Wednesday, August 28, 2019

-११- सुशा


(हेक्टर ह्यु मन्रो (साकी) याच्या ESME या नावाच्या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
 
(ही गोष्ट आहे जुनी, इ.स.१९००-१९१० च्या दशकातली. हिंदुस्थानात तेव्हा अनेक संस्थाने होती, जाहागिरी होत्या. तेव्हाच्या मुंबई इलाख्यातल्या जत, डफळापूर, मुधोळ आणि आता कर्नाटकात असलेले जमखंडी या अगदी जवळ जवळ असलेल्या जहागिरींच्या परिसरातली ही गोष्ट आहे. जतच्या जहागीरदारीण ताईसाहेबराजे सापळे आणि त्यांची डफळापूरमधली भाची कांचनमाला सापळे या दोघींमधल्या संभाषणाने ही गोष्ट सुरु होते.कथेत येणाऱ्या आणखी दोन व्यक्ति म्हणजे जमखंडीच्या उषाराजे रणनवरे आणि मुधोळचे सरदार भांबरे. ही सर्व नावे, अर्थातच, काल्पनिक आहेत. सदरच्या जहागिरींमधील जिवंत अथवा मृत व्यक्तींमध्ये नामसादृश्य किंवा इतर काही सादृश्य आढळल्यास तो केवळ अभावित योगायोग समजावा.)

“ताईसाहेबराजे, सगळ्या शिकारकथा इथून तिथून सारख्याच असतात. माझं तरी असं मत आहे.” कांचनमाला त्यांच्या मावशीना म्हणाल्या.
 
“पण आमची ही गोष्ट तुम्ही आजवर ऐकलेल्या सगळ्या शिकारकथांहून वेगळी आहे कांचनमाला,” ताईसाहेबराजे उत्तरल्या. “तशी जुनीच आहे म्हणा, तरीही ! आम्ही तेव्हा असू काहीतरी बावीस तेवीस वर्षांच्या. जहागीरदारसाहेबांच्यात आणि आमच्यात बेबनाव नव्हता तेव्हा आतासारखा. पण तरीही शिकारीवर जाताना आम्ही एकत्र कधी गेलो नाही. साहेब जायचे त्यांच्या लवाजम्याबरोबर. आम्ही जायचो तेव्हा आमच्यासाठी शिकारकऱ्यांचा, हाकाऱ्यांचा वेगळा ताफा असायचा. घोडी, बंदुका, काडतुसं सगळा जामानिमा खास आमचाच. पण बरं का कांचनमाला, आमच्या आजच्या गोष्टीशी याचा काही संबंध नाही.” 


“हो का? मग सांगाच आम्हाला तुमची ही अफलातून कथा.” 

“सांगतो की ! आमच्याबरोबर तेव्हा जमखंडीच्या उषाराजे रणनवरे होत्या. उषाराजे म्हणजे उंच, धिप्पाड, पठाणी बांध्याच्या बायका असतात तशांपैकी होत्या. वर दागिन्यांनी मढलेल्या. अगदी दिवाणखान्यातली सजावट असावी तशा दिसायच्या. तर अशा त्या उषाराजे आम्हाला म्हणाल्या, ‘आज काय होणार आहे काय की ! आम्हाला मनात जरा धाकधूकच वाटायला लागली बघा. कायतरी विपरीत होणार आसं सांगतय आमचं मन आम्हाला. धास्तीनं आमचा चेहरा फिक्कट तर दिसत नाही ना?’ 

“फिक्कट? अहो बिटाच्या रसासारखा जांभळा लाल रंग होता त्यांच्या गालावर. आम्ही त्याना म्हणालो, ‘नाही हो उषाराजे, खरं तर नेहमीपेक्षा जास्त टवटवीत दिसताय तुम्ही आज.’ आमच्या बोलण्यातली खोच त्यांच्या ध्यानात यायच्या आधीच शिकारीची सुरुवात झाल्याचं लक्ष्यात आलं. आमच्या ताफ्यातल्या शिकारी कुत्र्यांना एक कोल्हा करवंदाच्या जाळीत दिसला आणि त्यांनी जोरजोरात भुंकून त्याला बाहेर आणायचा प्रयत्न सुरु केल्याचे आवाज ऐकू यायला लागले.” 

