस तर काम मिळेलच तुला कुठंतरी. पण नाही! तू आळशी आहेस, दारुड्या आहेस, हातभट्टीच्या घाणेरड्या दारूचा वास मारतोय तुला, आणि तरीही तुला कसली नोकरी हवी असणार ते कळतंय मला. जिथं काम नसेल आणि पगार जास्त मिळेल अशीच नोकरी हवी असणार तुझ्यासारख्या खोटारड्या, लुच्च्या लफंग्याला. दुसरं काय ! मेहनतीचं काम करणं कसं पत्करशील, नाही का?” 

कसनुसं हसून भिकारी म्हणाला, “काय बोलताय मालक? मला कामं कुठली मिळायला. उशीर झालाय त्याला. दुकानात काम बघावं तर त्यासाठी व्यापाराची कला लहानपणापासून यायला पाहिजे असते. कुठल्या कारखान्यातही काम मिळणार नाही कारण त्यासाठी लागणारं असं कुठलंही कौशल्य माझ्यात नाही. मग तुम्हीच सांगा मी काय करू?” 

“बकवास ! काही ना काहीतरी सबब सांगतोयस. लाकडं तोडू शकशील की.” 

“माझी ना नाही पण तुम्हालाही ठाऊक आहेच की मालक, आजकाल सगळे पट्टीचे लाकूडतोडे बेकार बसले आहेत ते.”

“हं ! तुझ्यासारखे कुचकामी लोक असंच बोलणार. माझ्या लाकूड वखारीत लागतील ती लाकडं फोडशील? मी देतो ते काम तुला.” 

“हो मालक, मी तयार आहे त्याला.” भिकाऱ्यानं नाईलाजानं उत्तर दिलं. 

“ठीक तर मग. चल, दिलं तुला ते काम.” साखरपेकरानी घाईघाईने घरातून त्यांच्या स्वैपाकिणीला हाक मारली, “पार्वतीबाई”. लुगड्याला  हात पुसत वयस्कर पण भक्कम अशा पार्वतीबाई बाहेर आल्या. साखरपेकरानी त्याना सांगितलं, “पार्वतीबाई, याला आपल्या वखारीत घेऊन जा आणि जळणासाठी म्हणून आणलेले लाकडाचे ओंडके फोडून ठेवायचं काम द्या.” 

भिकाऱ्यानं खांदे उडवले आणि अनिच्छेनंच पण नाईलाजानं पार्वतीबाईंबरोबर घराच्या मागे असलेल्या वखारीकडं जायला निघाला. भुकेलेला होता आणि पैसे मिळवायचे या उद्देशानं नव्हे, तर मालकाच्या बोलण्याला बळी पडलो याचं वैषम्य वाटलं म्हणून. खरं तर सकाळी सकाळीच प्यालेल्या बेवड्याचा अजून परिणाम होता त्यामुळं काम करायची तसदी घ्यायला त्याचं शरीर तयार नव्हतं. पण नाईलाज होता. 

साखरपेकर घरात गेले आणि जेवणाच्या खोलीतून दिसत असलेल्या वखारीकडे त्यांनी नजर टाकली. खिडकीजवळ उभे राहून ते वखारीत काय घडतंय याच्याकडे पाहू लागले. पार्वतीबाई आणि तो भिकारी दोघेजण घराशेजारच्या वाटेने वखारीकडे आले. पार्वतीबाईनी भिकाऱ्याला एकवार आपादमस्तक बघून घेतलं तणतणत वखारीचं दार उघडलं.  

तो ना शाळामास्तर ना शाळेतला विद्यार्थी असलेला ‘गायक’ भिकारी एका मोठ्या ओंडक्यावर बसला हाताच्या दोन्ही तळव्यांत गाल धरून. पार्वतीबाईनी वखारीतून आणून एक कुऱ्हाड त्याच्या पायाशी टाकली आणि बहुतेक त्याला शिव्या देत उभी राहिली. साखरपेकराना काय ते ऐकू येत नव्हतं.  “कजाग आहे बाई,” साखरपेकर पुटपुटले. 

भिकाऱ्यानं नाखुशीनंच एक ओंडका जवळ ओढला, आपल्या दोन पायात धरला आणि कुऱ्हाड उगारली. ओंडका सटकला आणि आडवा झाला. भिकाऱ्यानं पुन्हा एकदा ओंडका जवळ ओढला आणि त्याच्यावर सावधपणे पण हलकेच कुऱ्हाड मारायचा प्रयत्न केला. कुऱ्हाडीनं एक ढलपा देखील निघाला नाही ओंडक्याचा आणि ओंडका परत आडवा पडला. 

एव्हाना साखरपेकराना त्याच्यावर दया यायला लागली. दारू पिऊन आणि कदाचित विड्या फुंकून छाती पार पोकळ झालेल्या, ताकत नसलेल्या, कदाचित आजारीही असलेल्या माणसाला आपण हे मेहनतीचं काम करायला लावल्याबद्दल आता त्यांच त्यांनाच अपराधी  वाटायला लागलं. पण त्यातूनही त्यांच्या मनात आलं, “करू दे हे काम त्याला. त्याच्या भल्यासाठीच तर आपण ते  करायला लावतो आहोत.” खिडकीपासून बाजूला होऊन ते आपल्या कामाच्या खोलीत येऊन बसले. 

तासाभरानं पार्वतीबाईनी येऊन भिकाऱ्यानं दिलेली सगळी लाकडं फोडल्याचं सांगितलं. 

“अरे वा ! ठीक तर मग हे दोन रुपये द्या त्याला आणि म्हणावं, हे काम पसंत असेल तर दर आठवड्याला येऊन करत जा. पैसे मिळतील म्हणावं.” 

तेव्हापासून दर आठवड्याला सोमवारी तो भिकारी वखारीत येऊन लाकडं फोडून द्यायला लागला. ते काम नसेल तर वखार आणि परिसर झाडून काढायचा. साखरपेकर त्याही कामाचे त्याला पैसे द्यायचे. एकदा त्याला आपली एक जुनी विजारही दिली त्यांनी. 

असेच दिवस गेले आणि साखरपेकरानी राहतं घर बदललं. वखार आहे त्या जागेतच ठेवली पण राजारामपुरीतल्या पाचव्या गल्लीच्या कोपऱ्यावरून ते तेराव्या गल्लीत मोठ्या घरात रहायला गेले. तेव्हा घरसामान, फर्निचर वगैरे गाडीत भरून द्यायचं काम त्यांनी त्या भिकाऱ्याला संगितलं. तेव्हाही अगदी एकाददुसरी खुर्ची आणून गाडीत ठेवण्यापलीकडं त्यानं काही काम केलं नाही. त्या दिवशी तो सबंध वेळ मरगळलेलाच होता. नुसताच गाडीच्या अवतीभवती येरझाऱ्या घालत जणू काही काम करतो आहोत असं भासवत होता. सगळं सामान नव्या घरात पोचवल्यानंतर साखरपेकरानी त्याला बोलावलं आणि म्हणाले, “ हे घे तुझ्या आजच्या कामासाठीचे पैसे, तीन रुपये.  मी त्या दिवशी तुला कामं करायला लाग म्हणून सांगितलं त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतोय. दारू पिणंही कमी झालंय तुझं. काय नाव काय म्हणालास तुझं?” 

