Wednesday, August 7, 2019

-९- मालविका


 (विल्यम सॉमरसेट मॉमच्या 'LOUISE' या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

मालविका माझ्याबद्दल इतका विचार का करायची ते मला आजपर्यंत कधीच कळलं नाही. खरं तर मी तिला आवडत नव्हतो हे नक्की. माझ्या माघारी माझ्याबद्दल अनुदार उद्गार काढायची संधी ती कधीच सोडायची नाही हेही मला ठाऊक आहे. समक्ष तसं स्पष्ट न बोलण्याइतकं सौजन्य दाखवण्याचा नाटकीपणा तिच्यात आहे पण सूचक निश्वास, किंवा ओठ मुडपून मान कलती करणं किंवा निमुळत्या लांबसडक बोटांचा पंजा झटकणं यांमधून तिचा निषेधात्मक उद्देश स्पष्ट व्हायचाच. खरं तर गेली पंचवीस तरी वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो. पण तरीही तिच्या लेखी या इतक्या वर्षांच्या ओळखीला जवळिक अशी  संज्ञा असेल का याची मला शंकाच आहे.  मी एक रांगडा, आचरट आणि क्रूर माणूस आहे अशीच तिची धारणा असावी. पण तरीही माझ्याशी संबंध तोडून टाकण्याचा सोपा उपाय ती का योजत नव्हती हेच मला कळत नाही. उलट ती नेहमी मला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बोलवत असते. कधी कधी तर मला एखादी आठवड्याची सुटटी घालवायसाठी तिच्या घरी येऊन रहायचा आग्रहही करते. माझी  खात्री आहे की मी तिच्यावर विश्वास ठेवत नाही हा दाट संशय तिला येत असावा. पण या कारणासाठी जरी मी तिला आवडत नसलो तरी याच कारणासाठी तिला माझ्याशी सलगी, अगदी माफक का असेना, ठेवून रहायची आवश्यकता भासत असावी. मी तिला फारसं महत्व देत नाही या कल्पनेनं तिला वैषम्य वाटत असावं आणि म्हणूनच तिच्याबद्दलचं माझं मत चुकीचं आहे हे मला पटावं आणि मग मी तशी कबुली द्यावी यासाठी तिचा हा असा अट्टाहास असावा. किंवा तिचा चेहरा एक मुखवटा आहे हे मी ओळखलंय याची तिला थोडीशी शंका येत असावी आणि मीही तसा मुखवटा चढवूनच तिच्याबरोबर वागावं अशी अपेक्षा करत असावी ती. मुखवट्यामागचं तिचं व्यक्तिमत्व खरं कसं आहे हे मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकणार. ती जगाला फसवते आहे की स्वत:लाच हा निवाडाही मी करू शकणार नाही. पण तिच्या सलगीचं कारण असंही असेल कदाचित की एकमेकांची गुपितं माहित असणारे दोन ठग ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ या उक्तीप्रमाणे जवळ येतात तशी सावध जवळिक ठेवायची असावी तिला माझ्याशी. 

मालविकेला मी तिच्या लग्नाच्या आधीपासून ओळखतो. तेव्हा ती लहानखुऱ्या अंगलटीची, सुंदर रेखीव चेहऱ्याची, नाजूक, मोठ्या पण निस्तेज, करुण वाटणाऱ्या डोळ्यांची मुलगी होती. आईवडील तिला खूप म्हणजे खूपच जपायचे. त्याचं कारण म्हणजे तिला लहानपणी झालेल्या कसल्याश्या आजाराचा परिणाम म्हणून तिचं हृदय कमकुवत झालं होतं. कमालीची काळजी घ्यायला लागायची तिला स्वत:ची. तशात तिला जयंतराव कदमबांडेनी मागणी घातली तेव्हा सगळ्यांना एक हुरहूरच लागली, या आपल्या नाजूक मुलीला लग्न झेपेल की नाही याची. तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमेतेम, म्हणजे फारशी चांगली नव्हती. जयंतराव कदमबांडे मात्र गडगंज संपत्तीचे मालक होते. सरदार घराणं होतं, पिढीजाद मालमत्ता होती. आणि हयात असलेले जयवंतराव एकटेच वारस.  जयंतरावांनी, मालविकेची सर्वतोपरी काळजी घेईन, तिला अपार सुखात ठेवीन अशी हमी दिल्यावर आईवडिलानी दोघांच्या लग्नाला संमती दिली.  

