Saturday, January 23, 2021

-२२- श्रध्दांजली

 (अन्तोन चेखोव्ह च्या Marshall’s Widow या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

दर वर्षी एक फेब्रुवरीला मिसेस कॅथरीन कार्वालोच्या बंगल्यावर पाहुण्यांची वर्दळ असते. मिरजेचे मरहूम मेयर एरिक कार्वालो यांची कॅथरीन ही विधवा पत्नी. एक फेब्रुवारी या तारखेला मेयर एरिक स्वर्गवासी झाले. त्यांची  स्मृती  जागवून त्याना श्रध्दांजली वाहण्यासाठी म्हणून मिसेस  कॅथरीन गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी या दिवशी आपल्या आणि मरहूम एरिक यांच्या निवडक परिचितांना आमंत्रित करतात. श्रद्धांजली देणारी भाषणे झाल्यानंतर श्रमपरिहार म्हणून जेवण दिले जाते. आज रविवार, एक फेब्रुवारी. आजच्या समारंभासाठी आलेल्या निमंत्रितात सध्याचे मेयर धनवडे, मिरजेचे आमदार शफिक  मुजावर, म्युनिसिपल कौन्सिलर शामराव बेंडके, डीएसपी सायमन फर्नांडिस, समोरच असलेल्या मिशन हॉस्पिटलच्या कंपाऊंड मध्ये छोटेखानी निवासस्थानामध्ये राहाणारे, कपड्यांना सदोदित आयोडीनचा वास येत असेलेले हॉस्पिटलचे डॉक्टर जगदाळे, आयर्विन मेमोरियल चर्चचे बिशप फादर सॅम्युअल तिवडे, सेशन कोर्टाचे जज्ज फेलिक्स रिबेरो, हे खास आणि इतरही बरीचशी - बिल्डर, नोकरदार, शेतकरी - अशी जवळजवळ वीस एक तरी माणसे होती. दोन तीन खोल्यांमध्ये त्यांची बसायची व्यवस्था केली होती. मुख्य कार्यक्रम बंगल्यातल्या प्रशस्त सिटिंग हॉल मध्ये होणार होता.

बरोबर बाराच्या ठोक्याला सारे आमंत्रित गंभीर चेहरे करून खोल्यांमधून निघून हॉलमध्ये आले. कोणीही बोलत नव्हते. सारे अगदी गप्प गप्प. कार्पेट असल्यामुळे पायांचा आवाजही  होत  नव्हता. अर्थात, प्रसंगाचं गांभीर्य ध्यानात घेऊन सगळे शांतता राखून, एकमेकांचे हात धरून हॉल मध्ये आले. हॉलमध्ये सगळी तयारी होती. फादर तिवडे, लहानखुऱ्या चणीचे, उतारवयातले बिशप त्यांचा काळा झगा (रोब) पांघरून होते. त्यांचा सहकारी आफॉन्सो मुकाट्याने प्रार्थनापुस्तकाची पाने उलटत त्यांत बुकमार्क ठेवत होता. आणखी एकजण धूपपात्रातल्या निखाऱ्यांवर धूप टाकून हॉल मध्ये निळसर धूर आणि धुपाचा वास हाताने पसरवत होता. दानियाल  कांबळे, प्राथमिक शाळेतला शिक्षक चांदीचं पाणी दिलेल्या ट्रे मध्ये मेणबत्त्या घेऊन वाटत होता. यजमानीणबाई, कॅथरीन कार्वालो, छोटासा हातरुमाल घेऊन अश्रू टिपण्याच्या तयारीत उभ्या होत्या. मधून मधून टाकण्यात येणारे  उसासे वगळता हॉलमध्ये अगदी सुई पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती. सगळे लांब चेहरा करून होते.

