(ओ
हेन्री हा अमेरिकन लघुकथाकार होता. त्याच्या कथांचा अंत बऱ्याच वेळा अगदी
अनपेक्षित असा असायचा. त्याच्या काळात लोक त्याला ‘अमेरिकेचा गी-द-मोपासॉ’ म्हणून
नावाजायचे. तशा या दोघांच्याही कथावस्तूंच्या अखेरीस एक प्रकारे धक्कादायक वळण असण्याचे साम्य
असायचे. ओ. हेन्री त्या अंतापर्यंत घेऊन जायचा तो अगदी खेळकरपणाने. त्याची
वर्णनशैली चाणाक्षपणाची, म्हणून जास्ती रंजक असे. त्याच्या बहुतेक कथा तत्कालीन
म्हणजे २०व्या शतकातील वातावरणातील आणि सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असत. ओ.
हेन्रीच्या बऱ्याच कथांवर तयार केल्या गेलेल्या चित्रपटांनी कमालीची लोकप्रियता
मिळवली आहे. वैयक्तिक जीवनात मात्र पहिल्या बायकोचा अकाली मृत्यू, दुसरीपासून
घटस्फोट, बेकारी, आर्थिक गुन्ह्यांबद्दल तुरुंगवास, व्यसनाधीनता – मद्यपानाचा
अतिरेक वगैरे गोष्टीना तोंड द्यावे लागले. त्याचा मृत्यूही याच अतिरेकापायी
जडलेल्या व्याधींमुळे वयाच्या केवळ ४७व्या वर्षी झाला.)
कलानगरी नावाचं गाव. गावात पश्चिमेला एक
वस्ती होती लालवाडी. वस्तीला असं नाव असायला कारणही होतं. तिथली सारी घरं लाल
चिऱ्यांनी बांधलेली होती. मग ते घर बैठं असो की दुमजली तिमजली वाडा. अस्वस्थ,
चंचल, काळ जसा येतो आणि सरून जातो तशासारख्याच
क्षणभंगुर असणाऱ्या भाडेकरूंची वसाहत होती लालवाडी. शेकडो घरं असूनही
विस्थापितांसारखी भटकी माणसं ! एका घरातून दुसऱ्या घरात; दुसऱ्यातून तिसऱ्यात; घरं
बदलत फिरणारी, मनानेही चंचल ! विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तशी पुठ्ठ्याच्या
खोक्यांमध्ये आपला संसार भरून बरोबर वागवायची.
साहजिकच आहे की त्या गावातल्या घरांकडे
त्यांच्यात राहून गेलेल्या हजारो माणसांच्या हजारो चित्तरकथा असणार ! हां, बऱ्याचशा
कदाचित अगदी पाणचट असू शकतील; पण त्यात किमान एखादी तरी भटक्या भुताची असणारच नाही
का?
अशाच एका संध्याकाळी, म्हणजे अंधार
पडल्यापडल्या एक तरूण माणूस त्या लालगावात रहाण्यासाठी घरं धुंडाळत होता. दारावरची
घंटी वाजवायचा, दाखवलं तर घर आत जाऊन बघायचा आणि पसंत नाही म्हणत परत फिरायचा.
अकरा घरं बघून झाली. आता बाराव्या घराच्या दाराशी आला होता. घर नाही, एक मोठा
तीनमजली वाडाच होता तो. बंद असलेल्या दाराशी त्यानं हातातलं सामानाचं खोकं खाली ठेवलं,
चेहऱ्यावरची आणि टोपीवरची धूळ झटकली आणि दारावरची घंटी वाजवली. कुठंतरी लांब, खूप
खोलात वाजल्यासारखा क्षीण आवाज आला ती वाजताना.
दार उघडायला आली ती घराची मालकीण. एखादी
गलेलठ्ठ झालेली अळी आपल्या कोशात असलेले सारे काही खाऊन फस्त करून त्या रिकाम्या
कोशात भरण्यासाठी एखादा चविष्ट प्राणी शोधीत असावी अशी भावना होत होती तिला बघून.