जयंतराव भरभक्कम बांध्याचे, देखणे, खेळाडू, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले असे होते. मालविकेवर मनापासून प्रेम करत होते. हृदयदोषामुळं तिच्या आयुष्यात मोजकीच वर्षं उरलेली आहेत या धास्तीपोटी ती उरलेली वर्षं तिला अपार सुख द्यायचं हे एकच ध्येय त्यांनी बाळगलं होतं. तिला जास्तीत जास्त वेळ द्यायचा म्हणून जयंतरावानी स्वत:च्या आवडीचे आणि ज्यात त्यांचं प्राविण्य होतं असे खेळही थांबवले. तिनं सांगितलं म्हणून नव्हे. गोल्फ आणि शिकार यात आपल्या नवऱ्याचा हात धरणारा कुणी नाही याचा तिला अभिमानच  वाटायचा. पण जेव्हा जेव्हा जयंतराव गोल्फ कोर्सवर किंवा शिकारीला जायचा मनोदय बोलून दाखवायचे तेव्हा तेव्हा, योगायोगानं असेल, पण मालविकेला हार्ट अटॅक यायचा. दोघांमध्ये कधी मतभेद झाला तर मालविका लगेच पडतं घ्यायची आणि जयंतरावाना त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायला सांगायची. पण मग तिचा हृदयविकार उफाळून यायचा आणि येणाऱ्या अशक्तपणामुळे तिला आठवडाभर पडून रहायला लागायचं. अर्थातच मग जयंतराव जाणं रद्द करायचे. हे असं नेहमीच व्हायचं.  

पण एक दिवस माझ्या लक्षात आलं की मालविकेला स्वत:च्या इच्छेची पूर्ती करताना मात्र ही अडचण येत नाही. तिला त्या दिवशी मैत्रिणींबरोबर ट्रेकिंग करत आठ मैल चालताना मी बघितलं. मग नंतर जेव्हा जयंतराव भेटले तेव्हा त्याना मी सुचवलं, “जयंतराव, तुम्ही समजता तितकी काही अशक्त दिसत नाही हो मालविका.” त्यांनी नुसती मान हलवली, एक सुस्कारा टाकला आणि म्हणाले, “नाही हो, तसं नाहीये. ती कमालीची अशक्त आहे. कितीतरी हृद्रोगतज्ञांनी तिला तपासलंय आणि सगळ्यांचं एकमत झालंय की तिचं आयुष्य हे अगदी एखाद्या कमकुवत धाग्यामुळं लटकून असल्यासारखं आहे. फक्त तिची इच्छाशक्ती दुर्दम्य आहे इतकंच.” 

त्यांनी मग एक दिवस मालविकेला सहज मी तिच्या स्टॅमिनाबद्दल काय बोललो ते सांगितलं. त्यानंतर जेव्हा ती मला भेटली तेव्हा खोलवर गेल्यासारखा आवाज काढून म्हणाली, “हो. मी गेले होते त्या दिवशी ट्रेकिंगला. पण नसते गेले तर बरं झालं असतं. कारण आता मला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मरणाच्या दारात उभी असेन मी उद्या.” 

मी म्हणालो, “तुला जेव्हा काही तुझ्या आवडीचं करायचं असेल तेव्हा बरं हत्तीचं बळ येतं तुझ्या अंगात.” 

खरंच आहे माझं म्हणणं. एखाद्या पार्टीला गेलेलं असताना तिथलं वातावरण, नाचगाणी तिला आवडली तर ती अगदी पहाट होईपर्यंत तिथं बसू शकते, नाचात सहभागीदेखील होते. पण जर तिला पसंत नसलं तर मात्र तिला तिथं कसंसच वाटायला लागतं, घेरी आल्यासारखं वाटतं आणि मग जयंतरावाना, मजा येत असली तरी, लगेच पार्टी सोडून तिला घरी घेऊन जायला लागतं. 

