Saturday, January 23, 2021

-२२- श्रध्दांजली

 (अन्तोन चेखोव्ह च्या Marshall’s Widow या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

दर वर्षी एक फेब्रुवरीला मिसेस कॅथरीन कार्वालोच्या बंगल्यावर पाहुण्यांची वर्दळ असते. मिरजेचे मरहूम मेयर एरिक कार्वालो यांची कॅथरीन ही विधवा पत्नी. एक फेब्रुवारी या तारखेला मेयर एरिक स्वर्गवासी झाले. त्यांची  स्मृती  जागवून त्याना श्रध्दांजली वाहण्यासाठी म्हणून मिसेस  कॅथरीन गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी या दिवशी आपल्या आणि मरहूम एरिक यांच्या निवडक परिचितांना आमंत्रित करतात. श्रद्धांजली देणारी भाषणे झाल्यानंतर श्रमपरिहार म्हणून जेवण दिले जाते. आज रविवार, एक फेब्रुवारी. आजच्या समारंभासाठी आलेल्या निमंत्रितात सध्याचे मेयर धनवडे, मिरजेचे आमदार शफिक  मुजावर, म्युनिसिपल कौन्सिलर शामराव बेंडके, डीएसपी सायमन फर्नांडिस, समोरच असलेल्या मिशन हॉस्पिटलच्या कंपाऊंड मध्ये छोटेखानी निवासस्थानामध्ये राहाणारे, कपड्यांना सदोदित आयोडीनचा वास येत असेलेले हॉस्पिटलचे डॉक्टर जगदाळे, आयर्विन मेमोरियल चर्चचे बिशप फादर सॅम्युअल तिवडे, सेशन कोर्टाचे जज्ज फेलिक्स रिबेरो, हे खास आणि इतरही बरीचशी - बिल्डर, नोकरदार, शेतकरी - अशी जवळजवळ वीस एक तरी माणसे होती. दोन तीन खोल्यांमध्ये त्यांची बसायची व्यवस्था केली होती. मुख्य कार्यक्रम बंगल्यातल्या प्रशस्त सिटिंग हॉल मध्ये होणार होता.

बरोबर बाराच्या ठोक्याला सारे आमंत्रित गंभीर चेहरे करून खोल्यांमधून निघून हॉलमध्ये आले. कोणीही बोलत नव्हते. सारे अगदी गप्प गप्प. कार्पेट असल्यामुळे पायांचा आवाजही  होत  नव्हता. अर्थात, प्रसंगाचं गांभीर्य ध्यानात घेऊन सगळे शांतता राखून, एकमेकांचे हात धरून हॉल मध्ये आले. हॉलमध्ये सगळी तयारी होती. फादर तिवडे, लहानखुऱ्या चणीचे, उतारवयातले बिशप त्यांचा काळा झगा (रोब) पांघरून होते. त्यांचा सहकारी आफॉन्सो मुकाट्याने प्रार्थनापुस्तकाची पाने उलटत त्यांत बुकमार्क ठेवत होता. आणखी एकजण धूपपात्रातल्या निखाऱ्यांवर धूप टाकून हॉल मध्ये निळसर धूर आणि धुपाचा वास हाताने पसरवत होता. दानियाल  कांबळे, प्राथमिक शाळेतला शिक्षक चांदीचं पाणी दिलेल्या ट्रे मध्ये मेणबत्त्या घेऊन वाटत होता. यजमानीणबाई, कॅथरीन कार्वालो, छोटासा हातरुमाल घेऊन अश्रू टिपण्याच्या तयारीत उभ्या होत्या. मधून मधून टाकण्यात येणारे  उसासे वगळता हॉलमध्ये अगदी सुई पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती. सगळे लांब चेहरा करून होते.

