Monday, June 24, 2019

-४- शरणागती


(हेक्टर ह्यू मन्रो (साकी) याच्या CANOSSA या कथेचे मुक्त मुक्त रुपांतर.)
 
व्यंकाप्पा कळसण्णावर, अट्टल गुंड संपफोड्या आज कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. गंभीर गुन्ह्यासाठी. मुणगुट्टीचेच काय, आख्ख्या राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले होते या खटल्याकडे. हो ! सत्ताधारी पक्षाचे आमदार गुटकासम्राट धनिकचंद प्रणित ‘मुणगुट्टी चाया समारंभा’ (मुणगुट्टी टी-पार्टी) च्या आदल्या दिवशी तिथल्याच कै. बसवाण्णा कलगुटगी स्मारक भवनात आग लावून ते भस्मसात केल्याचा आरोप होता त्याच्यावर. त्या समारंभात राज्याचे पर्यावरणमंत्री “चिकन हा पक्षी चिकुनगुन्याचा प्रसार करतो का’ या त्यांच्या लाडक्या प्रबंधाबद्दल उहापोह करणार होते. व्यंकाप्पाने बॉम्ब टाकायची वेळ अगदी विचारपूर्वक निवडली होती. स्मारकभवन भस्मसात झाल्यानंतर चाया समारंभा बेमुदत पुढे ढकलला गेला. परंतु इतर बरेच राजकीय कार्यक्रम तसे पुढे ढकलणे शक्य होणार नव्हते. त्यातलाच एक म्हणजे  विधानसभेची मुणगुट्टी मतदारसंघातली पोटनिवडणूक. खटल्याच्या निर्धारित निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ही निवडणूक व्हायची होती. आणि विरोधी पक्षाने तर जाहीर धमकीच दिली होती की ‘व्यंकाप्पा कळसण्णावरला जर तुरुंगवासाची शिक्षा झाली तर सरकारी पक्षाच्या उमेदवाराची आम्ही ‘वाट लावणार’ हे नूरू प्रतिशत (शंभर टक्के) नक्की समजावे’. आता, दुर्दैवाने, व्यंकाप्पा दोषी ठरणार यात काही शंकाच नव्हती. त्यानं स्वत:च गुन्ह्याची कबुलीही दिली होती. आणि वर निगरगट्टपणे गुरकावलेही होते की वेळ आली तर तो अशाच आणखी दुसऱ्या ठिकाणांमध्येही आगी लावणार आहे. व्यंकाप्पाने जाणूनबुजून आणि हेतुपूर्वक ती आग लावली नव्हती असा ग्रह न्यायमूर्तींचा होण्याचा प्रश्नच नव्हता. प्रश्न हा होता की  व्यंकाप्पाला कोणत्या मुद्द्यावर निर्दोष म्हणून सोडायचा. अर्थात, कोर्टाने काहीही शिक्षा दिली तरी नंतर राज्यापलाकडून माफी देववून ती रद्द करून घेण्याचे प्रावधान होते हे खरे आहे, पण सरकारच्या दृष्टीने तशी माफी देण्याची वेळ येऊ न देणे हेच योग्य ठरणार होते. निकालाच्या आदल्या संध्याकाळी अशी माफी दिली तर ती शरणागती आणि देण्यात चालढकल केली तर मते फुटून पराभव, हीदेखील विरोधकांसमोर शरणागतीच अश्या दुधारी तलवारीला तोंड द्यावे लागणार होते सरकार पक्षाला. म्हणूनच खचाखच भरलेले कोर्ट काय किंवा दोन्ही पक्षांची कार्यालये काय, सगळीकडेच निकालाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती. 

न्यायमूर्ती चेंबरमधून बाहेर येऊन स्थानापन्न झाले आणि प्राथमिक कामकाज झाल्यानंतर त्यांनी निकाल सांगायला सुरुवात केली.  

“सादर करण्यात आलेले पुरावे, आरोपीचा कबुलीजबाब, सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांची प्रतिपादने या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून हे कोर्ट निकाल देत आहे की आरोपी व्यंकाप्पा कळसण्णावर याच्यावर कै. बसवाण्णा कलगुटगी स्मारक भवनात आग लावून ते भस्मसात केल्याचा आरोप सिध्द झाला आहे. तथापि शिक्षा सांगताना हे कोर्ट मुणगुट्टीमध्ये उद्या होणार असलेल्या  महत्वाच्या पोटनिवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आणि संभवत: उद्भवणारी अशांति व असुरक्षेची परिस्थिती यांचा विचार करून.........”  

“म्हणजे,” सरकारी वकील अधीरतेने उठून उभे रहात म्हणाले, “आरोपीला निर्दोष सोडले जाणार  आहे ना?” 

न्यायमूर्ती निर्विकारपणे त्या चिथावणीखोर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत शांतपणे म्हणाले, “हे कोर्ट आरोपीला सात दिवसांच्या कैदेची शिक्षा फर्मावत आहे.”  

अर्थातच राजकारणात न्यायमूर्ती सरकारी पक्षाच्या बाजूचे नव्हते.  

