Wednesday, August 28, 2019

-११- सुशा


(हेक्टर ह्यु मन्रो (साकी) याच्या ESME या नावाच्या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
 
(ही गोष्ट आहे जुनी, इ.स.१९००-१९१० च्या दशकातली. हिंदुस्थानात तेव्हा अनेक संस्थाने होती, जाहागिरी होत्या. तेव्हाच्या मुंबई इलाख्यातल्या जत, डफळापूर, मुधोळ आणि आता कर्नाटकात असलेले जमखंडी या अगदी जवळ जवळ असलेल्या जहागिरींच्या परिसरातली ही गोष्ट आहे. जतच्या जहागीरदारीण ताईसाहेबराजे सापळे आणि त्यांची डफळापूरमधली भाची कांचनमाला सापळे या दोघींमधल्या संभाषणाने ही गोष्ट सुरु होते.कथेत येणाऱ्या आणखी दोन व्यक्ति म्हणजे जमखंडीच्या उषाराजे रणनवरे आणि मुधोळचे सरदार भांबरे. ही सर्व नावे, अर्थातच, काल्पनिक आहेत. सदरच्या जहागिरींमधील जिवंत अथवा मृत व्यक्तींमध्ये नामसादृश्य किंवा इतर काही सादृश्य आढळल्यास तो केवळ अभावित योगायोग समजावा.)

“ताईसाहेबराजे, सगळ्या शिकारकथा इथून तिथून सारख्याच असतात. माझं तरी असं मत आहे.” कांचनमाला त्यांच्या मावशीना म्हणाल्या.
 
“पण आमची ही गोष्ट तुम्ही आजवर ऐकलेल्या सगळ्या शिकारकथांहून वेगळी आहे कांचनमाला,” ताईसाहेबराजे उत्तरल्या. “तशी जुनीच आहे म्हणा, तरीही ! आम्ही तेव्हा असू काहीतरी बावीस तेवीस वर्षांच्या. जहागीरदारसाहेबांच्यात आणि आमच्यात बेबनाव नव्हता तेव्हा आतासारखा. पण तरीही शिकारीवर जाताना आम्ही एकत्र कधी गेलो नाही. साहेब जायचे त्यांच्या लवाजम्याबरोबर. आम्ही जायचो तेव्हा आमच्यासाठी शिकारकऱ्यांचा, हाकाऱ्यांचा वेगळा ताफा असायचा. घोडी, बंदुका, काडतुसं सगळा जामानिमा खास आमचाच. पण बरं का कांचनमाला, आमच्या आजच्या गोष्टीशी याचा काही संबंध नाही.” 


“हो का? मग सांगाच आम्हाला तुमची ही अफलातून कथा.” 

“सांगतो की ! आमच्याबरोबर तेव्हा जमखंडीच्या उषाराजे रणनवरे होत्या. उषाराजे म्हणजे उंच, धिप्पाड, पठाणी बांध्याच्या बायका असतात तशांपैकी होत्या. वर दागिन्यांनी मढलेल्या. अगदी दिवाणखान्यातली सजावट असावी तशा दिसायच्या. तर अशा त्या उषाराजे आम्हाला म्हणाल्या, ‘आज काय होणार आहे काय की ! आम्हाला मनात जरा धाकधूकच वाटायला लागली बघा. कायतरी विपरीत होणार आसं सांगतय आमचं मन आम्हाला. धास्तीनं आमचा चेहरा फिक्कट तर दिसत नाही ना?’ 

“फिक्कट? अहो बिटाच्या रसासारखा जांभळा लाल रंग होता त्यांच्या गालावर. आम्ही त्याना म्हणालो, ‘नाही हो उषाराजे, खरं तर नेहमीपेक्षा जास्त टवटवीत दिसताय तुम्ही आज.’ आमच्या बोलण्यातली खोच त्यांच्या ध्यानात यायच्या आधीच शिकारीची सुरुवात झाल्याचं लक्ष्यात आलं. आमच्या ताफ्यातल्या शिकारी कुत्र्यांना एक कोल्हा करवंदाच्या जाळीत दिसला आणि त्यांनी जोरजोरात भुंकून त्याला बाहेर आणायचा प्रयत्न सुरु केल्याचे आवाज ऐकू यायला लागले.” 

“बघा ताईसाहेबराजे, मी म्हटलं नव्हतं? मी आजवर ऐकलेल्या सगळ्या शिकारकथांमध्ये करवंद जाळी आणि लपलेला कोल्हा हा असायचाच.” कांचनमालानी शेरा मारला. 

त्यांच्या त्या शेऱ्याकडे दुर्लक्ष करत ताईसाहेबराजेनी आपलं बोलणं चालू ठेवलं. “उषाराजे आणि आम्ही आपापल्या घोड्यांवर चांगली मांड जमवून होतो. त्यामुळं टाच मारून आवाजाच्या दिशेने चढावावर जायला काहीच अवघड गेलं नाही. पण आम्ही बहुधा बरोबर माग घेऊ शकलो नसणार, कारण कुत्र्यांचा आवाज हळू हळू कमी यायला लागला. काहीच पत्ता लागेना तेव्हा आमची निराशा व्हायला लागली. तुम्हाला माहीतच आहे आमचा स्वभाव कसा तापट आहे ते. हळूहळू आमची चिडचीड व्हायला लागली. एवढ्यात आमची घोडी होती तिथून जरा अंतरावर खालीच एका खोलगट भागात आमची कुत्री गुरगुरत करवंदाच्या जाळीभोवती फिरताना दिसली.” 

