(डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्ज
यांच्या The Monkey’s Paw या भयकथेचा मुक्त मुक्त अनुवाद)
डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्ज (पूर्ण नाव: विल्यम वायमार्क जेकब्ज)
हा ब्रिटिश लघुकथालेखक आणि
कादंबरीकार होता. त्याचं बहुतेक लेखन उपहासात्मक विनोदाकडं झुकलेलं असायचं. पण
‘The Monkey’s Paw’ या भयकथेसाठी तो जास्त प्रसिध्द झाला. त्याच्या ‘At Sunwich Port’ आणि ’
Dialstone Lane’ या कादंबऱ्या आणि
The Lady of the Barge, आणि Night Watches हे लघुकथा संग्रह
प्रसिध्द आहेत.
माकडाचा पंजा
बाहेरची हवा गार होती पण ‘हौशा निवास’ मध्ये दारं, खिडक्या बंद असलेल्या
दिवाणखान्यात धगधगत्या निखाऱ्यांची मोठी शेगडी छान ऊब देत होती. माजी नगराध्यक्ष
म्हातारबुवा मच्छिंद्र ढसाळ आणि त्यांचा मुलगा हंबीर बुध्दिबळाचा डाव मांडून बसले
होते. म्हातारबुवांचं या खेळातलं कौशल्य तसं जुजबीच होतं त्यामुळं त्यांनी घोडचुका
करत करत आपला राजा अशा घरात आणून ठेवला होता की हंबीरकडून अगदी पुढच्याच खेळीत
त्याला काटशह बसणं शक्य होतं. चाणाक्ष मिसेस ढसाळ, म्हणजे अंजनाबाईनी, ते ओळखलं
आणि हंबीरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला म्हणाल्या, “हंबीर, अरे वारं किती
जोराचं सुटलंय बाहेर बघ !”
“हो आई. मी ऐकतोय त्याचा आवाज,” चेसबोर्डकडं लक्षपूर्वक बघत आणि आपला उंट
सरकवत हंबीर म्हणाला. “आबा, शह!”
“आता नाही वाटत सुदामा आज येईलसं,” आणखी एक चुकीची खेळी करत ढसाळ पुटपुटले.
“मात !” आपला वजीर दोन घरं मागं घेत हंबीरनं उत्तर दिलं.
“बकवास ! बकवास वारं ! बघा कसं शीळ घालत वाहतंय. आमचं ध्यान लागत नव्हतं आज
त्यापायी,” ढसाळबाबा सबब सांगत बोलले. “त्यात हा गारवा! आपण गावाबाहेर ह्या
माळरानावर घर बांधून गाढवपणाच केलाय. रस्ते नीट नाहीत, आहेत त्यांच्यावर लाईट
नाहीत. आजूबाजूला दुसरी घरं पण नाहीत फारशी. बकवास !”
“जाऊ द्या. आता पुढला डाव जिंकाल हो तुम्ही.” अंजनाबाईंनी सांत्वन केलं.
ढसाळबाबांनी थोडं रागातच वर बघितलं. आई आणि मुलाचं डोळे मिचकावणं लक्षात आलं
त्यांच्या. म्हणून मग जास्त काही बोलले नाहीत ते फक्त त्यांच्या तोंडावर थोडं
ओशाळवाणं हसू उमटलं.
“हां ! हा बघा आला सुदामा. आरे हो, आता त्याला मेजर कांबळे म्हणायला पाहिजे
नाही का ! हा: हा: हा: !,” ढसाळबाबा बंगल्याच्या लोखंडी फाटकाचा आवाज ऐकू येताच
म्हणाले. “या या मेजर.” इतकं बोलून ते स्वत: उठून बाहेरचं दार उघडायला गेले आणि
हाताला धरून मेजर कांबळेना दिवाणखान्यात घेऊन आले. मेजर सुदाम कांबळे वयानं
ढसाळांच्यापेक्षा तसे बरेच लहान होते पण तरीही आता नुकतेच रिटायर झाले होते
आर्मीतनं. उंच पण भरभक्कम अंगलट, चेहरा लालसर, रापलेला, असं व्यक्तिमत्व होतं
त्यांच.
मेजर कांबळेनी अंजनाबाईना नमस्कार केला आणि “काय हंबीर, कसं काय चाललंय
फॅक्टरीतलं काम?” असं बोलून शेगडीच्या उबेत हात चोळत, आणि तेच चेहऱ्यावरून फिरवत,
ढसाळबाबांनी शेगडीजवळ सरकवून दिलेल्या खुर्चीवर बसले.
ढसाळानी अंजनीबाईंच्या नाखुशीकडं काणाडोळा करत कपाटातून व्हिस्कीची बाटली आणि
दोन ग्लासेस काढले. आणि मग दोघांची नित्त्याची बैठक सुरु झाली. अंजनीबाईनी
नेहमीप्रमाणे आतून भाजलेले शेंगदाणे, फरसाण, गरम पाण्याचा तांब्या वगैरे जामानिमा
आणून ठेवला आणि टीपॉयवर पडलेलं एक जुनं मासिक चाळत बसल्या. आता आणखी तास दीड तास
तरी या दोघांची गप्पांची मैफल चालू रहाणार हे त्यांना माहीत होतंच.
व्हिस्कीच्या तिसऱ्या पेगला कांबळेंची जीभ सैल झाली आणि मग त्यांनी आपल्या
आयुष्याची कहाणी, त्यांच्या बदल्या, भेटलेले लोक आणि ‘युध्दस्य वार्ता रम्या’
वगैरे गोष्टी ढसाळबाबा आणि कुटुंबियांना ऐकवायला सुरुवात केली.