श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. निळ्या धुराची वलयं वर वर जायला लागली, पेटवलेल्या मेणबत्त्या मधूनच फुरफुरायला लागल्या. सुरुवातीला मोठ्या आवाजात सुरू झालेलं संगीत हळू हळू प्रार्थनांच्या अनुषंगानं शांत मंद सुरांवर आलं. सूर दु:खी निघायला लागले तसतसा लोकांचा मूडही दु:खी व्हायला लागला. जीवन नश्वर आहे हे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टीदेखील हे त्यांच्या मनावर ठासायला लागले असावे. मरहूम एरिक कार्वालो, जाडाजुडा, लाल गालांचा गडी कसा एकदा तोंडाला लावलेली शांपेनची बाटली रिकामी करूनच खाली ठेवायचा, कपाळ बडवून डोळ्यांवरचा चष्मा चक्काचूर करून टाकायचा ते आठवत ‘वुईथ दाय सेंट्स ओ लॉर्ड’ ही प्रार्थना यांत्रिकपणे म्हणताम्हणता, यजमानीण  बाईंचे हुंदके ऐकत लोक अवघडलेले पाय बदलत राहायला लागले. जास्तच भावनाप्रधान असलेल्यांना घशात गहिवरून आल्याची आणि डोळ्यात अश्रू येऊ घातल्याची जाणीव व्हायला लागली. मग अवघडलेले वातावरण थोडे सुसह्य करण्याच्या प्रयत्नात मेयर धनवडे डीएसपी फर्नांडिसांच्या कानात कुजबुजले, “बरं का साहेब, काल मी आपल्या सातवेकरांच्या घरी गेलो होतो नेहमीच्यासारखा पत्त्यांच्या पार्टीला. तिथं सॅम सरवदे आणि मी पार्टनर होतो. तर बघा, हुकमाच्या पानाचा उपयोग न करताच आम्ही सगळे हात जिंकले... आणि अहो आमच्या ऑपोझिट असलेल्या मिसेस राठोड, तुम्हाला माहीत आहेत की त्या, त्या इतक्या अपसेट झाल्या की बोलता बोलता त्यांची कवळीच निसटून टेबलावर पडली.”

एवढ्यात शेवटची ‘इटर्नल मेमरी’ ही प्रार्थना म्हटली गेली. दानियाल कांबळेनी नम्रतापूर्वक सगळ्या मेणबत्त्या गोळा केल्या. आणि मग एकेकजण प्रथम दबलेल्या आवाजात आणि मग नॉर्मल आवाजात  बोलायला लागले. आणि मग रिवाजानुसार आभार प्रदर्शन झाले आणि फादर तिवडेनी  अंगावरला रोब उतरवला. थंडी असल्यामुळे लोकांनी हाताचे पंजे एकमेकांवर घासून ऊब आणायचा प्रयत्न केला. कॅथरीनने मरहूम एरिकच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. जरा वेळाने त्यांचा स्वैपाकी बाहेर आला आणि त्याने जाहीर केले, “मॅडम, खाना लगाया है”.  कॅथरीनने उसासा टाकला, आठवणी आटोपत्या घेतल्या आणि पाहुण्यांना “चला मंडळी, लंच घेऊया” म्हणत डायनिंग हॉलकडे नेले.

बुफे मांडलेला होता. दर वर्षीच्या अलिखित प्रघाताप्रमाणे आफॉन्सो बुफेकडे बघत दोन्ही हात फैलावून म्हणाला, “आहाहा! स्वर्गीय! हे जेवण माणसांसाठी आहे की देवांसाठी असा संभ्रम पडावा इतके स्वर्गीय वाटते. हो ना फादर?”

कितीतरी पदार्थ होते. तऱ्हतऱ्हेचे, स्वादिष्ट. बघूनच तृप्त व्हावे असे. मिरजच काय, आसमंतातील उपलब्ध भाज्याचे, मटण, चिकन, मासे इत्यादींचे पदार्थ,  फळे, गोड पदार्थ, शीतपेये यांची रेलचेल होती. नव्हते ते फक्त कुठल्याही प्रकारचे मद्य! कॅथरीनने शपथ घेतलेली होती, घरात पत्ते आणि दारू यांना पूर्ण प्रतिबंध होता. या दोन नादांच्या अतिरेकामुळेच एरिकचा मृत्यू अकाली ओढवला होता. त्यामुळे दरवर्षीच्या पार्टीत बाटल्या असायच्या त्या फक्त सरबताच्या, पेप्सी, कोकाकोला, थम्स अप या पेयांच्या. व्हिस्कीच्या बाटलीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या स्वर्गस्थ एरिकला या बाटल्या नक्की हिणवत असणार.

