Monday, June 24, 2019

-४- शरणागती


(हेक्टर ह्यू मन्रो (साकी) याच्या CANOSSA या कथेचे मुक्त मुक्त रुपांतर.)
 
व्यंकाप्पा कळसण्णावर, अट्टल गुंड संपफोड्या आज कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. गंभीर गुन्ह्यासाठी. मुणगुट्टीचेच काय, आख्ख्या राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले होते या खटल्याकडे. हो ! सत्ताधारी पक्षाचे आमदार गुटकासम्राट धनिकचंद प्रणित ‘मुणगुट्टी चाया समारंभा’ (मुणगुट्टी टी-पार्टी) च्या आदल्या दिवशी तिथल्याच कै. बसवाण्णा कलगुटगी स्मारक भवनात आग लावून ते भस्मसात केल्याचा आरोप होता त्याच्यावर. त्या समारंभात राज्याचे पर्यावरणमंत्री “चिकन हा पक्षी चिकुनगुन्याचा प्रसार करतो का’ या त्यांच्या लाडक्या प्रबंधाबद्दल उहापोह करणार होते. व्यंकाप्पाने बॉम्ब टाकायची वेळ अगदी विचारपूर्वक निवडली होती. स्मारकभवन भस्मसात झाल्यानंतर चाया समारंभा बेमुदत पुढे ढकलला गेला. परंतु इतर बरेच राजकीय कार्यक्रम तसे पुढे ढकलणे शक्य होणार नव्हते. त्यातलाच एक म्हणजे  विधानसभेची मुणगुट्टी मतदारसंघातली पोटनिवडणूक. खटल्याच्या निर्धारित निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ही निवडणूक व्हायची होती. आणि विरोधी पक्षाने तर जाहीर धमकीच दिली होती की ‘व्यंकाप्पा कळसण्णावरला जर तुरुंगवासाची शिक्षा झाली तर सरकारी पक्षाच्या उमेदवाराची आम्ही ‘वाट लावणार’ हे नूरू प्रतिशत (शंभर टक्के) नक्की समजावे’. आता, दुर्दैवाने, व्यंकाप्पा दोषी ठरणार यात काही शंकाच नव्हती. त्यानं स्वत:च गुन्ह्याची कबुलीही दिली होती. आणि वर निगरगट्टपणे गुरकावलेही होते की वेळ आली तर तो अशाच आणखी दुसऱ्या ठिकाणांमध्येही आगी लावणार आहे. व्यंकाप्पाने जाणूनबुजून आणि हेतुपूर्वक ती आग लावली नव्हती असा ग्रह न्यायमूर्तींचा होण्याचा प्रश्नच नव्हता. प्रश्न हा होता की  व्यंकाप्पाला कोणत्या मुद्द्यावर निर्दोष म्हणून सोडायचा. अर्थात, कोर्टाने काहीही शिक्षा दिली तरी नंतर राज्यापलाकडून माफी देववून ती रद्द करून घेण्याचे प्रावधान होते हे खरे आहे, पण सरकारच्या दृष्टीने तशी माफी देण्याची वेळ येऊ न देणे हेच योग्य ठरणार होते. निकालाच्या आदल्या संध्याकाळी अशी माफी दिली तर ती शरणागती आणि देण्यात चालढकल केली तर मते फुटून पराभव, हीदेखील विरोधकांसमोर शरणागतीच अश्या दुधारी तलवारीला तोंड द्यावे लागणार होते सरकार पक्षाला. म्हणूनच खचाखच भरलेले कोर्ट काय किंवा दोन्ही पक्षांची कार्यालये काय, सगळीकडेच निकालाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती. 

न्यायमूर्ती चेंबरमधून बाहेर येऊन स्थानापन्न झाले आणि प्राथमिक कामकाज झाल्यानंतर त्यांनी निकाल सांगायला सुरुवात केली.  