“ ‘ती बघा तिथं आहेत,’ उषाराजे ओरडल्या आणि एकदम धास्तावल्यासारख्या म्हणाल्या, ‘अरे देवा! ताईसाहेब, अहो कशाची शिकार धरलीय हो त्यांनी?’ 

“खरंच हो. साधा कोल्हा दिसत नव्हता तो. कोल्ह्यांपेक्षा दुप्पटीने मोठा होता प्राणी. डोकं लहान पण गर्दन मोठी. विचकलेले दातही दिसत होते.” 

“ ‘उषाराजे, अहो ते तरस आहे तरस,’ आम्ही ओरडलो; ‘मुधोळकर सरदार भांबऱ्यांच्या राखीव बंदिस्त कुरणातून निसटून आलेलं असणार. सरदार भांबरे सलुकी जातीचे शिकारी कुत्री आणि तरस यांच्या संकरातून मुधोळ हाऊंड ही क्रॉसब्रीड तयार करायच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी चारपाच तरसं आणून पाळलेत कुरणात. आम्हाला ठाऊक आहे." " 

“तरसानं वळून आपल्या मागावर आलेल्या कुत्र्यांकडं बघितलं आणि दात विचकत हल्ला करायच्या पवित्र्यात उभं राहिलं.. सहा कुत्री अर्धवर्तुळ करून त्याला घेरून होती. म्हणजे मूळ बाराच्या ताफ्यातली ही सहाच आली होती माग काढत. एवढ्यात त्या कुत्र्यांचा जो ट्रेनर हाकाऱ्या होता त्यानं माघारी बोलवायचं शिंग फुकलेलं ऐकू आलं तशी सारी सहाच्या सहा कुत्री मागं वळून पसार झाली. तरसाला आमच्या घोड्यांची चाहूल लागली होतीच. घेरून असलेली कुत्री गेल्याबरोबर ते जाळीतनं बाहेर आलं. कुरणात माणसांच्या संगतीत राहून त्याला बहुतेक माणसांची भीड वाटत नसावी असं गरीबासारखं चालत ते आमच्या मागं मागं यायला लागलं.” 

“बरं का कांचनमाला, ऐकताय ना? संध्याकाळ व्हायला लागली होती. उषाराजे आणि आम्ही त्या तरसाच्या संगतीत होतो. ‘ताईसाहेबराजे, आता हो काय करायचं आपण?’ धास्तावलेल्या उषाराजे आम्हाला म्हणाल्या. आम्ही बोललो, ‘काय उषाराजे, काय करायचं म्हणजे काय?’ “ 

“ ‘अहो म्हणजे या तरसाच्या संगतीत रात्रभर कसं हो रहाणार आपण इथं?’ उषाराजेनी विचारलं.” 

“ ‘उषाराजे हे तरस नसतं तरीही आम्ही या जंगलात रात्र काढायाला तयार नसतो झालो. आहो, शिकारीला बरोबरचा लवाजमा असतो तेव्हा आम्ही राहतो एखादी रात्र भवताली तंबू, राहुट्या ठेवून. पण जादा तर आम्ही लगोलग राजवाड्याकडे परत जातो. आत्ता पण आपण परतायचच. चला वळवा घोडं उजवीकडं ती उंच झाडं दिसतायत तिकडं. सदरबाजारातनं वाड्याकडं जाणारा रस्ता त्यांच्या पलीकडंच आहे. माहीत आहे आम्हाला.’ “ 

“मग आम्ही आमची घोडी दुडक्या चालीनं सदरबाजारच्या रस्त्याकडे न्यायला सुरुवात केली. ते तरसदेखील आमच्या मागोमाग यायला लागलं.” 

“ ‘ताईसाहेब, काय हो करायचं या तरसाचं? आपली पाठ काही सोडत नाहीच ते ?’ “ 

“ ‘लोकं काय बरं करतात तरसाचं उषाराजे?’ आम्ही उलट विचारलं.” 

“ ‘काय की ! आजवर आम्हाला असं काही भेटलंच नाही हो.’ उषाराजे म्हणाल्या.” 

“ ‘आम्हाला पण ! आणि उषाराजे, अहो ते नर आहे की मादी तेही कळत नाही. कळलं असतं तर आपण त्याला तसं नाव तरी दिलं असतं काही तरी. अंss... आपण त्याला देऊयाच काही तरी नाव.... सुशा... सुशा म्हणूया त्याला. नर असला काय नि मादी असली काय, दोघाना पण चालेल हे नाव.’ “ 

“अजून अंधुक उजेड होता. त्यामुळं आजूबाजूचं दिसत होतं. पण सुशा आमच्या बरोबर येताना दिसेना. मागे राहिला असावा. जरा पुढं, बाजूला अपुऱ्या आणि फाटक्या कपड्यातला एक लहान पोर आम्हाला जवळच्या करवंदाच्या जाळीत बहुतेक करवंद तोडत असताना दिसला. अचानक आमची दोघींची घोडी बघून तो घाबरून ओरडायला लागला. आम्ही काही थांबलो नाही. तशाच पुढे गेलो.” 

“ ‘ताईसाहेब, त्या पोराचं किंचाळणं काही बरं वाटलं नाही आम्हाला.’ उषाराजे नेहमीच अशुभाच्या बातमीदार असल्यासारख्या बोलल्या.” 

