(अंतोन चेखॉव्हच्या ‘Boots’ याच
नावाच्या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)
गुळगुळीत दाढी केलेला, फिक्कट चेहऱ्याचा, दोन्ही
नाकपुड्यांमध्ये ठासलेल्या तपकिरीचे डाग कायम दाखवत असणारा पियानो टेक्निशियन मारुतराव, कानात कापसाचे बोळे कोंबून त्रस्त चेहऱ्याने नंदनवन
लॉजमधल्या त्याच्या खोलीच्या दारातून बाहेर डोकावला. कॉरिडॉरमध्ये पाउल ठेवतानाच
सर्दीमुळे चिरफाळ्या झालेल्या आवाजात त्याने हाकाटी करायला सुरुवात केली, “शाम्या,
शामू वेटर, शाम्या!”
शामराव वेटर धावत आला, “काय झालं साहेब?”
“काय झालं म्हणून
विचारतोस? शाम्या? अरे मी नाजूक प्रकृतीचा माणूस, आधीच सांधेदुखीने हैराण, या
कडाक्याच्या थंडीत ही फरशी पण बर्फासारखी
थंडगार झालेली आहे आणि त्यात तू माझे बूट नाही आणून दिलेस अजून. काल
संध्याकाळी घेऊन गेला होतास पॉलिश करायला. कुठे आहे ते?”
शाम्या मारुतरावांच्या
खोलीत गेला, रोज साफ करून आणलेले बूट ज्या जागी ठेवायचा तिथे बघितले. आजूबाजूलाही
बघितले आणि डोके खाजवत म्हणाला, “दिसत नाहीत कुठंबी. कुठं गेले असत्याल ओ?..... मी
तर हितच आणून ठिवले असणार काल सांजच्याला...... म्हंजे काय हाय, काल जरा नवटाक
मारलेली हुती ओ मी.... तरीच नीट सुधरत न्हाई. येकान्द्र्या येळेला बाजूच्या रूममद्येबी ठिवले असतील चुकुन.... चुकूनच ओ. चौदा नंबर रूम
बगा. त्या रुमात आप्पासाब येलूरकर म्हणून उतरले हाईत. तितं.... न्हई, न्हई, तितं न्हई.
तुमचा रूम नंबर १२ हाय न्हवं? मग मी आलिकडल्या
आकरा नंबरमध्येच दिल्यात. व्हाय. आत्ता जरा कालची चढल्याली उतरली न्हवं,
तसं आटवलं बगा. आवो एक बाई ऱ्हाते त्या रूममद्ये, भवतेक नाटकातली असनार.”
“अरे देवा! म्हणजे
शाम्या आता इतक्या सकाळी मी त्या बाईना उठवायचे? तुझ्यामुळे? काय मूर्खपणा करून
ठेवला आहेस हा. मी असा आजारी माणूस, सांधेदुखीनं बेजार असलेला.......”
कुडकुडत,
खोकत मारुतरावांनी अकरा नंबर रुमच्या दारावर टकटक केले.
“कोण आहे?” मिनिटभराने आतून
बाईचा आवाज आला.
“मी आहे,” मारुतराव अगदी एखाद्या शिलेदाराने सरदारपत्नीसमोर
नतमस्तक होऊन बोलावे अशा नम्रपणे आणि नरम आवाजात म्हणाला. “माफ करा बाईसाहेब, मी
आजारी आहे हो सांधेदुखीने, मला डॉक्टरांनी सांगितले आहे अशा थंडीत पावले गरम ठेवा
म्हणून.. आता मला विजयानंद नाट्यगृहात जायचंय तिथला पियानो बिघडला आहे तो सुरात आणून द्यायला. मी अनवाणी तर जाऊ शकत
नाही ना.”
“मग काय हवे आहे तुम्हाला? बदली पियानो? माझ्याकडे कुठाय?”
“नाही
बाईसाहेब, पियानो नको आहे. माझे बूट हवे आहेत. काल संध्याकाळी शामराव वेटरने चुकून
तुमच्या खोलीत आणून ठेवलेत ते. प्लीज बाईसाहेब, माझे बूट तेवढे द्या.”