तरुणानं विचारलं, “जागा मिळेल का हो रहायला भाड्यानं?”
“या की, आत या.” खरखरीत, कर्कश्श वाटेल अशा
आवाजात मालकीण म्हणाली. “वरल्या मजल्याव्ली एक खोली हाय बगा खाली. मागल्या बाजूला हाय
पण सजीव्ल्यालीच हाय. पलंग, सोफा, आरसा, ग्यासची चूल, झालंच तर टेबल, खुर्ची, कपाट
सगळं काई हाय तिच्यात. मागल्या आठवड्यातच खाली झालीया. बगतासा?”
तिच्याबरोबर तो जिना चढून गेला. उजेड
बेताचाच होता. जिन्याच्या पायऱ्यांवर कधीकाळी घातलेलं कार्पेट म्हणजे ज्या मागावर
विणलं त्या मागानंच तिरस्कारानं झटकून फेकलं होतं की काय असं होतं. त्यातही दमट
ओलसरपणामुळं कुबट, शेवाळल्यासारखं झालं होतं. पायाला चिकटत होतं म्हणा नं ! प्रत्येक
टप्प्यावर भिंतीत कोनाडा होता. कधीकाळी त्यात घरात वाढणारी रोपं लावली असावीत आणि
आता ती वाळून किंवा दमट हवेनं कुजून मरून गेलेली असावीत. भिंतीतल्या खिळ्यांवर
देवांचे फोटोही लटकवलेले असण्याची शक्यता आहे. पण आता बहुतेक सैतानानं ते तिथून
काढून भिरकावून दिलेले असावेत कुठंतरी गर्तेत.
“हां, ही बगा खोली,” मालकीणबाई बोलली. “हाय
न्हवं झकास? कदी खाली ऱ्हाईत न्हाई. येकाला लागून येक भाडेकरू येत्यातच हितं
ऱ्हायला. लई चांगले भाडेकरू ऱ्हायलेले हुते बगा गेल्या मोसमात हितं. काय बी तरास
न्हाई. भाडंबी आगाऊच दिल्यालं हुतं समदं येकरकमी. सुलक्सनादेवी आनी त्येंचा
लग्नाचा न्हवरा शिरीराम पाटील. व्हय. आवो सुलक्सनादेवी म्हंजे नाटकातलं नाव वो.
खरी नावं येगळीच असत्यात नाटकवाल्यांची. सगुना पाटील हुत्या त्या खऱ्या. हां !
..... अवो, पान्याचा नळ हितं हाय बगा. आनि ग्यास त्योss तितं. लै सोयीची हाय बगा
खोली. मी सांगतीया ना, कदीबी खाली ऱ्हाईत न्हाई.”
“नाटकवाले जास्त येतात का हो तुमच्याकडे रहायला?”
तरुणानं विचारलं.
“येत्यात आन् जात्यात. व्हय, जास्ती करून
नाटकवाले येत्यात. का म्हनून विचारा? आवो हितं गावात दोन थेटरं हाईत न्हवं मोट्टी.
म अॅक्टरं अॅक्टरनी येनारच की ! आनि जास्त ऱ्हाईतबी न्हाईत. मोसम सप्ला की ग्येली.
मला माजं भाडं मिळतंय. ती आपली येत्यात आन् जात्यात, येत्यात आन् जात्यात.”
जागा पसंत पडली. एक आठवड्याचं भाडं आगाऊ
देऊन टाकलं त्यानं. “ही चावी घ्या.” म्हणून मालकीणबाई जायला निघाली तेव्हा गेले
कित्येक दिवस सगळ्याना विचारात असलेला प्रश्र्न त्यानं त्याना पण विचारला, “का हो,
एक तरुण मुलगी, इला वैष्णवी नाव असलेली, आली होती का कधी तुमच्याकडे रहायला? संगीत
नाटकात काम करायची, चांगली गायिका होती. गोरीशी, मध्यम उंचीची, सडपातळ अंगलट
असलेली मुलगी, तिच्या डाव्या भुवईच्या टोकाशी खाली एक ठळक काळा तीळ होता. आली होती
का कधी?”