“आम्ही काही बोललो नाही. खरं तर कातर वेळ होती त्यामुळं आम्हालाही काही तरी वाईट घडणार असल्यासारखी जाणीव व्हायला लागली होती. तरी आम्ही घोडी तशीच पुढं नेली. जरा वेळाने त्या पोराचे रडणेही थांबले असे वाटले. सुशा मागेमागे येताना दिसला नाही म्हणून उगीचच विषय बदलायला म्हणून आम्ही त्याला हाका मारल्या. तर काही मिनिटातच तो मागून बंदुकीतनं सुटलेल्या गोळीसारखा आला आणि आमच्या पुढं जाऊन बाजूच्या जंगलात दिसेनासा झाला. त्याच्या जबड्यात काही तरी घट्ट पकडलेलं दिसलं ओझरतं. पोराचं रडणं का थांबलं याचा आता खुलासा झाला.” 

“ ‘देवा रे, काय झालं हे?......’उषाराजे थरकापत किंचाळल्या, ‘काय करायचं हो ताईसाहेब आता?... हं?... सांगा की.’ “ 

“कांचनमाला, त्या वेळी आम्हाला काय वाटलं सांगू? अहो उषाराजे जर देवाच्या दरबारात असत्या चित्रगुप्ताच्या जागी तर ना, चित्रगुप्त विचारेल त्याच्यापेक्षा दुप्पटीने तरी जास्त प्रश्न त्यांनी विचारले असते यमानं धरून आणलेल्या जीवाला. मुलखाच्या चौकस आणि शंकेखोर हो !” 

“एवढ्यात सुशा झाडीतून बाहेर येऊन आमच्या पुढे चालायला लागला, काहीच न झाल्यासारखा. ‘काही नाही का हो करता येणार आपल्याला ताईसाहेब?’ उषाराजे काकुळतीला आल्यासारख्या बोलल्या.” 

“आम्ही त्याना म्हणालो, ‘उषाराजे, आहो आम्ही करतोच आहोत ना आमच्याकडून होईल ते. आम्ही सुशावर ओरडलो, आमचा चाबूक फटकावला हवेत त्यानं घाबरावं म्हणून. आमची पाण्याची बुधलीही फेकली त्याच्या अंगावर पण काही उपयोग झाला का? मग आता आणखी काय करायचं?’ ”  

“ ‘या क्रूर प्राण्याला आपल्या बरोबर कसे काय चालू देत होतात तुम्ही ताईसाहेब?’ उषाराजेनी पालुपद चालूच ठेवले.” 

“ ‘उषाराजे, एक तर आम्ही  सुशाला बरोबर चालण्यापासून थांबवू शकत नव्हतो. दुसरं म्हणजे आत्ता या घटकेला तो आणखी काही क्रूरपणा करेल असे वाटत नाही.’ आम्ही म्हणालो.” 

“ ‘त्या पोराचे हाल झाले असतील ना हो पण ?’ “ 

“ ‘काय सांगायचं?’ आम्ही उत्तरलो. आणि घोड्याला टाच दिली.” 

“अंधार जास्त गडद झाला. पण तोपर्यंत आम्ही मोठ्या रस्तावर येऊन पोचलो. त्या रस्त्यावर जरा पुढं गेलो तोच मागून एक मोटार गाडी आली आणि मोठ्यानं आवाज करत अगदी  आमच्या शेजारून वेगानं पुढं गेली. एक दोन मिनिटं झाली असतील नसतील तोवर थाडकन् आणि त्यापाठोपाठच गाडीचे ब्रेक करकचून लावल्याचा कर्कश्य असा आवाज झाला. आम्ही गाडीजवळ पोचलो तर तिथं एक गोरा तरुण माणूस थांबलेल्या गाडीजवळच काही तरी पडलं होतं त्याच्याकडे वाकून बघत असलेला दिसला.” 

‘अरे देवा ! तुम्ही मारलं की हो माझ्या सुशाला.’ आम्ही चिडून बोललो.” 

“ ‘माफ करा युअर हायनेस,’ कमरेत जरासा झुकत तो गोरा तरुण बोलायला लागला, ‘कुत्रा तुमचा होता काय? अपघात झाला खरा. माफ करा. मीदेखील कुत्री पाळतो. तेव्हा मला कल्पना आहे तुम्हाला किती दु:ख होत असेल त्याची. पण मी त्याची भरपाई करायला तयार आहे.’ ” 

“ ‘कृपा करून सुशाला दफन करा लगेच. मला बघवत नाही त्याच्याकडे अशा अवस्थेत.’ आम्ही म्हणालो.” 

“ ‘इस्माईल, टिकाव, फावडा लेके आव.’ त्यानं गाडीच्या ड्रायव्हरला हुकुम सोडला. बहुतेक अशा दफनविधीचे प्रसंग त्याच्यावर वरचेवर ओढवत असावेत. म्हणून तसल्या हत्यारांची सोय गाडीत करून ठेवलेली होती वाटतं.” 

