Friday, September 27, 2019

-१४- संभाषण


(अंतोन चेखॉव्ह्च्या ‘द ग्रीफ’ या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

सहदेव विश्वकर्मा, शिमल्यातल्या  जाखू देवळाजवळ रहाणारा एक कुशल पण निर्बुध्द सुतार. त्याच्या बायकोला – सरोसतीला - दवाखान्यात घेऊन चालला होता. जवळजवळ वीस तरी मैल घोडागाडी दौडवायची होती आणि रस्ता अगदी भयानक अवस्थेतला ! अनुभवी सरकारी गाडीवानाचाही मेटाकुटीने निभाव लागला असता तिथं, मग या कूर्मगतीवाल्या सहदेवचे हाल काय विचारता. थंडगार वारा तोंडावर मारा करत होता, आणि हिमवर्षाव तर असा की बर्फ आकाशातून खाली पडतोय की जमिनीवरून वर उडतोय असा संभ्रम पडावा. बाजूची शेते, टेलिफोनचे पोल, जंगल, काहीही दिसत नव्हतं त्या बर्फाच्या धुक्यात. आणि त्यात एकादा जोरदार झोत आला सहदेवच्या तोंडावर म्हणजे तर घोड्याच्या मानेवरलं जूंदेखील दिसेनासं व्हायचं. आधीच मरतुकडं असलेल घोडं मोठ्या मिनतवारीनं पाय उचलायचं बर्फातनं आणि मानेला हिसके देत धावायची पराकाष्ठा करायचं. सहदेवला घाई होती ना ! अस्वस्थपणे तो आपल्या बैठकीवर बसत, उभा रहात गाडी हाकत होता, घोड्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारत.

“रडू नको सरोसती...” सहदेव पुटपुटला, “...धीर धर. जssरा कळ काढ. देवाच्या दयेनं आपण लवकर पोचू कल्पिसच्या दवाखान्यात आणि मग सगळं ठीक होईल. डॉक्टर मायकेल फार्मर  तुला काहीतरी औषध प्यायला देतील, नाही तर लोकाना सांगतील रक्त काढायला. कदाचित ते स्वत:च  कसल्यातरी औषधानं मालिशही करतील. आणि मग तुला बरं वाटेल. डॉक्टर मायकेल  सगळं यथास्थित करतील बघ. ओरडतील कदाचित पण सगळं ठीक करतील. चांगला माणूस आहे. देव भलं करो त्यांचं. बघशीलच तू. आपण पोचलो की लगेच ते खोलीतून धावत येतील आणि माझ्यावर डाफरायला लागतील, “कसं? का?...” ते  ओरडतील, “... वेळच्या वेळी का आला नाही? मी काही तुमच्या घरचा पाळीव कुत्रा नाही, तुम्ही केव्हा येता याची वाट बघत बसायला. सकाळीच का आला नाही?. जा आता, उद्या सकाळी या. चला निघा.” आणि मग मी म्हणेन, “अरे ए डॉक्टर ! डॉक्टर मायकेल , तपासायला घे लवकर. हैवाना, पटकीचा रोग होईल तुला नायतर ! चल सुरु कर.” सहदेवनं चाबकाचा फटका मारला घोड्याला आणि बायकोकडं न बघता बडबडत राहिला.

“डॉक्टर, देवाशप्पथ, या ताइतावर हात ठेवून सांगतो. मी सकाळी उजेड व्हायच्या आत निघालो होतो. पण देवच रागावलेला होता तर मी तरी काय करणार? असली भयंकर बरफबारी केली  त्यानं. तुम्हीच बघा, अगदी नंबरातलं नंबरी घोडं असतं तरी पोचता आलं नसतं यापेक्षा आधी. आणि माझं घोडं तर? आज मरतंय का उद्या, असलं आहे.” डॉक्टर भडकेल आणि म्हणेल, “ बस्स बस्स. मी काय आज ओळखतो का काय तुला, सहदेवा ? नक्की सांगतो, तू वाटेत डझनभर तरी तिबेट्यांच्या गुत्त्यांवर थांबला असशील चांग (तांदळाची दारू) प्यायला .” म मी म्हणीन, “ओए डॉक्टर, मला काय सराईत गुन्हेगार समजताय काय? माझी म्हातारी बायको इथं मरायला टेकलेय आणि मी डझनभर गुत्त्यांवर जाईन? काय उलट्या काळजाचा आहे का काय मी? धाड पडो त्या गुत्त्यांवर पटकीची.” मग डॉक्टर तुला दवाखान्याच्या आत घेऊन जाईल आणि मग मी त्याच्या पायावर पडून म्हणीन, “डॉक्टरसाहेब, मायकेलसाहेब, उपकार झाले तुमचे. माफ करा मला पापी मूर्खाला. रागावू नका गरिबावर. तुम्ही इथं स्वताला बर्फात गाडून घेऊन उपचार करायला राबताय आणि आम्ही दळभद्री? जोड्यानं हाणायला पाहिजे आम्हाला खरंच.” डॉक्टर मायकेल मग खरंच मला बडवावसं वाटतंय असं बघेल आणि म्हणेल, “मूर्ख माणसा, चांग ढोसायचं सोडून दे आणि बायकोची काळजी घे, माझ्या पाया पडत बसण्यापेक्षा. खरोखर तुला बडवूनच काढला पाहिजे.”