“सादर करण्यात आलेले पुरावे, आरोपीचा कबुलीजबाब, सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांची प्रतिपादने या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून हे कोर्ट निकाल देत आहे की आरोपी व्यंकाप्पा कळसण्णावर याच्यावर कै. बसवाण्णा कलगुटगी स्मारक भवनात आग लावून ते भस्मसात केल्याचा आरोप सिध्द झाला आहे. तथापि शिक्षा सांगताना हे कोर्ट मुणगुट्टीमध्ये उद्या होणार असलेल्या  महत्वाच्या पोटनिवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आणि संभवत: उद्भवणारी अशांति व असुरक्षेची परिस्थिती यांचा विचार करून.........”  

“म्हणजे,” सरकारी वकील अधीरतेने उठून उभे रहात म्हणाले, “आरोपीला निर्दोष सोडले जाणार  आहे ना?” 

न्यायमूर्ती निर्विकारपणे त्या चिथावणीखोर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत शांतपणे म्हणाले, “हे कोर्ट आरोपीला सात दिवसांच्या कैदेची शिक्षा फर्मावत आहे.”  

अर्थातच राजकारणात न्यायमूर्ती सरकारी पक्षाच्या बाजूचे नव्हते.  

निकाल संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी जनतेला कळवला गेला. साडेपाच वाजता लोकांचा मोठा जमाव जोरजोरात घोषणाबाजी करत सरकारी कार्यालयासमोर हजर झाला. त्यांची घोषणा होती, “निवू वेंकटाप्पावन्नू वंदु दिना जेलीनल्ली इरिसिदारे, नावु निम्मविरुध्द हद्नेंदुनूरू मतदारारिगे मत हाकुत्तैवे.”  (“एक दिवससुध्दा व्यंकप्पाला तुरुंगात टाकाल तर आम्ही पंधराशे मतदार एकगठ्ठा तुमच्या विरोधात मतदान करू.”) 

“बापरे, पंधराशे,” सरकारी पक्षाचे जिल्हाप्रमुख हताशपणे म्हणाले, “अरे आपले मताधिक्य तर १३००चेच होते गेल्या वेळी. म्हणजे ही सीट आता गेलीच ना हातची?”  

“साहेब, उद्या सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात व्हायची आहे,” प्रचारप्रमुख उत्तरले, “व्यंकाप्पाला सकाळी सातच्या आत बाहेर काढले पाहिजे.”  

“साडे सात पर्यंत ! उगाच आपण घाई करतो आहोत असे वाटायला नको.” जिल्हाप्रमुख सावधगिरी दाखवत म्हणाले. 

“ठीक आहे. मात्र साडेसातपेक्षा जास्त उशीर व्हायला नको, मी प्रचार कार्यकर्त्याना आश्वासन देऊन बसलोय “व्यंकाप्पा कळसण्णावर सुटले” असे फलक लावायला सुरुवात करायची मतदान सुरु व्हायच्या आधी म्हणून. हे झाले तरच आपला उमेदवार जिंकू शकेल.”   

रातोरात पक्षाच्या उच्चाधिकारसमितीशी  फोनाफोनी झाली व्यंकाप्पासाठी माफी जाहीर करणारे परिपत्रक निघावे म्हणून. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाप्रमुख आणि प्रचारप्रमुख कार्यालयातच कँटीनमधून ‘उपाहारा’ मागवून बसले. उच्चाधिकार समितीने तातडीने रवाना केलेल्या आणि रातोरात येऊन व्यक्तिश: स्वत: व्यंकाप्पाला तुरुंगातून सोडवण्यासाठी गेलेल्या गृहसचिवाची प्रतीक्षा होती. एवढ्या सकाळीही बाहेर रस्त्यावर माणसे जमायला सुरुवात झाली होती आणि “हद्नेंदुनूरू मतदारारू” च्या घोषणाही ऐकू यायला लागल्या होत्या. 