“घ्या, सुरू करा मंडळी. अनमान करू नका !”, कॅथरीनने  आवाहन केले. “एका गोष्टीसाठी मात्र क्षमा करा मला, जेवणाबरोबर व्हिस्की, व्होडका वगैरे काही नाही. माझ्या घरात मद्याला जागा नाही हे तुम्हाला माहीत आहेच. तेव्हा, सॉरी !”

लोकांनी रांगेने जाऊन प्लेटस भरून घेतल्या. पण जेवताना त्यांच्यात उत्साह असा काही वाटत नव्हता. काही तरी कमी आहे ही भावना घर करत होती मनात.

“मला काही तरी हरवल्यासारखं वाटतंय,” म्युनिसिपल कौन्सिलर बेंडके शेजाऱ्याच्या कानात कुजबुजले. “माझी बायको जेव्हा चीफ ऑफीसरबरोबर पळून गेली होती तेव्हाची आठवण येतेय. त्या वेळेसारखंच आज आत्ताही मला जेवावसं वाटत नाही.”

मेयर धनवडे जेवायला सुरुवात करण्यापूर्वी अस्वस्थ होते. खिशात हात घालत काही तरी चाचपत  म्हणाले, “हातरुमाल सापडत नाही माझा. बहुतेक गाडीत ठेवलेल्या कोटाच्या खिशात राह्यलाय  वाटतं, घेऊन येतो हं.” आणि ते घाईघाईनं प्लेट टेबलावर ठेवून बाहेर गेले. थोड्या वेळानं परत आले ते खुषीत असल्यासारखे. आल्या आल्या प्लेटमधल्या पदार्थांवर तुटून पडले.

फादर, कोरड्या तोंडाने जेवण खायचं मुश्किल असतं नाही?” मेजर धनवडे फादर तिवडेंच्या  कानात कुजबुजत म्हणाले. “असं करा, ही माझ्या गाडीची किल्ली घ्या. एम एच के ३२१०  नंबर आहे. समोरच्या उजव्या कप्प्यात ग्लेनलिव्हेट सिंगल माल्टची बाटली आहे. ग्लास पण आहे. कुणाला सांगू नका हं मात्र.” मग फादर तिवडेना एकदम आठवलं त्यांचा सहाय्यक बाहेर आहे. त्याला महत्वाचं काम सांगायचं राहून गेलंय. “आलोच” म्हणून ते बाहेर गेले.

त्यांच्या पाठोपाठ डॉक्टर जगदाळे आणखी एकदोघांना आपल्या घराचे नव्याने केलेले इंटेरियर डेकोरेशन दाखवायला घेऊन निघाले.

आमदार शफिक मुजावर आणि कौन्सिलर शामराव बेंडके जवळच्या जकात नाका सर्कल मध्ये मेरिलीन बारवाल्यानी केलेले आक्रमण वाहतुकीला किती धोकादायक आहे, त्यावर काही तरी इलाज केला पाहिजे त्याची पाहणी करायला म्हणून बाहेर पडले.

दुपार झाली आणि हळू हळू साऱ्या निमंत्रितांनी कॅथरीनचे आभार मानत आणि एरिकचे आपणच किती जिवलग मित्र होतो आणि आपण त्याला कसे आयुष्यभर विसरू शकणार नाही ते परतपरत सांगत निरोप घ्यायला सुरुवात केली.

****

त्या दिवशी संध्याकाळी कॅथरीन आपल्या मुंबईनिवासी मैत्रिणीला पत्र लिहायला बसली.

