Friday, April 17, 2020

-१८- हवालदाराची खेळी

[डब्ल्यू डब्ल्यू जेकब्जच्या ‘The Constable’s Move’ या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर]
 
उत्तर कोलकात्यातील बारासात गाव. बिल्डिंग ब्लॉक्स फॅक्टरीतला कामगार बिधन पाल त्याच्या घरात जेवणाच्या खोलीत बसला होता. पारुलचं, म्हणजे त्याच्या बायकोचं जेवण संपलं नव्हतं. थंडगार पडलेल्या जेवणाचं ताट तसंच टेबलावर होतं, पण ती जागेवर नव्हती. बिधननं तिच्या ग्लासातलं पाणी पिऊन पालथ्या पंजाने ओठ पुसले आणि आरोळी दिली, “पारो, भीतरे आसो, आर खाना खाओ….. शुन, पारो, भितरे आसो, नोई तो आमी दरजा बोन्दो करबो, आर तुमी बाहिरे रोये जाबे. (“पारो  ये बघू आत आता आणि जेवून घे……ए, पारो, ऐकलंस का? चल ये नाही तर मी दार बंद करून टाकीन आणि तू राहशील बाहेर.”)
 
आपल्याच तिरकस बोलण्यावर खूष होऊन बिधन हसला. खिशातून पाकीट काढून एक सिगारेट  शिलगावली आणि बाहेरच्या खोलीत गेला. पारो खिडकीतून बाहेर डोकावत उभी होती शेजारच्या घरात नवा भाडेकरू येणार होता – पोलीस हवालदार सोमेंदु दासगुप्ता – त्याचं फर्निचर गाडीतून उतरवून घेतले जात होते ते बघत.
 
“भीतरे आसो, नोई तो आमी भीतरतेके चिटकरी लागी देबो. तुमी बाहिरे रोय जाबे. प्रोतिबेशीर   जिनिशेर दिके ताकानु ठीक नोई. ओननोई. (“ये आत आता नाही तर मी कडी लावून टाकीन दाराला आतून आणि तू राहशील बाहेरच. असं शेजाऱ्याच्या सामानाकडं निरखून बघणं बरोबर नाही. गैर आहे.”)
 
पारुलबाईनी या धमकीची अजिबात दखल घेतली नाही. खिडकीच्या तावदानाला नाक टेकवून बाहेर बघणं चालूच ठेवलं. आता जाड काच असलेलं एक टेबल काळजीपूर्वक गाडीवरून उतरवून घरात नेलं गेलं. नवा शेजारी हवालदार सोमेंदु दासगुप्ता स्वत: देखरेख करत उभा होता.
 
“आर कोतो जीनिश आशबे भगवान जानेन. मोने होय, एखाने हार्मोनियम ओ आछे.” (“आणखी काय नि किती सामान येणार आहे आहे कोणास ठाऊक ! एखादा पियानोही असेल कदाचित त्यात.”) बिधन एक कटाक्ष टाकत तिरसटपणे बोलला.
 
“आर्रे, शोत्तीई हार्मोनियम आछे. ट्रक थेखे नामाच्छे. ओई देखो ओर पा देखा जातसे. (“अय्या खरंच की. बाजाची पायपेटीच आहे आता उतरवतायत ती. ते काय त्तिचे पाय दिसतायत ट्रकमध्ये.”) पारुल चित्कारली.
 
आता बिधननं स्वत: खिडकीजवळ जाऊन बघितलं. आणि मग म्हणाला, “पारो, आमी शोकाले बोलेचीलाम आमादेर घरेर पुरानो बाक्शो उनादेर उठाने फेले दा ओ. फेलेछो की? (“पारो, मी तुला सकाळी सांगितलं होतं आपल्या घरातली डबडी आणि कबाडसामान त्याच्या अंगणात फेकायला ते फेकलं  होतंस का?”)
 
“हां आमी फेलेछी ! ओखान थेके तीन बाक्शो उठीये निये गेसेन. आमी शुनेछी प्रोतीबेशी उना बऊके बोलेछेन ‘एगुलू आमादेर काजे लाग्बे’ ” (“हो, टाकलं की ! त्यातले तीन डबे त्यानं उचलून घरात नेले. मी ऐकलं, ‘आपल्याला रंगासाठी नाही तर आणि कशासाठी तरी उपयोगाला येतील’ असं त्याच्या बायकोला म्हणाला ते.”) पारुलनं उत्तर दिलं.
 

“हां. ये पोलीसगुलू एबाबे चोरी कोरे, एजान्नोई हार्मोनियम किन्ते पारे. ओन्नेर जीनिश उठानू लोभी मानुशेर काज.” (“हं, अशी चिंधीचोरी करतात म्हणून तर बाजाच्या पेट्या घेऊ शकतात हे असले पोलिसवाले.”) बिधन पुन्हा तिरसटपणाने म्हणाला,  “किंतु, आमी तुमाके बोलेछी पुरानो बाक्शो फेलार जोन्नो. तुमी नूतन बाक्शो केनो फेलेछो? तुमार की ग्यान नाई?” (“दुसऱ्याच्या वस्तू अशा हडप करतात लेकाचे. पण… मी तुला बिनकामाची डबडी टाकायला सांगितली होती. मं तू चांगली कशाला फेकलीस? बिनडोक कुठली!”)
 
पारुलबाईनी काही उत्तर दिलं नाही. ट्रकवाल्यानं काळजीपूर्वक उतरवून हलकेच फुटपाथवर ठेवलेल्या पायपेटीकडे भारावून गेलेल्या नजरेनं बघत राहिल्या. सोमेंदु हवालदारानं सगळ्या बाजूनी तिची पहाणी केली. त्याच्या बायकोनं तेवढ्यातल्या तेवढ्यात तिचं झाकण उचलून बघितलं आणि दोनतीन पट्ट्या दाबून आवाजही काढला.
 
“अशोभ्भ मोहिला,” (“भंपक बया,”) पारुलबाईनी अर्धवट वळून उद्गार काढला.  “भूतनीर हातेर आंगुल देखो ! मोटा गाजोरेर मोतो.” (“सटवीची बोटं बघा कशी जून चरबट गाजरासारखी आहेत ती!”)
 
“पारो, चमत्कारेर कोथा! पुलीसगुला आमादेर मोहल्लाते? आर आमार प्रोतीबेशी होये थाके? ये बोरो ओन्नाई! थामो,  प्रोथोमे आमी घीये हारमोनियम भंगबो. तारोपोरे तार माथा फाटाबो.  दुई दिने एखान थेके चोले जाबे. तुमी देखते थाको.” (“पारो, अग, कहर म्हणजे पोलीसवाल्यानं आपल्या या कॉलनीत, त्यातसुध्दा माझ्या शेजारला येऊन रहावं ? मोठा अपराधच आहे हा. थांब, आधी त्याचा तो पियानो फोडून टाकतो आणि मग त्याचं टक्कुरं. दोन दिवस, बस् दोन दिवसात इथनं पळून जातोय की नाही बघच तू.”) बिधन म्हणाला.
 
“केनो? केनो जाबे?” (“का पण? का जाईल तो?”) पारुलनं विचारलं.
 
“केनो? तुमी देखो. आमी ताके बाचते देबो ना. बारासाते आमादेर मोहल्ला चेरे ओनेक जाएगा खाली थाकते पारे. आमी चाही आमादेर प्रोतिबेशीते केऊ पोलीस ना थाके. (“का? बघशीलच तू, जिणं हराम करून टाकीन मी त्याचं म्हणून. बारासातमध्ये ही वसाहत सोडून दुसरीकडंही कितीतरी जागा असतील रिकाम्या. माझ्या शेजारी नको कुणी पोलीसवाला.”)
 
नंतरचा संपूर्ण आठवडा बिधनचा मेंदू फक्त पोलिसाला कसा हुसकवायचा याचा विचार कर करून हैराण झाला. पोलीसवाला रहायला आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बिधनच्या अंगणात रोज रिकामी डबडी पडलेली दिसायची. त्याच्या ओळखीचीच होती ती सगळी. मग तीच डबडी पुढचे तीन दिवस या अंगणातून त्या अंगणात अशी ये जा करायला लागली. कधी कधी तर दिवसातून तीनतीनदा असा प्रवास व्हायचा त्यांचा. एके दिवशी संध्याकाळी बिधन बाहेर जाण्याच्या तयारीत बूट घालून  नाड्या बांधत असताना थड्ड असा आवाज करून एक चेपलेली, गंजकी बादली त्याच्या अंगणात पडली. पाच मिनिटांनी हवालदार सोमेंदु दासगुप्ता सूर्यास्त बघायला म्हणून त्याच्या घरातून बाहेर आला तेव्हा बिधननं त्याला खडसावलं तर तो म्हणाला, “मी ऐकला होता बुवा आवाज काही तरी पडल्याचा.”
 