“लक्ष्मण, मालक.” 

“ठीक आहे लक्ष्मण. लिहायला वाचायला शिकलायस का” 

“हो मालक.” 

“ठीक आहे, मग तुला मी दुसऱ्या चांगल्या कामाला लावतो. लाकडं फोडायचं मेहनत मजुरीचं काम नसेल ते. शाहूपुरी व्यापारी पेठेत माझे एक मित्र आहेत अडत दुकानदार, मी चिठ्ठी देतो ती घेऊन उद्या तू त्यांच्या दुकानात जा. दुकानात गुळाच्या आवक-जावकेच्या नोंदी करायचं काम देतील तुला. पगारही चांगला देतील. नीट मन लावून काम कर. आणि हो, दारू पिणं अजिबात सोडून दे. ऐकलंस का?”  

“हो मालक. मेहरबानी मालक.” 

साखरपेकरानी मित्राच्या नावे चिठ्ठी लिहिली. मनातल्या मनात धन्य वाटलं त्याना. आपण एका गरीब पण चुकार माणसाला चांगल्या मार्गाला लावलं याचं समाधान झालं. त्या समाधानात चिठ्ठी देताना त्यांनी लक्ष्मणच्या खांद्यावर थोपटलंही आणि त्याला निरोप दिला.   

लक्ष्मणनं चिठ्ठी घेतली आणि पुन्हा एकदा “तुमची मेहरबानी मालक” म्हणून निघून गेला. त्या दिवसापासून नंतर तो कधी वखारीकडं फिरकला नाही.  

दोन वर्षं उलटली.  

साखरपेकर त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीपाशी असलेल्या रांगेत उभे होते तिकिटासाठी. लोकांनी डोक्यावर घेतलेलं नाटक होतं, सुवर्णमहोत्सवी प्रयोग होता त्या दिवशी. तिकिटासाठी दोन खिडक्या उघडलेल्या होत्या. अर्थातच दोन्हीकडे रांगा मोठ्या होत्या. एका खिडकीमधून साखरपेकरानी तिकीट घेतलं, पैसे दिले आणि रांगेतून बाहेर पडले. अचानक दुसऱ्या खिडकीसमोरच्या रांगेकडं त्यांचं लक्ष गेलं. चामड्याचं जाकीट आणि बकरी टोपी घातलेल्या एका माणसानं तिकीट घेतलं आणि तोही मागं फिरला.  

“लक्ष्मण ! लक्ष्मणच ना तू?,” साखरपेकरानी त्यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या लाकूडफोड्याला ओळखलं आणि विचारलं. “कसं चाललंय तुझं ? बरं आहे ना?”  

“चांगलं चाललंय. आता मी वकिलाकडं काम करतो. सातपुते वकील. अशीलांचे दस्तऐवज लिहून देतो. महिना शंभर रुपये मिळतात.” 

“छान छान ! देवाची कृपा. मला खूप बरं वाटलं हे ऐकून, लक्ष्मण. अरे, तू माझ्या मुलासारखाच आहेस. म्हणून मी तुला सन्मार्गाला लावलं. तेव्हा तुझ्यावर रागावलो मी, आठवतंय? धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटलं असेल तुला त्या वेळी. पण आज? माझं ऐकलंस तेव्हा म्हणून आजचा हा दिवस दिसतोय तुला. आभार मानायला हवेस तू.” 

“आभारी आहे मी तुमचा, मालक,” लक्ष्मण म्हणाला. “त्या दिवशी तुम्ही भेटला नसतात तर आज कदाचित अजूनही मी स्वत:ला शाळामास्तर नाहीतर विद्यार्थी म्हणवत भीक मागत फिरत असतो. तुमच्याकडे आलो म्हणून वाचलो मी.” 

“ठीक ठीक. मला आनंद आहे त्यात.” साखरपेकर म्हणाले. 

“एक आहे मालक, त्या दिवशी तुम्ही मला जे बोललात, जो उपदेश दिलात तो लाख मोलाचा होता. आभारी आहेच मी तुमचा.... आणि तुमच्या स्वयपाकीण बाई...... पार्वतीबाईचा. देव तिचं भलं करो. फार मोठ्या मनाची बाई. तुमचे उपकार झालेत माझ्यावर, पण मला खरं वाचवलं असेल कुणी तर पार्वतीबाईनी!” 

“पार्वतीबाईनी? ते कसं काय?” 

“त्याचं असं झालं, तुमच्या वखारीत यायचा न मी, ओंडके फोडायला, तेव्हा माझ्याकड बघून पार्वतीबाई करवादायची, “आरं बेवड्या, मेल्या, कशाला जग्तुयास? मुडदा बशिवला तुजा भाड्या ! त्यो यम बी न्हेत नाई तुला, मुर्दाडा !” आणि कपाळावर हात धरून माझ्याकडं बघत बसायची माझी कीव करत.  म्हणायची, “कसा कमनशिबी हाईस रं पिंडक्या. चांगलं ख्यायाला न्हाई का अंगाव घालायाला न्हाई. दळभद्र्या, पाप्याचं पितर झालाईस. तू काय लाकडं फोडणार? उज्जेड !” आसवं भरायची तिच्या डोळ्यात माझ्याकडं बघत असंच काय काय बोलताना. मग, मालक, ती उठायची आणि स्वत:च लाकडं फोडायची सगळी. आजवर, मालक खरं सांगतो मी, विश्वास ठेवा, इतक्या दिवसात एक सुध्दा ओंडका मी नाही फोडला. सगळे तिनंच फोडले. फोडून झाल्यावर घरातून भाजी भाकरी आणून मला खायला लावायची. आणि वर तुम्ही दिलेले पैसे माझ्या हातावर ठेऊन म्हणायची, “जा आता नीट. याद राख, प्यायचं न्हाई. पिलास तर मला कळंलच पुन्यांदा यीशील तवा. मग ही कुऱ्हाडच घालीन बग तुझ्या टक्कुऱ्यात.” तिची ही आईसारखी माया, खोल मनातून केलेला, काळजीपोटीचा, रांगड्या पण प्रेमाच्या भाषेत केलेला उपदेश ऐकूनच मला उपरती झाली असणार. काय बाई ! काय बाई !! माझ्या आत्म्यालाच हात घातला तिनं ! मग मी मनात ठाम ठरवलं इथून पुढं दारूला हातही लावायचा नाही. आणि.... शेवटच्या दिवशी तुम्ही जायला सांगितलंत ना मालक, तेव्हा आधी मी पार्वतीबाईला भेटलो. पाया पडलो तिच्या. तर माझ्या तोंडावरून हात फिरवून तिनं ‘अला बला’ केली आणि म्हणाली, “जा लेकरा. सम्बाळून ऱ्हा !” कधी विसरणार नाही मी तिला मालक.”  

दुसरी घंटा झाली आणि लक्ष्मण निरोप घेऊन नाट्यगृहाच्या प्रवेशदारातून आत गेला. साखरपेकराना भानावर यायला क्षण दोन क्षण जायला लागले. मग तेही आत गेले.  