“बरोबर आहे तुमचं डॉक्टर मायकेल. बडवलं जायचीच लायकी आहे माझी. तुम्ही येव्हढे उपकार करताय आमच्यावर बापासारखे मग कसं तुमच्या पाया नाही पडायचं? देवाशप्पथ, डॉक्टरसाहेब. खोटं बोलत असेन  तुमच्याशी तर तोंडावर थुका माझ्या. माझ्या या सरोसतीला बरं होऊ दे अगदी पूर्वीसारखं. मग तुम्ही सांगाल ते करीन तुमच्यासाठी. अगदी भारीतल्या भारी  लाकडाची  खुर्ची, बॅटबॉल खेळासाठीची बॅट, तुमच्या लहानग्या मुलासाठी लकडीचा घोडा, काय म्हणाल ते. लक्कडबाजारात पन्नास रुपय तरी  पडतील अशा घोड्यासाठी. पण मी एक नवा पैसा पण  घेणार नाही तुमच्याकडून.” डॉक्टर हसतील आणि म्हणतील, “ठीकाय, ठीकाय. माहित आहे मला. गधड्या, कसबी आहेस, पण दारुडा आहेस तेव्हढच वाईट आहे बघ.” सरोसती, अगं मला माहित आहे या बड्या लोकांना कसं फिरवायचं ते. शहरात असा एकही डिग्रीवाला बाबू  नाही ज्याच्याशी मी बोलू शकणार नाही........आपली गाडी रस्त्यावरनं घसरू नये एवढंच देवानं करावं बघ. काय भन्नाट वारं वाहतंय ! डोळे बर्फानं भरतायत अगदी.”

सहदेव विश्वकर्मा असा न थांबता पुटपुटत राहिला. अगदी यंत्रवत. लहान मुलासारखं बडबडत होता आपल्या दु:खी भावनांना वाट करून द्यायची म्हणून. शेकडो शब्द त्याच्या जिभेवर येत होते. पण त्याहीपेक्षा जास्त विचार आणि प्रश्न त्याच्या मेंदूत दाटी करत होते. त्याच्यावर नकळत आणि अचानक हा नको तो दु:खाचा घाला पडला होता. आणि आता तो ना त्यावर मात करू शकत होता ना त्यातून बाहेर पडू शकत होता. आजवर तो कसल्याही खळबळीशिवाय शांततेचे जीवन जगत आला होता. अगदी एखादा माणूस दारुच्या अर्धवट नशेत असतो - ना खंत, ना खेद – तसं. पण आता काळजात एका तीव्र टोचणीची जाणीव होत होती त्याला.  कालचा बिनधास्त, आळशी दारुडा आज अचानक काळजी आणि तातडी यांच्या मन दडपून टाकणाऱ्या उद्रेकात आणि शिवाय भरीस भर म्हणून निसर्गाच्या विरोधात सापडला होता. 