“तूच तर टाकलंस ते.” बिधन गुरगुरला.
 
“नाही बुवा. मी आणि माझी बायको, तिचा धाकटा भाऊ उत्पल नि त्याची बायको आलेत त्यांच्याबरोबर आत चहा घेत बसलो होतो.” सोमेंदुने आरोप नाकारत ठासून म्हटले आणि वर हसत म्हणाला, “खरं सांगू का? तू जर नीट बघितलंस तर दिसेल की ती बादली काही अगदीच टाकाऊ नाही. तुझ्यापुरतं पाणी राहील त्यात.”
 
बिधन चरफडत घरात गेला. बदला कसा घ्यायचा या विचाराने तो बराच वेळ अस्वस्थ राहिला. पारुलकडून काही सुचवलं जाणार नाही हे ओळखून तो मग बाहेर पडला आणि नेहमीच्या मित्रांच्या कंपूकडे गेला. कंपूतल्या सगळ्यांचं मत पडलं की हवालदाराला चांगला धडा शिकवायला पाहिजे, परंतु कोणाकडेही हमखास यशस्वी होईल अशी योजना नव्हती.
 

“चार लोकात त्याचं हसं होईल असं काही तरी करायला पाहिजे, पोलीसवाल्याना आपली अशी कुचाळकी केलेली पसंत पडत नसते.” एक मित्र म्हणाला.
“पण कसं?” बिधननं विचारलं.
“आरे त्यात काय? हजार मार्ग आहेत त्यासाठी.” तो मित्रच बोलला.
“एक तरी सांग ना लवकर.” बिधन.
 
पण कुणाकडूनही काहीच ठोस उपाय सांगितला गेला नाही. पुढचा आख्खा आठवडा बिधननं अस्वस्थतेत घालवला, हवालदाराचा पाणउतारा कसा करता येईल याचा विचार करत. आणि तोपर्यंत त्याच्या अंगणात पडलेली डबडीही पडून राहिली तशीच. हवालदार सोमेंदु मधून मधून त्यांच्याकडं नजर टाकून जायचा.
 
एक दिवशी अचानक खुलून आलेल्या चेहऱ्यानं बिधन पारुलला म्हणाला, “पारो, आज रॉयबाबुर साथे कोथा होयेचिलो. उनी  की बोलेचे? उनी बोलेचे पोलीसगुलो कोनो भालो मानुषेर घरे बिना ओनोमोती चारा आश्ते पार्बे ना.” (“पारो, अगं तो रॉयबाबू भेटला होता आज मला, तो काय म्हणाला माहित आहे? तो म्हणतो की पोलीसवाल्यानं कुणा सभ्य गृहस्थाच्या घरात, बोलावलं असल्याशिवाय, पाउल टाकायचं नसतं.”)
 
“तोबे? तार की? तुमी तो प्रोतिबेशिके आमादेर घरे कोखोनो आस्ते बोलो ना.” (“मग? त्याचं काय? तुम्ही तर शेजाऱ्याला कधीच आपल्या घरात बोलावणार नाही.” चेहरा निर्विकार, मख्ख ठेवून पारुलनं विधान केलं.
 
“पारो, किछु बुद्धी काजे ला गाव! बिना ओनोमोतीते पोलीसगुलू आमादेर घरे आसले, तोबे तार  उपोर सरकारी बावे जीग्गाशा कोरा होबे. तार उपोरे बिपोदा आस्ते पारे” (“पारो, जरा डोकं वापर. न बोलावता आपला शेजारी पोलिसवाला घरात घुसला आपल्या तर त्याच्यावर सरकारी चौकशीला तोंड द्यायची वेळ येईल.”) बिधन तिच्या मख्खपणाची कीव करत म्हणाला.
 
“केनो औनी बिना ओनोमोतीते  आमादेर घरे आसबेन?” (“पण तो कशाला येईल आपल्या घरात न बोलावता?”)
 
“हां अवश्य उनी आस्बेन, तुमी जुरे चित्कार कोरले उनी आश्बेन……तुमार कापड शुकानुर लाठी कोताय?” (“नक्की येईल, तू मोठ्यानं किंचाळलीस तर……… तुझी ती कपडे वाळत घालायची काठी कुठं आहे?”) डोळा मिचकावत बिधन बोलला.
 
“हे भगवान!  तुमी की पागल होयेगेछो?” (“देवा रे, वेडबीड लागलंय की काय तुम्हाला?”) पारुल घाबरून म्हणाली.
 
“शुनो, तुमी निजेर रूमे जाव. आमी लाठी नीये आश्बो, जोरे जोरे गद्दीते मारबो. तुमी शुदू चित्कार कोर्बे, ‘आमाके आर मेरो ना, आर मेरो ना’. तुमार चित्कार शुने हविलदार दौरे दौरे आश्बे तुमाके बचानुर जोंनो. आमी भीतरतेके चीतकारी लागाबो ना. उनी शोहोजबाबे भित्तरे आश्ते पारे. बुझ ते पार छो? (“ऐक, तू आपल्या बेडरूममध्ये जा, मी येईन आणि काठीनं आपल्या गादीवर जोरजोरात फटके मारीन, तू नुसतं किंचाळत ओरडायचं, ‘नको नको, मारू नका, मारू नका’ म्हणत. तुझ्या किंकाळ्या ऐकून हवालदार नक्की धावत येईल तुला वाचवायला. मी बाहेरच्या दाराला आतली कडी नाही लावणार. ढकलल्याबरोबर उघडावं म्हणून. शिरलं काही डोक्यात?”)


पारुलनं विचार करण्यात बराच वेळ घालवला. बिधनचा संयम सुटायच्या बेतात आला असताना अनिच्छेनंच पारुल उठली आणि आत जाऊन काठी घेऊन आली. म्हणाली, “कुथाय मारचो देखे मारो, नोय तो आमारे होत्त्या करबे…… मारार  प्रोथोमे आमादेर मोध्दे किचू झगादा होवा प्रोयोजन?” (“काय बडवताय ते नीट बघून बडवा. नाही तर कराल माझाच खून…… आणि हो, मारायला सुरुवात करायच्या आधी आपल्यात वादावादी व्हायला हवी न?”)
“हा. तुमी आमाके जोर जोरे गाली दिये जाओ.” (“होय तर. तू मला शिव्या देत रहा कचकून कशावरनं तरी.”) बिधन म्हणाला आणि दोघंही मग बेडरूममध्ये गेले.
 
पारुलनं शेजारच्या घराच्या लागून असलेल्या बेडरूममधला कानोसा घेऊन हवालदार आणि त्याची बायको आत असल्याची खात्री करून घेतली आणि मग हळूहळू चढत्या आवाजात बिधनला त्यानं केलेल्या, न केलेल्या चुकांबद्दल नावं ठेवायला सुरुवात केली. एरवी नवऱ्यासमोर आवाज काढू न शकणाऱ्या तिनं मग नवरा, सासू एवढंच नव्हे तर धाकट्या नणंदेचाही उध्दार करायला मागे पुढे पाहिलं नाही. तिच्या त्या कर्कश्श आवाजातली लाखोली ऐकून बिधनला तर खरोखरच तिला फटकावून काढावं असं वाटायला लागलं. पण लगेच भानावर येऊन “चुप कोरे बोशो, नोईतो आमी लाठी दिये मार्बो” (“आता गप्प बसतेस की देऊ दोन तडाखे”) म्हणत त्यानं पलंगावरल्या गादीवर काठीनं तडाखे मारले. पारुल स्वर टिपेला नेऊन किंचाळली मारली, “उरी मा ! हे शोय्तान, तुमी आमार जान निबे ? केऊतो आमाके बचाव. ” (“आयाई ग, हैवाना, जीव घेतोस काय माझा. अरे कुणी तरी थांबवा, थांबवा ह्या सैतानाला.”) बिधन कानोसा घेत हलकेच म्हणाला, “प्रोतिबेशीदेर घरे कोथा शुना जाच्चे.”  (“हालचाल होते आहे ग शेजारच्या घरात.”) पारुलने परत एकदा किंकाळी फोडली, “मोरे गलाम, मोरे गलाम, केऊतो आमाके बचाव.” (“मेले मेले, वाचवा कुणीतरी.”)
 