“बघा ताईसाहेबराजे, मी म्हटलं नव्हतं? मी आजवर ऐकलेल्या सगळ्या शिकारकथांमध्ये करवंद जाळी आणि लपलेला कोल्हा हा असायचाच.” कांचनमालानी शेरा मारला. 

त्यांच्या त्या शेऱ्याकडे दुर्लक्ष करत ताईसाहेबराजेनी आपलं बोलणं चालू ठेवलं. “उषाराजे आणि आम्ही आपापल्या घोड्यांवर चांगली मांड जमवून होतो. त्यामुळं टाच मारून आवाजाच्या दिशेने चढावावर जायला काहीच अवघड गेलं नाही. पण आम्ही बहुधा बरोबर माग घेऊ शकलो नसणार, कारण कुत्र्यांचा आवाज हळू हळू कमी यायला लागला. काहीच पत्ता लागेना तेव्हा आमची निराशा व्हायला लागली. तुम्हाला माहीतच आहे आमचा स्वभाव कसा तापट आहे ते. हळूहळू आमची चिडचीड व्हायला लागली. एवढ्यात आमची घोडी होती तिथून जरा अंतरावर खालीच एका खोलगट भागात आमची कुत्री गुरगुरत करवंदाच्या जाळीभोवती फिरताना दिसली.” 

“ ‘ती बघा तिथं आहेत,’ उषाराजे ओरडल्या आणि एकदम धास्तावल्यासारख्या म्हणाल्या, ‘अरे देवा! ताईसाहेब, अहो कशाची शिकार धरलीय हो त्यांनी?’ 

“खरंच हो. साधा कोल्हा दिसत नव्हता तो. कोल्ह्यांपेक्षा दुप्पटीने मोठा होता प्राणी. डोकं लहान पण गर्दन मोठी. विचकलेले दातही दिसत होते.” 

“ ‘उषाराजे, अहो ते तरस आहे तरस,’ आम्ही ओरडलो; ‘मुधोळकर सरदार भांबऱ्यांच्या राखीव बंदिस्त कुरणातून निसटून आलेलं असणार. सरदार भांबरे सलुकी जातीचे शिकारी कुत्री आणि तरस यांच्या संकरातून मुधोळ हाऊंड ही क्रॉसब्रीड तयार करायच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी चारपाच तरसं आणून पाळलेत कुरणात. आम्हाला ठाऊक आहे." " 

“तरसानं वळून आपल्या मागावर आलेल्या कुत्र्यांकडं बघितलं आणि दात विचकत हल्ला करायच्या पवित्र्यात उभं राहिलं.. सहा कुत्री अर्धवर्तुळ करून त्याला घेरून होती. म्हणजे मूळ बाराच्या ताफ्यातली ही सहाच आली होती माग काढत. एवढ्यात त्या कुत्र्यांचा जो ट्रेनर हाकाऱ्या होता त्यानं माघारी बोलवायचं शिंग फुकलेलं ऐकू आलं तशी सारी सहाच्या सहा कुत्री मागं वळून पसार झाली. तरसाला आमच्या घोड्यांची चाहूल लागली होतीच. घेरून असलेली कुत्री गेल्याबरोबर ते जाळीतनं बाहेर आलं. कुरणात माणसांच्या संगतीत राहून त्याला बहुतेक माणसांची भीड वाटत नसावी असं गरीबासारखं चालत ते आमच्या मागं मागं यायला लागलं.” 

“बरं का कांचनमाला, ऐकताय ना? संध्याकाळ व्हायला लागली होती. उषाराजे आणि आम्ही त्या तरसाच्या संगतीत होतो. ‘ताईसाहेबराजे, आता हो काय करायचं आपण?’ धास्तावलेल्या उषाराजे आम्हाला म्हणाल्या. आम्ही बोललो, ‘काय उषाराजे, काय करायचं म्हणजे काय?’ “ 

“ ‘अहो म्हणजे या तरसाच्या संगतीत रात्रभर कसं हो रहाणार आपण इथं?’ उषाराजेनी विचारलं.” 