सहदेवाला आठवलं, कालच्या संध्याकाळपासनं हा त्रास सुरु झाला. संध्याकाळी नेहमीसारखा पिऊन आला होता घरी आणि सवयीप्रमाणं शिवीगाळ, हातवारे, आरडाओरड करत होता. पण सरोसतीनं वेगळ्याच नजरेनं त्याच्याकडं पाहिलं होतं तेव्हा. नेहमी तिची नजर एकाद्या जेवायला मिळत नसलेल्या, मार खाल्लेल्या गरीब, भेदरट कुत्र्यासारखी किंवा हुतात्मा झाल्यासारखी दु:खी असायची. पण त्यावेळी मात्र तिनं निर्विकार, गोठलेली, परक्यासारखी नजर लावली होती आपल्या दारुड्या नवऱ्याकडं, एकाद्या धार्मिक चित्रातल्या संतानं शिष्यांकडं लावलेली असते तशी, किंवा मरणाच्या दारी असलेल्या माणसासारखी. तिथपासूनच हा त्रास सुरु झाला होता. चक्रावलेल्या सहदेवानं शेजाऱ्याकडून घोडागाडी मागून घेतली आणि सरोसतीला गाडीत घालून दवाखान्याकडं धाव घेतली होती, अशा आशेनं की गोरा डॉक्टर मायकेल फार्मर काहीतरी पावडर, गोळ्या, मलम अशासारख्या इलाजानी तिची नजर पूर्ववत करील.   

“तुला सांगतो सरोसती,...” सहदेव म्हणाला. “...डॉक्टर मायकेलनं जर तुला विचारलं की मी तुला मारतो का म्हणून तर काय सांगशील? कधीच नाही म्हणून सांग हं. बघ, मी तुला पुन्हा कधी मारणार नाही आजपासून. गळ्याशप्पथ. मी कधी तरी तुझा दुस्वास करून तुला मारलंय का ग? नाही न? कधी अविचारानं मारलं असेल एवढंच. वाईट वाटतंय ग त्याबद्दल. आणि मी तुला आता दवाखान्यात नेतोय न? दुसरा कुणी असता तर त्यानं नसतं नेलं असं. मी माझ्या परीनं शक्य तेवढं करतोय ग..... काय हा बर्फ, काय हा बर्फ ! देवा काय आहे रे तुझ्या मनात? गाडी घसरू देऊ नकोस बघ रस्त्यावरनं एवढंच मागतो. सरोसती, सरोसती, दुखतंय का ग तुला? बोलत का नाहीस? हं? फार दुखतंय का?”

सरोसतीच्या तोंडावरचा बर्फ वितळत का नाही याचं सहदेवाला आश्चर्य वाटलं. तिचा चेहरा चमत्कारिक दिसत होता. फिकट पिवळ्या रंगाचा, मेणासारखा आणि निर्विकार गंभीर. 

“वेडाबाई...” सहदेव  पुटपुटला, “...इथं मी तुला मनापासून सांगतोय. आणि तू? निघालीयेस ? वेडीच आहेस. बघ मं नेणार नाही मी तुला डॉक्टर मायकेलकडं !”

सहदेवनं हातातला लगाम सैल सोडला. सरोसतीच्या चेहऱ्याकडं बघायचं धाडस होईना त्याला. भीती वाटली, सटपटला तो. तिला काही विचारायचं आणि तिचं उत्तर यायचं नाही या विचाराने सटपटला. शेवटी जिवाच्या करारानं त्यानं तिच्या तोंडाकडं न बघता तिचा थंड हात धरून उचलला आणि सोडला. एकाद्या ओंडक्यासारखा खाली पडला तो.

“गेली का काय  ही. अरे देवा, कर्म माझं !” सहदेव पुटपुटला.....आणि रडला.... दु:खापेक्षा जास्त वैतागानं. किती झटक्यात सगळं संपतंय या जगातनं! त्याची नशिबाशी झटापट सुरु होते न होते तेव्हढ्यात हा आघात झालासुद्धा ! सरोसतीला तो सांगू पण शकला नाही की तिच्या या अवस्थेबद्दल त्याला फार वाईट वाटतंय म्हणून. चाळीस वर्षं काढली होती तिच्याबरोबर. ती सारी चाळीस वर्षं या बर्फाच्या धुक्यात नाहीशी झाली एकदम. चाळीस वर्षं ! दारूत, भांडाभांडीत, मारहाणीत बुडालेली, भावनारहित चाळीस वर्षं. आजच कुठं वाईट वाटायला लागलं होतं तिच्याबद्दल, आपण तिच्याशी आयुष्यात फार वाईट वागलो म्हणून. तिच्याशिवाय आपण जगू शकणार नाही असं आजच वाटायला लागलं होतं. आणि ते आपण सांगूही शकलो नाही तिला !”