“पुरेश्या मोठ्या आकाराचा खड्डा खोदायला ड्रायव्हरला जरा वेळ लागला. अंधार पडलेला होता. त्या अंधारात त्यानं सुशाचं कलेवर खड्ड्यापर्यंत ओढत नेलं. ते बघून तो तरुण म्हणाला, ‘तुमचा कुत्रा चांगला दणकट आणि रुबाबदार होता असे दिसते.’ “ 

“आम्ही ठासून म्हटलं, ‘गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडला घेऊन गेलो होतो त्याला आमच्या बरोबर. तेव्हा तिथल्या श्वानस्पर्धेत त्याला दुसरं बक्षिस मिळालं होतं.’ “ 

“उषाराजेना एकदम ठसका लागला.  तेव्हा आम्ही त्याना म्हणालो, ‘उषाराजे, रडू नका. गाडीखाली चिरडल्यामुळे सुशाचा प्राण ताबडतोबच गेला असणार. यातना नसतील झाल्या फारशा.’ “ 

“तेव्हा तो तरुण उषाराजेकडे परत परत क्षमायाचना करत आम्हाला म्हणायला लागला, ‘युअर हायनेस, मलाही दु:ख होते आहे. पण असे बघा, तुम्ही सांगाल ती रक्कम भरपाई म्हणून पाठवून द्यायला तयार आहे मी.’ “ 

“ ‘जाऊ द्या साहेब. त्याची काही गरज नाही.’ आम्ही त्याला म्हणालो. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या आग्रहावरून आम्ही त्याला आमच्या वाड्याचा पत्ता दिला. मग तो त्याच्या जीपमध्ये बसून निघून गेला आणि आम्ही दोघी वाड्याकडे परतलो.” 

“आणि बरं का कांचनमाला, आम्ही सुशा आम्हाला कसा आणि कुठं मिळाला त्याबद्दल कुठंच आणि कधीच वाच्यता केली नाही. उषाराजेनापण तसे आम्ही बजावून ठेवले. मुधोळकर सरदार भांबऱ्यानीही तरस बेपत्ता असल्याबद्दल कुठं तक्रार केलेली दिसली नाही. करणार कसे? मागे एकदा त्यांचा शाकाहारी बैल निसटून पळाला होता तेव्हा त्याना आजूबाजूच्या दहा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नासधूस झाली म्हणून जबर नुकसानभरपाई द्यायला लागली होती. मग या मांसाहारी तरसामुळं किती द्यायला लागली असती त्याचा अंदाजपण करता येणार नाही. म्हणून ते गप्प राहिले असावेत. आणि वस्तीवरनंही पोर सापडत नाही म्हणून काही आवाज निघाला नाही. साहजिकच आहे. अहो अशा लोकाना आपल्याला पोरं आहेत किती ते तरी ठाऊक असतं की नाही याची शंकाच आहे.” ताईसाहेबराजे जरा वेळ बोलायचं थांबल्या. मग म्हणाल्या, 

“संपली नाही ही गोष्ट इथं. थोड्या दिवसांनी वाड्यावर पोस्टातून एक पार्सल आलं, आमच्या नावानं. काय असेल त्यात? अहो एक फार सुंदर सोन्याचं लॉकेट होतं, हिरे जडवलेलं आणि वेलबुट्टीत ‘सुशा’ असं नाव इंग्रजीत कोरलेलं. आणि हो, त्यानंतर आमची आणि उषाराजेंची मैत्री तुटली बरं का. आम्ही ते लॉकेट विकलं. भारी किंमत मिळाली. पण आम्ही उषाराजेना त्यातला हिस्सा दिला नाही म्हणून त्या रागावल्या. पण आम्ही का म्हणून द्यायचा त्याना हिस्सा? ‘सुशा’ आमच्या कुत्र्यांनी हेरला होता, सुशा या नावाचा शोधही आमचा होता. आणि तो कदाचित मुधोळकर सरदार भांबऱ्यांचं तरस असू शकणार होता. मग? उषाराजे कुठं बसतात ह्यात? खरं आहे न?” 

*****

 

 

Sunday, August 25, 2019

-१०- मरळ मासा


(अंतोन चेकॉव्हच्या The Fish या कथेचे मुक्त मुक्त रुपांतर)

वाघवणे गाव. उन्हाळ्यातली फाटफट (सकाळ). वारा पडला होता. कर्ली नदीच्या काठाला गवतात टोळांची किर्रकिर्र, पाण्याची चुळुकचुळूक आणि एखाद्या चुकार कबुतराची गुटुर्रगू यांच्याशिवाय दुसरा कसला आवाज येत नव्हता. पांढऱ्या ढगांची कापसाची गाठोडी आकाशात उगीचच निर्हेतुक तरंगत होती...... भार्गवराम - उंच, वाळकुड्या अंगाचा, लालसर कुरळ्या केसांचा आणि तोंडभर दाढीमिश्यांचे खुंट वाढलेला - भार्गू सुतार, नदीच्या काठाशी पण पाण्यात, वाढलेल्या झुडपांच्या मुळांशी हात खुपसून  काही तरी पकडून धरायचा प्रयत्न करत होता. होता पाण्यात, तरी पण त्याचा चेहरा घामाने तर्र झालेला होता. त्याच्यापासून पाच सहा फुटांवर तिकोनी चेहरेपट्टीचा, मिचमिच्या डोळ्यांचा, पोरगेलासा, कुबडा सुतार रवळनाथ ऊर्फ रवळू जवळजवळ गळ्यापर्यंतच्या पाण्यात उभा राहून एकनाथाकडे बघत होता. भार्गू आणि रवळू, दोघेही गेला अर्धा पाऊण कलाक पाण्यात होते.  

भार्गवा, पान्यात चाचपतंस कित्याक ? (भार्गवा, पाण्यात चाचप्तोस काय?) कुबडा रवळू केकाटला. आवशीचो घोव, अरे, पकरुन धर, पकरुन धर तेका. नायतर पलून जावचो शिंचो. हांव उलयतां हां तुका. पकर, पकर” (च्यायच्चा ! पकडून धर, पकडून धर त्याला. नाहीतर शिंचा पळून जाईल, मी सांगतो तुला.) 