“अंजना, ऐका तरी, २०च्या वर वर्षं झाली,” ढसाळबाबा डोळे मिचकावीत म्हणाले.
“आर्मीत भरती होण्यापूर्वी साखर कारखान्याच्या वेअरहाउसमध्ये रोजंदारीवर काम करणारा हा तरुण पोरगा सुदामा
कांबळे, कसा गब्रू दिसतोय आता. होय ना? आता आपणही मेजर कांबळे म्हणून सल्यूट
ठोकायला हवा त्याला.”
“हे: ! काय तरीच काय बोलताय ढसाळसाहेब?” मेजर कांबळे तसे सुखावून, पण विनयानं,
बोलले.
“हंs ! तसं काय आर्मीत हाल
सोसल्यासारखं दिसत नाही मेजर कांबळेनी !” अंजनाबाईनी हसत हसत शेरा मारला.
“बाकी काई म्हणा मेजर, मला पण जावसं वाटतंय बॉर्डरवर तुमच्या सारखं. पण नुसतं
बघायला हं !” ढसाळबाबा बोलले.
“तुम्ही आहात तिथं ठीक आहात साहेब.” मेजर कांबळेनी ग्लास रिकामा करून टेबलावर
ठेवला आणि मुंडी हालवत म्हणाले.
“अहो बाकी काही नाही,” ढसाळ म्हणाले. “नॉर्थमधली सीनरी, देवळं, बघावीत, साधू
लोक, फकीर लोक अशासारख्याना भेटावं असं मनात येतंय इतकंच. अरे हो, मेजर, परवाच्या
दिवशी काय सांगत होतात तुम्ही? फकीरानं दिलेल्या माकडाच्या पंजाबद्दल काहीतरी?
अर्ध्यातच राहिलं तेव्हा. काय होतं ते?”
“काही नाही हो साहेब. किरकोळ गोष्ट होती ती !” मेजरसाहेबानी विषय टाळायचा
प्रयत्न केला.
“माकडाचा पंजा?” अंजनाबाईंची उत्सुकता चाळवली.
“नाही हो काकी, जादूटोणा म्हणा हवं तर. असंच काही तरी.” मेजर कांबळे म्हणाले.
त्यांचे तीन श्रोते आता उत्सुक झाले ऐकायला त्या जादूटोण्याबद्दल. मेजर कांबळेनी
अभावितपणे टेबलावरचा रिकामा ग्लास उचलून तोंडाला लावला आणि परत खाली ठेवला.
ढसाळानी त्यात एक पेग ओतला.
”काय आहे, दिसायला तो एक ठार वाळलेला माकडाचा पंजा आहे.” ओव्हरकोटाच्या खिशात
चाचपडत मेजर कांबळे म्हणाले आणि खिशातून काही तरी काढून त्यांनी ते पुढं केलं. अंजनाबाईनी तोंड कसनुसं करून माघार
घेतली. पण हंबीर ते हातात घेऊन उत्सुकतेनं निरिक्षण करायला लागला.
ढसाळबाबांनी हंबीरच्या हातातून पंजा घेत विचारलं, “काय जादू आहे यात?” आणि उलट
सुलट पारखून झाल्यावर तो टेबलावर ठेवला.
“एका म्हाताऱ्या फकीरानं त्याच्यात जादूची पावर घातलेली आहे,” मेजर कांबळेनी
सांगितलं. “पोचलेला फकीर होता तो. ब्राह्मण लोक सिद्ध म्हणतात ना तशातला ! तो
म्हणायचा दैव माणसाच्या आयुष्यावर सत्ता गाजवत असतं. आणि वर असंही म्हणणं होतं
त्याचं की जो माणूस दैवाशी खेळ मांडतो त्याला दु:खाला तोंड द्यावं लागतं. त्या फकीरानं
या पंजात अशी शक्ती भरली आहे जी वेगवेगळ्या तीन माणसांच्या प्रत्येकी तीन इच्छा
पूर्ण करते.”
मेजर कांबळेचं बोलणं आणि त्यातला त्यांचा आविर्भाव ऐकणाऱ्याचा विश्वास बसावा
असाच होता. त्यामुळं तीनही श्रोत्यांना त्याना आपल्या मनात आलेल्या शंका विचारणं
एक प्रकारे कुचेष्टा केल्यासारखं दिसेल असं वाटायला लागलं. तरीही हंबीरनं
विचारलंच, “ मग तुम्ही का नाही तुमच्या तीन इच्छा पुऱ्या करून घेत?”
मेजरनी त्याच्याकडं दोन क्षण रोखून बघितलं आणि उत्तर दिलं, “घेतल्यात.” पण
त्यांचा रापलेला चेहरा फिक्कट पडला हे उत्तर देताना.
अंजनाबाईंचा विश्वास बसत नव्हता. “खरंच तुम्ही तीन इच्छा पुऱ्या करून
घेतल्यात?”
“हो. मी घेतल्यात.” मेजरनी ओठाला लावलेला ग्लास हलकेच दातांवर आपटत आवाज
काढला.
“तुमच्याखेरीज आणखी कुणाच्या इच्छा पुऱ्या झाल्यात का? अंजनाबाईनी परत प्रश्न
विचारला.
“पहिल्या माणसाच्या तीन इच्छा पुऱ्या झाल्या. त्यातल्या पहिल्या दोन काय
होत्या त्या माहित नाही पण तिसरी मृत्यूची होती. त्यानंतर हा पंजा माझ्याकडं आला.