निकाल संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी जनतेला कळवला गेला. साडेपाच वाजता लोकांचा मोठा जमाव जोरजोरात घोषणाबाजी करत सरकारी कार्यालयासमोर हजर झाला. त्यांची घोषणा होती, “निवू वेंकटाप्पावन्नू वंदु दिना जेलीनल्ली इरिसिदारे, नावु निम्मविरुध्द हद्नेंदुनूरू मतदारारिगे मत हाकुत्तैवे.”  (“एक दिवससुध्दा व्यंकप्पाला तुरुंगात टाकाल तर आम्ही पंधराशे मतदार एकगठ्ठा तुमच्या विरोधात मतदान करू.”) 

“बापरे, पंधराशे,” सरकारी पक्षाचे जिल्हाप्रमुख हताशपणे म्हणाले, “अरे आपले मताधिक्य तर १३००चेच होते गेल्या वेळी. म्हणजे ही सीट आता गेलीच ना हातची?”  

“साहेब, उद्या सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात व्हायची आहे,” प्रचारप्रमुख उत्तरले, “व्यंकाप्पाला सकाळी सातच्या आत बाहेर काढले पाहिजे.”  

“साडे सात पर्यंत ! उगाच आपण घाई करतो आहोत असे वाटायला नको.” जिल्हाप्रमुख सावधगिरी दाखवत म्हणाले. 

“ठीक आहे. मात्र साडेसातपेक्षा जास्त उशीर व्हायला नको, मी प्रचार कार्यकर्त्याना आश्वासन देऊन बसलोय “व्यंकाप्पा कळसण्णावर सुटले” असे फलक लावायला सुरुवात करायची मतदान सुरु व्हायच्या आधी म्हणून. हे झाले तरच आपला उमेदवार जिंकू शकेल.”   

रातोरात पक्षाच्या उच्चाधिकारसमितीशी  फोनाफोनी झाली व्यंकाप्पासाठी माफी जाहीर करणारे परिपत्रक निघावे म्हणून. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाप्रमुख आणि प्रचारप्रमुख कार्यालयातच कँटीनमधून ‘उपाहारा’ मागवून बसले. उच्चाधिकार समितीने तातडीने रवाना केलेल्या आणि रातोरात येऊन व्यक्तिश: स्वत: व्यंकाप्पाला तुरुंगातून सोडवण्यासाठी गेलेल्या गृहसचिवाची प्रतीक्षा होती. एवढ्या सकाळीही बाहेर रस्त्यावर माणसे जमायला सुरुवात झाली होती आणि “हद्नेंदुनूरू मतदारारू” च्या घोषणाही ऐकू यायला लागल्या होत्या. 

“साहेबरु, थोड्याच वेळात या निदर्शकांना सुटकेची बातमी कळेल आणि मग आपल्या पार्टीचा जयजयकार करायला लागतील बघाs म्हणतो कि मीss.” प्रचारप्रमुख म्हणाले. 

मिनिटभरातच गृहसचिव घाईघाईने आले. त्यांचा चेहरा चिंतातुर दिसत होता. 

“ते येणार न्हई म्हणते कीss.” गृहसचिव कसेबसे बोलले. 

“येणार नाही? तुरुंगातून बाहेर येणार नाही? काय सांगता काय?” 

“ह्हुं. व्यंकाप्पा म्हणतो वाजंत्री म्हंजे ब्रास बँडशिवाय तो बाहेर येणार नाही. तो म्हणतो आजवर प्रत्येक वेळी तुरुंगातून सुटताना ब्रास बँड वाजवत मिरवणुकीनेच तो बाहेर आला आहे. ब्रास बँड नसेल तर तो एल्लारू संपूssर्णवागी अल्ला (अजिबात म्हणजे अजिबातच) तुरुंग सोडणार नाही.” 

“ठीक आहे, पण हा बँड त्याच्या पाठीराख्यांनी, त्याच्या मित्रांनी आणावा ना !” जिल्हाप्रमुख म्हणाले; “अपराधी कैद्याला बँडबाजा वाजवत तुरुंगातून बाहेर आणणे आपल्या पक्षाच्या आचारसंहितेत बसत नाही शिवाय निवडणूकखर्चाच्या बजेटात तो खर्च दाखवणार कसा?” 

“त्याचे पाठीराखे म्हणतात बँडबाजा, संगीत आपल्या पक्षानेच पुरवायला हवे. ते म्हणतात व्यंकाप्पाला तुरुंगात तुम्ही टाकले ना? मग तुम्हीच त्याला त्याच्या मानमरातबासहित वाजतगाजत बाहेर आणायला पाहिजे. वाजंत्री नाही तर आमचा व्यंकाप्पा बाहेर येणार नाही.”
 
टेलिफोनची घंटी कर्कश्श किंचाळली. “मतदान पाचच मिनिटानी सुरु होते आहे. कळसण्णावर सुटले की नाही? अजून का नाही?” पक्षाच्या उच्चाधिकार कार्यालयातून  आलेला फोन होता तो. प्राचारप्रमुखानी फोन खाली ठेवला आणि निर्वाणीच्या स्वरात म्हणाले, “हे बघा. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्याची ही वेळ नाही. बँड आणि वादक आपल्याला पुरवलेच पाहिजेत. आपण तर आपण ! पण व्यंकाप्पाला ब्रास बँड दिलाच पाहीजे. त्याशिवाय गत्यंतर नाही.” 