“साहेबरु, थोड्याच वेळात या निदर्शकांना सुटकेची बातमी कळेल आणि मग आपल्या पार्टीचा जयजयकार करायला लागतील बघाs म्हणतो कि मीss.” प्रचारप्रमुख म्हणाले. 

मिनिटभरातच गृहसचिव घाईघाईने आले. त्यांचा चेहरा चिंतातुर दिसत होता. 

“ते येणार न्हई म्हणते कीss.” गृहसचिव कसेबसे बोलले. 

“येणार नाही? तुरुंगातून बाहेर येणार नाही? काय सांगता काय?” 

“ह्हुं. व्यंकाप्पा म्हणतो वाजंत्री म्हंजे ब्रास बँडशिवाय तो बाहेर येणार नाही. तो म्हणतो आजवर प्रत्येक वेळी तुरुंगातून सुटताना ब्रास बँड वाजवत मिरवणुकीनेच तो बाहेर आला आहे. ब्रास बँड नसेल तर तो एल्लारू संपूssर्णवागी अल्ला (अजिबात म्हणजे अजिबातच) तुरुंग सोडणार नाही.” 

“ठीक आहे, पण हा बँड त्याच्या पाठीराख्यांनी, त्याच्या मित्रांनी आणावा ना !” जिल्हाप्रमुख म्हणाले; “अपराधी कैद्याला बँडबाजा वाजवत तुरुंगातून बाहेर आणणे आपल्या पक्षाच्या आचारसंहितेत बसत नाही शिवाय निवडणूकखर्चाच्या बजेटात तो खर्च दाखवणार कसा?” 

“त्याचे पाठीराखे म्हणतात बँडबाजा, संगीत आपल्या पक्षानेच पुरवायला हवे. ते म्हणतात व्यंकाप्पाला तुरुंगात तुम्ही टाकले ना? मग तुम्हीच त्याला त्याच्या मानमरातबासहित वाजतगाजत बाहेर आणायला पाहिजे. वाजंत्री नाही तर आमचा व्यंकाप्पा बाहेर येणार नाही.”
 
टेलिफोनची घंटी कर्कश्श किंचाळली. “मतदान पाचच मिनिटानी सुरु होते आहे. कळसण्णावर सुटले की नाही? अजून का नाही?” पक्षाच्या उच्चाधिकार कार्यालयातून  आलेला फोन होता तो. प्राचारप्रमुखानी फोन खाली ठेवला आणि निर्वाणीच्या स्वरात म्हणाले, “हे बघा. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्याची ही वेळ नाही. बँड आणि वादक आपल्याला पुरवलेच पाहिजेत. आपण तर आपण ! पण व्यंकाप्पाला ब्रास बँड दिलाच पाहीजे. त्याशिवाय गत्यंतर नाही.” 

“हो, पण आता या क्षणी कुठून आणायचा ब्रास बँड?” गृहसचिव त्राग्याने म्हणाले, “मिलिटरी बँड काही आपण पुरवू शकत नाही. आणि तो मिळालाच तरी व्यंकप्पा तो स्वीकारणार नाही.” 

प्रचारप्रमुख म्हणाले, “दुसरा कुठला वाजंत्रीताफा मिळणे कठीण आहे. सगळ्या वाद्कांचा संप चालू आहे, माहित आहे न? या संपातून मार्ग काढता येईल का?” 

”पाहतो काही करता येते का या बाबतीत.” गृह सचिव म्हणाले आणि फोनकडे वळले. 

आठ वाजले. बाहेरच्या जमावातून येणाऱ्या घोषणांचा स्वर आता जास्त तीव्र झाली होता: ”नावू विरुध्दअभ्यार्थीगे मता हाकुत्तैवे” (आम्ही विरोधी उमेदवाराला मत देऊ). 

नऊ वाजता आलेल्या निरोपावरून जाणवले विरोधी उमेदवाराचे मतदार जास्त संख्येने मतदान केंद्रांवर येत आहेत. 