आणखी थोडं गादीला धोपटल्यानंतर बिधन पुटपुटला, “बहिरा आहे की काय हा पोलीसवाला!”
 
इतक्यात पलिकडून हवालदाराचा आवाज आला, “अरे ए, अरे, गप्प बसव की तिला. केव्हापासून किंचाळते आहे, एक क्षणभरसुध्दा डोळा नाही लागत तिच्या या केकाटण्यामुळं.”
 
बिधननं काठी टाकली आणि पारुलला म्हणाला, “हविल्दार भोयपाच्छे, पारो, आरो जोरे चित्कार कोरो.” (“भेकड आहे. यायला घाबरतोय लेकाचा. पारो, ओरड आणखी जोरानं.”)
 
त्यानं परत काठी हातात घेतली, पारुलनंही पुन्हा पुन्हा केकाटायला सुरुवात केली. पण दमल्यामुळं आता त्यात काही दम राहिला नव्हता. निराश होऊन बिधन तो ‘शंभरटक्के अक्सीर इलाज’ थांबवायचा विचार करत होता इतक्यात धाडकन् बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “आला वाटतं एकदाचा” बिधन बोलला. खुषीत येऊन दोघांनी परत नाटकाला सुरुवात केली न केली एवढ्यात बेडरुमचा दरवाजा ढकलून कोणीतरी आत आलं. पारुलचा भाऊ होता तो, बिप्लव. आल्याआल्या त्यानं एक जोराचा गुद्दा बिधनच्या पाठीत हाणला आणि त्याला खाली पाडत ओरडला, ”माझ्या बहिणीवर हात उगारतोस? मारशील? मारशील तिला पुन्हा? घे, हे घे.” आणि पुन्हा दोनतीन रपाटे लगावले त्यानं बिधनला. पारुलनं बिप्लवला मागे खेचत थांबायला सांगितलं आणि म्हणाली, “बिपुदा, एठा एकटा नाटोक. आर किछु ना. देखो आमार कुथाओ लागे नी. लागे नी ना ?” (‘बिपुदा, अरे नाटक होतं ते. बाकी काही नाही. बघ, मला कुठं लागलंय का? नाही न?”)
 
“नाटक? नाटक हं?” बिप्लव उद्गारला. बिधननं मग सगळा खुलासा केला.
 

“आजवर मी ऐकलेला सर्वात उत्तम विनोदी किस्सा आहे हा.” हसून हसून डोळ्यात आलेलं पाणी पुसत बिप्लव म्हणाला.
 
“ठीक आहे, ठीक आहे. जा आता तुझ्या घरी.” बिधन गुरकावला.
 
“बिधनदा, मी जातोच आहे. पण बाहेर बरीच माणसं उभी आहेत तमाशा बघायला, आणि कितीतरी घरांमध्ये जाग आलेली दिसतेय त्यांच्या खिडक्यातनं दिसणाऱ्या दिव्यांवरून. बरं झालं काही जखमा न होता आटपलं ते. चला, मी निघतो.” अजून हसू आवरायचा प्रयत्न करत बिप्लव गेला.
 
तो गेल्यानंतर बाहेरचं दार बंद करायला गेलेला बिधन मात्र हवालदार सोमेंदु आपल्या क्लृप्तीला फसला नाही म्हणून खंत करत राहिला. पारुल बेडरूममध्ये गेली ते त्याच्या लक्षातही आलं नाही.
 
“आय भगवान, पालोंगथो भेंगे गेछे.” (“अरे देवा, पलंग तर मोडला की हो.”) पारुल म्हणाली.

“तोय? तुमी मोने कोरो की काटेर पालोंग तुमार मोरोन पर्जन्तो टिके थाकबे? मेझेथे गिये घोमाओ.” (“मग? लाकडी फर्निचर काय तू मरेपर्यंत टिकणार असं वाटतं की काय तुला? चल, खालीच झोप आता.”) आत येत बिधन धुसफुसला. पारुलनं मुकाट्यानं अंथरूण जमिनीवर पसरलं आणि चादर ओढून क्षणार्धात घोरायला लागली.
 
सकाळी जेव्हा कामावर जाण्यासाठी बिधन बाहेर आला तेव्हा त्याला सोमेंदु हवालदार सिगारेट फुंकत अंगणात उभा असलेला दिसला, बिधनचीच वाट बघत असल्यासारखा.
 
“या या बिधनमोशाय, मी रात्री तुमचा आवाज ऐकला काल. काय मोठ्यानं किंकाळ्या येत होत्या हो ऐकायला !”
 
“तुला काय करायचय? नसत्या चांभारचौकशा करू नको.” बिधन तिरसटपणाने बोलला.
 
हवालदारानं बिधनकडं रोखून बघितलं आणि तसंच एकेरीवर येत म्हणाला, “बायको झोडपत होती वाटतं तुला? तसाच किंचाळत होतास. असा मार खाण्यापेक्षा बारासात पोलीस स्टेशनवर येऊन तक्रार कर तिची. मीच असेन तिथं. लॉकअपमध्ये टाकू तिला. काय?”
 
“तक्रार तुझीच केली मी तर काय होईल?” बिधननं हवालदाराला डिवचलं.
 
“दोन महिने, कदाचित तीन महिनेसुद्धा….. तू आत जाशीन, आणि तिथं मी धुलाई करीन तुझी ती वेगळीच.” खंवचट हसत हवालदार बोलला.
 
“शिपुरड्या, तू बाहेर ये मग दाखवतो तुला काय ते.” मुठी वळत बिधननं हवालदाराला धमकावलं.
 
“आलो असतो, पण ते गैरकानुनी होईल. त्यापेक्षा तुझ्या मेव्हण्यालाच बोलावून घे नं. तो वाचवेल तुला बायकोपासून.” हवालदारानं टोमणा मारला आणि हसत हसत आपल्या घरात गेला.
 
बिधन पुटपुटत पुटपुटत कामावर गेला. संध्याकाळी जेव्हा कामावरून परत आला तेव्हा त्याला हवालदार त्याच्या अंगणात पत्र्याची डबडी, दगडगोटे, विटांचे तुकडे वापरून अंगणातली पायवाट नीट करत असलेला दिसला. बिधनला बघून म्हणाला, “तुझ्या बायकोनं सकाळी दिले हे डबे. बरे  उपयोगाला आले. ही वाट छान आखता आली त्यांच्यामुळं.” आणि आपल्या कामात गर्क झाला. काय उत्तर द्यायचं ते न सुचून बिधन फक्त ‘ह्हं’ असा तुच्छता ध्वनित करणारा उद्गार काढून आणि एक सिगारेट पेटवून आपल्या घराच्या दाराला टेकून उभा राहिला. ‘यानं आता फुलझाडं लावावीत इथं,’ त्याच्या मनात विचार आला.

आणि खरंच की, आठवड्याभरात सोमेंदु हवालदाराच्या अंगणात गुलाब, झेंडू, मोगरा अशी वेगवेगळी रोपं लावलेली दिसली. बिधनच्या डोक्यात आता त्या फुलबागेचा विचार घोळायला लागलं.
 
दुसऱ्या दिवशी बिधन सकाळी लवकर उठला आणि ‘शेजाऱ्याची बाग पावसाची वाट बघत असल्यासारखी मरगळलेली दिसते आहे’ असा शेरा पारुलकडं मारून कामावर निघून गेला. कामावर असताना आज त्याचा मूड मनावरचं दडपण उतरल्यासारखा चांगला होता. त्या दिवशी तो कामावरून जरा लवकरच बाहेर पडला. पण घरी न जाता मित्रांच्या अड्ड्यावर जाऊन त्यानं वेळ घालवला. तिथून  तो शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या एका अगदी जवळच्या मित्राच्या घरी गेला. त्याच्याकडंच जेवून मध्यरात्रीच्या सुमाराला तो घराच्या वाटेला लागला.
 
बारासातच्या परिसरात पोचला तेव्हा रात्रीचे बाराचे टोले वाजायला सुरुवात झाली. बारावा टोला वाजून विरतो न विरतो तोच समोर आला सोमेंदु हवालदार.
 
“ए, बिधन,  थांब थांब. मला बोलायचंय तुझ्याशी.” हवालदार म्हणाला.
 