“हो, पण आता या क्षणी कुठून आणायचा ब्रास बँड?” गृहसचिव त्राग्याने म्हणाले, “मिलिटरी बँड काही आपण पुरवू शकत नाही. आणि तो मिळालाच तरी व्यंकप्पा तो स्वीकारणार नाही.” 

प्रचारप्रमुख म्हणाले, “दुसरा कुठला वाजंत्रीताफा मिळणे कठीण आहे. सगळ्या वाद्कांचा संप चालू आहे, माहित आहे न? या संपातून मार्ग काढता येईल का?” 

”पाहतो काही करता येते का या बाबतीत.” गृह सचिव म्हणाले आणि फोनकडे वळले. 

आठ वाजले. बाहेरच्या जमावातून येणाऱ्या घोषणांचा स्वर आता जास्त तीव्र झाली होता: ”नावू विरुध्दअभ्यार्थीगे मता हाकुत्तैवे” (आम्ही विरोधी उमेदवाराला मत देऊ). 

नऊ वाजता आलेल्या निरोपावरून जाणवले विरोधी उमेदवाराचे मतदार जास्त संख्येने मतदान केंद्रांवर येत आहेत. 

दहा वाजले. जिल्हाप्रमुख, प्रचारप्रमुख, गृह सचिवधिकारी आणि इतरही काही कार्यकर्ते तुरुंगाधिकाऱ्याच्या ऑफिसात दाखल झाले. व्यंकाप्पा कळसण्णावरला आणले गेले. व्यंकाप्पा मख्खपणे हाताची घडी घालून उभा राहिला आणि हे सगळे अजीजीच्या सुरात त्याची मनधरणी करायला लागले. पण त्याचे एकच पालुपद होते, “ब्रास बँड नाही तर आपण बाहेर येणार नाही.”  

यांच्याकडे तर बँडची काही सोय होत नव्हती. मिनिटन् मिनिट महत्वाचे होते. मतदानकेंद्रांवरून मिळणारे चित्र काही उत्साहजनक नव्हते.  

अखेर प्रचारप्रमुखाने तुरुंगाधिकाऱ्यालाच धाडस करून विचारले, “साहेब, तुमच्याकडेच काही वाद्ये असतील का हो तुरुंगाच्या मालकीची? ढोल, झांजा, बिगुल अशांसारखी जी कुणीही वाजवू शकेल?” 

“आमच्याकडे वाद्ये आहेत, वॉर्डन लोकांचा वादक जथाच आहे गाणी बजावणी करणारा. पण तुम्हाला माहित आहेच आम्ही त्यांना बाहेर पाठवू शकत नाही ते.” तुरुंगाधिकारी उत्तरले. 

“हरकत नाही साहेब, तुम्ही आम्हाला वाद्ये द्या उसनी. एवढी मेहरबानी करा. बाकी आम्ही बघून घेऊ.” उतावीळपणाने प्रचारप्रमुख आणि जिल्हाप्रमुख दोघेही एकदमच बोलले. 

वाद्ये मिळाली. 

कार्यकर्त्यांपैकी एकाला बासरी जुजबी वाजवता येत होती तर दुसऱ्याला बिगुलाचा आवाज काढणे जमले. प्रचारप्रमुख स्वत: ढोल गळ्यात बांधून वाजवायला तयार झाले तर आणखी एकजण झांजा वाजवायला उभा राहिला. 

“कोणते गाणे वाजवायचे व्यंकाप्पा?” जिल्हा प्रमुखांनी विचारले. 

मिनिटभराच्या विचारानंतर व्यंकाप्पा बोलला, “ते, आत्ता पॉपीलर आहे न ते....”नानु इदन्नु माडल्लु बयसलिल्ला, एंदिगु बयसुवुदिल्ला” (मला हे करायचे नव्हते, अजिबात करायचे नव्हते) हे गाणे वाजवायचे बघा. मग मी येतो बँडच्या मागोमाग.” 

अवघड होते. पण अनेकदा लाउडस्पीकरवरून सगळ्यांनी ऐकले होते त्यामुळे, कशीतरी ओढाताण करत का होईना, वादकांनी ह्या गाण्याचा ठेका धरला आणि त्या ठेक्यावर पावले टाकत कैदी व्यंकाप्पा कळसण्णावर रुबाबात तुरुंगातून सुटून बाहेर आला.  

खरं तर गाण्याचे बोल कैद्याच्या अपराधाशी संबंधित नाही पण सरकारी पक्षाकडून त्याला तुरुंगात टाकण्याच्या संदर्भातच लागू होत होते नाही का? एवढं करूनही, ते करण्यात झालेल्या उशिरामुळे असेल कदाचित, सरकारी पक्षाचा उमेदवार एक्कावन, म्हणजे अगदीच थोड्या फरकानी हरला. शिवाय कामगार संघटनेकडून ‘सरकारी पक्षाच्या अधिकाऱ्यांनीच वादकांचा संप फोडला’ हा ठपका ठेवला गेला ते वेगळेच.  