“न्हाय बा. आसलं नाव काय आटवत न्हाई. आणि
तसंबी अॅक्टरनी आपली खरी नावं कुटं लावत्यात? येत्यात, ऱ्हात्यात आन् जात्यात
येवडंच. न्हाय, मला तर काय आटवत न्हाई अशी कुनी बाई आल्याचं.”
नाही, नाही आणि नाही ! गेल्या पाच महिन्यांच्या शोधात केवळ हाच शब्द ऐकायला
मिळाला होता त्याला. किती दिवस घालवले होते सगळीकडे चौकशी करत फिरताना ! नाटकांचे
ठेकेदार, एजंट, कलाकार, म्युझिकवाले, किती किती तरी जणांकडे चौकशी केली होती
त्यानं इतक्या दिवसात. खरं खरं प्रेम होतं त्याचं तिच्यावर. म्हणूनच तो ती घरातून
निघून गेल्या दिवसापासून इतका कसोशीनं शोध घेत होता तिचा. आणि त्याची खात्री होती
याच गावात कुठंतरी असणार ती म्हणून. पण कुठं?
त्या ‘सजवलेल्या’ खोलीनं आजच्या या ‘उतारू’
चं स्वागत एखाद्या दमणूक झालेल्या नायकीणनं जितक्या मरगळलेल्या उत्साहानं करावं
तितक्याच उत्साहानं केलं. खोलीत त्याला
मिळू घातलेला ‘आराम’ तिथल्या वाळवी लागलेल्या फर्निचरमध्ये, सोफ्यावरल्या
जीर्णशीर्ण अभ्र्यामध्ये, लंगड्या खुर्च्यांमध्ये, पारा उडालेल्या आरशामध्ये, रंग
उडालेल्या दोन फोटो फ्रेम्समध्ये आणि गंजलेल्या लोखंडी पलंगामध्ये दिसून येतच
होता.
भाडेकरू हताश, निर्विकारपणे शून्यात बघत
खुर्चीत बसला. खोलीतला भोवताल बाहेरच्या गोंगाटातही जणू काही आजवरच्या भाडेकरूंचं
कोडकौतुक ऐकवत होता त्याला. खोलीत असलेल्या इतर ‘सजावटी’च्या गोष्टींमध्ये होते मळलेले
जीर्णशीर्ण जाजम, भिंतींवर टांगलेल्या, रंग उडालेल्या चित्रांच्या आणि
नटनट्यांचे फोटो असलेल्या तसबिरी, तोकड्या
पडद्याआड असलेली शेगडी, शेगडीवर आणि आजुबाजूला दोनचार भांडी, टेबलावर बहुधा
आधीच्या भाडेकरुची विसरलेली औषधाची बाटली आणि विखुरलेला पत्त्यांचा जोड. जिथे जिथे
नजर पडेल तिथे तिथे आधीच्या भाडेकरूंच्या खुणा आता दिसून यायला लागल्या. आरशाच्या
समोर पडलेल्या हेअरपिन्स, आरशावर लिपस्टिकने लिहिलेले नाव ‘सुमन’, टिकल्या, या
मुली किंवा बायका येऊन बसून गेल्याच्या खुणा तर भिंतीवर उठलेल्या डागांची
सूर्यफुले तिच्यावर फेकून फोडलेल्या ग्लासाचे किंवा बाटलीचे स्मरण करून देत
होत्या. भाडेकरूंनी व्यक्त केलेला संताप म्हणा की नैराश्य म्हणा, खोलीतला भोवताल
या सगळ्यांचा साक्षीदार बनला होता. टेबल खुर्च्यांच्या चिरफाळ्या निघाल्या होत्या
तर सोफ्याच्या गादीतल्या स्प्रिंगा वर आलेल्या होत्या. जोडीने आलेल्यांच्या पाशवी
प्रेमाच्या खुणा होत्या तशाच त्यांच्यामध्ये झालेल्या लाथाबुक्क्यांच्या
भांडणांच्याही होत्या. या सगळ्या उद्रेकांचा राग बिचाऱ्या वास्तुदेवतेवर निघालेला होता
जणू. तात्पुरतं का होईना ‘घर’ म्हणाले होते ते तिला. पण खरंच, कितीही झालं तरी ते
त्यांचं स्वत:चं घर थोडंच होतं? स्वत:च्या मालकीचं घर असेल तर ते झाडून लोटून
स्वच्छ ठेवलं जातं.