“ती गावात जायची. आपणच जायला भाग पाडायचो तिला. भाजी भाकरीसाठी उधार उसनवार  मागायला. सरोसती गss ! अजून दहा वर्षं तरी जगायला हवी होतीस. काय समजत असशील माझ्याबद्दलं? दीड दमडीचा नालायक नवरा आहे म्हणून? सुधारलो असतो ग मी. देवा! पण मी हा कुठं चाललोय? आता काय उपयोग आहे दवाखान्यात जाउन? स्मशानात न्यायला पाहिजे हिला आता. चला, फिरवावी गाडी मागं.”

सहदेवनं गाडी मागं वळवली आणि घोड्याला खच्चून जोराचा चाबकाचा फटका मारला. रस्ता तासातासाला आणखीनच बिघडत चालला होता. आता तर घोड्याच्या मानेवरचं जूंदेखील दिसत नव्हतं. गाडी मधूनमधून बाजूच्या एकाद्या झुडपावर जात होती. कधीकधी एकाद्या झाडाची फांदी सहदेवाच्या हाताना किंवा चेहऱ्याला घासून जात होती. डोळ्यापुढं फक्त पांढरं बर्फच बर्फ दिसत होतं.

“परत जगायची सुरवात करायची. हं !” सहदेवाच्या मनात विचार आला.

त्याला आठवलं, चाळीस वर्षांपूर्वी सरोसती  तरुण, सुंदर आणि आनंदी होती. चांगल्या सुखवस्तु घरातली होती ती. निव्वळ त्याच्यातलं कसब बघून लग्न करून दिलं होतं तिचं त्याच्याशी. आयुष्य सुखात जावं असं सारं काही होतं. वाईट एवढंच की लग्नाच्या रात्रीच दारू ढोसून येऊन विझल्या शेगडीवर पडला होता तो आणि तिथंच झोपून पसरला होता. त्या झोपेतून अजूनपर्यंत जागा होत नव्हता तो.  त्याला लग्न आठवत होतं पण त्यानंतर काय झालं ते नाही. शेगडीवर पडला, भांडला आणि झोपला एवढं कदाचित लक्षात राहिलं असेल. चाळीस वर्षं अशीच वाया गेली होती.  

पांढरे ढग आता जरा जरा तांबूस रंगाचे व्हायला लागले होते. पहाट होण्याच्या मार्गावर होती.

“कुठं चाललोय मी?” विचारात हरवलेल्या सहदेवाच्या मनात आलं एकदम, “हॉस्पिटलकडं? वेडा आहे का काय मी. जाळायला जायला पाहिजे होतं नं हिला !”

त्यानं गाडी परत वळवली आणि घोड्याला पुन्हा फटकावलं. घोडं जिवाच्या आटापिटयानं दौडायला लागलं. परत परत चाबकाचे फटकारे खात होतं बिचारं. मागं काही तरी कशावर तरी आपटत होतं. वळून न बघताच सहदेवाला कळलं, सरोसतीचं डोकं गाडीच्या कडेला आपटत होतं. बर्फ जास्तीच मातकट व्हायला लागलं. आणि वारा जास्ती बोचरा, थंड.

“आता परत आयुष्याला सुरुवात करायची म्हणजे..” सहदेवाच्या मनात विचार यायला लागले, “... मला नवीन हत्त्यारं घ्यायला पाहिजेत, आरी, भिंड, ड्रील मशीन, जमली तर एखादी वापरलेली जिग्सॉ मशीन, जास्तीच्या ऑर्डरी मिळवायला पाहिजेत आणि पैसे बायकोला दिले पाहिजेत.” त्याच्या हातातनं लगाम निसटला. परत उचलून घ्यायचा प्रयत्न केला त्यानं पण जमलं नाही. हात कामच करेनात.    

“जाऊ देत. काही हरकत नाही. घोडं जाईल बरोबर. रस्ता माहित आहे त्याला. थोडं झोपावं झालं. दहनविधीपूर्वी किंवा जमातीच्या शोकसभेपूर्वी जराशी विश्रांती मिळाली तर बरंच आहे.” सहदेवानं डोळे मिटले. जरा वेळानं घोडं थांबल्यासारखं वाटलं म्हणून उघडले तर त्याला एकाद्या झोपडीसारखं किंवा गवताच्या मोठ्या गंजीसारखं काही तरी दिसलं.