मेजर कांबळेंच्या आवाजात असं काही होतं की त्यामुळं तीनही श्रोते एकदम चुप
झाले. ती शांतता थोड्या वेळानं ढसाळबाबांनी तोडली. “तुमच्या तीन इच्छा पूर्ण
झाल्या होत्या, मग तरीही तुम्ही हा पंजा अजून का बाळगताय?”
कांबळेनी डोकं हलवलं. “उगीचच,” ते म्हणाले. “तो विकायचं माझ्या मनात आलं होतं.
पण मला वाटत नाही मी विकू शकेन असं ! या पंजानं तसा मला त्रासच दिलाय तरी. शिवाय
कुणी घेईलसं वाटत नाही. मी काहीतरी भाकडकथा सांगतोय असं वाटतं काही लोकाना. आणि जे
थोडे जण विकत घ्यायला राजी झाले ते ‘आधी आम्ही पडताळा घेऊ आणि मगच पैसे देऊ’ अशा
म्हणायचे.”
“मग तुम्हीच आणखी तीन इच्छा मागू शकणार नाही का त्याच्याकडून?” ढसाळबाबानी
डोळे थोडे बारीक करून विचारलं.
“माहित नाही. मला नाही वाटत ते शक्य असेलसं. तीन वेगवेगळी माणसं असं सांगितलंय
ना. ”- मेजर कांबळे म्हणाले आणि त्यांनी तो पंजा चिमटीत धरून अचानकपणे शेगडीवर
फेकला.
ढसाळबाबांनी चपळाई करून तो शेगडीतून बाहेर काढला.
“साहेब, जाऊ द्या जळून तो. मनहूस आहे, टाका निखाऱ्यांवर.”
“तुम्हाला नको असेल तर, मेजर, मला द्या तो. मी ठेवीन माझ्याजवळ.” ढसाळबाबा
म्हणाले.
“नाही.” मेजर कांबळे ठामपणे म्हणाले. “मी तो आगीत टाकलाय. तुम्ही काढून ठेवलात
स्वत:जवळ तर पुढं काय होईल ते सांगता येणार नाही. काही विपरीत घडलं तर मी जबाबदार
नसेन त्याला. तेव्हा माझं ऐका, जाळून टाका तो.”
ढसाळबाबांनी मुंडी हलवली आणि पंजाकडं निरखून बघत विचारलं, “काय करायचं
याच्याकडं काही मागायचं असलं तर?”
“उजव्या हातानं डोळ्यांसमोर धरायचं आणि मागायचं काय मनात असेल ते. पण साहेब,
पुन्हा सांगतो, परिणाम कदाचित वाईटही होतील, ध्यानात घ्या.”
अंजनाबाईनी जेवण वाढायची तयारी करण्यासाठी उठून जाताजाता शेरा मारला, “अरेबियन
नाईटमध्ल्यासारखी सुरस आणि चमत्कारिक गोष्ट वाटतीय. आहो, मागायचंच तर माझ्यासाठी
आणखी चार हात मागा की! म्हणजे कामं पटापटा
करायला बरं !”
ढसाळबाबांनी लगेच खिशात टाकलेला पंजा बाहेर काढला. त्यांची ही चपळाई बघून मेजर
कांबळे सोडून सगळेच हसले, अगदी स्वत: ढसाळबाबा सुध्दा ! कांबळे मात्र गंभीरपणे
बोलले, “तुम्हाला काही मागायचंच असेल तर काही तरी नीट विचार करून मागा.”
ढसाळबाबांनी पुन्हा तो पंजा खिशात टाकला आणि खुर्च्या सरकवून मेजर कांबळेना
जेवणाच्या टेबलाकडे चलायला सांगितलं. जेवतानाच्या गप्पात त्या पंजाची गोष्ट कुणीही
काढली नाही. मेजर कांबळेंच्या वायव्य सरहद्दीवरील लढाईतल्या आठवणींचा दुसरा हप्ता
ऐकण्यात जेवण पार पडलं.
जेवणानंतर आणखी थोड्या गप्पाटप्पा करून मेजर कांबळेनी निरोप घेतला. गेटमधून ते
बाहेर जातात न जातात तोच हंबीर म्हणाला, “आबा, हा माणूस सांगतोय त्यात तथ्य नसेल
तर आपल्याला या पंजाकडून काही फायदा होणं शक्य नाही.”
“काय हो, त्या मेजरला काही पैसे बियसे दिले नाहीत ना?” अंजनाबाईनी विचारलं.
“दिले थोडेसे, अगदी जुजबी. तसा तो
नकोच म्हणत होता. पण मी जबरदस्तीनं घ्यायला लावलं. आणि हो, पुन्हा पुन्हा
तो मला सांगत होत पंजा जाळून टाका म्हणून.” ढसाळ म्हणाले.
घाबरल्यासारखा चेहरा करत हंबीर म्हणाला, “बापरे, म्हणजे आपण आता गडगंज श्रीमंत
होणार तर ! आणि सुखीही. आबा, तुम्ही पंजाकडं राजा व्हायला मागा. म्हणजे आईची नेहमीची भुणभुण सहन करायला
लागणार नाही तुम्हाला.” आणि खुर्चीच्या पाठीवरला अभ्रा घेऊन धोपटून काढायच्या
आविर्भावात पाठलाग करणाऱ्या अंजनाबाईंना चुकवत टेबलाभोवती पळत सुटला. ढसाळबाबांनी पुन्हा एकदा तो पंजा खिशातून काढला
आणि त्याच्याकडं बघत म्हणाले, “मला कळत नाही काय मागू याच्याकडं ते. खरं तर
आपल्याकडं सगळं काही आहे.”