“सिल्व्ही डार्लिंग,

आज, गेल्या चार वर्षांच्या रिवाजाप्रमाणं, मी एरिकच्या स्मृतीदिनानिमित्त माझ्या सगळ्या शेजाऱ्यांना आणि आमच्या दोघांच्या कॉमन मित्रांना लंचसाठी आमंत्रित केलं होतं. अगं, भली माणसं, सगळी. एरिकवर जिवापाड प्रेम करणारी. मी जबरदस्त बुफे ठेवला होता त्यांच्यासाठी. लोक अगदी आवडीनं जेवले. अर्थात नेहमीप्रमाणं मी दारू सर्व्ह करणं कटाक्षानं वगळलं होतं. तुला माहीतच आहे, एरिक लिमिटच्या बाहेर दारू प्यायचा, आणि त्यामुळंच लिव्हर खराब होऊन तो वारला. तेव्हापासून मी स्वत: तर ड्रिंक्स घेत नाहीच, दुसऱ्यांनाही घेऊ देत नाही.  अगं आख्ख्या मिरजेतल्या लोकांच्या मनावर  दारूचे  दुष्परिणाम  बिंबवायचे आणि दारूरहित मिरज निर्माण करायची हे ध्येय मी ठेवलंय. तसा प्रचारही  मी करत असतेच. इथले आयर्विन मेमोरिअल चर्चचे बिशप फादर तिवडे, फार चांगले आहेत ग ते, माझ्या या प्रयत्नांचं त्यांना खूप कौतुक आहे. मला पाठिंबा देत असतात या बाबतीत. अगं फक्त तेच नाही, माझ्या सगळ्याच  शेजाऱ्यांचा माझ्यावर जीव आहे.  आताचे मेयर धनवडे यांनी लंच आटोपल्यावर निरोप घेताना माझा हात हातात घेतला, आपले ओठ त्यावर  बराच वेळ टेकवले. आणि मान हलवत राहिले, एकही शब्द ना बोलता, डोळ्यातून टिपं गाळत. बघ ना, किती भावनाविवश झाले होते!  आणि फादर तिवडे, अगदी प्रसन्न चेहऱ्याचे आहेत. माझ्या शेजारी बसले आणि पाणी भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत लहान मुलासारखे काही तरी बोलत राहिले. मला समजलं नाही काय बोलतायत ते. पण भावना जाणवू शकतातच ना ग? आणि डीएसपी सायमन फर्नांडिस. नाही का मागे मी तुला त्यांच्याबद्दल लिहिलं होतं? ते कविही आहेत हो! तर ते अगं, माझ्यासमोर गुढगे  टेकून बसले आणि आपल्या भावनांनी ओथंबलेल्या कविता म्हणून दाखवायला लागले. इतके वाहवत गेले ना भावनांमध्ये की तोल नाही सावरू शकले स्वत:चा, आणि चक्क पडले गं कोलमडून! एवढा भरभक्कम माणूस, पण कमालीच्या हळव्या मनाचा आहे न? सिल्व्ही  डियर, दिवस तसा चांगला गेला, पण एक गोष्ट जरा मनाला लागली माझ्या. अगं, सेशन जज्ज रिबेरो आहेत ना, त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आणि माझ्या सोफ्यावर ते जवळजवळ दोन तास निपचित पडून राहिले. आम्ही हाका मारल्या, पाणी मारलं तोंडावर पण काही केल्या शुध्दीवरच येईनात. नशीब डॉक्टर जगदाळे होते तोपर्यंत म्हणून. त्यांनी लगेच हॉस्पिटलच्या डिस्पेन्सरी मधून अल्कोहोल आणवलं आणि रिबेरोंच्या कानशीलावर चोळलं आणि थोडंसं ओठ उघडून तोंडात ओतलं. या उपायाचा  मात्र लगेच परिणाम झाला आणि ते शुध्दीवर आले. आणि मग त्यांना उचलून हळू हळू चालवत डॉक्टरांनी आपल्या घरी नेलं. पुढचं काही समजलं नाही मला. तर अशी झाली मेमोरियल पार्टी. बरं आता पुरे करते ग. उत्तर पाठव. मग नेक्स्ट संडे ला लिहीन मी दुसरं पत्र. बाय् !

कॅथी” 

*****    

Friday, January 15, 2021

-२१- द्रौपदी आणि आर्किमिडीज

(गी द मोपासॉ च्या A SALE या कथेवर आधारित.)

गजापूर गावातलं कोर्ट फारसं गजबजलेलं नसायचं कधीच. तसे फारसे गुन्हेच व्हायचे नाहीत म्हणा त्या गावातआज मात्र एक खटला उभा राहिला होता सुनावणीसाठी. धर्माण्णा पंदारे आणि दुर्याप्पा कोरवी हे दोघे आरोपी म्हणून आणले गेले होते. धर्माण्णाची बायको धुर्पदा हिचा पाण्यात बुडवून खून करायचा प्रयत्न केल्याचा आरोप होता दोघांवर.