“माझ्याशी बोलायचंय? काय? कशाबद्दल?” – बिधन
 
“माझ्या बागेतल्या फुलझाडाचा सत्यानाश केलंस तू. का?” – सोमेंदु
 
“फुलझाडं?” आपल्याला काहीच समजत नसल्यासारखं दाखवत बिधननं विचारलं, “कुठली फुलझाडं?”
 
“एss…. नाटक करू नकोस. तू काल रात्री माझ्या अंगणात शिरून माझी झाडं उपटून टाकलीस.”
 
“जबान सांभाळून बोल हां, सांगून ठेवतो,” बिधननं बजावलं. “अरे मला स्वत:ला फुलझाडं आवडतात. मग मी असं कसं करेन? पण खरंच तू एवढ्या नीटपणे लावलेली तुझी झाडं मेली? की उगाच माझ्याशी भांडण उकरायचंय म्हणून बोलतोयस?”
 
“अरे वा, काय पण आव आणतोयस निरागसपणाचा! थांब, तुझ्याविरुध्द तक्रार नोंदवून तुला आतच टाकायला लावतो आता.”
 
“हो का? काय रे, मी हे कधी केलं असं तुझं म्हणणं आहे ?” बिधननं प्रश्न केला.
 
“कधी केलंस ते तुलाच माहिती. नक्की वेळ काय ते महत्वाचं नाही.”
 
“नाही कशी? माझ्यासाठी महत्वाचं आहे जाणून घेणं,” बिधन ठासून म्हणाला. “कारण बिप्लव, माझ्या बायकोचा भाऊ काल रात्री आला होता आमच्याकडे मुक्कामाला. रात्रभर तब्येत ठीक नव्हती बिचाऱ्याची. विचार जाऊन त्याला हवं तर, म्हणजे तुझी खात्री होईल मी नाही हे काम केलं ते.”
 
“मी जर पोलिसात नसतो नं तर तुला  असा बेदम चोपला असता की जन्माची अद्दल घडली असती तुला.” हवालदार बोलला.
 
‘अरे, तू पोलिसात आहेस म्हणून, पोलीस नसतास तर, आईशप्पथ, मीच तुझा खून केला असता.” बिधननं सुनावलं.
 

“माझ्या फुलझाडांचा केलासच खून तू……”  सोमेंदु हवालदारानं अचानक बिधनशी  धक्काबुक्की सुरु केली. बिधनचा कोट धरून त्याला खाली पाडलं. आणि मग दोघांची झटापट सुरु झाली ती जवळजवळ दहा मिनिटं चालली. दोघेही जेव्हा दमले तेव्हाच थांबले. बिधनचा कोट फाटला होता आणि त्याच्या डोक्यावरची टोपी चुरगळली होती. नाकातून रक्त येत होतं. सोमेंदुची अवस्थाही तशीच होती. हेल्मेट चेपलं होतं, युनिफॉर्मवर रक्ताचे आणि चिखलाचे डाग पडले होते. दोघानीही एकमेकांकडं बघितलं आणि दोघांची अवस्था सारखीच आहे हे बघून शस्त्रसंधि अंमलात आणायचा निर्णय घेतला.
 
सोमेंदुनं हेल्मेट उचलून घेतलं आणि म्हणाला, “चल निघ, जा माझ्यासमोरून मी माझं मन बदलायच्या आत. नाहीतर परत सुरुवात करीन. आणि लक्षात ठेव, आपल्यात झालेल्या मारामारीबद्दल कुणाकडही एक अक्षरही बोललास ना, तर तू आहेस आणि मी आहे.”
 
“मला वेड लागलेलं नाही जाहिरात करायला.” बिधननं उत्तर दिलं आणि घराच्या दिशेने जायला निघाला.
 
हवालदाराला बडवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं, सोमेंदुनं लाईटच्या खांबाखाली उभा राहून युनिफॉर्म ठीकठाक केला, हेल्मेटचा चेप जमेल तितका काढला आणि ते डोक्यावर ठेवून बारासात पोलीस स्टेशनची वाट धरली. युनिफॉर्मची वाट लागलेलीच होती, शर्टाचं दोऱ्याला लोंबकळत असलेलं एक बटन तुटून खाली पडलं ते त्यानं उचलून खिशात टाकलं. गस्तीच्या बीटवरून कुणाही गुन्हेगाराला पकडून न नेण्यातल्या अपयशाची काय सबब इन्स्पेक्टरला सांगायची हा विचारही त्याला आता सतावायला लागला. एवढ्यात कसला तरी गलका ऐकू यायला लागला.
 
हवालदार सोमेंदु जवळजवळ पळतच आवाजाच्या दिशेने निघाला. ‘पोलीस, पोलीस’ अशा आरोळ्या आता स्पष्ट ऐकू यायला लागल्या. एका वळणानंतर त्याला माणसांचा जमाव एका मोठ्या घराच्या फाटकापाशी असलेला दिसला. इतरही काही माणसं त्याच दिशेने जात होती. हवालदार तिथं पोचला.
‘आला, पोलीस आला, उशिरा का होईना, आला खरा.” त्या घराचा मालक छद्मीपणानं बोलला.
 
थकलेल्या सोमेंदुनं फाटकाच्या खांबाच्या  आधाराने दम घेतला. घरमालक पुढं म्हणाला, “ते चोरटे त्याs दिशेने पळाले, तुम्हाला दिसले नसतील ना हवालदारसाहेब?” इतक्यात घराचा दरवाजा कुणीतरी उघडला तेव्हा आतून आलेल्या दिव्याच्या उजेडात सोमेंदुचा अवतार लोकांच्या नजरेत आला.
 
“अरे? तुम्हाला दुखापत झालीय का? काय झालं?” एकानं विचारलं.
 
“होय” धापा टाकत हवालदार सोमेंदु बोलला. आणि आणखी थोडा वेळ मिळावा म्हणून त्यानं आपल्या खिशातून शिटी काढून फुंकली.
 
घरमालकानं जास्ती माहिती पुरवायचा प्रयत्न केला, म्हणाला, “तीन होते साले चोर, त्यातला एक माणूस भक्कमसा होता, त्याला मी ओळखू शकेन पण बाकीच्या दोघांचे चेहरे नाही दिसले.”
 
सोमेंदुच्या तल्लख मेंदूत आता एक कल्पना आली. त्यानं पुन्हा एकदा शिटी जोराने फुंकली. नंतर विचारलं, “काय काय सामान नेलं त्यांनी?”
 
“काही नाही, मला जाग आली आणि माझ्या दरडावण्यामुळं पळाले लगेच.”
 
हवालदारानं एक आवंढा गिळला आणि म्हणाला, “मी आशुतोष घोष रस्त्यावरून येत होतो तर तिघंजण पळत येताना दिसले या केएनसी रोडवरून. संशय आल्यामुळं मी अडवलं त्याना तिठ्ठ्यावरच आणि त्या जाड्या चोराला धरलं. पण मग तिघानी मिळून माझ्यावर हल्ला केला हो. मी झटापट केली त्यांच्याशी पण तिघांपुढे मी एकटा कमीच पडलो ना. मला धरून ढकललं त्यांनी तर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथच्या दगडावर डोकं आपटून मी बेशुध्द झालो. शुध्द आली तोवर ते तिघेही पळून गेले होते.” इथं सोमेंदुनं हेल्मेट काढून डोक्यावर पडलेली खोक दाखवली. कुणी सहानुभूती दाखवली, कुणी पाठ थोपटली. इतक्यात बारासात पोलीस स्टेशनमधले सबइन्स्पेक्टर ज्योतिर्मोय आणि इन्स्पेक्टर शुभंकर चौधुरी तिथे आले. त्यांनी सोमेंदु हवालदाराची चौकशी केली. सोमेंदुनं परत आपली कथा ऐकवल्यावर इन्स्पेक्टर चौधुरी म्हणाले, “वेल डन, हवालदार दासगुप्ता!  तू पोलीसधर्माला जागून कर्तव्यात कसूर केली नाहीस. आता चौकीवर जा आणि तुझा सविस्तर लेखी रिपोर्ट दाखल कर.”
 