“आबा, मी सांगू का? आपल्या घरासाठीच्या कर्जाचा शेवटचा हप्ता राहिलाय ना, २०
हजारांचा? तेवढी रक्कम मागून घ्या.
तुर्ताला तेव्ह्ढे बास ! म्हंजे तुमच्या जिवाचा घोर तरी मिटेल. खरं का नाई?” हंबीर म्हणाला. त्यानं
आईकडं बघून डोळे मिचकावले आणि टेबलावर बोटांनी ताल धरत पुढं काही न बोलता बसून
राहिला. ढसाळबाबाना पटलं असावं त्याचं सांगणं. त्यांनी तो पंजा, मेजर कांबळेनी
सांगितला होता तसा उजव्या हातानं, डोळ्यांसमोर धरला आणि गंभीरपणे इच्छा व्यक्त केली,
“मी मला २० हजार रुपये मिळावेत अशी इच्छा बाळगतो.”
अचानक एखादी झांज वाजल्यासारखा आवाज झाला आणि ढसाळबाबा एकदम जोरानं ओरडले.
अंजनाबाई आणि हंबीर, दोघंही, पटकन उठून त्यांच्याजवळ गेले.
“तो हलला,” म्हातारबाबा अकल्पित भीतीने थरथरत जमिनीवर पडलेल्या पंजाकडं बोट
दाखवत बोलले. “मी इच्छा बोलून दाखवल्याबरोबर पंजा माझ्या हातातल्या हातात हलून
फिरला सापासारखा आणि निसटून खाली पडला.”
“हॅ ! काय उपयोग? पैसे कुठं आणलेत त्यानं? मला तर दिसत नाहीत कुठं ! दिसतील
असं वाटतही नाही.” हंबीर अविश्वासानं म्हणाला.
“तुमाला भास झाला असेल हो.” अंजनाबाई म्हणाल्या.
“नाही हो. भास नव्हता तो. आवाज पण आला नव्हता का मोठ्ठ्यानं?,” अजीजीच्या
सुरात ढसाळबाबा बोलले. “पण जाऊ द्या ते. काही नुकसान तरी नाही झालेलं. मला
आश्चर्याचा धक्का बसला इतकंच !”
तिघंही आणखी थोडा वेळ शेगडीसमोर बसले. बाहेर वाऱ्याचा जोर वाढला होता आणि
टेरेसवर जायचा दरवाजा त्यामुळं थड थड आवाज करत होता. खिन्नतेची शांतता त्या
तिघांना लपेटून होती. आणि ती पतीपत्नी झोपायसाठी बेडरूममध्ये जाईला उठेपर्यंत तशीच
होती.
हंबीर थोड्या कुचेष्टेनंच म्हणाला, “आबा, मला वाटतं २०हजार रुपयांची पोटली
तुमच्या अंथरुणात येऊन पडली असेल आणि रात्री या पंजावाल्या माकडाचं भूत खोलीतल्या
कपाटावर बसून तुमच्याकडं तुम्ही ते पैसे मोजताना बघत असेल.”
अंजनाबाई आणि ढसाळबाबा काही न बोलता बेडरूममध्ये गेले.
हंबीर थोडा वेळ एकटाच शेगडीतल्या पांढरी राख धरत असलेल्या निखाऱ्यांकडं बघत
बसून राहिला. एकटक बघत असताना त्याला त्या राखेत भीतीदायक असे चेहरे चेहरे दिसायला
लागले. त्यातला एक, शेवटचा, तर दात विचकून बघत असलेल्या माकडाचा होता. त्यामुळं
अस्वस्थ झालेल्या हंबीरनं टेबलावरचा थोडं पाणी असलेला ग्लास उचलून त्यातलं पाणी
टाकून शेगडी विझवली. ढसाळबाबांनी टेबलावर ठेवलेला पंजा एकदा हातात घेऊन परत ठेवला
आणि मग एकदम शिरशिरी आल्यासारखं वाटल्यानं
हात शर्टावर घासत झोपायला निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणांनी खिडकीतून दिवाणखान्यात प्रवेश केला.
त्यांची तिरीप डायनिंग टेबलावर पडली. हंबीरही नाष्ट्यासाठी टेबलासमोर येऊन बसला. ढसाळबाबा आधीच तिथं बसले
होते आणि अंजनाबाई नाष्ट्याच्या प्लेट्स
भरत होत्या. रात्री आपल्याला वाटलेल्या भीतीबद्दल हंबीरला आता हसू येत होतं. त्याची
नजर साईड टेबलवर दुर्लक्षित पडलेल्या पंजावर गेली. कुणालाही त्या पंजाच्या बाबतीत
आज गंभीरपणे विचार करावा वाटत नसावा असं दिसलं.
“सगळी मिलिट्रीची मानसं अशीच असतात का?,” अंजनाबाई म्हणाल्या. “काय बाई, आपण
तरी तस्ल्यांच्या गप्पांना भुलून ऐकत ऱ्हातो आणि विश्वास ठेवतो ! आजकाल कधी अशा
कुणाच्या इच्छा पुऱ्या होतात काय? आणि काय हो? रात्री काय म्हणत होता तुमी? वीस
हजार रुपयांची भीती वाटते म्हणून?”
“अगंs आईss, नोटांची बंडलं डोक्यात पडली तर काय असं वाटलं असेल आबांना.”
हंबीरनं चेष्टा केली.