खुर्चीत बसून मनातल्या विचारांना स्वैर वाहू
देत असलेल्या तरुणाला शेजारच्या खोल्यांतून येणारी फिदिफिदी हसणी, रडणी, कुजबुजी,
चढलेले स्वर, भाषणांची पाठांतरे, असे नाना प्रकारचे आवाज ऐकू यायला लागले. वरच्या
मजल्यावर कुणीतरी बँजोच्या तारांमधून आर्त सूर काढत होता. कुठेतरी दार आपटल्याचा
आवाज तर खाली कुंपणापलीकडे बेवारशी मांजराचा मियाऊं ! खोलीच्या उच्छ्वासाचा
बुरशीचा वास त्याच्या श्वासातून फुफ्फुसात शिरत होता.
आणि अचानक खोलीत कुठूनतरी चाफ्याच्या
फुलांचा वास आल्याचं जाणवलं. वाऱ्याचा झोत
आला असावा आणि त्यावर स्वार होऊन तो सुगंध जिवंत होऊन आला असावा असं वाटलं.
कुणीतरी हाक मारत आहे असा भास होऊन तो मोठ्यानं ओरडला, “काय ग?” आणि झटकन
खुर्चीतून उठून उभा राहिला. त्या वासानं त्याला जणू काही लपेटून टाकलं. त्या
वासाला स्पर्श करायला त्यानं हात पुढं केला. हा काय प्रकार आहे? वास कोणाला हाक
कशी मारेल? वास होता की आवाज? जे काही होतं त्यानं स्पर्श केला होता त्याला आणि
कुरवाळून घेतलं होतं खरं ! इलाच्या आवडत्या अत्तराचाच हा वास. तिच्या प्रत्येक
लहान सहान गोष्टींची त्याला सवय झालेली होती. मग तिच्या आवडीचा चाफ्याचा वास कसा
विसरेल तो? पण तो या खोलीत कुठून आला? “ती आली होती या खोलीत ? नक्की !” तो
ओरडला.
खोली तर अस्ताव्यस्त होती. बाईच्या अस्तित्वाच्या
आतापर्यंत दिसलेल्या खुणांत हेअरपिनाच काय त्या होत्या. पण त्या तर सगळ्याच बायका
वापरतात. टेबलाच्या खणात एक छोटा घामट वासाचा हातरुमाल मिळाला. पण तो इलाचा असणं
शक्यच नव्हतं. चाफ्याच्या अत्तराचा वास नव्हता त्याला. काही तुटलेली बटनं, एका नाटकाच्या प्रयोगांचं वेळापत्रक,
थोडे चणे, स्वप्नात दिसणाऱ्या शकुनांबद्दलचं पुस्तक आणि एक काळा सॅटीनचा हेअरबँड.
हेअरबँडनं त्याला थोडसं थबकायला लावलं. पण “छे, इला असली स्वस्तातली गोष्ट वापरणं शक्य नाही. तिची ही खूण नाहीच
नाही”.