तिला मी मारलेला शेरा रुचला नसावा. तिच्या डोळ्यातच मला दिसलं ते. माझ्या विधानाकडं दुर्लक्ष करत म्हणाली, “काय म्हणायचंय तुला? तुला वाटतं म्हणून मी काय लगेच मरून पडायचं की काय?” 

आणि एकदा दोघे सिमल्याला गेले असताना जयंतरावाना थंडीनं कुडकुडल्यामुळं मरण आलं. मालविकेला थंडी वाजते म्हणून होती नव्हती ती सगळी ब्लँकेट्स तिच्या अंगावर घालून स्वत: कुडकुडत राहिले. आणि त्यापायी हायपोथर्मिया होऊन गेले ते. एक मुलगी आणि सगळी मालमत्ता मालविकेकडे सोपवून गेले. मालविकेच्या शोकाला पारावार उरला नाही. त्या धक्क्यातून ती कशी सावरली ते आश्चर्यच आहे. तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना वाटत होतं जयंतरावांच्या मागोमाग लगेचच तीही जाईल, बिचाऱ्या मुलीला – इरावतीला - दोन्ही बाजूनी पोरकी करून. पण नाही.  मालविका जयंतरावांपेक्षा जास्त जगली. 

जयंतरावांच्या मरणानंतर मालविकेच्या मित्रमैत्रिणींनी तिची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. तिला काहीही शारीरिक कष्ट पडू नयेत यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. तसं रहायलाच लागलं त्यांना. कारण जरासंही नावडतं किंवा दमणुकीची थोडीशीही शक्यता असलेलं काम करायला सांगितलं तर लगेच तिचं हृदय कुरकुर करायला लागायचं नि ती मरणाच्या दारात उभी रहायची. तिची काळजी घ्यायला जवळचा असा कोणी पुरुषमाणूस उरलेला नसल्यामुळं ‘मी माझ्या लाडक्या इरावतीला एकट्यानं कशी वाढवू शकेन’ हे तिचं पालुपद व्हायला लागलं. दुसरं लग्न का करत नाहीस असं कुणी विचारलं की ती म्हणायची, “छे, माझ्या या अशा हृद्रोगापायी आता ते शक्य नाही. मला माहित आहे माझ्या प्रेमळ जयंतरावानाही मी पुन्हा लग्न करावं अस वाटत असेल. इरावतीचा नीट सांभाळ व्हावा म्हणूनही ते करणं योग्य होईल. पण माझ्या या अशा असाध्य आजारापायी कोण तयार होईल माझ्याशी लग्न करायला?” तिच्या इस्टेटीसाठी खरं तर एकच का अनेक तरुण तयार झाले असते. आणि खरंच, जयंतरावाना जाऊन एक वर्ष पूर्ण होतंय न होतंय तोवर मेजर जगदीश सातघरे नावाच्या उमद्या माणसानं मालविकेचं मन जिंकून घेतलं. तिच्या इस्टेटीसाठी नाही, कारण जगदीश स्वत:ही प्रतिष्ठित आणि आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेला होता. फुलासारख्या नाजुक आणि सुंदर मालविकेची आयुष्यभर काळजी घ्यायला तो एका पायावर आणि खुशीनं तयार झाला. 

“मी फार काळ नाही तुम्हाला त्रास द्यायला जगणार जगदीश.” मालविका त्याला म्हणायची. 

मेजर जगदीशनं लग्न झाल्यानंतर सैन्यातली नोकरी सोडली कारण त्याला मालविकेची पूर्णवेळ काळजी घ्यायची होती. तिच्यासाठी उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी आणि थंडीत उबदार प्रदेशात रहाणं आवश्यक होतं. सैन्यातल्या ड्युटीवर राहून हे साध्य करणं जगदीशला कठीण जात होतं. आपली इतक्या वर्षाची नोकरी, हुद्दा आणि प्रतिष्ठा सहजासहजी सोडणं तसं त्याच्या जीवावर आलं होतं आणि मालविकाही त्याला सोडू नकोस असं बजावत होती. पण तिच्या आयुष्यातील उरलीसुरली वर्षं तिला सुखात घालवायला द्यायची या विचारांनी भारलेल्या जगदीशनं तिला माघार घ्यायला लावली. तिनंही नेहमीप्रमाणे नाही होय करत माघार घेतली आणि जगदीशनं राजीनामा दिला. 