कॉटवरून
उतरल्याचा आणि मग पायातल्या सपाता वाजत असल्याचा आवाज आला आणि मग दरवाजा किलकिला
करून बाईच्या एका गुबगुबीत हाताने बुटाचा जोड बाहेर फेकला. तो उचलून घेऊन मारुतराव
आपल्या खोलीत परत गेला.
“अरे!..... ” मारुतराव बूट घालायच्या प्रयत्नात असताना
चित्कारला. “हे नाहीत आपले बूट. आणि हे काय? दोन्ही डाव्या पायाचेच आहेत. शाम्या,
अरे हे माझे बूट नाहीत. माझ्या बुटांवर लाल लेबल्स होती. यांच्यावर नाहीत. यातल्या
एकाला तर ठिगळ लावलेले दिसत आहे, शिवाय दुसऱ्याला भोकेही आहेत.”
“च्यामारी!... असं
हाय व्हय?, ” शामरावाने बूट हातात घेऊन उलट सुलट बघितले आणि एक डोळा बारीक करत म्हणाला,
“आओss.... ह्ये बूट तं बाबुराव मसुट्यांचे हाईत.”
“कोण बाबुराव मसुटे?”
“त्ये बी एक नटच हैत न्हवं का. दर आईतवारी रातीला यिऊन ऱ्हात्यात हित. तुमचे बूट घालून गेल्याले दिसत्यात बाबुराव. म्हणजे तुमचा जोड मी आकरा नंबरमद्ये जितं ठेवला तितं जवळच बाबुरावानी आल्यावर आप्लेबी बूट काडून ठीवले असनार.”
“कोण बाबुराव मसुटे?”
“त्ये बी एक नटच हैत न्हवं का. दर आईतवारी रातीला यिऊन ऱ्हात्यात हित. तुमचे बूट घालून गेल्याले दिसत्यात बाबुराव. म्हणजे तुमचा जोड मी आकरा नंबरमद्ये जितं ठेवला तितं जवळच बाबुरावानी आल्यावर आप्लेबी बूट काडून ठीवले असनार.”
“मग जा आणि बदलून आण
त्याच्याकडून.”
“ह्ये बरं सांग्तायसा. कुटनं आनू? आओ, त्ये ग्येलं कवाच.”
“कुठं
राहतात ते?”
"आता त्यांचं घर कुटं हाय मला कुटं म्हैत हाय? आईतवारी रातीच्या मुक्कामापुरतं यिवून ऱ्हात्यात नि सोमवारी येरवाळी निगुन जात्यात. आता तुमच्या बुटांसाठी फुडच्या आईतवारपर्यंत वाट बघाय पायजे.”
"आता त्यांचं घर कुटं हाय मला कुटं म्हैत हाय? आईतवारी रातीच्या मुक्कामापुरतं यिवून ऱ्हात्यात नि सोमवारी येरवाळी निगुन जात्यात. आता तुमच्या बुटांसाठी फुडच्या आईतवारपर्यंत वाट बघाय पायजे.”
“केलास न सगळा घोळ? गाढवा. काय करायचे मी आता? विजयानंदला कसा जाऊ
मूर्ख माणसा?...माझे पाय!.... आई ग ! माझे पाय पार गोठलेत रे.”
“साहेब, एक आयडीया
हाय. आसं करा, हेच बूट घालून चाला दिवसभर. मागनं संद्याकाळच्याला जावा नवनाथ
थेटरला. तितं झुंझारराव नाटकाचा खेळ हाय ना आज संद्याकाळी. त्येच्यात काम करत्यात
बाबुराव. तितं जावून जाधवरावचा पार्ट करनाऱ्या पार्टीला भ्येटायचं हाय म्हणून
सांगा. येवडंच हातात हाय तुमच्या. नसल जमssत तर मग थांबा फुडल्या आईतवारपर्यंत.”
“अरे
पण हे दोन्ही बूट डाव्या पायाचे आहेत हे कसं काय?”