तो गाडीतून उतरून आला असता. पण इतकं गळून गेल्यासारखं वाटलं त्याला की त्याच्याच्याने उठून बसवेना. आणखी शांत गडद झोपेत गेला तो.

जागा झाला तो एका मोठ्या पांढऱ्याफेक रंगवलेल्या खोलीत. बाहेरून भगभगीत उजेड येत होता खिडकीतून. त्याच्याभोवती माणसं होती त्याच्याकडे वाकून बघणारी. पहिला विचार त्याच्या मनात आला तो कोणी जाणकार माणूस दिसतोय का ज्याला पुढच्या क्रिया कशा करायच्या ते माहित असेल.  

“माझ्या बायकोसाठी शेवटची प्रार्थना म्हणायला हवी आहे हो स्मशानात. कुणी एखाद्या ब्राह्मणाला बोलावता का?”

“ठीक आहे, ठीक आहे. पडून रहा तू.”

“डॉक्टर मायकेल फार्मर ?” सहदेवाला आश्चर्य वाटलं, “डॉक्टरसाहेब? तुम्ही इथं?”

त्याला उडी मारून डॉक्टरच्या पुढं गुढगे टेकावेसे वाटले. पण लक्षात आलं त्याचे हात आणि पाय काम करत नव्हते.

“डॉक्टरसाहेब, माझे पाय कुठं आहेत? आणि माझे हातसुद्धा?”

“त्याना विसरून जा आता. बर्फामुळं गोठून गेलेत ते. रडतोस कशाला? आयुष्य जगलास तू तुझं. देवाचे आभार मान त्यासाठी. साठ वर्षं जगलास ना? पुरे आहे तेव्हढं.”

“मला दु:खं होतंय. क्षमा करा मला मायबाप. अजून  पाच सहा वर्षं मिळाली तर...”

“कशासाठी?”

“अहो ते घोडं माझं नाही. परत करायला पाहिजे. माझ्या बायकोचं क्रियाकर्म करायला पाहिजे. किती झटक्यात सगळं संपलं, मायबाप डॉक्टर मायकेल ! आणि तुमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम लाकडाची खुर्ची, क्रिकेट बॅट, झुलणारा ला....लाकडी घ...घो...घोडा.........”

हात आणि डोकं हालवून डॉक्टर वॉर्डबाहेर गेले.

सहदेव विश्वकर्मा सुताराचा अवतार  संपला होता.

*****

Thursday, September 12, 2019

-१३- बूट

(अंतोन चेखॉव्हच्या ‘Boots’ याच नावाच्या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
 
गुळगुळीत दाढी केलेला, फिक्कट चेहऱ्याचा, दोन्ही नाकपुड्यांमध्ये ठासलेल्या तपकिरीचे डाग कायम दाखवत असणारा पियानो टेक्निशियन मारुतराव,  कानात कापसाचे बोळे कोंबून त्रस्त चेहऱ्याने नंदनवन लॉजमधल्या त्याच्या खोलीच्या दारातून बाहेर डोकावला. कॉरिडॉरमध्ये पाउल ठेवतानाच सर्दीमुळे चिरफाळ्या झालेल्या आवाजात त्याने हाकाटी करायला सुरुवात केली, “शाम्या, शामू वेटर, शाम्या!”
 
शामराव वेटर धावत आला, “काय झालं साहेब?”
 
“काय झालं म्हणून विचारतोस? शाम्या? अरे मी नाजूक प्रकृतीचा माणूस, आधीच सांधेदुखीने हैराण, या कडाक्याच्या थंडीत ही फरशी पण बर्फासारखी  थंडगार झालेली आहे आणि त्यात तू माझे बूट नाही आणून दिलेस अजून. काल संध्याकाळी घेऊन गेला होतास पॉलिश करायला. कुठे आहे ते?”
 