श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. निळ्या धुराची वलयं वर वर जायला लागली, पेटवलेल्या मेणबत्त्या मधूनच फुरफुरायला लागल्या. सुरुवातीला मोठ्या आवाजात सुरू झालेलं संगीत हळू हळू प्रार्थनांच्या अनुषंगानं शांत मंद सुरांवर आलं. सूर दु:खी निघायला लागले तसतसा लोकांचा मूडही दु:खी व्हायला लागला. जीवन नश्वर आहे हे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टीदेखील हे त्यांच्या मनावर ठासायला लागले असावे. मरहूम एरिक कार्वालो, जाडाजुडा, लाल गालांचा गडी कसा एकदा तोंडाला लावलेली शांपेनची बाटली रिकामी करूनच खाली ठेवायचा, कपाळ बडवून डोळ्यांवरचा चष्मा चक्काचूर करून टाकायचा ते आठवत ‘वुईथ दाय सेंट्स ओ लॉर्ड’ ही प्रार्थना यांत्रिकपणे म्हणताम्हणता, यजमानीण  बाईंचे हुंदके ऐकत लोक अवघडलेले पाय बदलत राहायला लागले. जास्तच भावनाप्रधान असलेल्यांना घशात गहिवरून आल्याची आणि डोळ्यात अश्रू येऊ घातल्याची जाणीव व्हायला लागली. मग अवघडलेले वातावरण थोडे सुसह्य करण्याच्या प्रयत्नात मेयर धनवडे डीएसपी फर्नांडिसांच्या कानात कुजबुजले, “बरं का साहेब, काल मी आपल्या सातवेकरांच्या घरी गेलो होतो नेहमीच्यासारखा पत्त्यांच्या पार्टीला. तिथं सॅम सरवदे आणि मी पार्टनर होतो. तर बघा, हुकमाच्या पानाचा उपयोग न करताच आम्ही सगळे हात जिंकले... आणि अहो आमच्या ऑपोझिट असलेल्या मिसेस राठोड, तुम्हाला माहीत आहेत की त्या, त्या इतक्या अपसेट झाल्या की बोलता बोलता त्यांची कवळीच निसटून टेबलावर पडली.”

एवढ्यात शेवटची ‘इटर्नल मेमरी’ ही प्रार्थना म्हटली गेली. दानियाल कांबळेनी नम्रतापूर्वक सगळ्या मेणबत्त्या गोळा केल्या. आणि मग एकेकजण प्रथम दबलेल्या आवाजात आणि मग नॉर्मल आवाजात  बोलायला लागले. आणि मग रिवाजानुसार आभार प्रदर्शन झाले आणि फादर तिवडेनी  अंगावरला रोब उतरवला. थंडी असल्यामुळे लोकांनी हाताचे पंजे एकमेकांवर घासून ऊब आणायचा प्रयत्न केला. कॅथरीनने मरहूम एरिकच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. जरा वेळाने त्यांचा स्वैपाकी बाहेर आला आणि त्याने जाहीर केले, “मॅडम, खाना लगाया है”.  कॅथरीनने उसासा टाकला, आठवणी आटोपत्या घेतल्या आणि पाहुण्यांना “चला मंडळी, लंच घेऊया” म्हणत डायनिंग हॉलकडे नेले.

बुफे मांडलेला होता. दर वर्षीच्या अलिखित प्रघाताप्रमाणे आफॉन्सो बुफेकडे बघत दोन्ही हात फैलावून म्हणाला, “आहाहा! स्वर्गीय! हे जेवण माणसांसाठी आहे की देवांसाठी असा संभ्रम पडावा इतके स्वर्गीय वाटते. हो ना फादर?”

कितीतरी पदार्थ होते. तऱ्हतऱ्हेचे, स्वादिष्ट. बघूनच तृप्त व्हावे असे. मिरजच काय, आसमंतातील उपलब्ध भाज्याचे, मटण, चिकन, मासे इत्यादींचे पदार्थ,  फळे, गोड पदार्थ, शीतपेये यांची रेलचेल होती. नव्हते ते फक्त कुठल्याही प्रकारचे मद्य! कॅथरीनने शपथ घेतलेली होती, घरात पत्ते आणि दारू यांना पूर्ण प्रतिबंध होता. या दोन नादांच्या अतिरेकामुळेच एरिकचा मृत्यू अकाली ओढवला होता. त्यामुळे दरवर्षीच्या पार्टीत बाटल्या असायच्या त्या फक्त सरबताच्या, पेप्सी, कोकाकोला, थम्स अप या पेयांच्या. व्हिस्कीच्या बाटलीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या स्वर्गस्थ एरिकला या बाटल्या नक्की हिणवत असणार.