“आवो द्येवाची मर्जी, पायच तशे दिले असणार ना त्याना द्येवानं? मग क्या करेगा बाबुराव? ह्या ह्या ह्या! न्हई, तस्ं न्हई. मी इचारलं हुतं एक डाव. तं बाबुराव तिरपाडले. म्हनले ‘फुकनिच्च्या, आरे खंडोबाच्या देवळासमोरनं उचलून आणल्यात मी त्ये. आनि हेच बूट घालून मी आजवर राजा महाराजांचेबी पार्ट केल्यात. लकी हाएत माज्यासाटी.’ काय तरी इपरीतच! न्हई?”
“आवो द्येवाची मर्जी, पायच तशे दिले असणार ना त्याना द्येवानं? मग क्या करेगा बाबुराव? ह्या ह्या ह्या! न्हई, तस्ं न्हई. मी इचारलं हुतं एक डाव. तं बाबुराव तिरपाडले. म्हनले ‘फुकनिच्च्या, आरे खंडोबाच्या देवळासमोरनं उचलून आणल्यात मी त्ये. आनि हेच बूट घालून मी आजवर राजा महाराजांचेबी पार्ट केल्यात. लकी हाएत माज्यासाटी.’ काय तरी इपरीतच! न्हई?”
मारुतरावाने मोठ्या कष्टाने ते बूट पायात घातले आणि लंगडत,
खुरडत चालत कसेतरी विजयानंद नाट्यगृहात पोचला. तिथले पियानोचे काम उरकून मग
दिवसभरात इतरही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स विकणाऱ्या दुकानातली कामे उरकून
संध्याकाळी नवनाथ नाट्यगृहात हजर झाला. चालताना होणाऱ्या यातनांशिवाय जाणाऱ्या
येणाऱ्या लोकांच्या कुत्सित नजरांमुळे वाटणारी शरम देखील त्याच्या दु:खात भर टाकत होती.
मारुतराव
थिएटरमध्ये पोचला तेव्हा झुंजारराव नाटकाचा शेवटचा प्रयोग नुकताच संपला होता. थिएटरच्या
वाद्यवृंदात बासरी वाजणारा कलाकार ओळखीचा असल्यामुळे त्याला अगदी पडद्यामागच्या
रंगपटात प्रवेश मिळाला. संपलेल्या खेळातील काही पात्रे चेहऱ्यावरची रंगरंगोटी पुसत
होती तर काही विड्यांचे झुरके मारत गप्पा मारत बसली होती. जाधवराव, म्हणजे आपले
बाबुराव मसुटे झुंझाररावाची भूमिका साकारणाऱ्या सदाशिव ऐतवडेकरासमोर उभे राहून
हातातले पिस्तुल दाखवत होते.
“सदाशिवराव,” बाबूराव म्हणत होते, “तुम्हाला म्हणून
सांगतो, आठशेला घेतले आहे मी. सहा महिन्यांपूर्वी मुंबईला दौरा झाला होता ना
तेव्हा चोरबाजारात मिळाले, स्वस्त न? पण घेतल्यापासून
वापरायचा चान्सच नाही मिळाला हो. हा: हा: हा: ! म्हणून आता विकून टाकायचे म्हणतो.
पाहिजे का तुम्हाला? बघा, हातात घेऊन बघा. काही हरकत नाही.”
“अहो नको, भरलेले आहे
ना?”
“मग काय झाले त्यात? घ्या, बघा.”
एवढ्यात मारुतराव आत आला आणि म्हणाला,
“जाधवरावाचे काम करणारे बाबुराव मसुटे कोण
हो तुमच्यापैकी?”
बाबुरावाने वळून मारुतरावाकडे बघितले आणि उत्तरले, “मी, मी बाबूराव.
काय काम आहे?”
“ओह, माफ करा बाबूरावजी, मी मारुती पंदारे. माझी प्रकृती नाजूक आहे
आणि मला संधिवातही आहे हो. डॉक्टरानी पावले गरम ठेवायला सांगितले आहे माझी.
पण........”
“मग? इथं का आलास?”
“सांगतो ना,” मारुतराव अजीजीच्या स्वरात म्हणाला, “तुम्ही....बाबूरावजी, काल रात्री नंदनवन लॉजमध्ये रहायला होतात ना, खोली नंबर आकरा. .......”