“हसू नका दोघं. सुदामा काय म्हणाला होता ते आठवा. अगदी सहज, योगायोगानं
घडल्यासारख्या घडतात गोष्टी असंच म्हणाला होता न?”
“ओके, ओके आबा. पण काही झालं तरी मी फॅक्टरीतनं परत यायच्या आधीच वीस हजार
खर्च करू नका हां. नाही तर लोभी माणसात गणना करू तुमची आणि मग संबंध तोडू आम्ही
दोघे. हो न आई?” हंबीर हसत हसत म्हणाला आणि नाष्टा संपवून कामावर जायला निघाला.
अंजनाबाईही हसल्या आणि त्याला गेट पर्यंत सोडायला गेल्या आणि हंबीर रस्त्याला
लागलेला बघितल्यावर मागं वळून घरात गेल्या. पतीबरोबर नाष्टा करताना त्याच्या
भोळेपणावर शेरेबाजी करण्यात आणि मेजर कांबळेच्या गप्पांची संभावना ‘दारुड्याची बडबड’ अशी करण्यात त्याना मजा येत
होती. पण दारावरची बेल वाजल्याबरोबर लगबगीनं उठून त्या दार उघडायला गेल्या.
दाराबाहेर वर्तमानपत्रवाला उभा होता. त्यानं आणलेला दैनिक सत्यवादीचा अंक घेऊन आणि
त्यानं मागितलेलं गेल्या महिन्याचं बिल देऊन त्या चरफडतच टेबलाकडे परतल्या.
नाष्टा संपल्यानंतर रोजची कामं, स्वयंपाक, दुपारचं जेवण, नंतरची आवराआवर आणि
थोडी वामकुक्षी यात अंजनाबाईंचा वेळ गेला तर ढसाळबाबांचा वर्तमानपत्र वाचन, जेवण,
शब्दकोडं सोडवणं आणि मग दुपारची डुलकी घेणं यात. संध्याकाळच्या चहाच्या वेळी परत
एकदा पंजाचा विषय निघाला.
“हंबीर कामावरनं परत यील तेवा बघा आणखी कशी चेष्टा करेल ती.” अंजनाबाईंनी
नवऱ्याला सुनावलं.
किटलीतून कपात आणखी थोडा चहा ओतत ढसाळबाबा म्हणाले, “होय हो. पण माझी खिल्ली उडवायला तुम्हीच त्याला उसकता. मी बघितलंय ते. पण तरी सांगतो,
अगदी शपथेवर ! मी खोटं बोलत नाही. तो पंजा माझ्या हातात खरंच फिरला काल.”
तसं वाटतंय हो तुमाला. मी सांगते, भासच असणार तो.” अंजनाबाईंनी पालुपद लावलं.
“नाही. मी ठ्ठाम सांगतो. हाललाच तो. शंकाच नको,....... का हो, काय झालं? असं
बाहेर काय बघता सारखं डोकवून?”
अंजनाबाईनी काहीच उत्तर दिलं नाही. खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत उभ्या राहिल्या.
एक माणूस त्यांच्या बंगल्याच्या गेटकडं बघत संशयास्पद वाटावी अशी हालचाल करत होता.
आत जाऊ का नको, जाऊ का नको अशा द्विधा मनस्थितीत असावा बहुधा. टापटीप पोषाखात होता
आणि त्याच्या हातात एक लिफाफा होता. उगीचच अंजनाबाईना २० हजार रुपये आठवले. माणूस
तीन वेळा गेटसमोर आला आणि परत फिरला. चौथ्या वेळी मात्र धाडस करत असल्याच्या
आविर्भावात त्यानं गेट उघडलं आणि बंगल्याच्या दाराजवळ आला. अंजनाबाईनी झटकन हात
मागे करून एप्रनची गाठ सोडली आणि तो घाईघाईनं काढून सोफ्याच्या कुशनखाली खोचला.
साडी ठीकठाक करत दिवाणखान्याचं दार उघडायला धावल्या आणि अनाहुत पाहुण्याला घरात
घेऊन आल्या.
आलेला पाहुणा अस्वस्थ होता. अंजनाबाईनी दिवाणखाण्याच्या अस्ताव्यस्त
अवस्थेबद्दल दिलगिरी व्यक्त केली तीही ऐकू आली की नाही असंच दर्शवत चमत्कारिक
नजरेनं इकडं तिकडं बघत राहिला. बायकांमध्ये जन्मजात अनावर असलेली उत्सुकता लपवत
अंजनाबाई तो माणूस काही तरी बोलेल या अपेक्षेनं त्याच्याकडं बघत गप्प राहिल्या. पण
एक दोन मिनिटं तोही गप्पच राहिला. आणि नंतर खिशातून रुमाल काढून घाम पुसत म्हणाला,
“मी...मी...मला आमच्या मॅ...मॅनेजरनं पाठवलंय.... स..सप्तगंगा साखर कारखान्याकडून
आ...आलोय मी....”
सप्तगंगा साखर कारखाना म्हणजे हंबीर कामाला होता ती शुगर फॅक्टरी.
अंजनाबाईंच्या काळजात धस्स झालं. “काय झालं? हंबीर ठीक हाय न आमचा? काय मामला
हाय?”
ढसाळबाबानी अंजनाबाईना धीर दिला. म्हणाले, “अहो, जरा शांत व्हा. इथं बसा बरं
तुम्ही आधी,” आणि मग आलेल्या माणसाला उद्देशून काळजीच्या सुरात म्हणाले, “काही
वाईटसाईट बातमी आणली नाहीत न तुम्ही?”
“कसं सांगू साहेब तुम्हाला ?...सॉरी....”, पुन्हा एकदा कपाळावरचा घाम पुसत तो
माणूस बोलला.