“आता फार दिवस नाही उरलेत माझ्यापाशी जगदीश”, ती म्हणायची. “फार त्रास नाही देणार मी तुम्हाला.” 

पुढची दोन अडीच वर्षं मालविका अशक्त हृदयासहितही सुंदर कपडे, मैत्रीणींबरोबर सहली, पिकनिक्स,  पार्ट्या, नाचगाणी हे जीवन जगली. एक्स-मेजर जगदीश सातघरेची मात्र या साऱ्या धावपळीत दमछाक व्हायची. आजारी पत्नीचा दुसरेपणाचा पती ही ड्युटी मेजरपदाच्या ड्युटीपेक्षा जास्तच थकवणारी सिध्द होत होती. परिहारक म्हणून आर्मीतल्या सवयीची मद्यासक्ति पुन्हा उफाळून आली. कदाचित ती आणखी वाढली असती एव्हढ्यात सीमेवर युध्द सुरु झालं आणि त्यानं पुन्हा आर्मी जॉईन केली. आपल्या रेजिमेंटसह तो आघाडीवर गेला आणि जेमतेम एक महिन्यातच तो शहीद झाल्याची बातमी आली. 

मालविकेला हा मोठाच धक्का होता. पण तिला वाटलं आपलं हे खासगी दु:ख आहे, लोकांना त्याची झळ लागायला नको. त्यामुळं तिनं नेह्मीसारखंच आयुष्य जगायचं ठरवलं. त्या दु:खात तिला हृदयविकाराचा झटका आला की नाही कळलं नाही. दु:खातून बाहेर निघायसाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जयंतराव आणि जगदीश या दोघांबरोबर जिथं तिनं चांगले सुखाचे दिवस बघितले त्या नागपुरातल्या प्रासादतुल्य वाड्याला तिनं जखमी सैनिकांसाठीच्या  शुश्रूषागृहात रुपांतरीत केलं. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, “मालू, अग नको हा उपद्व्याप करू. तुला सोसायचा नाही.” पण ती म्हणायची, “या तणावात मी मरणार आहे हे नक्की. मला माहित आहे. पण काय करू? समाजाचंही काही देणं लागतो आपण. मला हे केलंच पाहिजे.” 

पण तिला मरण आलं नाही. उलट तिचे दिवस आनंदात जायला लागले. पंचक्रोशीत असं खास  सैनिकांसाठी वाहिलेलं शुश्रूषागृह नव्हतं.  युध्द चालूच होतं. त्यामुळं शुश्रूषागृह सतत भरलेलं असायचं. आणि त्यातून ते अद्यावत असल्यानं तर आणखीनच चांगलं चालायचं.

***

असेच काही दिवस गेले आणि एकदा अचानक मला मालविका अमरावतीत भेटली.  साहित्यसंमेलनासाठी गेलो होतो मी. दुपारच्या जेवणासाठी अवंतिका हॉटेलमध्ये गेलो तिथं तीही जेवायला आली होती. तिच्याबरोबर आर्मीतला एक उमदा जवानही होता. मला म्हणाली सुश्रुषागृहाच्या संबंधाने बिझनेस मीटिंग साठी आली होती ती. नागपूरमध्ये येणारे सगळे आर्मी ऑफिसर्स तिला फार आदराने वागवतात, शुश्रूषागृहाच्याच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील जड जोखमीच्या जबाबदाऱ्या घेऊ देत नाहीत, स्वत: धावून येतात मदतीसाठी तिच्या नाजूक प्रकृतीबद्दल माहिती असल्यामुळं. आणि म्हणून ते सगळे तिची खूप काळजी घेतात, अगदी जयंतराव किंवा जगदीश घ्यायचे तशी.  