(रंग भरण्यासाठी शेवटच्या संभाषणात मी खूपच स्वातंत्र्य घेतले आहे. मात्र संभाषणाच्या ‘आत्म्याला हात लावला नाही’. तो चेकोव्हला अपेक्षित होता तसाच ठेवला आहे.  अर्थात तरीही म्हणतो, “कॉम्रेड चेकॉव्ह, कृपा करून कुठं असाल तिथून क्षमा करा याबद्दल.”)

 

Sunday, July 21, 2019

-७- गवाक्षवाली खोली

(ओ. हेन्री यांच्या 'The Skylight Room' या मूळ इंग्रजी कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)


सुदर्शन लॉजच्या मालकीणबाई, मिसेस पालेकर सर्वात आधी मोठ्या खोल्या दाखवायच्या. दाखवताना त्या खोलीच्या ‘सद्गुणांची’ – म्हणजे हवेशीरपणा, आकार, कपाटे, बाथरूम, फर्निचर अशा सुखसोयी, आधीचा डॉक्टर भाडेकरू कसा सलग आठ वर्षे तिथं आनंदात राहून गेला वगैर वगैरे- यांची अशी काही भलामण लावत सुटायच्या की होतकरू भाडेकरूला त्यांना थांबवताच यायचं नाही. आणि तरी धाडस करून मध्येच तो, “नाही हो बाई, मी कुणी डॉक्टर किंवा डेंटिस्ट नाही, तेव्हा ही १००० रुपये महिना भाड्याची खोली मला परवडायची नाही” असं बोलू शकलाच तर पालकरबाईंच्या चेहऱ्यावर, ‘तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तशा भाड्याची खोली परवडेल अशा उच्चभ्रू व्यवसायात जाण्याइतपत शिक्षण का दिलं नसेल?’ असा कुत्सित भाव उमटायचा. 

मग त्या दुसऱ्या मजल्यावरच्या महिना ७५० रुपये भाड्याची खोली दाखवायच्या. त्यांच्या मते खरं तर तिचं भाडं ९०० होतं आणि “तुळपुळे नावाचे एक गृहस्थ तितकं भाडं दर महिन्याला अगदी वेळच्यावेळी देऊन बरेच महिने राहिले होते. अगदी त्यांच्या थोरल्या भावानं तासगावमधल्या त्याच्या द्राक्षमळ्याची देखभाल करायला आग्रहाने बोलवून नेईपर्यंत. मग एक शेवडेबाई येऊन रहायच्या  तीन तीन महिने सलग, उन्हाळ्याची सुट्टी घालवायला म्हणून. हवेशीर आणि स्वतंत्र बाथरूम होती ना ! त्याना आवडायची ती खोली.”  

पण मग भाडेकरूनं “नाही हो, याहून कमी भाड्याची आहे का एखादी?” अस्ं विचारलं की पालेकरबाई तिसऱ्या मजल्यावर शेकदार नावाचे गृहस्थ रहात असलेली खोलीकडे न्यायच्या. हे गृहस्थ नाटककार होते. दिवसभर लिहित आणि विड्या फुंकत असायचे खोलीत. त्यांच्या खोलीत खिडक्याना लावलेले कलाकुसरीचे पेल्मेट्स दाखवायला म्हणून घेऊन जायच्या खऱ्या पण खरा उद्देश असायचा की ‘नवीन भाडेकरू आणलेला असावा, तेव्हा थकलेले भाडे द्यायला हवे नाहीतर आपल्याला खोलीतून हुसकून लावणार मालकीणबाई’ अशी भीती शेकदारांच्या  मनात निर्माण करायची. अशानं शेकदार दुसऱ्या दिवशी थकबाकीतली काही तरी थोडीफार रक्कम आणून द्यायचे. 

पण भाडेकरूनं “नाही, महिना दोनशे रुपयेच्यापलीकडं भाडं आपल्याला परवडणारच नाही” असं सांगितलं तर पालेकरबाई त्याला आणखी खोल्या दाखवायला स्वत: यायच्या नाहीत. “लिंगव्वा” अशी मोठ्यानं हाक मारायच्या आणि मग लिंगव्वा नावाची ठार काळ्या रंगाची आणि दातवण लावून त्याहूनही काळे झालेल्या दाताची त्यांची मोलकरीण “बरुत्तेन रीSS (येते हो मी)” म्हणत वर यायची आणि चवथ्या मजल्यावरची छपरात गवाक्ष असलेली खोली दाखवायला त्याला घेऊन जायची.  

७ फूट X ८ फूट मापाची आणि समोरासमोरच्या दोन भिंतीना लाकडी फडताळं असलेली अशी ती खोली होती. खोलीत एक लोखंडी कॉट, एक खुर्ची, आरसा आणि वॉशबेसिन एव्हढंच ‘फर्निचर’ होतं. छपरात उजेड येण्यासाठी २ फूट X २ फूट मापाचं जाड पारदर्शक तावदान बसवलेलं गवाक्ष होतं त्यातून दिवसा निळं आणि रात्री काळं आकाश दिसायचं. 

“तुला सांग्तंय बSSग, बाई चिवाट हाय. भाडं अडीच्शाच्या खाली हुनार न्हSSई. परवाडतंSS त बग.” कानडी हेल काढत लिंगव्वा म्हणायची. 

आणि एक दिवस आश्लेषा सावे आली घर शोधत. एक जुना टाईपरायटर - जड होता तो - दोन्ही हातात पेलून धरला होता. लहानखुऱ्या चणीची, सावळी, गोल काळे पण स्वप्नाळू डोळे आणि जाडजूड लांबसडक वेणी. शरिराची उंची वाढायची थांबली होती पण केसांची लांबी नाही. ती लांब वेणी बहुधा म्हणत असावी, ”बाई ग, माझ्या पावलावर पाउल ठेवून वाढत का नाहीस तू?” 

पालेकरबाईनी पहिल्या मजल्यावरची मोठी खोली दाखवली. “बघ, या खोलीत किती मोठी कपाटं आहेत. अगदी आख्खा उभा सांगाडासुध्दा मावतो यात. नाही तर भूल देण्याची सिलिंडरं, नळ्या, अवजार, सगळी......” 

“हो, पण बाई, मी डॉक्टर नाही नि डेंटिस्ट पण नाही असलं काही माझ्याजवळ बाळगायला.” आश्लेषा अंगावर शहारा आल्यासारखं थरकापत बोलली. 

पालेकरबाईनी डॉक्टर किंवा डेंटिस्ट असू न शकलेल्या क्षुद्र व्यक्तींसाठीचा त्यांचा राखीव कुत्सित कटाक्ष टाकला आणि दुसऱ्या मजल्यावर मोर्चा वळवला. 

“साडे सातशे? बापरे, मी गडगंज श्रीमंत नाही हो! साधी, गरीब टायपिस्ट आहे. अगदी कमी भाड्याच्या जागा असतील तर दाखवा ना.” आश्लेषा म्हणाली. 

तिसरा मजला, शेकदारांची खोली. 

दारावर थाप ऐकताच शेकदार गडबडीनं उठले. त्या गडबडीत टेबलावरचा भरलेला अॅश ट्रे खाली पडली. विड्यांची थोटकं जमिनीवर विखुरली.  

“अरे..., शेकदार....., आहात होय घरात? मला जरा पेल्मेट्स दाखवायची होती याना म्हणून आले.” 