“सांगतो ना,” मारुतराव अजीजीच्या स्वरात म्हणाला, “तुम्ही....बाबूरावजी, काल रात्री नंदनवन लॉजमध्ये रहायला होतात ना, खोली नंबर आकरा. .......”
“एsss, दीडशहाण्या, काही तरी काय बोलतोस? नंदनवन लॉजमधल्या आकरा
नंबरच्या खोलीत तर माझी मिसेस, कमळजा राहते.” झुंजारराव, म्हणजे सदाशिव ऐतवडेकर
म्हणाले.
“तुमच्या मिसेस?..... साहेब,” ऐतवडेकराकडे वळून मारुतराव म्हणाला, “हां,
त्याच होत्या वाटते, त्यांनीच मला या साहेबांचे त्यांच्या खोलीत विसरून राहिलेले
बूट दिले आज सकाळी हे खोलीतून निघून गेल्यानंतर. माझे बूट पॉलिश केल्यावर लॉजच्या
वेटरने नशेत असल्यामुळे चुकून त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले होते. सकाळी, बाबूरावजी,
तुम्ही यांच्या मिसेसना सोडून गेलात तेव्हा तुमचे समजून माझे बूट घालून गेलात.”
“ए,.....
फुकनीच्च्या, काय बकतोयस रे? माझी बदनामी करायला आलास काय इथे?”
“नाही बाबूरावजी,
मी कशाला तुमची बदनामी करू? तुमचा गैरसमज होतो आहे. मी माझ्या बुटांबद्दल बोलतोय.
रात्री तुम्ही आकरा नंबर खोलीत झोपला होतात. होय ना?”
“कधी?”“काल रात्री.”“तू स्वत:
बघितलंस मला?”
“नाही, मी नाही, पण, “ मारुतराव गोंधळून जाऊन म्हणाला, “मी नाही
बघितलं तुम्हाला. पण या साहेबांच्या मिसेसनी तुमचे बूट फेकले माझ्याकडे खोलीतून.
हे बघा.” मारुतराव खाली बसला आणि आपल्या पायातून बूट काढायला लागला.”
“एss, काय
बोलतोयस? माझं सोड, पण एका सच्छील पत्नीची बदनामी करतोयस, तीही तिच्या नवऱ्यासमोर.
कळतंय तुला?”
इतका वेळ अवाक् उभ्या असलेल्या झुंझाररावानी दोन्ही हातांच्या मुठीत
आपले केस धरून उपटले आणि जिवाच्या आकांताने ओरडत हात समोरच्या टेबलावर आपटले.
“सदाशिवराव,
सदाशिवराव, तुमचा विश्वास बसतोय या दीडदमडीच्या माणसावर? सांगा, ह्या कुत्र्याला
आताच्या आता इथंच खतम् करून टाकू? तुम्ही हो म्हणा नुसतं आणि याच्या मेंदूच्या चिथड्या
उडवतो.” बाबूराव म्हणाले.
.......
.......
......
त्या संध्याकाळी नवनाथ नाट्यगृहासमोरच्या
रस्त्यावरून चालत असलेल्या ज्यानी ज्यांनी एक गुळगुळीत दाढी केलेला, फिक्कट
चेहऱ्याचा अनवाणी माणूस नाट्यगृहातून बाहेर पडून पळताना आणि त्याच्या मागोमाग ‘झुंझारराव’
नाटकातल्या जाधवरावाच्या वेशभूषेतला ती भूमिका करणारा नट पिस्तुल हातात घेऊन
पळताना पाहिले असेल ते ते लोक कितीतरी दिवस ते अविस्मरणीय दृश्य वर्णन करत होते.
त्याच्यापुढे काय झाले ते कुणालाच माहीत नाही. पण एवढे मात्र खरे की नंतर जवळजवळ
पंधरा दिवस नंदनवन लॉजच्या खोली नंबर बारामधल्या बेडवर झोपून असलेला मारुतराव
ज्याला त्याला सांगायचा, “अहो मी नाजूक प्रकृतीचा माणूस आहे हो, त्यात संधिवात आहे
मला नि शिवाय ह्या जखमा !.........”
*****
No comments:
Post a Comment