दहा वाजले. जिल्हाप्रमुख, प्रचारप्रमुख, गृह सचिवधिकारी आणि इतरही काही कार्यकर्ते तुरुंगाधिकाऱ्याच्या ऑफिसात दाखल झाले. व्यंकाप्पा कळसण्णावरला आणले गेले. व्यंकाप्पा मख्खपणे हाताची घडी घालून उभा राहिला आणि हे सगळे अजीजीच्या सुरात त्याची मनधरणी करायला लागले. पण त्याचे एकच पालुपद होते, “ब्रास बँड नाही तर आपण बाहेर येणार नाही.”  

यांच्याकडे तर बँडची काही सोय होत नव्हती. मिनिटन् मिनिट महत्वाचे होते. मतदानकेंद्रांवरून मिळणारे चित्र काही उत्साहजनक नव्हते.  

अखेर प्रचारप्रमुखाने तुरुंगाधिकाऱ्यालाच धाडस करून विचारले, “साहेब, तुमच्याकडेच काही वाद्ये असतील का हो तुरुंगाच्या मालकीची? ढोल, झांजा, बिगुल अशांसारखी जी कुणीही वाजवू शकेल?” 

“आमच्याकडे वाद्ये आहेत, वॉर्डन लोकांचा वादक जथाच आहे गाणी बजावणी करणारा. पण तुम्हाला माहित आहेच आम्ही त्यांना बाहेर पाठवू शकत नाही ते.” तुरुंगाधिकारी उत्तरले. 

“हरकत नाही साहेब, तुम्ही आम्हाला वाद्ये द्या उसनी. एवढी मेहरबानी करा. बाकी आम्ही बघून घेऊ.” उतावीळपणाने प्रचारप्रमुख आणि जिल्हाप्रमुख दोघेही एकदमच बोलले. 

वाद्ये मिळाली. 

कार्यकर्त्यांपैकी एकाला बासरी जुजबी वाजवता येत होती तर दुसऱ्याला बिगुलाचा आवाज काढणे जमले. प्रचारप्रमुख स्वत: ढोल गळ्यात बांधून वाजवायला तयार झाले तर आणखी एकजण झांजा वाजवायला उभा राहिला. 

“कोणते गाणे वाजवायचे व्यंकाप्पा?” जिल्हा प्रमुखांनी विचारले. 

मिनिटभराच्या विचारानंतर व्यंकाप्पा बोलला, “ते, आत्ता पॉपीलर आहे न ते....”नानु इदन्नु माडल्लु बयसलिल्ला, एंदिगु बयसुवुदिल्ला” (मला हे करायचे नव्हते, अजिबात करायचे नव्हते) हे गाणे वाजवायचे बघा. मग मी येतो बँडच्या मागोमाग.” 

अवघड होते. पण अनेकदा लाउडस्पीकरवरून सगळ्यांनी ऐकले होते त्यामुळे, कशीतरी ओढाताण करत का होईना, वादकांनी ह्या गाण्याचा ठेका धरला आणि त्या ठेक्यावर पावले टाकत कैदी व्यंकाप्पा कळसण्णावर रुबाबात तुरुंगातून सुटून बाहेर आला.  

खरं तर गाण्याचे बोल कैद्याच्या अपराधाशी संबंधित नाही पण सरकारी पक्षाकडून त्याला तुरुंगात टाकण्याच्या संदर्भातच लागू होत होते नाही का? एवढं करूनही, ते करण्यात झालेल्या उशिरामुळे असेल कदाचित, सरकारी पक्षाचा उमेदवार एक्कावन, म्हणजे अगदीच थोड्या फरकानी हरला. शिवाय कामगार संघटनेकडून ‘सरकारी पक्षाच्या अधिकाऱ्यांनीच वादकांचा संप फोडला’ हा ठपका ठेवला गेला ते वेगळेच.  

विधानसभेतली एक सीट गेली पण सरकारी पक्षाला एक फायदा मात्र नक्की झाला - शरणागती केव्हा आणि कशी पत्करायची हे समजले.
*****
 

 

No comments:

Post a Comment