“ ‘उषाराजे हे तरस नसतं तरीही आम्ही या जंगलात रात्र काढायाला तयार नसतो झालो. आहो, शिकारीला बरोबरचा लवाजमा असतो तेव्हा आम्ही राहतो एखादी रात्र भवताली तंबू, राहुट्या ठेवून. पण जादा तर आम्ही लगोलग राजवाड्याकडे परत जातो. आत्ता पण आपण परतायचच. चला वळवा घोडं उजवीकडं ती उंच झाडं दिसतायत तिकडं. सदरबाजारातनं वाड्याकडं जाणारा रस्ता त्यांच्या पलीकडंच आहे. माहीत आहे आम्हाला.’ “ 

“मग आम्ही आमची घोडी दुडक्या चालीनं सदरबाजारच्या रस्त्याकडे न्यायला सुरुवात केली. ते तरसदेखील आमच्या मागोमाग यायला लागलं.” 

“ ‘ताईसाहेब, काय हो करायचं या तरसाचं? आपली पाठ काही सोडत नाहीच ते ?’ “ 

“ ‘लोकं काय बरं करतात तरसाचं उषाराजे?’ आम्ही उलट विचारलं.” 

“ ‘काय की ! आजवर आम्हाला असं काही भेटलंच नाही हो.’ उषाराजे म्हणाल्या.” 

“ ‘आम्हाला पण ! आणि उषाराजे, अहो ते नर आहे की मादी तेही कळत नाही. कळलं असतं तर आपण त्याला तसं नाव तरी दिलं असतं काही तरी. अंss... आपण त्याला देऊयाच काही तरी नाव.... सुशा... सुशा म्हणूया त्याला. नर असला काय नि मादी असली काय, दोघाना पण चालेल हे नाव.’ “ 

“अजून अंधुक उजेड होता. त्यामुळं आजूबाजूचं दिसत होतं. पण सुशा आमच्या बरोबर येताना दिसेना. मागे राहिला असावा. जरा पुढं, बाजूला अपुऱ्या आणि फाटक्या कपड्यातला एक लहान पोर आम्हाला जवळच्या करवंदाच्या जाळीत बहुतेक करवंद तोडत असताना दिसला. अचानक आमची दोघींची घोडी बघून तो घाबरून ओरडायला लागला. आम्ही काही थांबलो नाही. तशाच पुढे गेलो.” 

“ ‘ताईसाहेब, त्या पोराचं किंचाळणं काही बरं वाटलं नाही आम्हाला.’ उषाराजे नेहमीच अशुभाच्या बातमीदार असल्यासारख्या बोलल्या.” 

“आम्ही काही बोललो नाही. खरं तर कातर वेळ होती त्यामुळं आम्हालाही काही तरी वाईट घडणार असल्यासारखी जाणीव व्हायला लागली होती. तरी आम्ही घोडी तशीच पुढं नेली. जरा वेळाने त्या पोराचे रडणेही थांबले असे वाटले. सुशा मागेमागे येताना दिसला नाही म्हणून उगीचच विषय बदलायला म्हणून आम्ही त्याला हाका मारल्या. तर काही मिनिटातच तो मागून बंदुकीतनं सुटलेल्या गोळीसारखा आला आणि आमच्या पुढं जाऊन बाजूच्या जंगलात दिसेनासा झाला. त्याच्या जबड्यात काही तरी घट्ट पकडलेलं दिसलं ओझरतं. पोराचं रडणं का थांबलं याचा आता खुलासा झाला.” 