दोन्ही आरोपी बाकावर शेजारीशेजारी बसले होते. त्यातला धर्माण्णा होता तो ठेंगणा, पण जाडाजुडा, लहान हात, लहान पाय, गरगरीत पोट आणि छातीसुध्दा तशीच, असा होता. पुटकुळ्यांनी भरलेले गाल असलेलं गोल डोकं त्या गरगरीत छातीवर मडकं  ठेवल्यासारखं दिसत होतं कारण मान जवळजवळ नव्हतीच. राहायला इंदरपेठेत, धंदा पाळलेली डुकरं विकायचा.दुर्याप्पा  किडकिडीत, मध्यम उंचीचा, आजानुबाहु, वाकुडमान्या, रुंद जबडा आणि चकणे डोळे असा होता. पातळ पण बहुतेक मेंदी लावून भुरकट झालेले केस डोक्यावर एकाच  बाजूला चोपून बसवले होते. गुढग्याच्या खाली पोचणारा सदरा आणि कळकट लेंगा अशा अवतारात होता. न्हाव्याचा धंदा करायचागजापूर हेअर कटींग सलूनहोतं त्याचं आणि शिवाय घरच्या दोन म्हशींच दूध रतीबावर विकायचा. न्हावीगिरी करताना अखंडपणे संतवचनं सांगत राहायची सवय त्याला होती. या त्याच्या सवयीमुळं त्याची बरीचशी गिर्हाइकं त्यालाकीर्तनकार महाराजचम्हणायची.

धुरपदा साक्षीदाराच्या बाकावर बसली होती. चारचौघीसारखीच दिसणारी, पण झोपाळू असावी. आताही पेंगत असल्यासारखीच दिसत होती. डावा पंजा उजव्या मांडीवर आणि उजवा डाव्या मांडीवर ठेवून मख्ख बसली होती.

जज्जमहोदयांचं प्रश्न विचारणं सुरू होतं.

हं, धुरपदाबाई, तुमचं म्हणणं, हे दोघे आरोपी, यातला एक तुमचा नवरा आणि दुसरा त्याचा मित्र, तुमच्या घरात आले आणि त्यांनी तुम्हाला पाण्यानं भरलेल्या पिंपात टाकलं. बरोबर? आता जरा उभ्या रहा आणि सविस्तर सांगा बघू काय घडलं ते.”

धुरपदा उठून उभी राहिली आणि दोन्ही आरोपींकडं एकएकदा मारक्या म्हशीसारखं बघत बोलायला लागली.

व्हय न्हवं काय ! आवो, सांजच्या व्यक्ताला म्या बसलीती बावचीच्या शेंगा मोडत तंवर ह्ये  दोगंबी आले भाईरनं. म्या वळीकलं, की ह्येन्चं दोघांचं कायतरी घ्याटम्याट  चालल्यालं हाय. त्याबिगार अशी इस्कटल्यावानी दिसनार न्हाईत. दुर्याप्पानं वाकडी मान करून माज्याकडं बगीतलं. आवो त्यो चकनाच हाय, पर माज्या ह्या दाल्ल्यानंबी मान तशीच वाकडी क्येली आनि बगीतलं. दोगं मुरदाड संगट असली म्हंजी अशीच वागत्यात. म्या इचारलं, “काय पायजे भाडयानो तुमास्नी?” तर येक न्हाई नि दोन न्हाई........”

मी पेलेलो, टाईट हुतो.” धर्माण्णा बरळला.

आरं आपुन दोगंबी प्येलेलो हुतो, टाईट ! असं सांग की. भ्याचं काय  तेच्यात? प्येलेलो तर प्येलेलो ! कोन पीत न्हई? काय वो जजसायेब ? ” दुर्याप्पानं री ओढली.

जज्जमहोदय कडकपणे म्हणाले, “म्हणजे तुम्ही दोघेही नशेत होतात. असंच ना?”

काई संशोयच न्हाई !” धर्माण्णानं हमी भरली.

आवो, कुनालापन हुतंच की असं कदी कदी.” दुर्याप्पा बरळला.

तुम्ही दोघं गप्प बसा. ठीक आहे धुरपदाबाई, पुढं सांगा.” जज्ज महोदय धुरपदाकडं मोहरा वळवत म्हणाले.