सुंघत सुंघत माग काढत जाणाऱ्या कुत्र्यासारखं
फिरला तो खोलीभर. भिंती चाचपल्या, सोफा बघितला, टेबलाचे खण, जाजम, कोपऱ्यातलं कपाट,
पडदे, सारं सारं काही पुन्हा पुन्हा तपासलं तिच्या अस्तित्वाच्या पुराव्यासाठी. काही
आढळलं नाही. “पण ती आहे, इथं, माझ्या मनात, माझ्या भोवती, वर, खाली, बाजूला, मला
बिलगते आहे, साद घालते आहे”, आणि पुन्हा
एकदा तो ओरडला, “हो गं राणी !” विस्फारलेल्या डोळ्यांनी साद आलेल्या दिशेला त्यानं
पाहिलं. पण कुणीच नव्हतं तिथं. चाफ्याचा वासच काय तो दरवळत होता. त्या वासाला कसा
असेल आवाज? बिलगायला कसे असतील हात? देवा, हे काय आहे? सुगंधाला आवाज आणि स्पर्श
कधीपासून मिळाला ?
खोलीचा प्रत्येक कोनाकोपरा, फट अन् फट
त्यानं धुंडाळली पण बाटल्यांची बुचे, सिगारेटांची थोटके याच गोष्टी सापडल्या. शिवी
हासडून त्यानं ती थोटकं पायानं चुरगळून टाकली. खोली अगदी या टोकापासून त्या
टोकापर्यंत चाळून घेतल्यासारखी तपासली त्यानं. इलाला सोडून इतर अनेक कलंदर भटक्या
उतारूंच्या, या ना त्या वेळच्या अस्तित्वाच्या खुणा सापडत होत्या. जिला शोधत होता,
जी तिथं येऊन गेल्याचं प्रकर्षानं जाणवत होतं, इतकंच नव्हे तर जी अजूनही तिथं
घुटमळते आहे याची खात्री वाटते आहे त्या त्याच्या इलाचा मात्र त्या सुवासापलीकडं काहीच सुगावा लागत नव्हता.
पुन्हा एकदा घरमालकिणीशी बोलावं असं त्याला
वाटलं आणि जिन्यावरून धावतच तो तळमजल्यावर आला. एका बंद दारामागून उजेडाची तिरीप
येत होती. त्यानं दरवाजा ठोठावला. मालकीण बाहेर आली. अधीरता लपवायचा जमेल तितका
प्रयत्न करत तो म्हणाला, “बाई, माझ्या आधी कोण इथं रहात होतं ते सांगाल का पुन्हा
?”
“मगाशी सांगितलं हुतंच की, पन पुन्यांदा
सांगतो, सुलक्सनादेवी नि शिरीराम पाटील, म्हंजी सगुना पाटील आनी शिरीराम पाटील.
न्हवरा बायकू हुती. आवो मी धुरपदा संकपाळ, अशी तशी मालकीण न्हाई. खात्री करून
घेतल्याबिगर कुनाला जागा दित नसतो. म आशुक माशुक ? नावच सोडा. आवो, जोडीनं आली तर
अदुगर लग्नाचा दाकला दावायला लावती मी. हां !”
“त्या सुलक्षणादेवी कशा होत्या हो ? म्हणजे
दिसायला कशा होत्या?”
“रंगानं काळी, खांद्यापावतरचा ब्वाबकट केल्याली,
थोराड बांद्याची बाई हुती सगुना. आणि चेरा म्हन्शिला तर काईच्याबाईच हुता. येक
आटवड्यामागंच जागा खाली करून गेली दोगं.”
“आणि त्या जोडप्याच्या आधी?”
बगाss, एक शिंगल मानुस हुता. ल्वांड्रीत काम
करायचा. एक आटवड्याचं भाडं बुडवून ग्येला भाड्या. त्येच्या आदुगरला चौदरीबाई आणि
तिची दोन मुलं हुती. चार महिने ऱ्हायली. तेन्च्याबी आदुगर एक ढवळे नावाचा बापई सा
म्हैने ऱ्हाऊन ग्येला. म्हणजे एक साल झालं का? त्येच्या आदुगरचं काई आटवत न्हाई
बगा.”
बाईचे आभार मानून तरुण परत वर खोलीत आला. आता
खोली मृतवत होती. तो चाफ्याचा सुमधुर वास आता येत नव्हता. बुरसटलेला कुबट असा
आतल्या फर्निचरचा वास भरून राहिला होता.