जबर जखमी असल्याची बेमालुम बतावणी करत सोमेंदु मनातल्या मनात त्या तीनही चोराना पोलिसाना न सापडण्यासाठी शुभेच्छा देत बारासात पोलीस स्टेशनकडे गेला. आणि अर्थात, ते पकडले गेले तरी पोलिसाचा जबाब गुन्हेगारांच्या जबाबापेक्षा जास्त विश्वसनीय मानला जाईल याची त्याला खात्री होतीच.
पोलीस स्टेशनमध्येही त्यानं रिपोर्टात आपली ‘कथा’ रंगवून दिली. डोक्याच्या जखमेवर मलमपट्टी, बँडेज इत्यादी सोपस्कार झाल्यानंतर त्याला चार दिवसाची सुट्टी दिली गेली, पुढचे दोन तीन दिवस झाल्या घटनेबद्दल वाच्यता करू नकोस असं सांगण्यात आलं. पण बंगाली दैनिक ‘बर्तमान पत्रिका’ मध्ये ‘बहादूर हवालदार’ या शीर्षकाखाली एक कॉलमभर मजकूराचा लेख छपून आलाच. सोमेंदु मात्र लोकांसाठी ‘संपर्काबाहेर’ राहिला.
 
बिधननं दैनिक बर्तमान पत्रिकाचा तो अंक पाहिला आणि लेख वाचला, परत परत वाचला. काहीतरी गोम आहे यात असं त्याला ठामपणे वाटलं. पण विचारणार कुणाला? हवालदाराचं घर तर बंद होतं. बिधनची उत्सुकता तर अस्वस्थतेत रूपांतरित झाली. आणि मग आठवड्यानंतर जेव्हा त्याला सोमेंदु हवालदार अंगणात आलेला दिसला तेव्हा घाईघाईनं मधल्या कुंपणावरून डोकावून त्याला तिरसट आवाजात विचारलं, “कसली घरफोडी होती रे?”
 
“अरे वा. सुप्रभात बिधन पाल. काय म्हणतोस?”
 
“घरफोडीचं काय? चोरांशी झटापट केलीस म्हणे तू?”
 
“का? तुला काय वाटतंय? खोटं आहे ते?”
 
“नक्कीच! चोर तुला दिसले यावरच माझा विश्वास नाही.”
 
सोमेंदु उठला आणि शांतपणे म्हणाला, “बिधन, जा. बऱ्या बोलानं घरात जा तू.”  पण बिधनला आता खुमखुमी आली होती पुन्हा भांडण उकरून काढायची. सोमेंदुवर खोटारडेपणाचा शिक्का मारत म्हणाला, “खोटारडा आहेस तू. चोरांनी नाही, मीच बडवला होता तुला. तुझं ते टोपडं चेपलं मी, तुझं टक्कुरं फोडलं मी. पण त्या वर्तमानपत्रवाल्याकडं चोरांशी झटापट करून शौर्य गाजवल्याची फुशारकी मारलीस.”
 
“आज सकाळी सकाळी हातभट्टीची मारलीस काय रे? जा गप घरात.”
 
“म्हणजे? शिपुरड्या, तुला काय म्हणायचंय? मी नाही बडवलं तुला?”
 
सोमेंदु जवळ आला आणि बिधनच्या डोळ्याला डोळा भिडवून शांतपणे म्हणाला, “तू काय बोलतो आहेस तेच मला समजत नाही.”
 
बिधन काही तरी बोलणार होता इतक्यात सोमेंदु पुढं बोलला, “हां, आता त्या तीन चोरांपैकी जाडाजुडा असलेला चोर तू असलास तर शक्य आहे. मला त्याचा आणि तुझा आवाजही एकच वाटतोय. बोल. तू होतास तो? सांग म्हणजे आत्ताच्या आत्ता तुला चौकीत नेऊन गुदरतो.”
 
हळूहळू बिधनच्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडायला लागला. सोमेंदु हवालदार पुढं म्हणाला, “तुझ्याच उंचीचा होता तो. म्हणजे बघ, ठरव काय ते नक्की…..आणि हो, तुझ्या भल्यासाठी सांगतो, तू आता माझ्याकडं जे बोललास ते दुसऱ्या कुणाकडं बोलशील तर गोत्यात तूच येशील.”
 

बिधन घाईघाईनं म्हणाला, “नाही, नाही! आईशप्पथ! मी कुणाकडं काही बोलणार नाही.”
 
“म ठीक आहे. तसंही मला माझ्या शेजाऱ्याचं काही वाईट करायचं नाही आहे. पण अरे हो, तू काही इथून पुढं माझा शेजारी नसणार आहेस म्हणा.” हवालदार बोलला.
 
“म्हणजे?” बिधननं बुचकळ्यात पडून विचारलं.
 
“म्हणजे असं, की आता मला या साधारण वस्तीत तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसाच्या शेजारी रहायची गरज नाही. त्या रात्री दाखवलेल्या शौर्याबद्दल मला बढती मिळाली आहे असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून. गुप्ता कॉलनीतला सरकारी फ्लॅटही दिलाय मला. आणि हो, तुझा आभारी आहे मी बिधन पाल. तू आणि ती चोरी, यामुळंच मला ही बढती इतक्या लवकर मिळाली. नाहीतर वर्षानुवर्षं वाट बघायला लागते लोकाना.”
 
कुत्सितपणानी हसत हवालदार….छे, छे, असिस्टंट सबइन्स्पेक्टर…. सोमेंदु दासगुप्ता घरात शिरला. बिधन पाल अवाक् होऊन बघतच राहिला.
*****

 (कथेतील पात्रांचे बंगाली संभाषण लिहिण्यासाठी माझा बांगलादेशी मित्र झोमीर अली याने मदत केली. त्याला ‘धोन्नोबाद’ देतो.)

Saturday, April 11, 2020

-१७ - पैज

(अंतोन चेखॉव्ह यांच्या The Bet या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
 
अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा.  मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता. बहुसंख्य लोक, ज्यात पत्रकार, बुध्दिवादी विचारवंतांचा समावेश होता, मृत्युदंड रद्द व्हायला हवा या मताचे होते. त्यांच्या मते ही शिक्षा कालबाह्य, अयोग्य, आणि धर्माविरुध्द होती. काही थोडे लोक ‘मृत्युदंडाऐवजी जन्मठेप हीच फक्त मोठ्यात मोठी शिक्षा असावी जगभर’ या मताचे होते. “मला नाही तसं वाटत.” धनानंद म्हणाला. “मी जन्मठेप भोगलेली नाही नि मृत्युदंडही नाही. हसू नका, पण विचार करायचा झाला तर मला तरी मृत्युदंड हा जन्मठेपेपेक्षा जास्त दयाळू, योग्य आणि माणुसकीला धरून असलेला वाटतो. मृत्यू देणं म्हणजे माणसाला एकदाच आणि क्षणात मारणं. पण जन्मठेपेच्या शिक्षेत आपण माणसाला क्षणाक्षणाने, कणाकणाने, परत परत मारतो. मित्रानो, तुम्हीच विचार करा. यातनांची जाणीवही होऊ न देता क्षणार्धात मारणं दयाळूपणाचं? की त्याला वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवून त्याची जगण्याची उमेदच मारून टाकणं हे?”

“दोन्ही अयोग्यच आहेत,” दुसरा एकजण म्हणाला. “दोन्हींचा उद्देश एकच असतो, जीव घेणं. पण राज्य किंवा न्यायसंस्था म्हणजे परमेश्वर नाही. कुणाचाही जीव घ्यायचा त्याना काहीही अधिकार नाही.”

उपस्थितांमध्ये एक वकीलपेशाचा माणूस होता. विद्याधर नाव त्याचं. तरुण, पंचविशीतला. तो ‘तुला काय वाटतं?’ असं विचारल्यावर म्हणाला:

“मृत्यदंड काय नि जन्मठेप काय, दोन्ही अयोग्यच. पण मला जर त्यापैकी एक निवडायला सांगितलं तर मी जन्मठेप स्वीकारेन. जिवंत नसण्यापेक्षा, आयुष्य कसंही का होईना, जगत राहणं हेच माझ्या मते श्रेयस्कर असेल.”

बरीच उलटसुलट चर्चा झाली. धनानंद आपल्या मतावर ठाम होता आणि विद्याधरही. अचानक धनानंदाचा पारा चढला. टेबलावर हात आपटून त्यानं विद्याधरला आव्हानच दिलं, “काही अर्थ नाही तुझ्या या बोलण्याला. अरे, मी पैज लावतो, एकांतवासात, एका कोठडीत बंदिस्त होऊन तू पाच वर्षं काढून दाखवलीस तर मी २ लाख… नाही, नाही, ५ लाख रुपये तुला देईन. घेतोस आव्हान?”

“तुम्ही हमीपूर्वक बोलत असाल तर स्वीकारलं. हे आव्हान मी आत्ता इथल्या इथे स्वीकारलं. आणि हो, फक्त पाचच नाही तर पुरी पंधरा वर्षं रहायला तयार आहे मी एकटा, एका खोलीत बंदिस्त.”