विधानसभेतली एक सीट गेली पण सरकारी पक्षाला एक फायदा मात्र नक्की झाला - शरणागती केव्हा आणि कशी पत्करायची हे समजले.
*****
 

 

Monday, June 17, 2019

-३- राजवीरप्रसाद जाधव

व्हिक्टर ह्यू मन्रो (साकी) यांच्या ‘Hyacinth’ या मूळ इंग्रजी कथेचे मुक्त मुक्त रूपांतर
(साकी (हेक्टर ह्यू मन्रो)
एच् एच् मन्रो’ आणि ‘साकी’ या टोपण नावांनी जास्त ओळखला जात असलेला, सित्वे-म्यानमार (ब्रह्मदेश) इथे जन्मलेला हा ब्रिटीश लेखक त्याच्या चाणाक्षपणाच्या, मिश्कील आणि कधीकधी भेसूर अशा, त्या काळच्या एडवर्डियन समाजाची आणि संस्कृतीची खिल्ली उडवणाऱ्या, कथांमुळे प्रसिध्द होता. लघुकथा लिहिण्यात पटाईत असलेल्या या लेखकाची नेहमी ओ हेन्री, डोरोथी पार्कर यांच्याशी तुलना केली जायची. त्याच्यावर ऑस्कर वाइल्ड, लुईस कॅरोल आणि रुड्यार्ड किप्लिंग यांचा प्रभाव होता तर ए. ए. मिलर, नोएल कोवर्ड, पी. जी. वुडहाउस हे साकीच्या प्रभावात होते. साकीच्या लघुकथा त्या काळाच्या प्रथेप्रमाणे अगोदर वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायच्या आणि मग संकलित होऊन पुस्तक रूपात यायच्या. असंख्य लघुकथांव्यतिरिक्त त्याचे The Watched Pot या नावाचे एक  नाटक, दोन एकांकिका, The Rise of the Russian Empire या नावाचा इतिहासाचा आढावा, The Unbearable Bassington या नावाची लघुकादंबरी, The Westminster Alice या नावाची ‘अॅलीस इन वंडरलँड’ वरील विडंबन मालिका, जर्मनीचं ब्रिटनवरील आक्रमण आणि कबजा हे काल्पनिक कथानक असलेली A Story of London Under the Hohenzollerns हे पुस्तक अशी साहित्यसंपदा आहे. साकी १४ नोव्हेंबर १९१६ रोजी ब्युमॉण्ट-हॅमेल (फ्रान्स) मध्ये मरण पावला.)

राजवीरप्रसाद जाधव
 
"प्रमिलादेवी, उमेदवाराच्या लहान मुलांना निवडणूक प्रचारात उतरवायचं ही प्रथा आता चांगली रुळलीय हे खरंय,” नणंद उर्मिलाबाई म्हणाल्या; “त्यामुळं निवडणूक प्रचाराच्या धुमाळीतला कडवटपणा जरा कमी होतो आणि शिवाय मुलांना पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल असा एक अनुभव मिळतो. पण तरीही तुम्हाला सांगू का? भानुप्रसाद दादाना म्हणाव पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही राजवीरला नेऊ नका प्रचाराला.”
 
“काय सांगताय तुम्ही ननंदबाई? राजवीरप्रसादना न्हाई जाऊ द्याचं त्यांच्या पप्पांच्या प्रचाराला? का? अवोss, सत्ताधारी पार्टीचा उमेदवार बुलबुले वकील त्याच्या तीन तीन मुलाना उतरवनार आहे प्रचारात. त्यांच्या पार्टीचं निवडणूक चिन्ह गाढव जोडी आहे म्हणून ती पोरं रोज दोन धट्टीकट्टी  गाढवं जुंपल्याली गाडी घेऊन त्यांचा प्रचार करत फिरनार मतदारसंघात. मग आमच्या पार्टीनं आमच्या सायबांच्या - भानुप्रसाद जाधवांच्या - प्रचारात त्यांच्या राजवीरना फिरू दिलं तर काय बिघडंल? आमच्या पार्टीची घोषना काय हाय? ‘सध्या राज्य पोलीसदलात फक्त लाठ्या दिल्यात त्या ऐवजी रायफली द्या, पोलिसाना जादा अधिकार द्या’ एवढंच मागणं आहे आमचं. मग आमच्या राजबिंड्या राजवीरना पोलीस कमिशनरचा ड्रेस घालून फिरिवलं प्रचारात तर लोकांमध्ये छाप पडंल का न्हाई?” मिसेस प्रमिलादेवी जाधव म्हणाल्या. 
 
“अहो प्रश्न राजवीर कसा दिसेल त्याचा नाही. तो कसा वागेल याचा आहे. तो आहे तरतरीत, गोड मुलगा, सगळं मान्य. पण त्याच्यात वेळी अवेळी उफाळून येणारा भांडखोरपणा आहे त्याचं काय? मागं त्यानं बुलबुले वकिलांच्या धाकट्या मुलाचं काय केलं होतं आठवतंय? तुम्ही विसरला असाल पण मला चांगल आठवतंय.” - उर्मिलाबाई. 

“मी तवा बावड्यात न्हवते. कानावर काईकाई आलं हुतं. थोडं थोडं आठवतंय. राजवीरप्रसाद खोडकर हुते जराजरा. पन अवो आठ वर्षांचे म्हंजे ल्हानच हुते न त्या वक्ताला?” – प्रमिलादेवी.  