“घ्या, सुरू करा मंडळी. अनमान करू नका !”, कॅथरीनने  आवाहन केले. “एका गोष्टीसाठी मात्र क्षमा करा मला, जेवणाबरोबर व्हिस्की, व्होडका वगैरे काही नाही. माझ्या घरात मद्याला जागा नाही हे तुम्हाला माहीत आहेच. तेव्हा, सॉरी !”

लोकांनी रांगेने जाऊन प्लेटस भरून घेतल्या. पण जेवताना त्यांच्यात उत्साह असा काही वाटत नव्हता. काही तरी कमी आहे ही भावना घर करत होती मनात.

“मला काही तरी हरवल्यासारखं वाटतंय,” म्युनिसिपल कौन्सिलर बेंडके शेजाऱ्याच्या कानात कुजबुजले. “माझी बायको जेव्हा चीफ ऑफीसरबरोबर पळून गेली होती तेव्हाची आठवण येतेय. त्या वेळेसारखंच आज आत्ताही मला जेवावसं वाटत नाही.”

मेयर धनवडे जेवायला सुरुवात करण्यापूर्वी अस्वस्थ होते. खिशात हात घालत काही तरी चाचपत  म्हणाले, “हातरुमाल सापडत नाही माझा. बहुतेक गाडीत ठेवलेल्या कोटाच्या खिशात राह्यलाय  वाटतं, घेऊन येतो हं.” आणि ते घाईघाईनं प्लेट टेबलावर ठेवून बाहेर गेले. थोड्या वेळानं परत आले ते खुषीत असल्यासारखे. आल्या आल्या प्लेटमधल्या पदार्थांवर तुटून पडले.

फादर, कोरड्या तोंडाने जेवण खायचं मुश्किल असतं नाही?” मेजर धनवडे फादर तिवडेंच्या  कानात कुजबुजत म्हणाले. “असं करा, ही माझ्या गाडीची किल्ली घ्या. एम एच के ३२१०  नंबर आहे. समोरच्या उजव्या कप्प्यात ग्लेनलिव्हेट सिंगल माल्टची बाटली आहे. ग्लास पण आहे. कुणाला सांगू नका हं मात्र.” मग फादर तिवडेना एकदम आठवलं त्यांचा सहाय्यक बाहेर आहे. त्याला महत्वाचं काम सांगायचं राहून गेलंय. “आलोच” म्हणून ते बाहेर गेले.

त्यांच्या पाठोपाठ डॉक्टर जगदाळे आणखी एकदोघांना आपल्या घराचे नव्याने केलेले इंटेरियर डेकोरेशन दाखवायला घेऊन निघाले.

आमदार शफिक मुजावर आणि कौन्सिलर शामराव बेंडके जवळच्या जकात नाका सर्कल मध्ये मेरिलीन बारवाल्यानी केलेले आक्रमण वाहतुकीला किती धोकादायक आहे, त्यावर काही तरी इलाज केला पाहिजे त्याची पाहणी करायला म्हणून बाहेर पडले.

दुपार झाली आणि हळू हळू साऱ्या निमंत्रितांनी कॅथरीनचे आभार मानत आणि एरिकचे आपणच किती जिवलग मित्र होतो आणि आपण त्याला कसे आयुष्यभर विसरू शकणार नाही ते परतपरत सांगत निरोप घ्यायला सुरुवात केली.

****

त्या दिवशी संध्याकाळी कॅथरीन आपल्या मुंबईनिवासी मैत्रिणीला पत्र लिहायला बसली.