“बिचारे जयंतराव. माझ्या अशा क्षणभंगुर अवस्थेत मी त्यांच्या मागे जिवंत राहीन असं कुणाला वाटलं तरी असतं का?” मालविका म्हणाली. 

“आणि मेजर जगदीशच्या मागंही !” मी उत्तरादाखल बोललो. 

माझं हे वाक्य तिला रुचलं नसावं. खिन्न हसून आणि पाणीभरल्या डोळ्यांनी तिनं माझ्याकडं बघितलं. म्हणाली, “माझ्या आयुष्यातली उरली सुरली मोजकी वर्षंही तुझ्या नजरेत खुपतायत का?” 

मी विषय बदलून म्हणालो, “काय ग मालविका, तुझं हृदय आता पूर्वीपेक्षा जरा बऱ्या अवस्थेत आलंय, हो नं?” 

“कधीच सुधारणार नाहीये ते. आज सकाळीच मी दाखवून आले हृद्रोगतज्ञाला. त्याचं म्हणणं की मी माझ्या मनाची तयारी ठेवायला हवी वाईटातलं वाईट घडू शकेल याची.” 

“पण ती तयारी तर तू गेल्या पंचवीस वर्षांपासून ठेवली आहेसच की,” मी म्हणालो.

***

मालविका नंतर इथं महाबळेश्वरात स्थायिक झाली. आता जवळजवळ चाळीशीच्या घरात आली होती ती. पण कृश अंगकाठी, गोल मोठे डोळे, आणि फिकटलेले गाल यांमुळं पंचवीसच्या वर नसावी असंच वाटलं असतं कुणालाही. इरावती कॉलेजचं शिक्षण संपवून तिच्याकडं घरीच रहायला आली.  

“इरावतीच आता माझी काळजी घेते,” मालविका ज्याच्यात्याच्याकडं म्हणायची. “बिचारीला त्रासच आहे माझ्यासारख्या कमकुवत प्रकृतीच्या बाईची शुश्रूषा करत रहायचं हा. तरी प्रेमानं करते. पण तशी थोडीच वर्ष आहेत म्हणा आता. माझी खात्री आहे, त्यानंतर सुटका होईल बिचारीची.” 

इरावती खरंच प्रेमळ मुलगी आहे. आईच्या गंभीर आजाराची माहिती होती तिला. अगदी लहान असल्यापासून तिला दंगा-आवाज न करता वावरायची सवय झाली होतीच. आईला जरासुध्दा त्रास मनस्ताप होऊ देता कामा नये हे तिच्या मनावर ठामपणे बिंबवलं गेलं होतं. त्यामुळं आता मालविकानं किती जरी सांगितलं की इरावतीनं स्वत:चं आयुष्य चांगलं जगावं, त्याग करून आईची काळजी करत राहू नये, तरीही तिनं ते कधीच मनावर घेतलं नाही. त्याग म्हणून नाही पण बिचाऱ्या आईला इतका त्रास असताना तिच्यासाठी शक्य तितकं झटून तिची सेवा करायची यातच समाधान मानायची ती. आणि मालविका नाईलाज असल्यासारखं तिला ते सगळं करू द्यायची. “इराला आनंद मिळतो त्यात तर करू दे तिला.” मालविका म्हणायची. 

एकदा मीच तिला म्हटलं, “अग, आता इरावती तरुण झाली आहे, तिनं तिच्या वयाच्या मित्रमैत्रिणींत जास्तीत जास्त मिसळावं, आनंदात रहावं असं नाही का वाटत तुला मालविका?” 

“मी तिला हेच सांगत असते नेहमी. पण काय करू? ऐकतच नाही ती. देवाशप्पथ, माझ्यासाठी कुणाला त्रास व्हावा असं माझ्या मनातही मी कधी आणू शकत नाही.” मालविका म्हणाली. 

इरावतीला भेटून मी जेव्हा तिला समजवायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, “काका, आई बिचारी किती यातना सहन करत असते. तरी नेहमी मला सांगते की मी बाहेर जावं, मित्र मैत्रिणींमध्ये मिसळावं, पिकनिक्स, पार्ट्या, सिनेमा, एन्जॉय करावे. पण काय नं, मी जायचं ठरवून तिला सांगितलं आणि तयारी करायला गेले की थोड्याच वेळात तिच्या छातीत तरी कळा यायला लागतात किंवा तिला घेरी तरी येते. मग मी जाणं रद्द करते आणि तिच्या शुश्रूषेसाठी घरी थांबते.” 