“वा. खूप छान. पण महागातली असणार ! होय ना?” छानसं हसून आश्लेषानं कौतुक केलं. 

त्या दोघी जणी दाराबाहेर गेल्यानंतर शेकदारांनी लगबगीनं त्यांच्या नव्या नाटकाच्या नायिकेचं ‘उंच, गोरी आणि खांद्यापर्यंत केस’ असं केलेलं वर्णन रद्द करून नवीन वर्णन लिहीलं....’लहानखुऱ्या चणीची, सावळी, गोल काळे पण स्वप्नाळू डोळे आणि जाडजूड लांबसडक वेणी.’ “निर्माते सोहन घाग नक्की खुश होतील” म्हणत त्यांनी नवी विडी पेटवली. 

दोघी दाराबाहेर पडताच कर्कश्श हाक गेली’ “लिंगव्वा.” 

लिंगव्वा तीन जिने चढून आली आणि आश्लेषाला चवथ्या जिन्यावरून गवाक्षाच्या खोलीत घेऊन गेली. “आडीच्शे. वाटाघाट न्हाई.”  

“चालेल. घेते मी.” आश्लेषा झोळणा झालेल्या कॉटवर बसत म्हणाली. 

*** 

आश्लेषा काम मिळवण्यासाठी रोज बाहेर जायची. संध्याकाळी परत येताना हातानी लिहिलेले कागद घेऊन यायची आणि रात्री बसून आपल्या टाईपरायटर ते टाईप करायची. कधी कधी तिला काम नसायचं तेव्हा रात्री इतर भाडेकरूंबरोबर जिन्याच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या गप्पाटप्पांत सामील व्हायची. खरं तर गवाक्षवाल्या खोलीसाठी आश्लेषाचा जन्म झालेला नव्हताच ! शवपेटीसारखी दिसणारी उदास खोली आश्लेषासारख्या उत्साही, हसतमुख, मजेशीर हळुवार आणि रोमांचक कल्पना मनात बाळगणाऱ्या जीवासाठी? छे !! उदासवाण्या, आणि एकट्याच पडून असलेल्या त्या शवपेटीचा आणि मिळून मिसळून राहाणाऱ्या आश्लेषाचा काय जोड? शेकदारांना  त्यांच्या अद्याप अपूर्ण असलेल्या विनोदी नाटकातले तीन प्रवेश तिला ऐकवायचे होते आणि तिनंही ते ऐकायला संमती दिली होती. अशी ही कुणाला न दुखावणारी आश्लेषा, त्या मनहूस खोलीत ! दैवा, किती क्रूर आहेस तू? 

आश्लेषा जेव्हा तास दोन तासांसाठी जिन्यात येऊन बसायची तेव्हा लॉजमधल्या पुरुष भाडेकरूंना आनंद व्हायचा. पण वरच्या पायरीवर बसलेल्या, म्युनिसिपालिटीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या, पिंगट केसांच्या उंच मानकामेबाई, ज्याना कुठल्याही वाक्यावर “खरं की काय?” असा उद्गार काढायची सवय होती त्या आणि सगळ्यात खालच्या पायरीवर बसलेल्या, सनराईज मार्टमध्ये काम करणाऱ्या नेमबाज कुसाळेबाई या दोघीच फक्त नाक मुरडयच्या. आश्लेषा मधल्या पायरीवर बसायची आणि सगळे पुरुष तिच्याजवळच्या मिळतील त्या पायऱ्यांवर. खास करून शेकदार. त्यांनी तर मनातल्या मनात स्वत:च्या आयुष्याच्या नाटकात आश्लेषाला नायिकेची भूमिका देऊन टाकली होती. नायक, अर्थातच तेच होते. तसेच दुसरे एक मिस्टर हविरे. ४५ वर्षांचे, चांगली प्राप्ती असलेले, लठ्ठ, आणि मठ्ठही. आणखीही एकजण, तरुण, पण सिगारेट ओढणारा जीवन म्हांब्रे. तो उगीचच कोरडा खोकला काढून तिचं लक्ष वेधून घ्यायचा, “जीवन, सिगारेट ओढत जाऊ नकोस रे” असं तिनं म्हणावं म्हणून. या तीनही पुरुषांनी तिला ‘छान, हसरी, मनमोकळी’ ठरवली होती. पण वरच्या आणि खालच्या पायऱ्यांवरची नाकं मात्र कायम मुरडलेलीच होती.5961The Skylight RoomO. Henry

***

पालेकर बाईंचे भाडेकरू त्या दिवशी रात्री नेहमीसारखेच जिन्यात पायऱ्यांवर बसले होते. आश्लेषाच्या खोलीच्या उघड्या दारातून तिच्या छपरातलं ते गवाक्षही दिसत होतं. तिनं मान वर करून त्यातून दिसणाऱ्या आकाशाकडं नजर टाकली आणि खुद्कन् हसली आणि उद्गारली, “अरे व्वा, कानडा विठ्ठलु आला की! इथूनपण दिसतोय मला.”

सगळ्यांनी माना वर केल्या, एखादं विमान दिसतंय का बघायला जे कदाचित या खुळ्या पोरीचा मित्र उडवत असेल या अपेक्षेनं. 

“नाही हो, तो तारा बघा. तो मोठा आणि चमचमतोय तो नाही. ती तर चांदणी आहे. पण तोSS तिच्या शेजारचा. स्थिर, उगाळलेल्या चंदनगंधाच्या रंगासारखा प्रकाश देतोय तो. माझ्या गवाक्षातून मी रोज रात्री बघते त्याला. मीच नाव दिलंय त्याला ‘कानडा विठ्ठलू’ असं. छान आहे नं? आमच्या पंढरपूरच्या विठोबाच्या ललाटावर कस्तुरी टिळा असतो ना, त्याचा मला भास होतो त्याच्यात म्हणून.” आश्लेषानं स्पष्टीकरण दिलं. 

“खरं की काय? मला नव्हतं बाई माहित तू ग्रह ताऱ्यांची जाणकार आहेस हे.” मानकामे बाई नाक मुरडतच म्हणाल्या. 

“अहो नाही. थोडीफार माहिती आहे इतकच.” आश्लेषा उत्तरली. 

“खरं की काय?,” मानकामेबाई म्हणाल्या, “ पण तू जो दाखवते आहेस ना तो गॅमा नावाचा तारा आहे. कॅसिओपिया नक्षत्रातला. सूर्याच्या खालोखाल त्याचा नंबर लागतो आकारात आणि त्याचा भ्रमणमार्ग.........” 

“असेल हो बाई. पण ‘कानडा विठ्ठलू’ हेच नाव छान शोभतंय त्याला.” जीवननं संधी साधली. आणि मिस्टर हविरेनी त्याला अनुमोदन दिलं, “मानकामेबाई, खगोलशास्त्रज्ञांना आहे तितकाच अधिकार आश्लेषालाही आहे ताऱ्याला नावं द्यायला.” 

“खरं की काय?” 

“शूटिंग स्टार तर नाही ना तो? आणि हो, गेल्या रविवारी मी दहापैकी नऊ टार्गेट्स शूट केली बरं का शूटींग रेंजवर !” कुसाळेनी नेम साधला. 