“हंबीरला अपघात झालाय का? फार लागलंय का त्याला?”
मान खाली घालत त्या माणसानं मान होकारार्थी हलवली. “होय. गंभीर जखमा
झाल्या...... पण आता वेदना नाहीत होत त्याला.”
“देवा.... उपकार तुझे देवा. हंबीरला दुखत खुपत नाही आता कुठं त्याबद्दल......”
आभाळाकडं नमस्कार करत अंजनाबाई बोलल्या आणि बोलता बोलता थांबल्या. ‘वेदना नाहीत
आता’ याचा दुसरा अर्थ एकदम त्यांच्या ध्यानात आला. माणसानं मान दुसरीकडं फिरवलेली
बघून त्यांची खात्री पटली. ढसाळबाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या हातावर आपला थरथरता
हात ठेवून त्या बधिरपणे बघत राहिल्या.
किती वेळ नीरव शांततेत गेला कुणास ठाऊक. अखेर आलेल्या माणसानं दबल्या आवाजात
सुरुवात केली, “क्रशरच्या पट्ट्यातच आले हो हंबीरराव.”
ढसाळबाबा हताशपणानं उद्गारले, “क्रशरच्या पट्ट्यात !” आणि खिडकीजवळ उभ्या
असलेल्या अंजनाबाईंचा हात आपल्या हातात घेऊन हळुवारपणे दाबत खिडकीतून बाहेर टक
लावून राहिले. गेल्या चाळीस वर्षांत ते कधीच इतके हळवे झाले नव्हते.
निरोप घेऊन आलेल्या माणसाशी काही तरी बोलायचं म्हणून म्हणाले, “एकच मुलगा
राहिला होता हो हा आमचा.... कठीण आहे. कठीण आहे !”
माणूस हलकेच खाकरला आणि खिडकीजवळ जाऊन म्हणाला, “साहेब, क्षमा करा, मी
कारखान्याचा नोकर म्हणून ही दु:खाची बातमी घेऊन आलो. वरच्या अधिकाऱ्यांनी
सांगितल्यावर हे निरोपाचं काम करायलाच पाहिजे होत न ! नाईलाज झाला माझा.”
दोघांपैकी कुणीच काही बोललं नाही. अंजनाबाईंचा चेहरा पांढरा पडला होता आणि
त्या शून्य नजरेनं बाहेर बघत होत्या. ढसाळबाबांच्या चेहऱ्यावर भीती होती, त्यांचा
मित्र मेजर सुदामा कांबळेच्या चेहऱ्यावर लढाईत पहिल्यांदाच अचानक शत्रुसैनिक रायफल
रोखून समोर उभा ठाकलेला दिसल्यावर उमटली असेल तशी.
निरोप्या माणूस पुढं म्हणाला, “कारखान्यातर्फे आमच्या मॅनेजरसाहेबांनी तुमच्या
या दु:खात सांत्वनाची म्हणून ही चिठ्ठी पाठवली आहे." आणि त्यानं एक उघडा लिफाफा ढसाळबाबांच्या हातात दिला.
चिठ्ठीत लिहिलं होतं, “झालेल्या अपघाताची जबाबदारी सप्तगंगा साखर कारखाना घेऊ
शकत नाही. तथापि आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत कामगार हंबीर मच्छिंद्र ढसाळ यांची
कारखान्याकडील नोकरीची मुदत लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या दु:खद प्रसंगी मदत
म्हणून सोबत काही रक्कम पाठवत आहोत. तिचा स्वीकार करावा. ईश्वर आपल्या पुत्राच्या
आत्म्याला शांति आणि दु:ख सहन करायला आपल्याला शक्ति देओ.”
ढसाळबाबानी अंजनाबाईंचा हात सोडला. त्यांचे ओठ कोरडे पडले आणि काहीतरी भयंकर
ऐकायला लागणार आहे अशी कल्पना येऊन विचारलं, “किती रक्कम पाठवले?”
उत्तर आलं, “वीस हजार रुपये.”
अंजनाबाईंची किंचाळी कानावर पडूनही स्तब्ध असलेले ढसाळबाबा आंधळ्या माणसाने
आधारासाठी पुढे करावेत तसे हात समोर करून बेशुध्द झाले आणि उभ्या जागीच कोसळले.
घरापासून दोन मैलांवर असलेल्या स्मशानभूमीत प्रेत दफन करून ढसाळबाबा
स्मशानशांतता असलेल्या घराकडे परतले.
साऱ्या गोष्टी इतक्या झपाट्यानं घडल्या की काय चाललं आहे हेच त्यांच्या लक्षात येत
नव्हतं. मेंदू बधीर होऊन गेले होते दोघांचे. काही तरी घडेल आणि मुलाच्या मृत्यूचे
ओझे मनावरून उतरेल अशी आशा करण्यात दिवस चालले त्यांचे.
पण किती दिवस गेले तरी तशी काही घटना घडली नाही. आणि मग त्यांच्या मनांनीही
परिस्थितीशी तडजोड केली. दोघेही मूक झाले होते. बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं
जणू आता त्यांच्या आयुष्यांत. आला दिवस गेला दिवस हेच आता नशिबी आलं होतं. दोघंही
हताश आणि जास्तीच म्हातारे झाले. ढसाळबाबांची दृष्टीही सतत शून्यात बघून बघून कमी
कमी होत चालली.