“ ‘देवा रे, काय झालं हे?......’उषाराजे थरकापत किंचाळल्या, ‘काय करायचं हो ताईसाहेब आता?... हं?... सांगा की.’ “ 

“कांचनमाला, त्या वेळी आम्हाला काय वाटलं सांगू? अहो उषाराजे जर देवाच्या दरबारात असत्या चित्रगुप्ताच्या जागी तर ना, चित्रगुप्त विचारेल त्याच्यापेक्षा दुप्पटीने तरी जास्त प्रश्न त्यांनी विचारले असते यमानं धरून आणलेल्या जीवाला. मुलखाच्या चौकस आणि शंकेखोर हो !” 

“एवढ्यात सुशा झाडीतून बाहेर येऊन आमच्या पुढे चालायला लागला, काहीच न झाल्यासारखा. ‘काही नाही का हो करता येणार आपल्याला ताईसाहेब?’ उषाराजे काकुळतीला आल्यासारख्या बोलल्या.” 

“आम्ही त्याना म्हणालो, ‘उषाराजे, आहो आम्ही करतोच आहोत ना आमच्याकडून होईल ते. आम्ही सुशावर ओरडलो, आमचा चाबूक फटकावला हवेत त्यानं घाबरावं म्हणून. आमची पाण्याची बुधलीही फेकली त्याच्या अंगावर पण काही उपयोग झाला का? मग आता आणखी काय करायचं?’ ”  

“ ‘या क्रूर प्राण्याला आपल्या बरोबर कसे काय चालू देत होतात तुम्ही ताईसाहेब?’ उषाराजेनी पालुपद चालूच ठेवले.” 

“ ‘उषाराजे, एक तर आम्ही  सुशाला बरोबर चालण्यापासून थांबवू शकत नव्हतो. दुसरं म्हणजे आत्ता या घटकेला तो आणखी काही क्रूरपणा करेल असे वाटत नाही.’ आम्ही म्हणालो.” 

“ ‘त्या पोराचे हाल झाले असतील ना हो पण ?’ “ 

“ ‘काय सांगायचं?’ आम्ही उत्तरलो. आणि घोड्याला टाच दिली.” 

“अंधार जास्त गडद झाला. पण तोपर्यंत आम्ही मोठ्या रस्तावर येऊन पोचलो. त्या रस्त्यावर जरा पुढं गेलो तोच मागून एक मोटार गाडी आली आणि मोठ्यानं आवाज करत अगदी  आमच्या शेजारून वेगानं पुढं गेली. एक दोन मिनिटं झाली असतील नसतील तोवर थाडकन् आणि त्यापाठोपाठच गाडीचे ब्रेक करकचून लावल्याचा कर्कश्य असा आवाज झाला. आम्ही गाडीजवळ पोचलो तर तिथं एक गोरा तरुण माणूस थांबलेल्या गाडीजवळच काही तरी पडलं होतं त्याच्याकडे वाकून बघत असलेला दिसला.” 

‘अरे देवा ! तुम्ही मारलं की हो माझ्या सुशाला.’ आम्ही चिडून बोललो.” 

“ ‘माफ करा युअर हायनेस,’ कमरेत जरासा झुकत तो गोरा तरुण बोलायला लागला, ‘कुत्रा तुमचा होता काय? अपघात झाला खरा. माफ करा. मीदेखील कुत्री पाळतो. तेव्हा मला कल्पना आहे तुम्हाला किती दु:ख होत असेल त्याची. पण मी त्याची भरपाई करायला तयार आहे.’ ” 

“ ‘कृपा करून सुशाला दफन करा लगेच. मला बघवत नाही त्याच्याकडे अशा अवस्थेत.’ आम्ही म्हणालो.” 

“ ‘इस्माईल, टिकाव, फावडा लेके आव.’ त्यानं गाडीच्या ड्रायव्हरला हुकुम सोडला. बहुतेक अशा दफनविधीचे प्रसंग त्याच्यावर वरचेवर ओढवत असावेत. म्हणून तसल्या हत्यारांची सोय गाडीत करून ठेवलेली होती वाटतं.” 