आश्लेषा अजून हरवलीच होती ताऱ्याकडं बघण्यात. “इथून तो तितकासा स्पष्ट दिसत नाही. माझ्या खोलीतून पहायला हवं तुम्ही त्याला. एखाद्या कोळश्याच्या खाणीतल्या खोल खोल विवराच्या तळातून वर बघताना काळं काळं आकाश आणि चमकते तारे दिसावे ना तसं दृश्य दिसतं माझ्या गवाक्षातून. विठ्ठलमूर्तीच्या काळ्या भाळावरला कस्तुरीगंधाचा टिळा,” आणि तिनं तल्लीनतेनं अभंगाची ओळ म्हटली. “कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेणे मज लावियेला वेधू.” 

*** 

काही दिवस गेले. आश्लेषाला आता कामं जरा कमी कमी मिळत गेली. या ऑफिसमधून त्या ऑफीसमध्ये चकरा टाकत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत टायपिंगसाठी पेपर्स मिळावेत म्हणून. पण आता बऱ्याच ऑफिसांनी त्यांचे स्वत:चे टायपिस्ट नेमले होते त्यामुळे सगळीकडे नन्नाचा पाढाच ऐकायला मिळे. प्राप्ती अर्थातच कमी कमी होत जवळजवळ थांबलीच. 

आणि एक दिवस वणवण फिरून रात्री आश्लेषा लॉजवर परत आली ती अगदी गलितगात्र अशी. नेहमी याच वेळी परतायची ती खानावळीतून रात्रीचं जेवण जेवून. आज जेवली नव्हती. त्यासाठीचे पैसे नव्हते तिच्याजवळ.

हॉलमध्ये पाउल टाकलं आणि हविरेमहाशयानी तिला अडवलं. संधी साधून एकटी बघून चक्क लग्नाची मागणी घातली. त्याना कसंतरी टाळून तिनं पहिल्या पायरीवर पाय ठेवला तर हविरे तिचा हात धरायला सरसावले. हात वर करून आणि असलेला नसलेला जोर एकवटून तिनं त्यांच्या श्रीमुखात ठेवून दिली आणि पटकन् जिन्याच्या कठड्याला त्याच हातानं पकडलं. हळू हळू करत आश्लेषा तिसऱ्या मजल्यावर आली. शेकदार त्यांच्या खोलीत त्यांच्या ‘साभार परत’ आलेल्या नाटकातल्या नायिकेला, मीनलला (खरं तर त्यांच्या मनातल्या आश्लेषाला) स्टेजवरची हालचाल समजावणारी ओळ लिहित होते – ‘कसलेल्या बॅलेरिनासारख्या सफाईदार गिरक्या स्वत:भोवती घेत मीनल स्टेजच्या डाव्या बाजूकडून उजव्या विंगकडे जाते’-१, २, ३, ४ स्टॉप’. कसा तरी पाय ओढत आश्लेषा जिना चढून आली आणि तिनं आपल्या खोलीचं दार उघडलं. दिवा लावायला किंवा कपडे बदलायलाही त्राण नव्हतं तिच्या अंगात. कशीतरी जाऊन कॉटवर पडली. तिची आधीचीच बारीक आणि त्यात उपासमारीनं हलकी झालेली काया त्या कॉटच्या कमकुवत  स्प्रिंगांना देखील हलवू शकली नाही.  अंधारात कॉटवर पडल्यापडल्या तिनं डोळे उघडून गवाक्षाकडं पाहिलं आणि तिच्या मुखावर हलकसं स्मित झळकलं. तिचा कानडा विठ्ठलू शांतपणे प्रकाशत होता आकाशातून तिच्याकडं बघत. छोट्याश्या गवाक्षातून येणाऱ्या त्याच्या प्रकाशाशिवाय तिच्या भोवती विश्वच नसल्यासारखा अंधार होता. त्या छोट्याशा चौकोनातून दिसणारा कानडा विठ्ठलू, आपण का त्याला हे नाव दिलं? कदाचित मानकामेबाई म्हणतात तसा तो कॅसिओपिया नक्षत्रातला गॅमाच असेल. पण नाही. त्यानं कानडा विठ्ठ्लूच असायला हवं, गॅमा नाही.  

पाठीवर झोपल्या झोपल्या तिनं दोनदा हात उचलायचा अयशस्वी प्रयत्न केला. तिसऱ्या वेळी तिनं दोन बोटं ओठांवर टेकली आणि त्यांचा फ्लायिंग किस विठ्ठलूकडं फेकला. हात त्राण नसल्यासारखा कॉटवर पडला. “चलते रे मी विठ्ठलू, निरोप घेते तुझा. तू आहेस तिकडं लक्षावधि मैल दूर माझ्यापासून. एकदाही डोळा मिचकावला नाहीस माझ्याकडं हसून बघून. पण तरी आपली ओळख झाल्यापासून मला दिसत राहशील अशी ही तुझी जागा नाही सोडलीस. कारण तुला माहित होतं, माझ्या भोवती या अंधाराशिवाय काहीच नाही ते. हो ना? पण आता मी चालले रे. काळजी घे स्वत:ची माझ्या कानड्या विठ्ठलू.”   

सकाळी दहा वाजता लिंगव्वा वर आली साफसफाईला तेव्हा तिला आश्लेषाचं दार आतून बंद दिसलं. हाका मारूनही उघडलं नाही तेव्हा तिनं बाजुच्यांच्या मदतीनं धक्के मारून ते उघडलं. कॉटवर आश्लेषा उताणी पडली होती. श्वास चालू होता पण शुध्द नव्हती. हालवलं, कांदा हुंगवला, पाणी मारलं पण काही केल्या शुद्धीवर येईना. तेव्हा कुणी तरी अँब्युलन्ससाठी फोन केला.  

थोड्या वेळातच सायरन वाजवत सुलेखा हॉस्पिटलची अँब्युलन्स सुदर्शन लॉजच्या दारात आली. तिच्यातून पांढरे कपडे घातलेला, स्टेथास्कोप गळ्यात लटकवलेला, तरतरीत, काळासाच पण हुशार दिसणारा डॉक्टर उतरून आला आणि त्यानं समोर आलेल्या पालेकरबाईना विचारलं, “तुम्ही कॉल केला होता? काय झालंय?” 

“होय होय डॉक्टर, आम्हीच केला होता कॉल. काय झालंSS आमची एक भाडेकरू, आश्लेषा सावे बेशुध्द पडली आहे तिच्या खोलीत. टायपिस्ट आहे ती. आम्ही सगळ्यानी खूप प्रयत्न केले तिला उठवायचे पण उठतच नाहीय. असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं हो माझ्या लॉजमध्ये. त्याचं काय आहेSS......” 

“कितवा मजला? खोली नंबर?” डॉक्टर पालेकरबाईंची कहाणी ऐकत थांबण्याच्या मूडमध्ये नव्हते. जराश्या जरबेच्या आवाजातच त्यांनी विचारलं आणि जिन्याकडे धावले. 

“चौथा मजला, एकच खोली आहे मजल्यावर, गवाक्षाची खोली.” 