“तुम्ही लाडानं त्याच्यासाठी खास बनवून घेतलेला बोकडाचा छकडा हाकत होता तो. रस्त्यात बुलबुले वकिलांच्या घरातली आया त्यांच्या छोट्या जय- जयकिसनला बाबागाडीत बसवून फिरवताना दिसली. राजवीरच्या अंगात काय संचारलं कुणास ठाऊक, त्यानं जो आपला छकडा बेफाम उधळवला तो थेट बाबागाडीवरच. बाबागाडी उलटली. जय बिचारा अडकला तिच्याखाली. आया छकडा आणि बोकड याना बाबागाडीवरून ओढून बाजूला काढत होती तर राजवीर कमरेचा पट्टा काढून जयच्या पायांवर सपासप मारायला लागलेला.” – उर्मिलाबाई. 

“राजवीर आगदी बरोबरच हुते असं न्हाई म्हनायचं आमाला,” प्रमिलादेवी म्हणाल्या. “पन अवो बुलबुलेच्या घरच्यांनीबी कवातरी कायतरी केल्यालं असनार, राजवीरमध्ये आशी खुन्नस जागी हुयाला.” 

“नाही हो. कुणीतरी राजवीरला बोललं होतं फॉरेन रिटर्नड बुलबुलेंची मुलं अर्धी इंग्रज आहेत म्हणून. म्हणजे वडील भारतीय पण आई इंग्लंडमधली ख्रिश्चन अशी. आणि त्या दिवशी शाळेत इतिहासाच्या तासाला सांगितलं गेलं होतं म्हणे की भारतीयाना गुलामासारखे वागवायचे इंग्रज, ‘काला आदमी, कुत्ता, सुव्वरका  बच्चा’ म्हणत त्यांच्यावर अत्याचार करायचे. ते ऐकून इंग्रजांबद्दलची चीड राजवीरच्या मनात घर करून राहिली म्हणतात. बाबागाडीच्या प्रकरणानंतर मी समजावून सांगायचा प्रयत्न केला की इंग्रज केव्हाच परत गेलेत आणि आता भारत आणि इंग्लंड या दोन देशांत वैर राहिलेलं नाही म्हणून आणि शिवाय बुलबुले वकिलांची मुलं अर्धी इंग्रज असली तरी अर्धी भारतीय आहेतच न.  तर मलाच सांगायला लागला की तो जयमधल्या अर्ध्या इंग्रज भागालाच बडवत होता. भारतीय भाग तर बाबागाडीखाली अडकलेला होता म्हणून. आता यावर काय म्हणायचं? त्यामुळं मला भीती वाटतेय निवडणुकीचा प्रचार करताना बुलबुलेंवर ‘इंग्रज बाईशी लग्न करणारा फितूर’ म्हणत हल्ला करेल की काय !” – उर्मिलाबाई. 

प्रमिलादेवी राजवीरचा बचाव करण्यासाठी म्हणाल्या, “न्हाई हो. तवा किती ल्हान हुते राजवीर. आता मोठ्ठं झाल्यात, जास्त समज आलिया त्येंच्यात.” 

“राजवीरसारखी मनोभूमिका असलेल्या माणसांचं वय वाढल्यावर त्यांच्या माहितीतले विषय फक्त वाढतात. समज किंवा सारासारबुध्दी नाही.” उर्मिलाबाईनी शेरा मारला. 

“तुम्ही गप्प बसा वो ताई. आमचे राजवीर रस घेनार प्रचारकार्यात. नवीन सूट शिवून घ्येतलाय आमी त्येंच्यासाटी, निळ्या रंगाचा. आमच्या पार्टीचा अधिकृत रंग निळा आहे ना, म्हनून. खाकी वर्दीपेक्षा थोडा येगळा दिसेल पन कॅप, छडी आनि मेडल्सनी कसर भरून काढली जाईल. त्येंच्या डोळ्यातबी निळसर झाक हाय ना. मस्त दिसतील ते एकदम. आता मतमोजनी होईपर्यंत दमून जातील हे मात्र खरं ! पन चालायचंच” – प्रमिलादेवी. 

“हं: ! कुणाकुणाला नैतिकतेपेक्षा दिखाऊपणा महत्वाचा वाटतो तो असा !” उर्मिलाबाई स्वत:शीच पुटपुटल्या आणि मग बोलल्या, “ आपलं नातं आहे म्हणून सांगते हो, निवडणुकीत काही वावगं झालं तर माझे शब्द लक्षात ठेवा म्हणजे झालं.” 