शाम्या मारुतरावांच्या खोलीत गेला, रोज साफ करून आणलेले बूट ज्या जागी ठेवायचा तिथे बघितले. आजूबाजूलाही बघितले आणि डोके खाजवत म्हणाला, “दिसत नाहीत कुठंबी. कुठं गेले असत्याल ओ?..... मी तर हितच आणून ठिवले असणार काल सांजच्याला...... म्हंजे काय हाय, काल जरा नवटाक मारलेली हुती ओ मी.... तरीच नीट सुधरत न्हाई. येकान्द्र्या येळेला बाजूच्या रूममद्येबी  ठिवले असतील चुकुन.... चुकूनच ओ. चौदा नंबर रूम बगा. त्या रुमात आप्पासाब येलूरकर म्हणून उतरले हाईत. तितं.... न्हई, न्हई, तितं न्हई. तुमचा रूम नंबर १२ हाय न्हव? मग मी आलिकडल्या  आकरा नंबरमध्येच दिल्यात. व्हाय. आत्ता जरा कालची चढल्याली उतरली न्हवं, तसं आटवलं बगा. आवो एक बाई ऱ्हाते त्या रूममद्ये, भवतेक नाटकातली असनार.”
 
“अरे देवा! म्हणजे शाम्या आता इतक्या सकाळी मी त्या बाईना उठवायचे? तुझ्यामुळे? काय मूर्खपणा करून ठेवला आहेस हा. मी असा आजारी माणूस, सांधेदुखीनं बेजार असलेला.......”
 
कुडकुडत, खोकत मारुतरावांनी अकरा नंबर रुमच्या दारावर टकटक केले.
 
“कोण आहे?” मिनिटभराने आतून बाईचा आवाज आला.
 
“मी आहे,” मारुतराव अगदी एखाद्या शिलेदाराने सरदारपत्नीसमोर नतमस्तक होऊन बोलावे अशा नम्रपणे आणि नरम आवाजात म्हणाला. “माफ करा बाईसाहेब, मी आजारी आहे हो सांधेदुखीने, मला डॉक्टरांनी सांगितले आहे अशा थंडीत पावले गरम ठेवा म्हणून.. आता मला विजयानंद नाट्यगृहात जायचंय तिथला पियानो बिघडला आहे  तो सुरात आणून द्यायला. मी अनवाणी तर जाऊ शकत नाही ना.”
 
“मग काय हवे आहे तुम्हाला? बदली पियानो? माझ्याकडे कुठाय?”
 
“नाही बाईसाहेब, पियानो नको आहे. माझे बूट हवे आहेत. काल संध्याकाळी शामराव वेटरने चुकून तुमच्या खोलीत आणून ठेवलेत ते. प्लीज बाईसाहेब, माझे बूट तेवढे द्या.”
 
कॉटवरून उतरल्याचा आणि मग पायातल्या सपाता वाजत असल्याचा आवाज आला आणि मग दरवाजा किलकिला करून बाईच्या एका गुबगुबीत हाताने बुटाचा जोड बाहेर फेकला. तो उचलून घेऊन मारुतराव आपल्या खोलीत परत गेला.
 
“अरे!..... ” मारुतराव बूट घालायच्या प्रयतनात असताना चित्कारला. “हे नाहीत आपले बूट. आणि हे काय? दोन्ही डाव्या पायाचेच आहेत. शाम्या, अरे हे माझे बूट नाहीत. माझ्या बुटांवर लाल लेबल्स होती. यांच्यावर नाहीत. यातल्या एकाला तर ठिगळ लावलेले दिसत आहे, शिवाय दुसऱ्याला भोकेही आहेत.”
 
“च्यामारी!... असं हाय व्हय?, ” शामरावाने बूट हातात घेऊन उलट सुलट बघितले आणि एक डोळा बारीक करत म्हणाला, “आओss.... ह्ये बूट तं बाबुराव मसुट्यांचे हाईत.”

“कोण बाबुराव मसुटे?”

“त्ये बी एक नटच हैत न्हवं का. दर आईतवारी रातीला यिऊन ऱ्हात्यात हित. तुमचे बूट घालून गेल्याले दिसत्यात बाबुराव. म्हणजे तुमचा जोड मी आकरा नंबरमद्ये जितं ठेवला तितं जवळच बाबुरावानी आल्यावर आप्लेबी बूट काडून ठीवले असनार.”
 
“मग जा आणि बदलून आण त्याच्याकडून.”
 
“ह्ये बरं सांग्तायसा. कुटनं आनू? आओ, त्ये ग्येलं कवाच.”
 
कुठं राहतात ते?”