तर बगा, ह्यो माजा मुरदाड न्हवरा म्हन्तो कसा, ‘शंबर रुपय पायज्येत का तुला?’ मी म्हन्लंपायज्येत की. दे.’ तसा त्यो भाईर ग्येला आनि तितं पागुळीचं पानी साटवायचं येक ब्यारल ठीवलं हुतं त्ये आडवं ढकलंत घीऊन आला आनि त्ये खोलीत मदूमद हुबं करून ठीवत म्हनाला, ‘जा बारडीबारडीनं पानी आन आनी ह्ये ब्यारल भर काटोकाट’. म्या बारडी घ्येतली आन् लागली भराय पानी. आरदा तास लागला भराय. तवर दोगं बाटली काडून बसलेते प्याला. म्या म्हन्लंआरं पिंडक्यांनो ह्या ब्यारलपरास भरून प्येलाईसा आत्तापावतोर. आता बास करा.... घ्या, ब्यारल भरलं काटोकाट.’

मंग ह्या दुर्याप्पानं  खिशातनं शंबराची नोट काडून मला दिली. तसा न्हवरा बोलला, ‘आजून शंबर पायज्येत का?’ म्या म्हन्लंद्या की’. तर त्यो म्हन्ला, ‘मंग तुजी कापडं फेड’.

कापडं फेडू? समदी ?’

पायज्येल तर एक बारकंसं पटकूर बांद कमरंला. आमी जंटलमॅन हाय, व्हय का नाय रे धर्माण्णा?’ दुर्याप्पा म्हन्ला.

सायेब, शंबर रुपय म्हन्जे शंबर रुपय ! म्या कापडं फेडली आणि इचारलं, ‘आता?’ तसा न्हवरा दुर्याप्पाला बोल्ला, ‘तैय्यार हाइस?’

तैय्यार हाय.’

मंग एकानं माजं मुंडकं धरलं, दुसऱ्यानं धरलं पाय आनि म्याकाय करता पिंडक्यांनोम्हनं  म्हनंस्तवर ब्यारलात टाकलं की वो मला सुक्काळीच्यानी. पानी लई गार हुतं, बरफावानी, म्या वरडायली, तशी ह्यो धरम्या म्हन्ला, ‘झालं?’. दुर्याप्पा बोलला, ‘झालं!’ तर धरम्या त्येला म्हन्तो कसा, ’पर हिचं मुंडकं रायलय की पान्याच्या वर. माप चुकनार मग.’

आरं, मग दाब की पान्यात खाल्ती.’

मग माज्या न्हवऱ्यानं माजं मुंडकं पान्याखाली दाबून धरलं. सायेब म्या पार घुसमाटली सायेब. मग न्हवराबी सटपाटला आत्ता ही मरती का काय म्हनून, आनि त्येनं तशीच मला मानगुट धरून उचलली आणि पान्याभाईर काडली. म्हणला, ‘जा सटवे, कापडं घाल.’

म्या, सायेब, लईच एडबाडलीती वो! पळतच भाईर ग्येली. तवर तिकडनं  किशनमल कापड दुकानाचा  मालक किशनमल भाईर आला, त्येनं दुकानातलं एक लुगडं  आनून माज्या आंगावर टाकलं. आनि माजी चित्तरकथा ऐकून मला पोलिस चौकीत घिऊन ग्येला. मंग आमी दोन पोलिसांस्नी संगट घिऊन घरला आलो तर तितं या पिंडक्यांचं टकरीच्या एडक्यांगत आपसात भांडान सुरू हुतं.

धरम्या म्हनीत हुता ब्यारलात धा बारड्या पानी भराय लागलं, म्हन्जे अंजमास दोनशेहे  लिटर. तर दुर्याप्पाचं म्हननं बारड्या फुल भरीत न्हवतास, म्हन्जे कटाकटी सा बारड्याच भरल्या, म्हणजे फक्त येकशेवीस लिटर.  

तवा मग पोलिसांनी दोगान्लाबी दोन दोन लाता घातल्या कंबारड्यात आनि धरून न्येलं बगाफुडचं काय मला ठाव नाय सायेब.”