पन्हाळा-बावड मतदारसंघाच्या निर्वाचित आमदाराच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होत होती. दोन पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी पक्षाचे बुलबुले वकील आणि विरोधी पक्षाचे भानुप्रसाद जाधव. लढत अटीतटीची होती. पण मतदान योग्य प्रकारे आणि शांतपणे पार पडलं. तसं म्हटलं तर बुलबुले लोकप्रिय होते. पण सत्ताधारी असलेल्या त्यांच्या पक्षाच्या सरकारवरला लोकांचा विश्वास डळमळलेला होता.  गेल्या विधानसभा निवडणुकीत २६५जागा मिळवून जुजबी बहुमत मिळालेलं होतं तेही सरकारच्या नाकर्तेपणामुळं गमावण्यासारखी वेळ आलेली होती. दोन्ही पक्षांना विजय आपल्याला मिळेल असे वाटत होते. पण खात्री नव्हती, भरवसा वाटत नव्हता.  दोन्ही पक्षांच्या  प्रचार मोहिमांमध्ये मुलांच्या सहभागानं मतदारांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. बुलबुलेंची तीन मुलं  जय, वीरू-वीरभद्र आणि बल्लू-बलविन्द्र त्यांच्या प्रचारात सामील झाली होती आणि आपल्या पक्षाचे मोठे मोठे बॅनर्स लावून सजवलेल्या गाढवांच्या गाडीतून फिरत होती. “आपलं मत कोणाला? गाढवांच्या  जोडीला”, “पन्हाळा-बावड्याचा आधार कोण? बुलबुलेसाहेब ! दुसरं कोण?” अशा त्यांच्या घोषणा होत्या. तर भानुप्रसांदाचा प्रचार राजवीर करत होता. तसे त्याचे बाकीचे पाच भाऊही होतेच, पण प्रभाव एकट्या राजवीरचा पडत होता म्हणा ना. प्रचार बंद होण्याच्या दिवसाअखेरपर्यंत राजवीर अगदी शांतपणे, संयमाने आणि पध्दतशीरपणे मतदारांना भेटत होता, मत भानुप्रसादानाच देण्याविषयी विनवत होता. त्याचे आपल्या वडिलांचा दूत म्हणून मतदारांबरोबरचे होणारे संभाषण अगदी एखाद्या देवदूताने देखील धडा घ्यावा असे आर्जवपूर्ण  होते. 

मतमोजणीचा दिवस उजाडला. त्या दिवशी राजवीर स्वत: होऊन जवळजवळ डझनभर पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या निरिक्षणाखाली बुलबुलेंच्या मुलांना भेटला. त्याना आपल्या हाताने मिठाई दिली आणि म्हणाला, “आयका रं, आपन येगयेगळ्या पक्षांचे रंग मिरवत असलो कनैss तरी आपल्यात वैर ठिवाय्चं न्हाई. आपली जवान पिढी ! मैत्रीनं ऱ्हाऊया. काय?” गाढवजोडीच्या गाडीत बसलेल्या तिघांनी अवाक् होऊन पण दिलदारपणे मिठाई स्वीकारली. या संपूर्ण प्रसंगात दोन्ही पक्षांचे साक्षीदार कार्यकर्ते खूष होते. एकट्या उर्मिलाबाई गप्प होत्या. स्वत:च्या डोळ्यांनी बघत असूनही या अशक्यप्राय गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. 

मतमोजणी शेवटच्या काही मतांपर्यंत आली होती. गेले कित्येक दिवस दोन्ही उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेल्या श्रमाचं फळ मिळायची वेळ जवळ येत होती. या क्षणाला दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकड्यात फारसा फरक नव्हता इतकी अटीतटीची होणार होती ही निवडणूक. फक्त काही तास आणि नंतर विजेत्याकडून मिठाई वाटली जाणार होती.  आणि पराभूताकडून? “आम्ही आमच्याकडून प्रयत्नांची शिकस्त केली होती.” “हरलो असलो तरी अगदी थोड्या मतांनी.” “पण आमची तक्रार नाही. काहीही गडबड घोटाळा, हेराफेरी झाली नाही. आम्हाला मत देणाऱ्या मतदारांचे आम्ही आभार मानतो.” अशा वाक्यांची पेरणी होणार होती. दोन्ही बाजूंच्या प्रचारक मुलांनी अगदी अहमहमिकेनं आपली जबाबदारी पार पाडली होती. 

मुलं? आहेत कुठं ती? आत्ता कुठं लोकांच्या ध्यानात आलं की गेला तासभर बुलबुलेंचे जय, वीरू, बल्लू, आणि भानुप्रसादांचा राजवीर कुठं दिसले नव्हते. गेलीत कुठं ही चारी मुलं? दोन्ही कुटुंबियांनी आपापल्या पक्षाच्या निवडणूक कार्यालयांकडं कार्यकर्त्याना पिटाळलं चौकशी करायला. तिथंही नव्हती. मतमोजणीकेंद्रासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या आया हैराण झाल्या. उर्मिलाबाईसुध्दा ! आणि इतक्यात प्रमिलादेवीना फोन आला ..... राजवीरचा. मतमोजणीचा निकाल लागला का म्हणून विचारायला. 

“कुटं हायसा तुमी राजवीर? आनि बुलबुले वकिलांची मुलं कुटं हाईत?” प्रमिलादेवीनी उलट प्रश्न केला. 

“मम्मी आमी रमणमळ्यात फडतरेच्या हाटेलात हाय. च्या पितोय.” 

“अवो, काई खाल्लंत का? की निसता च्याच पितायसा? उपाशीच फिरत हुत दुपारपास्न? पित्त हुयाचं अशानं.” 

“खाल्लं मम्मी, मिसळपाव, एक्स्ट्रा कट आणि पावाचे चार स्लाईस खाल्ले. माजा  शेलफोन बंद पडलाता हो म्हनून आदी फोन न्हाई केला. आता हाटेलातल्या फोनवरनं बोलतोय.” 

“त्ये ठीक हाय. पन अवेळी मिसळ खातान जास्ती कट आनि एक्स्ट्रा पाव खाऊ नये. आजारी पडशिला अशानं. बरं बुलबुलेची मुलंबी हाईत ना तुमच्यासंगट?” 

“न्हाई. ती पांडऱ्या डुकरांच्या कोंडवाड्यात हाईत.” 

“डुकरांच्या कोंडवाड्यात? कंच्या? आनि कशापाई?” 