"आता त्यांचं घर कुटं हाय मला कुटं म्हैत हाय? आईतवारी रातीच्या मुक्कामापुरतं यिवून ऱ्हात्यात नि सोमवारी येरवाळी निगुन जात्यात.  आता तुमच्या बुटांसाठी फुडच्या आईतवारपर्यंत वाट बघाय पायजे.”
 
“केलास न सगळा घोळ? गाढवा. काय करायचे मी आता? विजयानंदला कसा जाऊ मूर्ख माणसा?...माझे पाय!.... आई ग ! माझे पाय पार गोठलेत रे.”
 
“साहेब, एक आयडीया हाय. आसं करा, हेच बूट घालून चाला दिवसभर. मागनं संद्याकाळच्याला जावा नवनाथ थेटरला. तितं झुंझारराव नाटकाचा खेळ हाय ना आज संद्याकाळी. त्येच्यात काम करत्यात बाबुराव. तितं जावून जाधवरावचा पार्ट करनाऱ्या पार्टीला भ्येटायचं हाय म्हणून सांगा. येवडंच हातात हाय तुमच्या. नसल जमssत तर मग थांबा फुडल्या आईतवारपर्यंत.”
 
“अरे पण हे दोन्ही बूट डाव्या पायाचे आहेत हे कसं काय?”

“आवो द्येवाची मर्जी, पायच तशे दिले असणार ना त्याना द्येवानं? मग क्या करेगा बाबुराव? ह्या  ह्या  ह्या! न्हई, तस्ं न्हई. मी इचारलं हुतं एक डाव. तं बाबुराव तिरपाडले. म्हनले ‘फुकनिच्च्या, आरे खंडोबाच्या देवळासमोरनं उचलून आणल्यात मी त्ये. आनि हेच बूट घालून मी आजवर राजा महाराजांचेबी पार्ट केल्यात. लकी हाएत माज्यासाटी.’ काय तरी इपरीतच! न्हई?”
 
मारुतरावाने मोठ्या कष्टाने ते बूट पायात घातले आणि लंगडत, खुरडत चालत कसेतरी विजयानंद नाट्यगृहात पोचला. तिथले पियानोचे काम उरकून मग दिवसभरात इतरही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स विकणाऱ्या दुकानातली कामे उरकून संध्याकाळी नवनाथ नाट्यगृहात हजर झाला. चालताना होणाऱ्या यातनांशिवाय जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या कुत्सित नजरांमुळ वाटणारी शरम देखील त्याच्या दु:खात भर टाकत होती.
 
मारुतराव थिएटरमध्ये पोचला तेव्हा झुंजारराव नाटकाचा शेवटचा प्रयोग नुकताच संपला होता. थिएटरच्या वाद्यवृंदात बासरी वाजणारा कलाकार ओळखीचा असल्यामुळे त्याला अगदी पडद्यामागच्या रंगपटात प्रवेश मिळाला. संपलेल्या खेळातील काही पात्रे चेहऱ्यावरची रंगरंगोटी पुसत होती तर काही विड्यांचे झुरके मारत गप्पा मारत बसली होती. जाधवराव, म्हणजे आपले बाबुराव मसुटे झुंझाररावाची भूमिका साकारणाऱ्या सदाशिव ऐतवडेकरासमोर उभे राहून हातातले पिस्तुल दाखवत होते.
 
“सदाशिवराव,” बाबराव म्हणत होते, “तुम्हाला म्हणून सांगतो, आठशेला घेतले आहे मी. सहा महिन्यांपूर्वी मुंबईला दौरा झाला होता ना तेव्हा  चोरबाजारात मिळाले, स्वस्त न? पण घेतल्यापासून वापरायचा चान्सच नाही मिळाला हो. हा: हा: हा: ! म्हणून आता विकून टाकायचे म्हणतो. पाहिजे का तुम्हाला? बघा, हातात घेऊन बघा. काही हरकत नाही.”
 
“अहो नको, भरलेले आहे ना?”
 
“मग काय झाले त्यात? घ्या, बघा.”
 
एवढ्यात मारुतराव आत आला आणि म्हणाला, “जाधवरावाचे  काम करणारे बाबुराव मसुटे कोण हो तुमच्यापैकी?”
 
बाबुरावाने वळून मारुतरावाकडे बघितले आणि उत्तरले, “मी, मी बाबूराव. काय काम आहे?”
 