नाय जावचा. कसा जायल? झाडाच्ये मुळात अडकडलो ना?” (नाही जाणार. झाडाच्या मुळ्यात अडकलाय ना) भार्गवराम बेंबीच्या देठापासून काढल्यासारखा आवाज काढून म्हणाला, “बुळबुळीत आसा. मायझया नीट पकडूकच हातात काय नाय ना.” (बुळबुळीत आहे. च्यायला पकडायला हातात काही नाही न) 

“अरे, कल्ल्यात हात घालून पकर रे.” (अरे कल्ल्यात हात घालून पकड ना)  

कल्लो गावत नाय. दम धर, गावलो रे, गावलो काय तां पकरायला... तोंडच आसा भवतेक. हय. ओठ आसा. धरलंन काय! च्च्या... आवशीचो घो. चावता रे.” (कल्लाच सापडत नाही. थांब, सापडलं काही तरी पकडायला. तोंडच असेल बहुतेक. ओठ आहे. धरलं बघ. च्च्या... च्यायला, चावतोय रे.) 

ओठाक धरून ओढू नको. सुटून जातला. जरा बाजूक हात कर. कल्लो सापडतलो तुका. हट, मेल्या, लागलंस पुन्हा चाचपाक ! तुझ्या आयशीचो घो ! सोडलंय वाटतां? पकर पुन्हा.”  (ओठाला धरून ओढू नको. सुटून जाईल. जरा बाजूला हात कर. कल्ला सापडेल तुला. हात् मेल्या ! लागला परत चाचपायला. हात्त् तुज्याssयला ! सोडलास वाटतां. पकड पकड पुन्हा) 

अरे, रवळ्या, मेल्या, कुबड्या, थंयसर उबो रवतंस आणि माका सांगतंस ? चल ये हंयसर आनि पकर बग तेंका. (रवळ्या, मेल्या, तिथं उभा राहतोस आणि मला सांगतोस? ये इथं आणि पकड बघू त्याला) 

माका जमला असतां तर इलो असतो. पन तुका ठाव आसा, माजी उंची किती ? दीड फूट. थंय उबो कसो रवनार. बुडूचो नाssय ?  (मला जमलं असतं तर नक्की आलो असतो. पण तुला ठाऊक आहे. माझी उंची किती? दीड फूट? तिथं उभा कसा राहणार? बुडणार नाही का मी?)  

बुडतंय कित्याक ? मेल्या तुका पवुक येना नाय ? माका गजाली सांगतंस ? (बुडतोस कशानं? तुला पोहायला येत नाही. बाता नको ठोकू) 

रवळूनं हात झटकले आणि पोहत भार्गवाजवळ पोचला. झुडपाची खाली आलेली एक फांदी धरायच्या प्रयत्नात धडपडला आणि पाण्यात एक गटांगळी खाऊन वर आला. 

मिया बोललंय होतंय तुका पाणी जास्तच खोल आसा म्हणून.”  (मी बोललो होता तुला पाणी जादा खोल आहे म्हणून) तो म्हणाला. “आता ! मिया तुजे खांद्यार उबो रवू काय?” (आता ! मी काय तुझ्या खांद्यावर उभा राहू काय?) 

ये. हायसर ये. झाडाच्या मुळांची शिडी झालीसा हयसर. तिच्येर उबो रव आन् ही फांदी घट पकड.” (“ये. इथवर ये. झाडाच्या मुळयांची शिडी झाली आहे इथं. तिच्यावर उभा रहा. आणि ही फांदी घट्ट पकड.”) भार्गवानं त्याला हात दिला आणि उभं केलं. ..... तोल सावरत रवळू  कसाबसा उभा राहिला आणि पाण्यात वाकून झाडाच्या मुळाशी हात घालून चाचपायला लागला. मुळांच्या जाळीत आणि बुळबुळीत चिखलात त्याच्या हाताला चिंगुळी माशाच्या -क्रे फिश- टोकदार नांग्यानी पकडलं. जल्ला तुजा लक्षण मेल्या. मिया काय तुका भेटूक आयलंय तुका रे हैवाना?  (जळ्ळं मेलं लक्षण तुझं. मेल्या, मी काय तुला भेटायला आलो होतो काय रे हैवाना?) म्हणत रवळूनं हात झटकून चिंगुळीला काठावर भिरकावलं. 

या साऱ्या धडपडीत एकदाचा रवळूच्या हातानं पाण्यातल्या भार्गवाच्या हाताला धरून चाचपत काही तरी मऊ पण बुळबुळीत गोष्टीला स्पर्श केला.  

सापडलो रेss”..... (सापडला बघ) रवळू ओरडला.. “भार्गवा, हो बाजूक तू. मिया खेचतंय तेका कल्ल्यात हात घालून. एक मिंटात भायेर काढतंय बघ. जरा माका पक्को धरू दी तेका.” (“भार्गवा, हो बाजूला तू. मी खेचतो त्याला कल्ल्यात हात घालून. एक मिनटात बाहेर काढतो बघ. जरा मला पक्कं धरू दे त्याला) …. आवशीचो... पोटकुळी लागतासा रे हाताक. अजून धरूक काय गावात नाय रे. भार्ग्या, माज्या मानेर बसलेली माशी हाकाव मरे. चावतासा माका. हांग आश्शी ! वायच बाजूक सर नि माशयेक तुज्या बोटान ढोस, मगे हांव तेका खेचतंय भायेर.” (....आयशीचा....  पोटकुळी लागतेय रे हाताला. अजून धरायला काय सापडत नाही. भार्गवा, अरे माझ्या मानेवर बसलेली माशी हाकल रे. चावतेय मला. हं. ठीक आहे! जरा बाजूला सरक नी माश्याला तुझ्या बोटानं ढोस. मग मी त्याला खेचतो बाहेर.) 