दोन दोन पायऱ्या एका वेळी चढत डॉक्टर गवाक्षाच्या खोलीकडं धावले. पालेकरबाई सवयीनुसार सावकाश एक एक पायरी करत त्यांच्या मागून जिने चढायला लागल्या. त्या दुसऱ्या मजल्यावर पोचल्या तेव्हा डॉक्टर आश्लेषाला दोन हातांवर उचलून घेऊन घाईघाईनं खाली येताना भेटले. क्षणभर थांबून डॉक्टरांनी कॉल करण्यात दिरंगाई केल्याबद्दल तिखट शब्दात बाईंची कानउघाडणी केली आणि तडक खाली उतरले. काय चाललंय ते बघण्याच्या कुतूहलाने जमा झालेल्या सगळ्या भाडेकरूंच्या आणि इतर बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत ते पळतच अँब्युलन्सपर्यंत पोचले. आश्लेषाला तशीच हातावर घेऊन चपळाईनं ड्रायव्हरनं उघडून धरलेल्या दारातून आत शिरले आणि ड्रायव्हरला म्हणाले, “आंबिले, फास्ट. तिसऱ्या मिनिटाला पोचायला हवंस कॅजुअल्टीमध्ये.” 

*** 

दुपारी तीनच्या सुमाराला जीवन म्हांब्रे सायकल दामटत सुलेखा हॉस्पिटलमध्ये पोचला. रिसेप्शन काउंटरवर चोकशी करायला गेला. तिथल्या नर्सला त्यानं आश्लेषाचं नाव सांगून घाबरत घाबरतच “शुद्धीवर आली का ती आणि कशी आहे आता?” असं विचारलं. तेव्हढ्यात काउंटरच्या मागे पाठमोरे उभे असलेले सकाळचे डॉक्टरच वळून पुढं आले आणि म्हणाले, “आश्लेषा सावे ना? शुद्धीवर आली आहे. मीच आणलं होतं तिला सुदर्शन लॉजमधल्या तिच्या खोलीतून उचलून. दोन दिवसांपासून पोटात अन्न गेलेलं नव्हतं. उपासमार झाल्यानं ग्लानीत गेली होती. ठीक आहे आता. माझ्याकडेच आहे तिची केस. नक्की बरी होईल. काळजी करू नका. पण ताकत येईपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहील ती. वाटलं तर फोन करून तुम्ही चौकशी करू शकाल वेळोवेळी. ठीक आहे?” 

“थँक्स डॉक्टर. मी फोन करेन आपल्याला. पण आपलं नाव नाही समजलं?” जीवननं कृतज्ञतेनं विचारलं.  

“डॉ. विठ्ठल कानडे.”
 
*****

Tuesday, July 16, 2019

-६- बॅग

(हेक्टर ह्यू मन्रो – ‘साकी’, याच्या ‘The Bag’ या इंग्रजी कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

पवारसाहेब येणार आहेत बरं का चहाला,” अनुसयाबाईंनी त्यांच्या भाचीला सांगितलं. “आत्ताच गेलेत घोड्यावरनं रपेटीला उसाच्या फडांकडं. जरा नीटनेटकी तयार होऊन बस. पवारसाहेबाना गयलटपणा नाही पसंत, ठाऊक आहे नं? त्यात आज ते जरा काळजीत असल्यासारखेच दिसत आहेत असं दिसलं.” 

रिटायर्ड सुभेदार सुभानराव पवारांच नशीब तसं खडतरच होतं म्हणायचं. नशिबावर त्यांचा कंट्रोल नव्हता तसाच स्वत:च्या गरम, उतावळ्या स्वभावावरही नव्हता. चंदगड हंटर्स असोशिएशनचे आजरा तालुक्यातले मास्टर हंटर म्हणजे शिकारप्रमुख,  म्हणून त्यांनी चार्ज घेतला होता तो आधीच्या प्रमुखावर चेअरमनची खप्पा मर्जी होऊन त्याला बडतर्फ करण्यात आले त्यानंतर. पण असोसिएशनमधल्या जवळजवळ निम्म्या सभासदांचा पवारांनाही मुळातून विरोध होता आणि उरलेल्यांना त्यांनी आपल्या उतावळ्या स्वभावानं तसं जरा नाराजच करत आणलं होतं. त्यामुळं मंजूर होणाऱ्या बजेट मध्ये काटछाट होत होती आणि त्याशिवाय इतर सावजांबरोबरच उसाच्या फडांत घुसणाऱ्या कोल्ह्यांची संख्याही घटत चाललेली दिसत होती. शिकार मिळणं दुरापास्त झालं होतं. त्यामुळं पवारसाहेब चिंतेत असणं स्वाभाविकच होतं.  

पवारांच्या बाबतीत अनुसयाबाई जी आपुलकी दाखवत होत्या त्याला कारण होतं तसंच. त्यांची भाची सुनीता आता विशीत आली होती. कोल्हापुरात कॉलेजात शिकत असली तरी यंदा तिला उजवायची असं बहिणीचं म्हणणं होतं. पवारसाहेब वयानं जरा जादा आणि विधुर असले, गरम डोक्याचे, उतावळ्या स्वभावाचे असले तरी काय झालं? घरची बक्कळ शेतीवाडी, महिना जवळजवळ पाच हजार पेन्शन आणि वर असोसिएशनकडला चार हजाराच्या वर पगार. शहाण्णव कुळी मराठा गडी. पुढल्या निवडणुकीत चंदगडचे आमदारपण होतील ते अशी वदंता होती. सुनीताला यापेक्षा आणखी चांगला नवरा कुठं मिळणार आहे? हा विचार अनुसयाबाईंच्या डोक्यात बसला होता. लवकरात लवकर हे जमवून आणायचंच ही त्यांची जिद्द होती. पवारांना इष्काची इंगळी डसली होती की नाही हे माहित नाही पण आजकाल त्यांच्या अनुसयाबाईंच्या मळ्याकडे फेऱ्या वाढल्या होत्या हे मात्र खरं. गावात थोडीशी कुजबुजपण व्हायला लागली होती तशी आजकाल.   

“अगं, काल पवारसाहेबांच्या शिकारी ताफ्यात फार कमी माणसं होती म्हणे,” अनुसयाबाई सुनीताला म्हणाल्या. “कोल्हापुरातनं दोनतीन दमाचे शिकारी आणायचे नाहीस का गं त्या खुळ्या चिन्याला बरोबर घेऊन आलीस त्यापेक्षा.”

“मावशीss, अगं वांग ची खुळा नाही हं!,” सुनीता म्हणाली. “अभ्यासात हुशार आहेच शिवाय शिकारीवरही जायचा हैनान की कुठल्या तरी जंगलात असं सांगत होता. म्हणून म्हटलं येतोस का आमच्या चंदगडच्या शिकारीचा अनुभव घ्यायला तर तयार झाला पटकन् म्हणून आणलं त्याला मी बरोबर. आता भरभक्कम पैलवान गाडी नाही तो एव्हढंच! सगळे पैलवान तरी चांगले शिकारी असतातच असं तर नसतं ना?” 

“अगं सुनिते, पण त्याला तर घोड्यावरही बसता येत नाही नीट.” 

“कुठल्याच चिन्याला येत नाही घोडेस्वारी. पण शिकार तर करतो ना वांग ची?” 