यावर मी काय बोलणार? 

असेच दिवस चालले. आणि कसं कुणास ठाऊक, इरावतीला एक तरुण मुलगा आवडला, प्रेमात पडली ती त्याच्या. माझ्याच एक मित्राचा मुलगा होता तो - उमेश. सुदृढ होता, सुस्वभावी होता, कमावता होता. दिसायलाही चांगला होता. इरावतीला अनुरूप असा. त्यानं मागणी घातली आणि इरावतीनं होकारही दिला त्याला.  बरं वाटलं मला हे समजल्यावर. आता ती स्वत:चं आयुष्य जगू शकेल. खरं तर आजवर अशी  गोष्ट घडेल याची मी आशाच सोडून दिली होती. पण घडली खरी. खूप खूप आनंद झाला मला. 

पण एक दिवस उमेश माझ्याकडं आला, पडलेल्या चेहऱ्यानं, आणि म्हणाला, “काका, आमचं लग्न बहुधा होत नाही असं दिसतंय.” 

“का रे? काय झालं?” मी विचारलं. 

“काका, इरा म्हणते ती तिच्या आईला सोडू शकत नाही.” 

मी काहीच बोललो नाही. 

खरं तर मी त्यांच्या या खासगी गोष्टीत दखल द्यायचं काही कारण नव्हतं. पण तरीही दोन तीन दिवसांनी एका संध्याकाळी मी सहज गेल्यासारखा मालविकेला भेटायला गेलो. चहाच्या वेळेला कुणा तरी मित्रांनी किवा मैत्रीणींनी  भेटायला यावं यात तिला आनंद व्हायचा. त्यामुळं माझं वरकरणी तरी हसून स्वागत केलं तिनं. 

“ये रे. किती दिवसांनी आलास. विसरलास काय मला?” ती म्हणाली. 

“नाही गं, तसं काही नाही. तुझं फ्रेंड सर्कल वेगळं आहे. मी त्यात शोभून दिसत नाही. म्हणून थोडं येणं कमी केलंय इतकंच. बाकी कशी आहेस?” मी. 

“काय सांगायचं? तुला तर माहित आहेच थोड्याच दिवसांची सोबतीण आहे मी ते.” 

आणि अशाच इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्यावर मी विषय काढला, “काय ग? मालविका, इराचं लग्न मोडतंय असं कानावर आलंय? खरं आहे का?” 

“तिचं लग्न लवकरात लवकर व्हावं ही तर माझी इच्छा आहे. पण काय सांगू? शक्य दिसत नाही ते. तिचा आडमुठेपणा, दुसरं काय? मी तर अगदी हात जोडून तिला सांगितलं. पण ऐकायला तयारच नाही ती. मला सोडून जायचं नाही हा एकच धोशा लावलाय तिनं.” 

“तुझ्या प्रकृतीपायी तिनं अडकून रहाण्यात काही तरी चुकतंय असं वाटत नाही तुला?” मी. 

“खरंय रे. पण अर्थात आता माझे किती दिवस राहिलेत? मी गेल्यावर तर करेलच ना लग्न.” मालविका म्हणाली. 

“ते सांगू नकोस मला, मालविका. दोन नवऱ्यांना पोचवूनही जगते आहेस तू. त्यात आणखी एक दोनांची सुद्धा भर पडू शकेल.” वरकरणी हसत पण थोडा कुत्सितपणानेच बोललो मी. 

“तुला विनोद सुचतोय यात?” तीही जरा तिरसटपणानेच बोलली. 

“तुला हव्या असलेल्या गोष्टी करण्यापुरती तू मजबूत, सशक्त असतेस, आणि न आवडणारी कामं अंगावर आली की लगेच तुझं कमकुवत हृदय धपापायाला लागतं हे न कळण्याइतकी निरागस आहेस तू?”  मीही तिला सुनावायला कमी करणार नव्हतो आज. 