कुबड्या रवळूला बहुतेक माशाचा कल्ला सापडला असावा. त्यानं गाल फुगवले, श्वास रोधून धरला आणि माश्याला बाहेर खेचायचा प्रयत्न केला. पण डाव्या हातात धरलेली काठावरच्या झुडपाची बारकीशी फांदी कटकन तुटली आणि रवळू स्वत:च धप्पदिशी पाण्यात पडला. त्याच्या पडण्यामुळं पाणीच जसं काही घाबरलंय अशा लाटा निर्माण झाल्या आणि त्याच काठाला थडकून उलट्या रवळूला प्रवाहात घेऊन निघाल्या. कसाबसा पाण्याच्या वर येऊन पोहत तो बाजूला झाला.  

“हो बाजूक. नाय तर बुडून मरशील तू आन् माका लागात निस्तरूक !” (हो बाजूला. नाही तर बुडून मरशील नि मला निस्तरावे लागेल) भार्गवरामानं दम भरला, “सरक थंयसर. मियाच कायतरी करतंय. मगे काय!” (सरक तिकडे. मीच काही तरी करतो, मग काय!) 

शब्दानं शब्द वाढला. फाटफट (सकाळ) सरून दोंपार (दुपार) व्हायला लागली. सावल्या लहान लहान होत आपल्यातच मिसळून जायला लागल्या. काठावरच्या उंच वाढलेल्या गवतातून तापल्यामुळं एक वेगळाच वास यायला लागला, मधासारखा. दुपार व्हायला लागली. पण अजूनही भार्गव आणि रवळू पाण्यातच होते त्या माशाचा पिच्छा पुरवत. गवतावरून वाहणाऱ्या वाऱ्याची आलटून पालटून खर्ज आणि तीव्र अशा दोन्ही सुरावटीतली शीळ साथीला होती. 

“रे भार्गवा, कल्ल्यात दोन बोटा घालून खेच तेका भायेर.” (भार्गवा, अरे कल्ल्यात दोन बोटं घालून खेच त्याला बाहेर.) 

रवळ्या, काय करतंस? मेल्या, कित्याक जातंस. थंय कोंड आसा. मात्शे हंय सर” (रवळ्या, मेल्या, काय करतोस? उजवीकडं कशाला जातोयस? तिथं डोह आहे. थोडंस इकडे सरक.) 

नदी काठावर चाबूक फटकावल्याचा आवाज झाला. धाकू गुराखी येत होता जनावरं घेऊन. धाकू तसा म्हाताऱ्यातच गणला जायचा, एक डोळा असलेला आणि वाकड्या तोंडाचा. पहिल्यांदा चार शेळ्या आल्या पाण्यावर, त्यांच्या मागून तीन म्हसरं आणि एक गाय. धाकू आपला खाल मुंडी नि पाताळ धुंडी असा येत होता. 

“भार्गू, रे पोटांत बोट ढोसून खालनं वर ढकल तेका. ऐकूक येणा नाय रे तुका ? (भार्गू, अरे पोटात बोट ढोसून खालनं वर ढकल त्याला. ऐकू येत नाही काय तुला ?) धाकूच्या कानावर रवळूचे हे शब्द पडले नि त्यानं मान वर करून बघितलं. 

“काय करता रे पोरानू ?(काय करता रे पोरानो?) त्यानं विचारलं. 

“मोठठो मरळ मासो आसा. आमच्यान् निघुचो नाय. मुळ्यांच्या भितुर घुसलोसा.” (मोठ्ठा मरळ मासा आहे. आमच्याच्यानं निघत नाही. मुळ्यांच्या आत घुसून बसलाय.) 

धाकूनं बोलणाऱ्याकडं आपला एकुलता एक डोळा फिरवून मिनिटभर बघितलं, खांद्यावरची पडशी खाली टाकली, सदरा काढला, पायातल्या वहाणा काढल्या आणि पाण्यात शिरला. गाळातून दहा पाच पावलं चालत आणि मग पोहत तो त्या दोन मच्छीमार सुतारांजवळ जाऊन पोचला. 

थांबा रे पोरांनु,(थांबा रे पोरानो,) तो ओरडला. “घाई करू नुका तेका भायेर काढूची. घाईघाईत काय तरी करात आन मासो जाल निसटान्. (थांबा. घाई करू नका त्याला बाहेर ओढायची. घाईघाईत काही तरी कराल नि मासा जाईल निसटून.) 

आणि धाकूही त्या दोघांबरोबर माश्याच्या मागं लागला. तिघंही एकमेकाला ढकलत, शिवीगाळ करत माशाला बाहेर काढायचा निष्फळ प्रयत्न करायला लागले. त्यात रवळूचं डोकं पुन्हा एकदा पाण्याच्या खाली जाऊन वर आलं. त्याच्या खोकून तोंडात गेलेलं पाणी काढण्याचा आवाज वातावरणात भरून राहिला. 

काठावरून आरोळी आली, “खंय उलथलो शिंचो गुराखी? धाक्या, मेल्या खंय मराक गेल्लंस? गुरां शिरली ना वावरांत. काढ भायेर तेंका अगुदर. खंय उलथलंस मायझया?(कुठं उलथला शिंचा गुराखी?  धाक्या, मेल्या कुठं गेलास मरायला? गुरं शिरली ना वावरात. काढ बाहेर काढ त्याना आधी. कुठं उलथलायस मायझया?) पहिल्यांदा हा पुरुषाचा आवाज होता. नंतर एक बाईही तसंच ओरडली. 