पिवळट उजेडाच्या दिव्याकडं बघत सुन्नपणे
खुर्चीत बसून राहिला. त्याच्या आशांवर पाणी पडलं होतं निराशेचं. जरा वेळानं कसल्या
तरी तिरिमिरीत उठला आणि चाकू घेऊन अंथरुणावरला पलंगपोस फाडायला लागला. झालेल्या
चिंध्या दाराच्या, खिडकीच्या, सगळीकडच्या फटींमध्ये दाबून बसवल्या, आणि खोली
संपूर्णपणे बंद झाल्याची खात्री पटल्यानंतर सिलिन्डरचा गॅस पूर्णपणे चालू करून आणि
दिवा विझवून पलंगावर निर्विकारपणे पडून राहिला.
*
* * *
* * *
* *
आजच्या रात्री समोरच्या घराची मालकीण
रुक्मिणी साळुखे हिची पाळी होती बेवडा पाजायची. जवळच्या रेशन दुकानाच्या मागे
असलेल्या चोरट्या हातभट्टीतून संध्याकाळीच खंबा घेऊन आली होती ती. वाड्याची मालकीण
द्रौपदीबाई संकपाळ आणि ती, दोघी विधवा तशा बेवडेबाजच. रुक्मिणी खंबा घेऊन
द्रौपदीबाईच्या घरी आली आणि दोघींची बैठक सुरु झाली.
“रखमे, आज तिसऱ्या मजल्यावरली जागा गेली बरं
का भाड्यानं,” मालकीणबाई म्हणाल्या, “आज संध्याकाळीच आला एक भाडेकरू. परगावचा हाय.
झोपला आसल आता.”
“आत्ता? धुर्पदे, लई वस्ताद हाईस की ग तू
भाडेकरुस्नी पटीव्न्यात? आणि त्ये बी त्या खोलीसाटी?” रखमाबाई कौतुकमिश्रित स्वरात
बोलली. आणि मग आवाज खाली करून सावधगिरीनं विचारलं, “काई सांगितलं न्हाईस न्हवं
त्येला?”
“रखमे, आपल्याला खोल्या भाड्यानं द्याच्या
असत्यात. भाडेकरूला सांगाय काय खुळी हाय व्हय मी?”
“त्ये बी खरंच हाय बग धुर्पदे, आपल्याला काssय
जागा दिऊन भाडं घ्याचं असतंय. त्येच्यावर तर जगतुय आपन. तुजं बरुबरच हाय.
खोलीतल्या हातरुनात जीव दिलाता कुनी आसं समाजल्यावर कोन घील ग खोली भाड्यानं? खोली
सोड, तुज्या वाड्याकडंच कुनी फिरकायचं न्हाई. ब्येस केलंस बग तू सांगितलं न्हईस त्ये.”
“मssग ! आगं जगायचंय आपल्याला हितं.”
धुर्पदाबाई बोलल्या.
“व्हय ग बाय, आज दिशी बरुबर एक आटवडा झाला
न्हाई का ग मी तुला ती खोली साफ कराय मदत केल्याला? काय बाई त्या तर्ण्याताटया,
साजऱ्यागोजऱ्या पोरीला कसं वाटलं आसल ग ग्यास सुंघून जीव द्यावा म्हनून? काय झालं
असल? गोरीपान, कमरंच्याबी खाल्पव्तूर लांबसडक क्येस, आनि आवाज्बी किती गोड हुता
तिचा, आगदी किनकिनत्या घंटवानी मंजुळ ! रंभेवानी देखनी पोर ! लै वाईट झालं, लै
वाईट झालं !
“व्हय, देखनीच म्हनली असती मी तिला. फकस्त
त्यो डाव्या भिवायीच्या टोकाखालचा काळा तीळ नसाय पायजे हुता. पर आता काय त्येचं?
ग्येली, म्येली, सपला विषय. आन बाटली हिकडं रखमे.”
*
* * *
* *
No comments:
Post a Comment