“ह्हो ! कर्माची शिकार करतो. काल काय आणलं मारून? एक सुतार पक्षी ? हॅ:” 

“मावशी, विसरू नकोस, तीन कवडे आणि दोन ससेपण आणले होते त्यानं दोन दिवसांपूर्वी.” 

“अगं ह्हो, पण म्हणून काय सुतारपक्षी मारायचा शिकार म्हणून?” 

“अगं हे फॉरीनर्स असतात ना ते एकाच सावजाच्या मागं लागत नाहीत. आता बघ, गोरे असतात न, म्हणजे इंग्लंडवाले, ते माळढोक पक्षी मिळाला तर तो मारतात तसंच गिधाडदेखील मारतात. वांग चीला मी समजावलंय कुठल्या पक्ष्यांना मारणं अप्रतिष्ठित समजलं जातं इकडं ते. तसाही तो एकोणीस वर्षांचा आहे. प्रतिष्ठा म्हणजे काय ते समजत असणारच त्याला.” 

अनुसयाबाईंनी नाक मुरडलं. गावातले जो जो माणूस वांग चीला भेटला त्याला त्याला  वांग ची मधल्या उत्साहाची लागण झाली. पण अनुसयाबाईना? नाव नको ! 

“पुरे आता. येतोय बघ तो. मी किचनमध्ये जाते चहाची तयारी करायला. इथं दिवाणखान्यातच घेऊया चहा. ते टेबल आवर जरा. आणि मी आत असेपर्यंत पवारसाहेब आले तर नीट स्वागत कर त्यांचं. हसूssन. बरं का.” 

मावशी करत असलेल्या लाडांमुळं आजऱ्याच्या घरात तशी सुनीता आरामात आणि खूश असायची. पण नाही म्हटलं तरी वांग चीच्या येण्यामुळं घरात अस्वस्थता वाढली आहे याची कल्पना आलीच होती तिला. आठवड्याभराच्या सुट्टीत कंपनी म्हणून तिनं चांगला मित्र असलेल्या वांग चीला बरोबर आणलं होतं खरं. पण हा चिनी काही फारशी छाप पाडू शकला नव्हता मावशीवर. त्याला अर्थातच त्याची कल्पना नव्हती. आत्ताही वांग ची आला तो रात्री शिकारीसाठी गेला होता तिथूनच. नेहमीपेक्षा जास्तच विस्कटलेला, मिचमिचे डोळे, अस्ताव्यस्त केस, मळलेले कपडे, पण चेहरा उत्साहाने फुललेला. आणि त्याची शिकार भरून आणायची बॅग आज जास्तच भरलेली दिसत होती. 

“सू नी, ओळख मी आज काय मारून आणलंय ते.” वांग ची म्हणाला. 

“कवडे? जंगली कबुतरं? ससे?” सुनितानं विचारलं. 

“अंहं ! मोठा प्राणी आहे. त्याला तुम्ही काय म्हणता मला माहित नाही. तपकिरी भुऱ्या रंगाचा, त्याच रंगाची पण जरा गडद शेपटी.”  

“झाडावर रहातो? फळं खातो?” ‘मोठा प्राणी’ ही जरा अतिशयोक्ती असेल असं सुनीताला वाटलं. 

वांग ची हसला. “नाही नाही, माकड नाही.” 

“पाण्यात पोहतो? मासे खातो?” 

“नोss,” वांग ची बॅगेचा बंध सोडवण्याच्या प्रयत्नात लागला. “जंगलात, जमिनीवर रहातो. ससे, कोंबड्या मारून खातो.” 

सुनीता ओंजळीत तोंड लपवून मटकन खाली बसली. “अरे देवा, कोल्हा मारला यानं !” 

सुनीताची अवस्था बघून वांग चीची गाळणच उडाली. या शिकारीमुळे किती भयंकर परिणाम होउ शकतील ते समजावून सांगायचा सुनीता महत्प्रयास करत असताना आपले मिचमिचे डोळे जितके विस्फारले जातील तितके विस्फारून तो ऐकत राहिला. अवाक्षरही समजत नव्हतं त्याला. पण काहीतरी धोका असणार याची कल्पना तेव्हढी आली. 

“लपव, लपव ती बॅग आधी,” सुनीतानं बॅगेकडं बोट दाखवत ओरडून सांगितलं. “मावशी आणि पवारसाहेब कुठल्याही क्षणी येतील इथं. ती दोघं यायच्या आधी फेक ती बॅग त्या पेटीवर. तिथं नजर जाणार नाही त्यांची.” 

वांग चीनं नेम धरून बॅग भिरकावली. पण ती वजनदार बॅग दुर्दैवानं टेबलाच्या बरोब्बर वर, भिंतीवर लावलेल्या, पेंढा भरलेल्या सांबराच्या शिंगात जाऊन लटकली. आणि त्याच क्षणी पवारसाहेब आणि अनुसयाबाई, दोघेही बरोबरच दिवाणखान्यात आले. 

“सुनीते,” आणलेला नाष्ट्याचा ट्रे टेबलावर ठेवत अनुसयाबाई म्हणाल्या. “पवारसाहेब उद्याच आपल्या उसाच्या फडात लपलेल्या कोल्ह्याला हुसकावून बाहेर काढणार असं म्हणतायत. बरं होईल बाई, भिकू कातवड्यानं खात्री देऊन सांगितलंय गेल्या दोन दिवसात तीन वेळा कोल्ह्याला बघितलं तिथं म्हणून.” 

“हां ना !,” पवारसाहेब मिशांवर उलट्या पंजानं ताव देत म्हणाले. “अहो शिकारीच्या दृष्टीनं भाकड दिवसांची साखळी आता तुटायलाच पायजेलाय. आम्ही मास्टर हंटर झाल्यापासून एक सुध्दा म्हणण्यासारखी शिकार मिळाली नाही. जो तो सांगतोय कोल्हा आमक्या आमक्याच्या फडात घुसून ऱ्हायलाय भाडेकरुसारखा मुक्कामाला. पण आम्ही जातो हुसकून काढायला तर त्याचं नावनिशाण न्हाई सापडत. परवाचीच गोष्ट बघा अनुसयाबाई, बातमी आली म्हणून देसायांच्या शेतात गेलो माग काढायला तर त्याधीच कोल्हा तिथनं गायब झालेला. एक तर निसटला तरी होता न्हाइतर त्याला ट्रयाप करून कुणीतरी आधीच उडीवला तरी होता.” 

“पवारसाहेब, माझ्या मळ्यात असं दुसऱ्या कुणी घुसून कोल्हं मारलं तर मी काय त्याला अशी तशी सोडणार नाही बघा. अहो मास्टर हंटर म्हणून तुमचा मान आहे तो पहिला बार टाकायचा. ऐऱ्या गैऱ्याचा नाही.” अनुसयाबाई बोलल्या. 