“पंधरा? बघ हं, या सगळ्यांच्या साक्षीनं मी पैज लावतोय आता,” धनानंद गरजला. “ऐका, सगळे ऐका, पंधरा वर्षांनंतर हा विद्याधर बंदिस्त कोठडीतल्या एकांतवासातून बाहेर येईल तेव्हा मी धनानंद त्याला ५ लाख रुपये देईन. नगद पाच लाख !”

“लागली पैज. तुम्ही तुमचे पाच लाख पैजेला लावलेत तसं मी माझं स्वातंत्र्य पैजेला लावतो.” विद्याधरानं आव्हान स्वीकारलं. आणि या विलक्षण, तारतम्य नसलेल्या पैजेला सुरुवात झाली. गडगंज श्रीमंत, जितका थिल्लर तितकाच उतावळ्या स्वभावाचा, अविचारी असलेला धनानंद या पैजेने स्वत:वरच खूप खूष झाला. जेवणाच्या टेबलावर विद्याधराची करता येईल तितकी टिंगल टवाळी करत म्हणाला:

“अजून वेळ आहे, नीट विचार कर. पाच लाख मला जास्त नाहीत. हरलो तरी मला काही कमी पडणार नाही. पण तुझ्या आयुष्यातली तारुण्याची तीन चार वर्षं मात्र तू गमावशील. तीन चारच का म्हणतोय मी? कारण त्यापेक्षा जास्त काळ एकाकी अवस्थेत, लहानशा कोठडीत तू काढू शकणारच नाहीस. स्वेच्छेनं पत्करलेला खडतर एकांतवास सक्तीनं भोगायला लावलेल्या एकांतवासापेक्षा जास्त जीवघेणा असतो. आतल्या आत घुसमटत जगत असताना बाहेर निघायला हवं या विचारानं तुझं मन सतावलं जाईल आणि मग त्याची जी ओढाताण होईल तिनं तुझं उरलेलं आयुष्यही तुला खात राहील. कींव येते मला तुझी.”

****

आणि आज, आत्ता, शतपावली करताना धनानंदाला ते सारं आठवत होतं. आपल्याच मनाला विचारात होता, “कशासाठी तो पैजेचा उपद्व्याप केला होता आपण? विद्याधराच्या आयुष्याची पंधरा वर्षं वाया जाण्यानं आणि मी पाच लाख रुपये उधळल्यानं असं काय साध्य होणार होतं? मृत्युदंड जन्मठेपेपेक्षा चांगला आहे की वाईट आहे हे सिद्ध होणार होतं? नाही. नक्कीच नाही. निव्वळ भंपकपणा होता आपला तो. माझ्यासाठी तो एका लाडावलेल्या पैसेवाल्याचा हट्ट होता तर त्याच्यासाठी केवळ पैशांची हाव….”

मग धनानंदाला पार्टीच्या दिवशीची संध्याकाळ आठवली. त्याच्याच मळ्यातल्या आउटहाउसमध्ये  सगळ्या सोयी आतच असलेल्या एका खोलीत विद्याधराला ठेवून खोली बाहेरून कुलुपबंद करण्यात आली. खोलीवर नजर ठेवण्यासाठी एक वॉचमनही नेमला गेला. पंधरा वर्षात त्याला बाहेरचा कुणी माणूस दिसणार नाही की माणसाचा आवाज ऐकू येणार नाही असा बंदोबस्त करण्यात आला. खोलीच्या दाराजवळ, जमिनीच्या पातळीवर एक छोटी झडप बनवली गेली जी फक्त बाहेरून उघडता यायची. तिच्यातून विद्याधराला वाचन करण्यासाठी हवी असतील तितकी  पुस्तकं, लेखन करण्यासाठी कागद आणि पेन्स, बासरीसारखी वाद्यं, जेवण, प्यायला पाणी वगैरे गोष्टी पुरवल्या जायच्या. हव्या असलेल्या गोष्टींची यादी करून त्यानं ती न बोलता त्या झडपेतून सरकवायची आणि पहारेकऱ्यानेही दुसऱ्या दिवशी त्या वस्तू न बोलता आत सरकवायच्या. पैजेतल्या अटी अगदी स्पष्टपणे लिहून ठेवण्यात आल्या. १४ नोव्हेंबर १८७० च्या रात्री १२ वाजता सुरु झालेली विद्याधरची बंदिवासाची मुदत १४ नोव्हेंबर १८८५ च्या  रात्री १२ वाजता संपायची होती. या वेळेच्या पूर्वी अगदी दोन मिनिटे जरी तो बाहेर आला तर धनानंद ५ लाख रुपये द्यायचं नाकारू शकणार होता.

बंदिवासाच्या पहिल्या वर्षात विद्याधरला एकाकीपणा जाणवत राहिला आणि त्यामुळं त्याचं मनोबलही घसरायला लागलं. दिवस रात्र तो वाजवत असलेल्या बासरीचे सूर खोलीतून ऐकू यायला लागले. वाईन, सिगारेट यापैकी काहीही त्यानं मागवलं नाही. एकदा एका चिठ्ठीत त्यानं लिहिलं होतं, ‘वाईन पिण्यामुळं मनात लालसा निर्माण होते आणि बंदिवासातल्या कैद्याच्या मनात अशी लालसा उत्पन्न होणं बरं नाही. शिवाय वाईन पिताना सोबत मिळायला लागते. वाईन प्यायची पण कोणीच साथीला नसेल तर काय उपयोग? आणि सिगारेटच्या धुरानं छोट्याश्या खोलीतली हवा प्रदूषित होणार. त्यापेक्षा वाईन आणि सिगारेट या दोन्हीपासून दूरच राहिलेलं बरं.’ त्या वर्षात त्यानं हलक्या फुलक्या विषयांवरली पुस्तकं, कादंबऱ्या, प्रेमकथा, रोमांचक कथा असलेली पुस्तकं मागवली.

दुसऱ्या वर्षात विद्याधरचं बासरीवादन थांबलं आणि त्यानं फक्त अभिजात स्वरूपाचं लेखन असलेली पुस्तकं मागवायला सुरुवात केली. पाचव्या वर्षी त्यानं पहिल्यांदा वाईन मागवली.  ज्यांनी कोणी त्या वर्षी झडपेतून आत डोकावून पाहिलं त्यांनी त्यांनी हेच सांगितलं की विद्याधर वर्षभर फक्त खाणं, पिणं, कॉटवर पडून जांभया देत स्वत:शीच उद्वेगानं बोलणं या पलिकडं काही करत नसे. वाचनही नाही. रात्री टेबलाशी बसून तासनतास लिहीत असायचा आणि सकाळी ते सगळे कागद फाडायचा. बऱ्याचदा त्याच्या रडण्याचा आवाजही ऐकू यायचा.

सहाव्या वर्षाच्या मध्यावर विद्याधरानं इतिहास, तत्वज्ञान, आणि वेगवेगळ्या भाषा पुस्तके वाचून शिकायला सुरुवात केली. परिस्थितीशी जुळते घेऊन त्यानं जोमानं या साऱ्याचा पाठपुरावा केला. इतका की पुस्तकांच्या त्याच्या मागण्या पुरवता पुरवता धनानंदाची पुरेवाट झाली. सहा ते दहा वर्षे या काळात विद्याधराने सहाशेच्या वर मोठमोठे ग्रंथ मागवून वाचले. याच काळात त्यानं धनानंदाला पत्र लिहिलं:

“प्रिय तुरुंगाधिपती,
हे पत्र मी तुम्हाला सहा भाषांमध्ये लिहून पाठवत आहे. त्या भाषांच्या तज्ञांना तुम्ही हे पत्र वाचायला द्या. त्यांना जर या मजकुरात एकही चूक आढळली नाही तर माझ्या खोलीच्या खिडकीजवळ मोठ्ठयाने आवाज करणारा एक फटाका पेटवा. तो आवाज ऐकून मला खात्री पटेल की माझे अध्ययन वाया गेलेले नाही. वेगवेगळ्या वयाचे आणि वेगवेगळ्या देशांत राहणारे तज्ञ भाषा वेगवेगळ्या बोलत असतील, पण तरीही सगळ्यांच्या अंतरात्म्यात तेवणारी ज्ञानज्योत एकच असते. अरे हो, पण तीच ज्योत माझ्याही आत्म्याला कसा स्वर्गीय आनंद देते ते तुम्हाला कोठून कळणार म्हणा !
तुमचा कैदी,
विद्याधर”

धनानंदानं विद्याधराची इच्छा पूर्ण केली. त्यानं एक नाही, दोन फटाके वाजवले.