“अहो मम्मी, ती तिगंबी माझ्याबरुबरच हुती. मीच म्हन्लं त्येना च्या प्याला जाऊया आमच्या जीपमधनं म्हनुन.  पन वाटंवर जीवनराव भांदिगऱ्याचं डुक्कर पैदास केन्द्र लागलं. त्येच्याकडची  एक गब्दुल डुकरीण व्याली आणि धाss पोरं झालीत तिला. मग आदी ती पोरं बघुया म्हनून नेलं त्येनास्नी. ” 

“मग?” 

“मग काय.  कोंडवाड्यात आतल्या रिंगणात असलेल्या डुकरिणीला मी पावाचे तुकडे टाकून भाएरच्या रिंगणात याला लावलं. तंवर बुलबुल्याची पोरं आतल्या रिंगणातच ऱ्हायली हुती डुकरिणीचा पोरवडा बगत.  मग मी झट्शिरी मधलं दार लावून घेतलं आणि कोंडलं तीन पोराना धा पोरांच्या बरूबर.” 

“अरे द्येवा. राजवीर, अवो काय केलंसा तुमी हे? त्या तिगांना कोंडवाड्यात येकटं सोडून आलासा?” 

“मम्मी, येकटं कुटं? अजून दहा हाईत ना त्येंच्यासोबत. आधी ती तिघं भिऊन सटपाटली हुती कुंपणाच्या आत आनि रडून आरडत हुती बाहेर काडा म्हनत. पन अहो भायेरच्या रिंगणात ती डुकरीण त्यापरास जास्त चिडली हुती तिच्या पोरांपासून तिला तोडलं म्हनून. आत जायला धडका मारत हुती मधल्या दारावर. आणि एकदा आत गेली की बुल्बुल्याच्या पोरांची धडगत न्हवती. पार राडा करून सोडला असता तिनं त्यांचा. दुसऱ्या दारानं काडू शकतो मी त्येनास्नी बाहेर. पन आताच न्हाई काडनार. मतमोजनीत त्यांचा बाप हरला तर काडीन. तो जिकला तर मग डकरिणीचं दार उघडून तिला आत सोडीन त्या तीन पोरांचा चिक्कूल करून सोडाय.... म्हनून तुम्मास्नी इचारलं मतमोजनीचा निकाल कदी लागनार म्हनून.” 

इतकं बोलून राजवीरनं फोन कट केला. 

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एक तर आपापल्या घरी तरी गेले होते किंवा जे थोडे हजर होते ते मतमोजणी कार्यालयात गुंतले होते. पण तरीही प्रमिलादेवीनी राजवीरचा हा प्रताप आपल्या पतीला म्हणजे भानुप्रसाद जाधवाना आणि बुलबुले वकिलांना कळवला तेव्हा तातडीने ते दोघे कार्यालयातून उठून बाहेर आले आणि मग प्रमिलादेवी, उर्मिलाबाई, ते दोघे उमेदवार आणि त्यांचे दोन तीन मित्र भांदिगऱ्यांच्या डुक्कर पैदास केंद्राकडे धावले. डुकरिणीचं भीतीदायक डुरकावणं आणि तीन अधिक दहा अशा तेरा पोरांच्या किंचाळ्या पैदासकेंद्राचा नक्की पत्ता अगदी बिनचूक देत होत्या. बाहेरच्या कुंपणाच्या आत चिडून वेडीपिशी झालेली डुकरीण आत जायच्या दरवाज्याला धडका देत होती तर त्या दाराला लावलेल्या कडीचा रॉड बाहेरून काढता येईल अशा मोक्याच्या ठिकाणी राजवीर बसून होता. त्याचा पोलीस कमिशनरचा सूट आता विस्कटलेला मळलेला वाटत होता आणि त्याच्या डोळ्यातल्या मूळच्या बालिशपणाची जागा अट्टहासातल्या क्रौर्यात घेतलेली होती. 

“तुमच्यापैकी येकानं जरी जवळ याचा प्रयत्न केला कनै तर मी डुकरिणीला आत सोडन.” त्यानं ओरडून सांगितलं. 

“समजावणं, विनवणं, धमकावणं, गयावया करणं सगळं काही बुलबुले आणि भानुप्रसाद यांनी आणि त्यांच्याबरोबर आलेल्यांनी केलं पण राजवीर त्यांचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. 

“बुलबुल्यानं इलेक्षन जिकली तर मी डुकरिणीला आत सोडणार. माझ्या पप्पांच्या विरोधात हुभं ऱ्हायल्याबद्दल  धडा शिकीवनाराय मी त्येला.” 

“राजवीर म्हणतो तसं करेल. मला काहीही शंका नाही वाटत,” उर्मिलाबाई म्हणाल्या. “मिठाई दिलेली बघितली तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती.” 

बुलबुले पुढ झाले. कसलेले  राजकारणी असल्यानं बेधडक खोटं बोलायची  सवय होतीच. बोलले, “अहो असं काय करता राजवीर? मी सांगतो ना तुम्हाला, तुमचे पप्पाच आलेत निवडून, बहुमतानं.” 

“ओss बुलबुले, एक नंबरचं खोटारडं हायसा. अजून मोजनी सपल्याली नाही. म्हाइत हाय मला. माझ्या दोस्ताला बशिवलय मी मोजनीकेंद्रात माझी रायफल दीऊन. पप्पा जिकले तर दोन बार आणि तुम्ही जिकला तर येकच बार काढायचा आसं सांगितलंय त्येला. आईक्लं का? आता बोला.” 