धुरपदा  खाली बसली. कोर्टात जमलेले लोक खुसूखुसू  हसायला लागले होते. जज्ज महोदय आरोपींकडे वळून म्हणाले, “दुर्याप्पा कोरवी, या झमेल्याला तूच जबाबदार आहेस असं दिसतंय. आपल्या सफाईमध्ये तुला काय म्हणायचं आहे? सांग.”

दुर्याप्पा उठून उभा राहिला.  

सायेब, मी फुल टाईट हुतो.”

ते ठाऊक आहे आम्हाला. पुढं बोल.”

बोलतो सायेब, ह्यो धर्मप्पा सकाळी नवाच्या सुमाराला माज्या दुकानात आला आनि म्हन्लाचला दुर्यापशेठ, नवटाक मारून ईवूया. तुमी बी घ्या आम्च्यासंगट आज.’ मग आमी दोगंबी गुत्त्यावर गेलो. ह्येनंच मग नारंगीचं दोन नवटाक मागीवलं. दोगं बी प्येलो. पन आपन बी काय  फुक्कट पिनाऱ्यातलं न्हई बरं का. मीबी मग दोन नवटाक मागीवलो. तित्नं फुडं, ह्यो  माज्यासाटी, मी ह्येच्यासाटी आसं मागवीत मागवीत आम्मी पीतच ऱ्हायलो दुपार झाली तरी. मग येकदम ह्यो रडाय लाग्ला. मी इचारलो, का रं बाबा? तं म्हन्ला बेस्तरवारच्या आत त्येला कुनाचं तरी येक हज्जार रुप्पय मागारी द्याचं हाईत आनि त्येच्याकडं त्ये न्हईत. मग जरा वेळ तसंच मुकाट बसला आन् मग येकदम म्हन्ला, ‘दुर्यापशेट, मी माजी बायको धुरपदा इकतो तुमाला. तुमी खरीदी करा.’ 

आता, ध्यानात घ्या बरं का सायेब, मी फुल  टाईट, त्यात्नं  माजी बायको म्येल्याला चार वरसं हून ग्येल्याली. मान्साला जराशी कुटं तरी आस लागतीच की वो. काय ? खरं का न्हाई ? मी काय तंवर ह्येच्या बायकूला बगितल्याली न्हवती. पन काय झालं तरी बाई ती बाईच की वो ! मी इच्यारलं, ‘कितक्याला इकनार?’

ह्येनं जरा येळ इचार करीत घालीवला आन् म्हन्ला, ‘मी तिला किबिक मीटर परमानं इकनार’. मला काय वावगं वाटलं न्हई. कारण मीबी फुल टाईट हुतो. आन येक किबिक मीटर म्हंजी येक हजार लिटर ह्ये मापबी मला ठाऊक हुतं. मं मी ईचारलं का किबिक मीटरला किती रुपय ? ह्यो म्हन्लासा हज्जार रुपय’.

मी मनातच हिशेब घातला. हजार लिटर ला सा हजार, म्हंजे सा रुपय लीटर. आवो सायेब, गाईचं दूद बी धा रुपय लिटरच्या खाली मिळत न्हाई. आनि आख्खी बाई? सौदा तर सस्ता हुता. पन मी हाडाचा बिजनेसमन! घासाघीस केल्याबिगर ऱ्हाईन का? म्हन्लं, ‘म्हाग हाय गड्या. मी बग जास्तीत जास्त किबिक मीटरला चार हजार भाव दीन.’ तसा ह्यो गयावया करतपरवडत न्हाई, माजी नुकसानी हुतीयाअसं म्हनाय लागला. पन मी काय हाटलो न्हई. म्हन्लं, ‘आरं धर्माप्पा, तुजी बायकू काय नवी ताजी न्हई, चार पाच वरसं तरी वापरली हाईस, मंजी शेकण्डह्यांडच झाली की!’ आखीरला ह्यो कबूल झाला. म्हन्ला, ‘कबूल हाय, चला म् जाऊया घराकडं.’  आमी निगलो एकमेकांच्या गळ्यात हात टाकून, ‘मी तुजा भाऊ, तू माजा भाऊआसं करत.”