एक आठवडा झाला. रात्री एकाएकी ढसाळबाबाना जाग आली. हात पुढं करून चाचपडलं
तेव्हा जाणवलं खोलीत एकटेच आहेत ते. खोलीत अंधार होता. अंथरुणात उठून बसून त्यांनी
कानोसा घेतला. खिडकीजवळून दबलेले हुंदके ऐकू आले.
“अंजना, या आत. थंडी आहे बाहेर. गारठून जाल.” त्यांनी अंजनाबाईना हाक मारली.
“माझं लेकरू बाहेर याच्यापेक्षा जास्त थंडीत गारठून गेलंय हो.” अंजनाबाई रडत
रडत उत्तरल्या.
ढसाळबाबा त्यांचं सांत्वन करू शकले नाहीत. शेवटी हताश होऊन ते अंथरुणात आडवे
झाले. ग्लानीनं त्याना घेरलं, डोळे जड झाले आणि नकळत ते निद्रावश झाले. कधीतरी
पुन्हा एकदम जाग आली ती अंजनाबाईंच्या
हाकाटीनं.
“पंजा!” त्त्या जवळजवळ किंचाळल्याच, “तो माकडाचा पंजा !”
अचानक झोपेतून उठवल्यामुळं ढसाळबाबांना एकदम काही कळेना. “कुठ? कुठंय? काय
झालं?” त्यांनी गडबडून विचारलं.
अंजनाबाई अडखळत खोलीत आल्या. म्हणाल्या, “मला पायजे तो. तुमी जाळला नाई नं?”
“दिवाणखान्यातच आहे तो, पुस्तकांच्या शेल्फवर. पण कशाला हवाय तुम्हाला तो
आत्ता?” त्यांनी विचारलं.
अंजनाबाई रडता रडता हसायला लागल्या आणि त्यांनी ढसाळबाबाना मिठी मारली. “आहो,
मला आत्ता एकदम आठवलं,” वेड लागल्यासारख्या रडत, हसत त्या म्हणाल्या, “आधी का नाई
सुचलं मला? तुमाला पण का नाई सुचलं?”
“काय आठवलं? बाबांनी विचारालं.
“आहो, आपल्याकडं आजून दोन इच्छा आहेत की बाकी,” अंजनाबाई उत्तरल्या. “तुमी तर
एकच मागून घेतली नं?”
“मग? झालं तेव्हढं पुरे नाही झालं का?” ढसाळबाबांनी चिडूनच विचारलं.
“नाई,” अंजनाबाई आता ठासून बोलल्या. “तुमी आजून एक मागणी करा. जा खाली आणि तो
पंजा घिऊन या. आपल्या लेकराला जिवंत कर म्हणून मागा त्याच्याकडं. जा.”
ढसाळबाबानी पांघरूण काढून टाकलं आणि चढ्या आवाजात म्हणाले, “वेड लागलंय
तुम्हाला?”
“नाई.” लढाई जिंकल्यासारख्या आवाजात अंजनाबाई म्हणाल्या, “आपण आजून एक इच्छा
मागायची. जा, जा खाली आणि घिऊन या तो पंजा आत्ताच्या आत्ता. आणि मागा माझं लेकरू
परत. ज्जा म्हणते नं?”
ढसाळबाबानी दिवा लावला आणि ओरडून म्हणाले, “या बघू बिछान्यावर. तुम्हाला कळत
नाहीये तुम्ही काय मागताय ते.”
“तुमची पैली इच्छा पुरी झाली,” अंजनाबाई ठाम होत्या, “म दुसरी का नको?”
“अहो तो दुर्दैवी योगायोग होता. नेहमीच आपल्याला हवं ते कसं मिळेल?”
“तुमी जा म्हणते न मी? ज्जा हो ! आणा तो इथं आणि माझ्यासमोर मागा
त्याच्याकडं.”
“अंजना, ऐका माझं. हंबीरला जाऊन दहा दिवस झालेत. शिवाय अहो तो कशा अवस्थेत
होता ते मी पाह्यलय. फक्त कपड्यांवरूनच ओळखू शकलो होतो मी. चेहराबिहिरा काही
नव्हतंच. तुम्ही तेव्हाही बघू शकला नव्हतात. आणि आता तर...!”
“परत आणा माझं लेकरू.” अंजनाबाई आवेगानं म्हणाल्या, “कसंही असू द्या. इतकी
वर्षं मी संभाळलेल्या माझ्या लेकराची मला भीती नाई वाटणार. मी सांगते तुमाला.”
नाइलाजानं ढसाळबाबा कसे तरी उठले आणि जिन्यावरून खाली पंजा आणण्यासाठी
दिवाणखान्यात जायला निघाले. जिन्यावरून जातानाच चेंदामेंदा झालेलं हंबीरचं शरीर
जिवंत होऊन येणार या कल्पनेनं त्यांच्या अंगावर भीतीचे शहारे येत होते. अशा
अवस्थेत दिशांचं भानही ते विसरले आणि लाईट लावायलाही. दिवाणखान्यातल्या अंधारातच
चाचपडत, भिंतीला धरत धरत ते पुस्तकांच्या शेल्फपाशी पोचले. अपवित्र पंजा हातात
घेतला आणि कसे तरी परत बेडरूममध्ये पोचले. अंजनाबाईंचाही चेहरा आता पांढरा पडला
आहे असं त्यांना वाटलं. त्या चेहऱ्यावर एक अनैसर्गिक झाक दिसत होती. आता
अंजनाबाईंचीही त्यांना भीती वाटायला लागली.
“मागा !” विचित्र आणि हुकुम केल्यासारख्या आवाजात अंजनाबाई बोलल्या.