परिस्थिती हाताबाहेर चालली. “डुकरिणीला बेशुध्द करायचं औषध घाला कसं तरी करून.” भानुप्रसाद बुलबुलेंच्या कानात कुजबुजले. 

कुणीतरी धावत जाऊन उघड्या असलेल्या फार्मसीमधून गुंगीचं औषध आणलं, पाव आणले आणि ते पाव औषधात भिजवून डुकरीण असलेल्या कोंडवाड्यात फेकले. पण राजवीरनं डाव ओळखला आणि जवळच पडलेला एक मोठासा अणकुचीदार दगड उचलून नेम धरून डुकरिणीला मारला. त्यासरशी डुकरीण चवताळली आणि जास्तच थयथयाट करायला लागली. त्यात त्या पावांचा चिखल होऊन गेला. 

आता कुठल्याही क्षणी मतमोजणीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. बुलबुले वकील आपल्या जीपमध्ये बसले आणि तडक मोजणी कार्यालयात गेले. त्यांचा एजंट सुहास्य मुद्रेने बाहेर आला आणि दारातच त्यांच्या कानात बोलला, “साहेब, तुमी जितनार बगा नक्की. आकरा मतांनी आगाडीवर हैसा आणि आता फकस्त कायतरी सत्तर ऐंशी मतं मोजायची ऱ्हायल्यात.” 

“मला जिंकायचं नाहीय,” बुलबुले घोगऱ्या आवाजात गरजले. “काय पण कर आणि इथून पुढं आपल्याला जी मतं पडतील ती बाद करायला लाव मोजणी अधिकाऱ्याला. काय झालं तरी मी जिंकता कामा नये.” 

‘च्या मारी, ह्ये काय आक्रीत म्हनावं?’ एजंटच्या मनात प्रश्न उठला. पण तरीही बुलबुले वकिलांच्या सांगण्याप्रमाणं त्याना मिळालेल्या प्रत्येक मतावर शंका घेऊन ते बाद ठरवायसाठी तो झगडायला लागला. तेही इतक्या जोशात की विरोधी पार्टीनंदेखील तितका जोश दाखवला नसता. मोजणी अधिकाऱ्याला पण काही समजेना. तरीही शेवटची तीस मत मोजायची उरली असताना बुलबुले सात मतांनी आघाडीवर राहिलेच. 

इकडे कोंडवाड्याजवळ लोक अस्वस्थ झाले होते. कुणीतरी डुकरिणीला गोळी घालायची टूम बोलून दाखवली. पण कुणाच्या हातात बंदूक दिसली तर क्षणाचाही विलंब न लावता राजवीर डुकरिणीला आत सोडेल ही दाट शक्यता होती तरीही एकजण गावात कुणाकडं बंदूक मिळते का ते बघायला धावला. पण वेळ कुठं होता तेव्हढा? कुठल्याही मिनिटाला निकाल जाहीर होईल अशी वेळ आलेली होती. 

एकाएकी मतमोजणी केंद्रातून जल्लोष ऐकू आला. भानुप्रसाद जाधवांनी अखेरचा उपाय म्हणून कोंडवाड्याच्या राखणदाराचा भाला घेतला आणि जीवावर उदार होऊन डुकरीण असलेल्या भागात उडी घ्यायच्या तयारीत पुढं आले. 

इतक्यात “ठ्ठोss” असा बंदुकीची गोळी झाडल्याचा एक आवाज घुमला. राजवीरनं डुकरिणीला आत सोडण्यासाठी दरवाजाच्या कडीला हात घातला. 

“ठ्ठोss” दुसरा बार झाला. 

तोच हात मागं घेऊन राजवीरनं पिलावळीच्या कुंपणाचा दरवाजा उघडला, “या रss, या, सुक्काळिचच्यानो, या भाईर. आमचे पप्पा जिंकले म्हणून सोडतो तुमाला. पन ध्यानात ठेवा, हितून फुडंss, आमचे पप्पाच काय जाधवांच्या पैकी कुनीपन इलेक्षनला उभं असंल तर तिथं तुमचा बा बुलबुले, आनी तुमी पोरं, कुनीबी आसपास फिरकायचं न्हाई. कळ्ळं काय? न्हाईतर आमच्याशी गाठ आहे हे वळखून ऱ्हावा.” 

निकाल जाहेर झाल्यानंतर पराजित उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करत फेरमोजणीची मागणी केली.  पण तरीही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला बहुमत मिळालं आहे अस सिद्ध करता आलं नाही. तरी वातावरणात एकंदरीत कटुता पसरली हे मात्र खरं. 

“आता पुन्ना कदिबी राजवीरना निवडणूक प्रचाराला लावनार नाही.” प्रमिलादेवी हताशपणे म्हणाल्या. 

“असं नका म्हणू वैनीसाहेब,” उर्मिलाबाई म्हणाल्या. “पुढची सार्वत्रिक निवडणूक असेल ना तेव्हा बिहार राज्यात पाठवा त्याला. तुमच्या पार्टीच्या प्रचारात हमखास उपयोग होईल. तिथल्या राजकारणात असला प्रचार राजमान्य आहे म्हणतात.”

******