सुनीता टेबलावर चहाबरोबर नाष्ट्यासाठी ताजं लोणी, कोल्हापुरी चटणी आणि भाकऱ्याची चळत मांडून ठेवण्यात गुंतली होती, म्हणजे तसं दाखवत तरी होती. टेबलाच्या एका बाजूला पवारसाहेब होते तर दुसरीकडे घाबरलेला बिचारा वांग ची. आणि वर ‘ती’ बॅग ! टेबलावरून नजर वर उचलायचीही तयारी नव्हती सुनीताची. कुठल्याही क्षणी पिशवीतून एखादा रक्ताचा थेंब टेबलावर पडेल की काय अशी धास्ती वाटत होती तिला. मावशी नजरेनं खुणावून तिला चेहरा हसरा ठेवायला सांगायचा प्रयत्न करत होती. पण सुनीताचा आटोकाट प्रयत्न चालला होता आपला होत असलेला थरकाप लपवायचा. 

“हं, मग आज काय मारून आणलंस बाबा वांग्या?” आज रोजच्यासारखा चर्पटपंजरी करत नसलेल्या वांग चीची भरती (की भरता?) अनुसयाबाई नेहमी वांग्यातच करायच्या. 

“काही विशेष सांगण्यासारखं नाही मावशी.” वांग ची कसाबसा पुटपुटला. 

मावशीचा प्रश्न ऐकून सुनीताच्या जवळजवळ थांबलेल्या हृदयानं पुन्हा एकदा ठोके देणं चालू केलं. 

“अरे, एकदा तरी तुझ्याकडं काही सांगण्यासारखं असू दे की रे बाबा. आज काल जो बघावा तो जीभ नसल्यासारखा गप्पच असतो.” 

पवारसाहेब बोलले, “बाई, अहो तो भिकू कातवडी शेवटचं कोल्ह्याला कधी बघितल्याचं म्हंटला होता आठवतंय का?”  

“काल सकाळी. गडद तपकिरी रंगाची शेपटी दिसलेली असं म्हंटला होता.” अनुसयाबाईंनी उत्तर दिलं. 

“अरे वा. मग उद्या त्या गडद शेपटाचा पाठलाग करायला मजा येईलसं दिसतंय तर.” पवारसाहेबांनी विनोद करून वातावरण मोकळं करायचा प्रयत्न केला. पण मग नाष्टा आणि चहापानात पुन्हा एकदा सगळे निमूट झाले. कपात वाजलेल्या चमच्याचा आवाज तेव्हढा ऐकू यायचा इतकी शांतता. आणि मग सुरु झालं ते दुसरंच संगीत. जॉनीचं, म्हणजे अनुसयाबाईंच्या टेरियर कुत्र्याचं भुंकणं. अचानक मोकळ्या असलेल्या खुर्चीवर उडी मारून वर बॅगेकडं बघत त्यानं असा काही भुंकायचा आणि उड्या मारायचा सपाटा सुरु केला की त्यामुळं चहापार्टी उधळली गेली.

“काय झालंय काय जॉन्याला? एव्हढा का पिसाळलाय तो आज?” अनुसयाबाई वर बघत म्हणाल्या, “वांग्या, अरे तुझीच न ती बॅग? तिथं वर काय करतीय ती. आं? काय आहे काय बॅगेत तुझ्या?” 

एव्हाना पवारसाहेब उठून उभे राहिले होते. म्हणाले, “च्या मारी, काय रे? रक्ताचा वास आला वाटतं कुत्र्याला. कसली शिकार आहे सांग तरी बाबा.” 

आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या आणि अनुसयाबाईंच्या डोक्यात एकदम ट्युबा पेटल्या. दोघंही एका सुरात किंचाळले, “तो कोल्हा मारलास तू ?” 

सुनीता घाईघाईनं त्या दोघांचा चढत चाललेला पारा खाली उतरवायच्या प्रयत्नाला लागली. पण दोघही तिचं काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत राहिले नव्हते. पवारसाहेबांच्या संतापाला तर पारावार उरला नव्हता. त्यापायी काय बोलू? किती बोलू? कसं बोलू? झालं होतं त्याना. पण शब्द फुटत नव्हते. बायका शॉपिंगला म्हणून मॉलमध्ये जातात आणि एकामागून एक नवे कपडे ट्राय करत आरशात बघत राहतात तसं ते ‘ही शिवी देऊ की ती शिवी?’ या चक्रातच अडकले होते बहुतेक. अस्वस्थपणे फेऱ्या घालता घालता समोर दिसेल त्याला खाऊ की  गिळू अशा नजरेनं बघत होते. तशात अनुसयाबाईंचे चिडखोर उद्गार आणि कुत्र्याचं अविरत भुंकणं ! वांग चीला यातलं  ढ्ढिम् सुध्दा  कळत नसल्यानं तो फक्त हातातल्या सिगरेटशी खेळत रात्री नव्यानंच ऐकलेली अस्सल मराठीतली  शिवी मोठ्या प्रेमाने पाठ करत बसला होता. बांधून ठेवलेल्या चक्री वादळासारखं घोंघावणाऱ्या पवारसाहेबाना खोलीतला फोन दिसला आणि त्यांनी तो झडप घालून उचलला. त्याच सणकेत चंदगड हंटर्स असोसिएशनच्या सेक्रेटरीचा नंबर फिरवून त्याच्याशी बोलले, “देवार्डेसाहेब, मी सुभानराव पवार बोलतोय. आत्ता या मिनटाला मी माझ्या मास्टरहंटर पोझीशनचा राजीनामा देतोय. नोंद घ्या. का म्हणून विचारू नका. देतोय म्हणजे देतोय. ब्बास झालं. पाणी गेलं डोस्क्यावरनं! ठेवतो.” अनुसयाबाईंच्या हरकाम्यानं तोवर पवारसाहेबांचा घोडा दाराशी आणला  होता. इतरांशी अवाक्षरही न बोलता घोड्यावर मांड टाकली आणि टाच मारून मास्टरहंटर रिटायर्ड सुभेदार सुभानराव पवार तिथून निघून गेले. अनुसयाबाईंचा आक्रस्ताळेपण तेव्हढा थोडा वेळ पुढं चालू राहिला. पण पवारसाहेबांच्या संतापाची सर आणि जोर त्यात नव्हता. व्हिलनबरोबरच्या हिरोनं केलेल्या तद्दन हाणामारीचा सीन झाल्यावर लगेच त्याच हिरोनं हिरॉईनबरोबर झाडाभोवती घिरट्या घालायचा सीन दिसावा तसं वाटलं. आपला आरडाओरडा एकदम पुचकट होतोय असं लक्षात आल्यावर अनुसयाबाई तणतणत कुत्र्याला फरफटत नेत दिवाणखान्याच्या बाहेर गेल्या. दिवाणखान्यात आता एकदम शांतता पसरली.  

वांग ची नं सुनीताला विचारलं, “सू नी, आता पुढं काय? काय करू त्या पिशवीतल्या शिकारीचं?” 

“पुरून टाक परसात.” सुनीता म्हणाली. 

“तसंच पुरून टाकू?” वांग ची. 

“मग? तुला काय भटाला बोलवून सोपस्कार करून पुरायचंय ते?” सुनीता तिरसटपणाने बोलली. 

वांग चीनं मुकाट्यानं परसदारी जाऊन लिंबोणीच्या झाडाखाली खड्डा खोदला आणि बौध्द धर्मात जे काही शांतीबद्दलचे मंत्र म्हणायचे असत असतील त्यातले काही पुटपुटत त्यानं त्या पिशवीतल्या मांजराच्या कलेवराला दु:खपूर्वक मूठमाती दिली.

****