हा सगळा आरडाओरडा ऐकून पायजमा आणि बिनबाह्यांचा कळकट जाळीदार बनियन या अवतारातला  आचरेकर ‘देवबाग समाचार’ वर्तमानपत्राची सुरळी  हातात धरून घरातून बाहेर आला. हा वावरातल्या वाड्याचा मालक. भार्गव आणि रवळू या दोघा सुताराना माडांच्या सावलीत न्हाणीघरासाठी शेड उभारायचं कंत्राट दिलं होत या आचरेकरानं. नदीच्या पात्रात चाललेल्या झटापटीचा कानोसा घेऊन  त्यानं शेडचं काम कुठवर आलंय ते बघितलं आणि त्याचं पित्त खवळलं. 

काय चल्लासा रे? का बोंबलतंय आन आपली कामा सोडून काय पवतासा की काय पाण्यांत ? मेल्या, तुजी गुरां अगुदर वावरतं भायेर काढ आन रे सुतारानु, रे माजा शेडाचा काम कंदी पुरा करतलात?  (काय चाललंय रे?, का बोंबलता? आणि आपली कामं सोडून काय पोहता की काय पाण्यांत? धाक्या, मेल्या, तुझी गुरं आधी वावरातनं बाहेर काढ आणि रे सुतारानो, अरे माझं शेडचं काम कधी पुरं करणार?) 

म्हावरा धरतां सावकारानू, मोठठो आसा.” (मासा पकडतोय मालक. मोठ्ठा आहे) भार्गव सुतार ओरडला.   

दोन दिसांसून काम करतत न् अजून शिरां पडल्या नसा छपराक. आन् आता काम सोडून थंयसर म्हाव-याच्या मागं लागलां रांडेच्यांनो? फटकेचो  वाको यील तुमका.” (दोन दिवसांपासून काम करता आहात आणि अजून छपरावर झावळी घातल्या नाहीत. आणि आता काम सोडून तिथं माश्यांच्या मागं लागलात काय रे रांडेच्यानो? पटकी होईल तुम्हाला.)  

सावकारानू, दोन दिसांत काम पुरा होतला. चिंता नोको करू. या म्हाव-याच्या आवशीचो घोव ! सावकारानू, माहित काय ? चांगली मरळ आसा, मोठ्ठी थोरली. मुळ्यात गुतली ना ! आमच्यान् काय भायेर येतासा नाय बघ. (मालक, अजून दोन दिवसात काम पुरं होईल बघा. काळजी करू नका. च्या मारी या माश्याच्या आयशीचा घो. मालक, चांगली मरळ आहे हो. मोठ्ठी. मुळ्यात गुंतून पडलेय ना! आमच्याच्याने काय बाहेर निघेना बघा.)  

मरळ म्हणाल्यावर आचरेकराचे डोळे मोठ्ठे झाले. “काय म्हणतंस ? मरळ ? आरे मगे काढ तेका भायेर बेगिन.” (काय म्हणतोस? मरळ? अरे मग काढा तिला बाहेर लवकर) 

“मगे ? तांच तर करतत ! रे धाकू, मरळीक दाबू नुको. मारशील तेका मेल्या. मुळयो वर कर. आन मरळीक खालसून हात घालून ढकल. वरसुन खाली नाय. खालसून वर ढकल.” भार्गवनं धाकू गुराख्याला झापलं. (मग? तेच तर करतोय! धाकू, अरे मरळीला दाबू नकोस. मारशील तिला मेल्या. मुळ्या वर कर आणि खाली हात घालून मरळीला खाली हात घालून ढकल. वरून खाली नाही, खालून वर ढकल) 

पाच मिनिटं झाली. दहा झाली. आता आचरेकरालाही दम निघेना. त्यानं वावरात असलेल्या मुलीला हाक मारली, “वच्छे, चेडवा, गो, पुरशा गाडीवानाक सांग मिया बोलावतंय म्हणून. बेगीन ये म्हण.” (वच्छे, मुली, जा पुरशा गाडीवानाल सांग मी बोलवलंय म्हणून. लगेच ये म्हणाव.)  

पुरषोत्तम, आचरेकराचा गाडीवान धापा टाकत पळतच आला. 

(“पाण्यात उतर पुर्षा, जा मदत कर या बिनकामाच्या माणसांक एक मरळ धरूक येणा नाय रांडेच्यांक.” (“पाण्यात उतर पुर्षा. जा मदत कर या बिनकामाच्या माणसाना. एक मरळ धरता येईना रांडेच्याना.”) 

पुरषोत्तमानं पटकन् कपडे काढले आणि पाण्यात उतरला. “एक मिन्टात काढतंय तेका भायेर. बगत रवा मालकानु (एक मिनटात काढतो तिला बाहेर. बघत रहा मालक). कुठशीक आसा रे मरळ ? भितर ? रे भार्ग्या, म्हाताऱ्या, तू हो वर. तुज्याच्यान होवचा नाय. तू आपलां तुजा छपरीचा काम सांबाल जा. मिया काढतंय बग तेका झटक्यात. एक मिनिट मिनिट बास आसा माका. आली बग हाताशी.   (रे भार्ग्या, म्हाताऱ्या, तू हो वर. तुझ्याच्यानं नाई व्हायचं हे. तू आपलं तुझं छपरीचं काम सांभाळ. जा. मी काढतो बघ तिला झटक्यात. एक मिनिट, एक मिनिट बास आहे मला. हां. आली बग हाताशी.)   