खटला ऐकायला आलेल्या लोकांप्रमाणेच जज्ज महोदयांचंही हा अफलातून सौदा ऐकताना कुतूहल वाढत चाललं होतं. तरी त्यांनी समज दिली, “दुर्याप्पा कोरवी, पाल्हाळ लावू नको. लवकर लवकर सांगून टाक पुढं काय झालं ते.”

सांगतो की सायेब, तर त्येवड्यात् माज्या मनात डाउट आला, की बाईचं मोजमाप काडायचं कस? ह्येला इचारलं तर ह्यो म्हन्ला, ‘सोप्पं हाय. येक ब्यारल घ्याचं, पान्यानं भरायचं, धुरपदेला त्यात ठीवायचं आनि ज्ये पानी भाईर पडल त्ये मापायचं. कळ्ळं का?’

आरं पर त्ये पानी भाईर सांडून जानार, मग मापायचं कसं म्हन्तो मी?’

सायेब, ह्यो त्येच्यामारी लई डोकेबाज. त्यात प्येलेला. मग काय? इचारायलाच नगो. म्हन्ला, ‘आवो दुर्यापशेट, शिंपल! धुरपदेला भायेर काडल्यावर ब्यारलात जागा हुईल का न्हाई? आपन  बारडी बारडीनं पानी भरून ती जागा भरून काडायची. किती बारड्या पानी लागंल त्ये माप धुरपदेचं. पन्नास बारड्यांचा येक किबिक मीटर हुतो. हाय का नाय शिंपल?’

तर बगा सायेब, आमी आनि धर्माण्णा त्येच्या घराला ग्येलो. त्येच्या बायकूला बगीतलं. काई  खास न्हवती. म्या जरा खट्टू झालो. पर इच्यार क्येला, रंभा काय आन् सूरपनखा काय, बाई ती बाईच की. दोगीबी उपेगाला येत्यातच की! खरं का न्हाई साययेब? काय म्हन्तासा? बरं त्ये जाऊ द्या. तर बगा, तिच्याकडं बगून मी अंदाज घीत्ला, दोनशे लिटरांच्या वर काय न्हवती ती. म्हंजे सौदा काई म्हागात जानार न्हवता. आणि, आवो, खरंच तिचं माप सा बारड्यांइतकं म्हंजे एकशेहे वीस लिटर यवढंच भरलं. आता फुडचं काय त्ये धुरपदेनं सांगितल्यालं हायच तुम्माला सायेब. माजी नुकसानी हुनार हुती तरी पन तिच्या आंगावर नामीनल तरी कापडं ठेवाय मीच सांगितली ह्यो पाइण्ट बी ध्यानात घ्या बरं का.  पान्यातन  भाईर आल्यावर ती पळून जावून  पोलिसांना घीऊन आली. पोलिसांनी लाता घातल्या आनि आमाला वडत घीऊन ग्येले चौकीवर. ह्ये काय बरूबर न्हाई झालं. मी कायद्यानं चालनारा मानूस हाये, नुकसान भरपाई मिळाय पायजे मला. तसा हुकूम द्या सायेब. बसू का आता खाली?” दुर्याप्पानं आपली साक्ष संपवली.

त्यानंतर धर्माण्णाची साक्ष झाली. त्यानंही दुर्याप्पाची री ओढली. पण एकच पालुपद लावलं,  “धुरपदेच माप धा बारड्या म्हंजे दोनशेहे लिटर भरलं ह्येच् खरं हाय. कुनाची म्हन्शीला त्येची आण घेतो, सायेब, आगदी तुमचीसुद्दीक.”

जज्ज महोदयानी कपाळावर हात घेतला. आणि थोड्या वेळात आपला निर्णय सांगितला. धुरपदेचा  मर्डर करण्याचा कट केल्याचा आरोप सिध्द होत नसल्यानं दोन्ही आरोपीना फक्त विवाहसंस्थेच्या पवित्रतेची शिकवणी देऊन कोर्ट उठेपर्यंत बाकावर उभं राहण्याची शिक्षा सुनावली.

शिक्षा भोगून झाल्यानंतर धर्माण्णा धुरपदेबरोबर इंदरपेठेतल्या त्यांच्या घरी गेला आणि दुर्याप्पा त्याच्या गजापूर हेअर कटिंग सलूनकडे.

******