“ओह, माफ करा बाबूरावजी, मी मारुती पंदारे. माझी प्रकृती नाजूक आहे आणि मला संधिवातही आहे हो. डॉक्टरानी पावले गरम ठेवायला सांगितले आहे माझी. पण........”
 
“मग? इथं का आलास?”

“सांगतो ना,” मारुतराव अजीजीच्या स्वरात म्हणाला, “तुम्ही....बाबूरावजी, काल रात्री नंदनवन लॉजमध्ये रहायला होतात ना, खोली नंबर आकरा. .......”
 
“एsss, दीडशहाण्या, काही तरी काय बोलतोस? नंदनवन लॉजमधल्या आकरा नंबरच्या खोलीत तर माझी मिसेस, कमळजा राहते.” झुंजारराव, म्हणजे सदाशिव ऐतवडेकर म्हणाले.
 
“तुमच्या मिसेस?..... साहेब,” ऐतवडेकराकडे वळून मारुतराव म्हणाला, “हां, त्याच होत्या वाटते, त्यांनीच मला या साहेबांचे त्यांच्या खोलीत विसरून राहिलेले बूट दिले आज सकाळी हे खोलीतून निघून गेल्यानंतर. माझे बूट पॉलिश केल्यावर लॉजच्या वेटरने नशेत असल्यामुळे चुकून त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले होते. सकाळी, बाबूरावजी, तुम्ही यांच्या मिसेसना सोडून गेलात तेव्हा तुमचे समजून माझे बूट घालून गेलात.”
 
“ए,..... फुकनीच्च्या, काय बकतोयस रे? माझी बदनामी करायला आलास काय इथे?”
 
“नाही बाबूरावजी, मी कशाला तुमची बदनामी करू? तुमचा गैरसमज होतो आहे. मी माझ्या बुटांबद्दल बोलतोय. रात्री तुम्ही आकरा नंबर खोलीत झोपला होतात. होय ना?”
 
“कधी?”“काल रात्री.”“तू स्वत: बघितलंस मला?”
 
“नाही, मी नाही, पण, “ मारुतराव गोंधळून जाऊन म्हणाला, “मी नाही बघितलं तुम्हाला. पण या साहेबांच्या मिसेसनी तुमचे बूट फेकले माझ्याकडे खोलीतून. हे बघा.” मारुतराव खाली बसला आणि आपल्या पायातून बूट काढायला लागला.”
 
“एss, काय बोलतोयस? माझं सोड, पण एका सच्छील पत्नीची बदनामी करतोयस, तीही तिच्या नवऱ्यासमोर. कळतंय तुला?”
 
इतका वेळ अवाक् उभ्या असलेल्या झुंझाररावानी दोन्ही हातांच्या मुठीत आपले केस धरून उपटले आणि जिवाच्या आकांताने ओरडत हात समोरच्या टेबलावर आपटले.
 
“सदाशिवराव, सदाशिवराव, तुमचा विश्वास बसतोय या दीडदमडीच्या माणसावर? सांगा, ह्या कुत्र्याला आताच्या आता इथंच खतम् करून टाकू? तुम्ही हो म्हणा नुसतं आणि याच्या मेंदूच्या चिथड्या उडवतो.” बाबूराव म्हणाले.
.......
.......
......
 
त्या संध्याकाळी नवनाथ नाट्यगृहासमोरच्या रस्त्यावरून चालत असलेल्या ज्यानी ज्यांनी एक गुळगुळीत दाढी केलेला, फिक्कट चेहऱ्याचा अनवाणी माणूस नाट्यगृहातून बाहेर पडून पळताना आणि त्याच्या मागोमाग ‘झुंझारराव’ नाटकातल्या जाधवरावाच्या वेशभूषेतला ती भूमिका करणारा नट पिस्तुल हातात घेऊन पळताना पाहिले असेल ते ते लोक कितीतरी दिवस ते अविस्मरणीय दृश्य वर्णन करत होते. त्याच्यापुढे काय झाले ते कुणालाच माहीत नाही. पण एवढे मात्र खरे की नंतर जवळजवळ पंधरा दिवस नंदनवन लॉजच्या खोली नंबर बारामधल्या बेडवर झोपून असलेला मारुतराव ज्याला त्याला सांगायचा, “अहो मी नाजूक प्रकृतीचा माणूस आहे हो, त्यात संधिवात आहे मला नि शिवाय ह्या जखमा !.........”
*****