“सिल्व्ही डार्लिंग,

आज, गेल्या चार वर्षांच्या रिवाजाप्रमाणं, मी एरिकच्या स्मृतीदिनानिमित्त माझ्या सगळ्या शेजाऱ्यांना आणि आमच्या दोघांच्या कॉमन मित्रांना लंचसाठी आमंत्रित केलं होतं. अगं, भली माणसं, सगळी. एरिकवर जिवापाड प्रेम करणारी. मी जबरदस्त बुफे ठेवला होता त्यांच्यासाठी. लोक अगदी आवडीनं जेवले. अर्थात नेहमीप्रमाणं मी दारू सर्व्ह करणं कटाक्षानं वगळलं होतं. तुला माहीतच आहे, एरिक लिमिटच्या बाहेर दारू प्यायचा, आणि त्यामुळंच लिव्हर खराब होऊन तो वारला. तेव्हापासून मी स्वत: तर ड्रिंक्स घेत नाहीच, दुसऱ्यांनाही घेऊ देत नाही.  अगं आख्ख्या मिरजेतल्या लोकांच्या मनावर  दारूचे  दुष्परिणाम  बिंबवायचे आणि दारूरहित मिरज निर्माण करायची हे ध्येय मी ठेवलंय. तसा प्रचारही  मी करत असतेच. इथले आयर्विन मेमोरिअल चर्चचे बिशप फादर तिवडे, फार चांगले आहेत ग ते, माझ्या या प्रयत्नांचं त्यांना खूप कौतुक आहे. मला पाठिंबा देत असतात या बाबतीत. अगं फक्त तेच नाही, माझ्या सगळ्याच  शेजाऱ्यांचा माझ्यावर जीव आहे.  आताचे मेयर धनवडे यांनी लंच आटोपल्यावर निरोप घेताना माझा हात हातात घेतला, आपले ओठ त्यावर  बराच वेळ टेकवले. आणि मान हलवत राहिले, एकही शब्द ना बोलता, डोळ्यातून टिपं गाळत. बघ ना, किती भावनाविवश झाले होते!  आणि फादर तिवडे, अगदी प्रसन्न चेहऱ्याचे आहेत. माझ्या शेजारी बसले आणि पाणी भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत लहान मुलासारखे काही तरी बोलत राहिले. मला समजलं नाही काय बोलतायत ते. पण भावना जाणवू शकतातच ना ग? आणि डीएसपी सायमन फर्नांडिस. नाही का मागे मी तुला त्यांच्याबद्दल लिहिलं होतं? ते कविही आहेत हो! तर ते अगं, माझ्यासमोर गुढगे  टेकून बसले आणि आपल्या भावनांनी ओथंबलेल्या कविता म्हणून दाखवायला लागले. इतके वाहवत गेले ना भावनांमध्ये की तोल नाही सावरू शकले स्वत:चा, आणि चक्क पडले गं कोलमडून! एवढा भरभक्कम माणूस, पण कमालीच्या हळव्या मनाचा आहे न? सिल्व्ही  डियर, दिवस तसा चांगला गेला, पण एक गोष्ट जरा मनाला लागली माझ्या. अगं, सेशन जज्ज रिबेरो आहेत ना, त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आणि माझ्या सोफ्यावर ते जवळजवळ दोन तास निपचित पडून राहिले. आम्ही हाका मारल्या, पाणी मारलं तोंडावर पण काही केल्या शुध्दीवरच येईनात. नशीब डॉक्टर जगदाळे होते तोपर्यंत म्हणून. त्यांनी लगेच हॉस्पिटलच्या डिस्पेन्सरी मधून अल्कोहोल आणवलं आणि रिबेरोंच्या कानशीलावर चोळलं आणि थोडंसं ओठ उघडून तोंडात ओतलं. या उपायाचा  मात्र लगेच परिणाम झाला आणि ते शुध्दीवर आले. आणि मग त्यांना उचलून हळू हळू चालवत डॉक्टरांनी आपल्या घरी नेलं. पुढचं काही समजलं नाही मला. तर अशी झाली मेमोरियल पार्टी. बरं आता पुरे करते ग. उत्तर पाठव. मग नेक्स्ट संडे ला लिहीन मी दुसरं पत्र. बाय् !

कॅथी” 

*****    

5 comments:

  1. सोहम दुभाषीFebruary 9, 2021 at 8:55 AM

    चांगले झाले आहे रूपांतर.

    ReplyDelete
  2. स्वाती कुमार वर्तकFebruary 9, 2021 at 11:11 AM

    रूपांतर खूप आवडले. अभिनंदन.

    ReplyDelete
  3. श्रद्धांजली खूप आवडली. ह्या गोष्टीवरून एक कळाले की मद्य प्राशन हे नेहमीच जरुरी नसते. अनुवाद खूप सुंदर झाला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मीनल. तुमच्या अभिप्रायामुळे उमेद वाढली.

      Delete