“अंजना, वेडेपणा होईल तो आणि पुढं काय वाढून ठेवलं असेल तेही सांगता येत
नाही.”
“मागा.” अंजनाबाई किंचाळून बोलल्या.
ढसाळबाबानी पंजा समोर धरला आणि कसे तरी बोलले, “हंबीर परत जिवंत व्हावा ही
माझी दुसरी इच्छा आहे.”
पंजा हातात फिरला आणि खाली पडला. अंजनाबाई खिडकीजवळ गेल्या आणि त्यांनी ती
उघडून बाहेर बघायला सुरुवात केली. ढसाळ अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखे जवळच्या
खुर्चीत कोसळून बसले.
बराच वेळ झाला तरी काही घडलं नाही. उघड्या खिडकीतून बाहेरची बोचरी थंडी
तेव्हढी खोलीत पसरली. पंजा हे काम करू शकत नाही या कल्पनेनं ढसाळबाबाना थोडं हायसं
वाटायला लागलं. ते सारी शक्ती एकवटून उठले आणि जाऊन बेडवर पांघरूण घेऊन पडून
राहिले. थोड्या वेळानं हताश अंजनाबाईही त्यांच्याजवळ येऊन बसल्या. दोघांपैकी कुणीच बोलत नव्हतं. उघड्या खिडकीच्या
झडपा वाऱ्याच्या झोतामुळं थडथडत होत्या त्या बंद करायला ढसाळ उठून गेले. आणि तिथं
पोचतात इतक्यात दिवाणखान्याच्या मुख्य दारावर हलकेच थाप वाजली. ढसाळबाबा थबकले.
तेव्हढ्यात पुन्हा दुसरी थाप तशीच वाजली. त्यांनी कशा तरी झडपा मिटून घेतल्या आणि
घाईघाईनं अंथरुणावर येऊन बसले. आणि तिसरी थाप जरा जोरानं वाजली.
“काय वाजलं ?” अंजनाबाईनी विचारलं.
“काही नाही. वारा आपटतोय न दारावर. त्याचा आवाज असेल.” ढसाळाबाबानी धीर करून
उत्तर दिलं.
पुन्हा लागोपाठ दोन थापा वाजल्या.
“आओ, ऐका. हंबीर ! माझा हंबीरच दार ठोकतोय.” म्हणत अंजनाबाई घाईघाईनं उठल्या
आणि जिन्याकडे धावत निघाल्या. ढसाळांनी त्याना मागं खेचलं, “अंजना, अहो काय करताय?
पडाल तुम्ही.”
“हंबीर आलाय, मी घरात घेते त्याला.” म्हणत अंजनाबाईंनी सुटायची धडपड केली.
“असं करू नका, माझं ऐका. आपला हंबीर नाही तो. आत्ता रात्रीच्या वेळी कुणी
भलतासलता घरात घुसेल. धोक्याचं आहे ते.”
“नाही. हंबीरच आहे तो. तुम्ही घाबरताय स्वताच्या लेकराला ! मला जाऊ द्या,
माझ्या लेकराला घरात घीऊ द्या. दोन मैलांवरनं यायला त्याला वेळ लागणार ते मी
विसरलेच होते. हंबीर, हंबीर, थांब, मी येतेय.” अंजनाबाईंनी अंगात हत्तीचं बळ
आल्यासारखं हिसडा मारून ढसाळबाबाना ढकलून पाडलं आणि जिन्यावरून खाली उतरल्या.
ढसाळबाबाना पटकन उठता आलं नाही. खाली अंजनाबाईनी दाराची साखळी काढली आणि वरचा टॉवर
बोल्ट खाली करायचा प्रयत्न करायला लागल्या. पण त्यांचा हात पोचेना. दारावरच्या
थापा वाढल्या. “आहो, खाली या, मला हा बोल्ट काढून द्या.” त्यांनी ढसाळाना हाका
मारायला सुरुवात केली. ढसाळबाबा जमिनीवर चाचपडत राहिले. पंज्यासाठी. बाहेरचं दार
उघडलं जाण्यापूर्वी त्यांना तो पंजा हातात हवा होता. त्यांचं काहीच उत्तर येत नाही
आणि ते स्वत:ही येत नाहीत हे लक्षात
आल्यावर अंजनाबाईनी डायनिंग टेबालाजवळची खुर्ची सरकवत दारापाशी आणली आणि तीवर चढून
टॉवर बोल्टाला हात घातला आणि इकडे ढसाळांना पंजा सापडला.
ढसाळबाबानी अंगात उरली असेल नसेल तितकी चपळाई पणाला लावून पंजा डोळ्यांसमोर
धरला आणि आपली तिसरी, अखेरची इच्छा मागितली.
अचानक दारावर पडणाऱ्या थापा बंद झाल्या. अंजनाबाई खुर्चीवरून खाली उतरल्या आणि
ती मागे ओढून त्यांनी दार उघडलं. थंड हवेचा झोत दिवाणखान्यात आणि जिन्यावरून
बेडरूममध्ये शिरला त्याच्याचबरोबर अंजनाबाईंचे निराशेचे हुंदकेही! हुंदके ऐकून
ढसाळबाबा खाली आले. उघड्या दारातून त्यांनी बाहेर नजर टाकली. गेटपर्यंत आणि पुढं
सुनसान रस्त्यावरही कमी उजेडाच्या विजेच्या दिव्याखेरीज काहीही नव्हतं,
चिटपाखरूदेखील नव्हतं. त्यांनी अंजनाबाईंना जवळ घेऊन मायेनं थोपटलं.
*********
No comments:
Post a Comment