“पुरेश्या मोठ्या आकाराचा खड्डा खोदायला ड्रायव्हरला जरा वेळ लागला. अंधार पडलेला होता. त्या अंधारात त्यानं सुशाचं कलेवर खड्ड्यापर्यंत ओढत नेलं. ते बघून तो तरुण म्हणाला, ‘तुमचा कुत्रा चांगला दणकट आणि रुबाबदार होता असे दिसते.’ “ 

“आम्ही ठासून म्हटलं, ‘गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडला घेऊन गेलो होतो त्याला आमच्या बरोबर. तेव्हा तिथल्या श्वानस्पर्धेत त्याला दुसरं बक्षिस मिळालं होतं.’ “ 

“उषाराजेना एकदम ठसका लागला.  तेव्हा आम्ही त्याना म्हणालो, ‘उषाराजे, रडू नका. गाडीखाली चिरडल्यामुळे सुशाचा प्राण ताबडतोबच गेला असणार. यातना नसतील झाल्या फारशा.’ “ 

“तेव्हा तो तरुण उषाराजेकडे परत परत क्षमायाचना करत आम्हाला म्हणायला लागला, ‘युअर हायनेस, मलाही दु:ख होते आहे. पण असे बघा, तुम्ही सांगाल ती रक्कम भरपाई म्हणून पाठवून द्यायला तयार आहे मी.’ “ 

“ ‘जाऊ द्या साहेब. त्याची काही गरज नाही.’ आम्ही त्याला म्हणालो. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या आग्रहावरून आम्ही त्याला आमच्या वाड्याचा पत्ता दिला. मग तो त्याच्या जीपमध्ये बसून निघून गेला आणि आम्ही दोघी वाड्याकडे परतलो.” 

“आणि बरं का कांचनमाला, आम्ही सुशा आम्हाला कसा आणि कुठं मिळाला त्याबद्दल कुठंच आणि कधीच वाच्यता केली नाही. उषाराजेनापण तसे आम्ही बजावून ठेवले. मुधोळकर सरदार भांबऱ्यानीही तरस बेपत्ता असल्याबद्दल कुठं तक्रार केलेली दिसली नाही. करणार कसे? मागे एकदा त्यांचा शाकाहारी बैल निसटून पळाला होता तेव्हा त्याना आजूबाजूच्या दहा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नासधूस झाली म्हणून जबर नुकसानभरपाई द्यायला लागली होती. मग या मांसाहारी तरसामुळं किती द्यायला लागली असती त्याचा अंदाजपण करता येणार नाही. म्हणून ते गप्प राहिले असावेत. आणि वस्तीवरनंही पोर सापडत नाही म्हणून काही आवाज निघाला नाही. साहजिकच आहे. अहो अशा लोकाना आपल्याला पोरं आहेत किती ते तरी ठाऊक असतं की नाही याची शंकाच आहे.” ताईसाहेबराजे जरा वेळ बोलायचं थांबल्या. मग म्हणाल्या, 

“संपली नाही ही गोष्ट इथं. थोड्या दिवसांनी वाड्यावर पोस्टातून एक पार्सल आलं, आमच्या नावानं. काय असेल त्यात? अहो एक फार सुंदर सोन्याचं लॉकेट होतं, हिरे जडवलेलं आणि वेलबुट्टीत ‘सुशा’ असं नाव इंग्रजीत कोरलेलं. आणि हो, त्यानंतर आमची आणि उषाराजेंची मैत्री तुटली बरं का. आम्ही ते लॉकेट विकलं. भारी किंमत मिळाली. पण आम्ही उषाराजेना त्यातला हिस्सा दिला नाही म्हणून त्या रागावल्या. पण आम्ही का म्हणून द्यायचा त्याना हिस्सा? ‘सुशा’ आमच्या कुत्र्यांनी हेरला होता, सुशा या नावाचा शोधही आमचा होता. आणि तो कदाचित मुधोळकर सरदार भांबऱ्यांचं तरस असू शकणार होता. मग? उषाराजे कुठं बसतात ह्यात? खरं आहे न?” 

*****

 

 

No comments:

Post a Comment