दहाव्या वर्षानंतर विद्याधर टेबलाशी अगदी निश्चल बसून तन्मयतेने भगवद्गीतेचे अध्ययन करताना दिसला. धनानंदाला आश्चर्य वाटलं. ज्यानं गेल्या चार वर्षात सहाशे मोठ्ठाले विद्वत्तापूर्ण ग्रंथ वाचून काढले तो या छोट्याश्या पुस्तकात इतक्या गंभीरपणे काय शोधतो आहे? गीतेनंतर वेदांत आणि सर्व धर्मांचा इतिहास या पुस्तकांची पाळी आली.

अखेरच्या दोन वर्षात विद्याधरचा एकांतवास प्रचंड पण विविधतापूर्ण वाचन करण्यात गेला. कधी तो आण्विक संशोधनावर पुस्तकं मागवायचा तर कधी शेक्सपीयर, महाकवी कालिदास, ज्ञानेश्वर, बायरन, जर्मन महाकवी गटे इत्यादींची. एकाच वेळी केमिस्ट्री, मेडिसिन, आयुर्वेद, मध्येच एखादी कादंबरी, सॉक्रेटीस, अरिस्टॉटल, कौटिल्यीय अर्थशास्त्र, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान अशा पुस्तकांची मागणीही नोंदवायचा. त्याचं असं अफाट वाचन म्हणजे महासागरात जीव वाचवण्यासाठी एखादा माणूस त्याच्याच फुटलेल्या बोटीच्या असंख्य फळकुटांपैकी एकदा एक धरेल तर नंतर दुसरेच अशा स्वरूपाचं होत होतं.

*****

धनानंदाच्या डोळ्यांसमोरून पंधरा वर्षांमधल्या या सगळ्या घटनांचा चित्रपट सरकून गेला. त्याच्या मनात विचार आला:

“उद्या रात्री १२ वाजतां विद्याधर बंदिवासातून मुक्त होईल. आमच्यातल्या करारानुसार मला त्याला पाच लाख रुपये द्यावे लागतील. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की हे पाच लाख गेले की माझ्याजवळ काहीही उरणार नाही. अन्नान्नदशा होऊन जाईल माझी.”

पंधरा वर्षांपूर्वी कोट्याधीश असलेल्या धनांनदाच्या खिजगणतीतही नसायची दहा पाच लाखांची रक्कम. पण आज बहुधा  त्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असावं. सट्टा, जुगार, फसलेल्या गुंतवणुकी, ऐषोआराम आणि भंपकपणापोटी केलेली उधळपट्टी यांमुळं धनानंदच्या वैभवाला उतरती कळा लागली होती. एके काळचा बेदरकार, कमालीचा आत्मविश्वास असलेला सिनियर बँक मॅनेजर आज छोट्या छोट्या गुंतवणुकीत होणाऱ्या अगदी नगण्य उतार चढावामुळेही घाबरून जाणारा, काडीचाही आत्मविश्वास नसलेला माणूस राहिला होता धनानंद. “ कसली पैज ! माझं वाटोळं करून टाकणार आहे ती,” डोक्यावरचे केस दोन्ही हातांच्या पंजांत धरून ओढत निराशेने तो स्वत:लाच दोष द्यायला लागला. “तो विद्याधर! मेला का नाही अजून? जेमतेम चाळीस वर्षांचा असेल आज. माझ्याजवळची उरलीसुरली सारी संपत्ती,  माझे पाच लाख घेऊन आता तो लग्न करेल, आरामात पुढचं आयुष्य कंठेल. मनसोक्त खर्च करेल आणि मी? एखाद्या भिकाऱ्यासारखा असूयेनं त्याच्याकडं नुसता बघत राहीन, रोज त्याच्याकडून कुत्सित उद्गार ऐकत राहीन, ‘धनांनदजी, तुमच्या कृपेनंच मला आज ही सुबत्ता मिळाली आहे. हे मी विसरू शकत नाही. आज तुम्हाला मदतीची गरज आहे, करू द्या मला मदत.’ नाही, हे होता कामा नये. मग? काही इलाज आहे त्यावर? हो, आहे, दिवाळखोरी आणि त्यापायी होणारी बेइज्जत यातून मला वाचायचं असेल तर त्या माणसानं मरायला हवं ! पैजेची मुदत पूर्ण होण्या आधी !”

*****

रात्रीचे आठ वाजले. धनानंदानं कानोसा घेतला. घरातले सगळे झोपले होते. बागेत गारठलेल्या झाडांची पानं सळसळत होती. त्या सळसळीशिवाय दुसरा कसलाच आवाज येत नव्हता. आपल्याही पावलांचा आवाज येणार नाही याची काळजी घेत धनानंद उठून आतल्या खोलीत गेला. तिथली भरभक्कम अग्निरोधक तिजोरी उघडून त्यानं विद्याधराला बंद केलेल्या खोलीची किल्ली काढून घेतली. गेल्या पंधरा वर्षात कधीही ती किल्ली तिजोरीबाहेर निघाली नव्हती. अंगात जाकीट चढवलं आणि तो घराबाहेर पडला.

बागेत अंधार आणि कमालीचा गारठा होता. पाउस  पडून गेला होता नुकताच. हुडहुडी भरवत वाहणारा बोचरा वारा झाडांच्या फांद्यांना हालण्यातून उसंत मिळू देत नव्हता. धनानंदानं डोळे ताणून बघितलं. पण गडद अंधारात त्याला बागेत ना फुलझांडाचे आकार दिसत होते ना पायाखालची वाट. आउटहाउस जवळ पोचला आणि त्यानं वॉचमनला हाक मारली, दोन तीनदा. पण काहीच प्रतिसाद आला नाही.  बहुधा कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तो घरात स्टोअररूममध्ये जाऊन गुडुप झोपला असावा.

“माझ्या मनात आत्ता जे आहे ते खरंच अंमलात आणलं तर पहिला संशय वॉचमनवर जाईल.” धनानंदाच्या मनात विचार चमकून गेला.

अंधारातच तो आउटहाउसच्या पायऱ्या चढून आत गेला. खिशातल्या मॅचबॉक्समधून एक काडी पेटवली. तिच्या उजेडात त्याला वॉचमनची कॉट दिसली. तिच्यावर अंथरूण पांघरूण काहीच नव्हतं. कैद्याच्या खोलीत जायच्या दारावरल्या कुलपावर पंधरा वर्षांपूर्वी केलेलं सील जसंच्या तसं होतं.

काडी विझली. धनानंदानं झडप उघडून आत डोकावलं. एक मेणबत्ती मंदपणे तेवत होती टेबलावर आणि विद्याधर टेबलाशी बसलेला होता. पाठमोरा होता. त्यामुळं त्याच्या डोक्यावरचे लांब अस्ताव्यस्त केस आणि टेबलावर कोपर टेकवून ठेवलेले हात एवढंच दिसत होतं. एकदोन उघडी पुस्तकंही होती टेबलावर आणि जवळच्या आरामखुर्चीतही, खाली जमिनीवरही पुस्तकंच पुस्तकं होती.

पाच मिनिटं झाली. विद्याधर हललाही नाही. पंधरा वर्षांचा एकांतवास निश्चल कसं बसायचं ते त्याच्या मनावर ठामपणे बिंबवून गेला होता. झडपेच्या झालेल्या आवाजानंदेखील त्यानं काहीच हालचाल केली नाही. धनानंदानं थरथरत्या हातानं कुलपावरचं सील तोडलं, किल्ली सरकवली आणि कुलूप उघडलं. गंजलेल्या बिजागऱ्यानी कुरकुर केली पण दार उघडलं. धनानंदाला वाटलं विद्याधर आश्चर्यचकित होऊन जोरात ओरडेल पण तसं काहीच झालं नाही. तीन मिनिटं झाली तरी खोलीत आधी जी शांतता होती ती तशीच राहिली. धनानंद आत गेला.

टेबलाशी बसलेल्या विद्याधरची काहीच हालचाल होत नव्हती. तो म्हणजे केवळ एक आकार होता. अस्थींच्या सांगाड्यावर चढवलेली कातडीची खोळ होती. बायकांच्या सारखे लांब केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी आणि मिशा, केसांच्या जटांमधल्या अगणित पांढऱ्या रेघा, डोळ्यांच्या आणि गालांच्या खोबणी, दोन हातांच्या काड्यांवर टेकवलेला पिवळा निस्तेज चेहरा… भयानक होतं ते दृश्य. ही व्यक्ति फक्त चाळीस वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. टेबलावर टेकलेल्या दोन्ही कोपरांच्या मध्ये एक कागद होता. काहीतरी लिहिलेलं होतं त्यावर.