“तां आमका सगळ्यांक ठाव आसा. बोलत नुको रव. तेंका भायेर हाड नि मंग बोल” (ते माहित आहे आम्हा सगळ्यांनाच. आता बोलत नको राहूस. आधी तिला बाहेर काढ आणि मग बोल)  

तशी नाय येवची ती भायेर. बोडूक धरूक होया.” (तशी नाही येणार ती बाहेर. डोकं धरायला हवं तिचं) 

तां ठाव आसा आमका. न् तेचा बोडूक पन आसा मुळ्याभितुर तां सुदिक.” (ते ठाऊक आहे आम्हाला. आणि डोकं मुळ्यांत आहे ते सुध्दा ठाऊक आहे.) 

, तू चीप रव रे. नायतर तू हाड तेंका भायेर. जमूचा तुका ?(ए, तू गप रहारे. नाहीतर तूच काढ तिला बाहेर. जमेल तुला?) 

आचरेकराचा पारा ही त्यांची आपापसातली बोलाचाली ऐकून चढला. “तुमच्या आवशीचो घोव हलकटानो. आता तुमी सगरे चीप रवा. हांव येतंय थंय (तुमच्या आयशीचा घो, हलकटानो. आता तुम्ही सगळे मुकाट बसा. मी येतो तिथं) आणि त्यानं कपडे उतरवले. “चार चार मानसा नि एक मरळ भायेर येणा नाय त्यांच्याच्यान्.” (चार चार माणसं नि एक मरळ बाहेर निघेना त्यांच्याच्यानं!) 

कपडे उतरून आचरेकर पाण्यात उतरला. दोन्ही हातानी अंगावर पाणी उडवून, चोळून अंग गार करून घेतलं आणि मग त्या चौघांजवळ जाऊन पोचला. पण त्याच्या प्रयत्नानाही यश आलं नाही. तेव्हा भार्गव म्हणाला, 

माका काय वाटतां सावकारानू, झाडाची मुळा कापुक होयी. रे रवळु, जा वर न् आरी घिऊन ये.” (मला काय म्हणायचय मालक, झाडाच्या मुळ्या छाटायला पाहिजेत. रवळू, वर जा आणि करवत घेऊन ये.) 

रवळूनं करवत आणली आणि भार्गवाकडे दिली.  

सांबाळून रे भार्ग्या, नायतर तुजीच बोटां छाटशीत. नकोच तुका. तू हो बाजूक. मिया बगतंय.” (सांभाळून रे भार्ग्या. नायतर तुजीच बोटं छाटशीत. नकोच ते. तू हो बाजूला. मी बघतो.) आचरेकर बोलला. 

झाडाचं मूळ जरासं छाटण्यात आलं. आचरेकराच्या बोटाना मरळीच्या मऊ पोटाचा स्पर्श झाला आणि त्यांनी तिच्या कल्ल्याना हात घातला. 

हां, बगा आत्ता मिया ओढून काढतंय तेका भायेर. तुमी सगले व्हा दूर जरा.”  (हां. बघा आता मी ओढून काढतो तिला बाहेर. तुम्ही सगळे व्हा दूर जरा.) आचरेकर बोलला. मरळीचं डोकं आणि त्याच्या मागे जवळजवळ अडीच तीन फूट लांबीचं शरीर बाहेर आलं. मरळीनं पाण्याला शेपटाचे जबरदस्त तडाखे मारत आचरेकराच्या हातातून सुटायचा प्रयत्न चालू केला. “बास बास, माजे बाय. किती फडफडतंस ? मी आता तुका सोडूचंय नाय ह्यां पक्का.” (बस् बस् माझे आई,  किती फडफडतेस? मी काही आता तुला सोडणार नाही हे नक्की) आचरेकर तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.  

सगळ्या ‘मच्छिमारांचे’ चेहरे आनंदानं फुलून आले.  

किती मोठठो थोरलो आसा नाय ?(किती मोठ्ठी आहे ना? ) भार्गव आपले खांदे चोळत म्हणाला. “हांव पैजेर सांगतंय सावकारानू, पाच किलोच्या खाली नसा ! कितें ? रवळू? (मी पैजेवर सांगतो मालक, पाच किलोच्या खाली नाही! काय म्हणतोस रवळू?)  

“हां. आन धपापतासा कशी ? पॉट बग... पॉट बग तेचा. पाचशयाच्या वर पोरां असतलीं.” ... (हं ! आणि धपापते कशी ! पोट बघ... पोट बघ तिचं. पाच्श्याच्या वर पोरं असणार.) आचरेकरानी समाधानानं आपलं निरिक्षण सांगितलं. “आवशीचो घोव तेच्या, अर्रर्र..... अर्रर्र.....” (आवशीचा घोव तिच्या, आर्र... आर्र.....) 

मरळीनं जीवाच्या आकांतानं एकवार शेपटीचा तडाखा हाणला आणि अंगाला वळसे देत सफाईनं आचरेकराच्या हातातून उसळी घेतली.  सगळ्यानी तिला झेलायसाठी हात पसरले पण.....

‘सुळुक्’. 

मरळीचं तेच शेवटचं दर्शन !
*****

**या कथेतील संवाद माझे स्नेही श्री मंगेश नाबर यांनी मालवणी भाषेत रूपांतरित करून दिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.