“काही बोलू नकोस. माझ्याबद्दल तुला काहीही दयामाया नाही हे ठाऊक आहे मला. मला कसला त्रास होतो यावर विश्वासच नाही तुझा.” 

मी तिच्यावर नजर ठामपणे रोखली आणि म्हणालो, “कधीच नव्हता. गेल्या पंचवीस वर्षांहून जास्ती काळ तू हे जबरदस्त नाटक करते आहेस. तू एक स्वार्थी, स्वयंकेंद्रित बाई आहेस. स्वत:वरच्याच प्रेमापायी दोन निष्पाप माणसांना मृत्युमुखी ढकललंस आणि आता तुझ्या स्वत:च्या मुलीचं आयुष्यही बरबाद करायला निघाली आहेस तू.” मी तोफ डागली. माझं हे बोलणं ऐकून तिला हार्ट अटॅक येणारच असं मला वाटलं होतं. तसलं काही तरी बघायची मी तयारी ठेवली होतीच. पण मला वाटत होतं तसं काहीच घडलं नाही. खिन्न डोळ्यांनी माझ्याकडं बघत तिनं फक्त स्मित केलं आणि म्हणाली, “जाऊ दे! आज ना उद्या हे बोलल्याचा  पश्चात्ताप होईल तुला.” 

“बघू ! पण मला सांग, इरावतीचं लग्न या मुलाबरोबर होऊ द्यायचं नाही हा निश्चय केला आहेस तू?” 

“नाही. उलट मी तिच्यामागं लागलेय तिनं लवकरात लवकर हे लग्न करावं म्हणून. पण काही केल्या ऐकायला तयार नाही ती.” 

“हे लग्न झालं तर तू मरण्याची शक्यता आहे असं सांगितलंयस तिला तू?” 

“सांगावंच लागलं. हटूनच बसली ती.” 

हे भगवान ! तुला एखादी गोष्ट करायचीच नसताना कुणी तरी तुला ती करायला भाग पाडू शकतं हे मला आज नव्यानंच कळतंय.” 

“जाऊ दे ..... तुला नाही कळायचं ...... इराला हे लग्न करायचं असेल तर उद्याच करू दे. मग मी मेले तरी चालेल.” 

“ठीक आहे. बघूयाच काय होतंय ते. मी वळवतो तिचं मन लग्नासाठी.” मी म्हणालो. 

“तुला माझी जराही कणव येत नाही ना?” 

“कणव? हसू येतं मला तुझ्या वागण्यावर विचार करताना.” मी म्हणालो. 

तिचे फिक्कट गाल लालसर होत असलेले दिसले. जराशी हसली, पण डोळ्यांत आता खिन्न भाव नव्हता, राग होता. 

“ठीक तर मग, इराला सांग, या पंधरा दिवसात तिचं लग्न करून टाकेन या तिच्या पसंतीच्या मुलाशी. पण त्यात माझ्या बाबतीत काही विपरीत घडलं तर तू आणि इरा, दोघंही स्वत:ला माफ करू शकाल अशी आशा करते मी.” मालविका म्हणाली.

***

मालविकेनं दिलेला शब्द पाळला. लग्नाची तारीख ठरली, वधूसाठीच्या कपड्यांची, दागिन्यांची खरेदी झाली, नवऱ्यामुलाला देण्याचा आहेरही निवडला, खरेदी केला गेला. आमंत्रणं पाठवली गेली. सगळी जय्यत तयारी झाली. लग्नाचा दिवस उजाडला. इरावती आणि उमेश दोघंही खुशीनं फुलून गेले होते. संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर अक्षता पडणार होत्या. 

पण ..... सकाळी दहा वाजताच मालविकेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मरण्यापूर्वी काही मिनिटांसाठी शुद्धीवर आली तेव्हा तिनं इराला जवळ बोलावून आपल्या मृत्यूसाठी कारणीभूत झाल्याच्या पापातून तिला आपण क्षमा करत असल्याचं सांगितलं आणि शांतपणे डोळे मिटले.  

******

 

 

No comments:

Post a Comment