“बिच्चारा !” धनानंदाच्या मनात विचार आला. “झोपलाय. कदाचित उद्या मिळणाऱ्या पाच लाखांची स्वप्न बघत असेल. पण मी याला उचलून बिछान्यावर ठेवून आणि उशी तोंडावर दाबून घुसमटवायचाच अवकाश आहे. ते स्वप्नही संपेल आणि हादेखील. प्रतिकार तर करायच्या अवस्थेतच नाही हा. तेव्हा जगातला कुणीही तज्ञ ‘नैसर्गिक मृत्यू’ या शिवाय दुसरं काहीही निदान करू शकणार नाही. पण आधी या कागदावर काय लिहिलंय यानं ते वाचायला हवं.”

धनानंदानं अलगद कागद उचलून घेतला आणि मेणबत्तीच्या प्रकाशात वाचायला सुरुवात केली.

“आज रात्री १२ वाजता मी पैजेतून मोकळा होईन, त्यानंतर या कैदेतून माझी सुटका होईल. या खोलीबाहेरच्या माणसांशी मी पुन्हा संपर्क साधू शकेन. पण खोलीबाहेर पडून उद्याचा सूर्य बघण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचंय; माझ्या सदसद्विवेक बुद्धीने आणि माझा सदैव सांभाळ करत असलेल्या परमेश्वराच्या साक्षीने!  स्वतंत्र असणं, जिवंत असणं, आरोग्यपूर्ण असणं या आणि तुमची पुस्तकं ‘जगातल्या चांगल्या गोष्टी’ म्हणून ज्यांचं वर्णन करतात त्या सगळया गोष्टींचा मला  तिरस्कार वाटतो.

“गेली पंधरा वर्षं मी ऐहिक आयुष्याचा सखोल अभ्यास करत आलोय. अर्थात, या काळात मी ना जग बघितलं ना त्यातली माणसं, पण तुमच्या पुस्तकातलं ज्ञानामृत मी मनसोक्त प्यायलो, त्याच्याबरोबर गायलो, जंगलातल्या मुक्त हरणांच्या, रानटी पशूंच्या शिकारी केल्या, सुंदर स्त्रियांबरोबर रमलो. तुमच्या कवींनी आणि  विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे स्वर्गात विहरणाऱ्या मेघांसारख्या तरल सौंदर्याने नटलेल्या सुंदरी मला रात्री भेटायला यायच्या आणि माझा मेंदू चक्रावेल अशा गोष्टी माझ्या कानात कुजबुजायच्या. तुमच्या पुस्तकांमधून मी हिमालयाच्या, कैलास पर्वताच्या शिखरांवर आरोहण करून आलो. तिथं उभा राहून सूर्योदय बघितला, संध्याकाळच्या सोनेरी जांभळ्या प्रकाशानं भारलेलं आकाश आणि समुद्र बघितला. माझ्या डोक्यावर चमकून जाणारी आणि कडाडत पावसाळी ढगांना चिरून जाणारी विद्युल्लता बघितली. हिरवाईनं नटलेली वनं, शेतं, नद्या, तळी, गावं, सगळं सगळं बघितलं. वाऱ्याची शीळ आणि तरळत येणारे गोपाळांच्या बासरीचे सूर ऐकले; देवांच्या कागाळ्या सांगायला आकाशातून अवगाहन करत माझ्याकडे येणाऱ्या सैतान पऱ्यांच्या तरल पंखाना मी स्पर्श केला….. तुमच्या पुस्तकांतून मी स्वत:ला तळ नसलेल्या गर्तेत झोकून दिलं, जादुगिरी केली, हत्या केल्या, गावं भस्मसात केली, नव्या नव्या धर्मांवर प्रवचने दिली, साम्राज्यंच्या साम्राज्यं पादाक्रांत केली…..

“तुमच्या पुस्तकांनी मला शहाणं बनवलं. युगानुयुगांच्या  विचारमंथनातून माणसांनी जे जे काही निर्माण केलं ते ते सर्व माझ्या मेंदूच्या एका छोट्या कप्प्यात ठासून भरलं. आणि म्हणून, मला ठाऊक आहे, मी तुम्हां सर्वांपेक्षा जास्त विद्यावान झालोय.

“आणि तरीही, मी तिरस्कार करतो तुमच्या पुस्तकांचा.  मी तिरस्कार करतो विद्वत्तेचा, जगाच्या  आशीर्वादांचा. सारं काही क्षुद्र आहे, क्षणभंगुर, मृगजळासारखं  फसवं. तुम्हाला गर्व असेल शहाणं, सुसंस्कृत असल्याचा. पण मृत्यू चुटकीसरसा पुसून टाकेल तुम्हाला या जगाच्या पटावरून कारण  तुम्ही जमिनीत बीळ करून राहणाऱ्या उंदरापेक्षा वेगळे नाही आहात.  तुमचा इतिहास, तुमचा वंश, तुमची तथाकथित अमर विद्वत्ता, सारं काही चुटकीसरशी होत्याचं नव्हतं होईल…. या पृथीच्या गोलासह !

“तुम्ही तुमची बुध्दी हरवून बसला आहात आणि चुकीच्या मार्गावर चालताहात. सत्त्य टाळून असत्त्याची कास धरली आहे तुम्ही, सुंदरता टाकून हिडीस विरूपता स्वीकारली आहे. काही अकल्पित कारणानी सफरचंदाच्या झाडांना बेडूक आणि संत्र्याच्या झाडांना सरडे लागले किंवा गुलाबाला घामट घोड्याचा वास आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसंच आश्चर्य तुम्हाला स्वर्गसुख सोडून पृथ्वीवरच्या नश्वर गोष्टींचा पाठपुरावा करताना बघून मला वाटतंय. पण तुम्ही असं का करता आहात याची कारणं शोधण्यात मला यत्किंचित स्वारस्य रस नाही.

“तुमच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची मला किळस वाटते आहे. हे दाखवून देण्यासाठी तुम्ही मला देऊ केलेले पाच लाख रुपये मी नाकारतोय. कधीकाळी मला त्या पैशांचा मोह होता. जसं काही ते मिळाल्यावर मला नंदनवन मिळणार होतं. पण आता, नाही. आता तिरस्कार करतो मी त्या पैशांचा. आणि पुन्हा त्या मोहाचा माझ्या मनाला स्पर्शही होऊ नये म्हणून पैजेतील नियोजित वेळेच्या आधीच दोन तास इथून निघून जाणार आहे, पैजेतील करार मोडून…..”

धनानंदानं वाचून झाल्यावर तो कागद परत टेबलावर होता तसा ठेवला. विद्याधराच्या मस्तकावर हलकेच आपले ओठ टेकवले आणि डोळ्यात येत असलेल्या अश्रूंना थोपवायचा प्रयत्न न करता तो खोलीच्या बाहेर गेला. जेव्हा जेव्हा शेअरबाजारात जबरदस्त नुकसान सोसावे लागले तेव्हाही त्याला स्वत:च्या व्यवसायपटु असण्याबद्दल शंका आली नव्हती.  परंतु आज तो हरला होता. घृणा वाटली त्याला स्वत:चीच. घरी येऊन अंथरुणावर पडला तरी पुढं किती तरी तास अश्रु आणि भावनांच्या कल्लोळामुळं त्याला झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी वॉचमन घाबऱ्याघुबऱ्या, पांढऱ्याफटक चेहऱ्याने पळत आला आणि त्यानं धनानंदाला खोलीतला माणूस खिडकीतून बागेत उतरून फाटकाबाहेर निघून जाताना बघितल्याचं सांगितलं. धनानंद पळतच आउटहाउसकडे गेला आणि त्यानं विद्याधर खरोखरच निघून गेल्याची खात्री करून घेतली. पुढं अनावश्यक लोकापवाद टाळण्यासाठी म्हणून त्यानं टेबलावरचं ते पत्र, ज्यात  विद्याधरानं स्वेच्छेनं पाच लाखांवर पाणी सोडलं होतं ते, खिशात टाकलं आणि घरी आल्यावर अग्निरोधक तिजोरीत ठेवून दिलं.
 
*****