(हेक्टर ह्यू मन्रो – ‘साकी’, याच्या ‘The Bag’ या इंग्रजी कथेचे मुक्त
मुक्त रूपांतर)
“पवारसाहेब येणार आहेत बरं का चहाला,” अनुसयाबाईंनी त्यांच्या
भाचीला सांगितलं. “आत्ताच गेलेत घोड्यावरनं रपेटीला उसाच्या फडांकडं. जरा नीटनेटकी
तयार होऊन बस. पवारसाहेबाना गयलटपणा नाही पसंत, ठाऊक आहे नं? त्यात आज ते जरा
काळजीत असल्यासारखेच दिसत आहेत असं दिसलं.”
रिटायर्ड सुभेदार सुभानराव पवारांच नशीब तसं खडतरच होतं म्हणायचं. नशिबावर
त्यांचा कंट्रोल नव्हता तसाच स्वत:च्या गरम, उतावळ्या स्वभावावरही नव्हता. चंदगड
हंटर्स असोशिएशनचे आजरा तालुक्यातले मास्टर हंटर म्हणजे शिकारप्रमुख, म्हणून त्यांनी चार्ज घेतला होता तो आधीच्या
प्रमुखावर चेअरमनची खप्पा मर्जी होऊन त्याला बडतर्फ करण्यात आले त्यानंतर. पण
असोसिएशनमधल्या जवळजवळ निम्म्या सभासदांचा पवारांनाही मुळातून विरोध होता आणि
उरलेल्यांना त्यांनी आपल्या उतावळ्या स्वभावानं तसं जरा नाराजच करत आणलं होतं.
त्यामुळं मंजूर होणाऱ्या बजेट मध्ये काटछाट होत होती आणि त्याशिवाय इतर
सावजांबरोबरच उसाच्या फडांत घुसणाऱ्या कोल्ह्यांची संख्याही घटत चाललेली दिसत
होती. शिकार मिळणं दुरापास्त झालं होतं. त्यामुळं पवारसाहेब चिंतेत असणं
स्वाभाविकच होतं.
पवारांच्या बाबतीत अनुसयाबाई जी आपुलकी दाखवत होत्या त्याला कारण होतं तसंच.
त्यांची भाची सुनीता आता विशीत आली होती. कोल्हापुरात कॉलेजात शिकत असली तरी यंदा
तिला उजवायची असं बहिणीचं म्हणणं होतं. पवारसाहेब वयानं जरा जादा आणि विधुर असले,
गरम डोक्याचे, उतावळ्या स्वभावाचे असले तरी काय झालं? घरची बक्कळ शेतीवाडी, महिना
जवळजवळ पाच हजार पेन्शन आणि वर असोसिएशनकडला चार हजाराच्या वर पगार. शहाण्णव कुळी
मराठा गडी. पुढल्या निवडणुकीत चंदगडचे आमदारपण होतील ते अशी वदंता होती. सुनीताला
यापेक्षा आणखी चांगला नवरा कुठं मिळणार आहे? हा विचार अनुसयाबाईंच्या डोक्यात बसला
होता. लवकरात लवकर हे जमवून आणायचंच ही त्यांची जिद्द होती. पवारांना इष्काची
इंगळी डसली होती की नाही हे माहित नाही पण आजकाल त्यांच्या अनुसयाबाईंच्या
मळ्याकडे फेऱ्या वाढल्या होत्या हे मात्र खरं. गावात थोडीशी कुजबुजपण व्हायला
लागली होती तशी आजकाल.
“अगं, काल पवारसाहेबांच्या शिकारी ताफ्यात फार कमी माणसं होती म्हणे,”
अनुसयाबाई सुनीताला म्हणाल्या. “कोल्हापुरातनं दोनतीन दमाचे शिकारी आणायचे नाहीस
का गं त्या खुळ्या चिन्याला बरोबर घेऊन आलीस त्यापेक्षा.”
“मावशीss, अगं वांग ची खुळा नाही हं!,” सुनीता म्हणाली. “अभ्यासात हुशार आहेच
शिवाय शिकारीवरही जायचा हैनान की कुठल्या तरी जंगलात असं सांगत होता. म्हणून
म्हटलं येतोस का आमच्या चंदगडच्या शिकारीचा अनुभव घ्यायला तर तयार झाला पटकन्
म्हणून आणलं त्याला मी बरोबर. आता भरभक्कम पैलवान गाडी नाही तो एव्हढंच! सगळे
पैलवान तरी चांगले शिकारी असतातच असं तर नसतं ना?”
“अगं सुनिते, पण त्याला तर घोड्यावरही बसता येत नाही नीट.”
“कुठल्याच चिन्याला येत नाही घोडेस्वारी. पण शिकार तर करतो ना वांग ची?”
“ह्हो ! कर्माची शिकार करतो. काल काय आणलं मारून? एक सुतार पक्षी ? हॅ:”
“मावशी, विसरू नकोस, तीन कवडे आणि दोन ससेपण आणले होते त्यानं दोन
दिवसांपूर्वी.”
“अगं ह्हो, पण म्हणून काय सुतारपक्षी मारायचा शिकार म्हणून?”
“अगं हे फॉरीनर्स असतात ना ते एकाच सावजाच्या मागं लागत नाहीत. आता बघ, गोरे
असतात न, म्हणजे इंग्लंडवाले, ते माळढोक पक्षी मिळाला तर तो मारतात तसंच
गिधाडदेखील मारतात. वांग चीला मी समजावलंय कुठल्या पक्ष्यांना मारणं अप्रतिष्ठित
समजलं जातं इकडं ते. तसाही तो एकोणीस वर्षांचा आहे. प्रतिष्ठा म्हणजे काय ते समजत
असणारच त्याला.”
अनुसयाबाईंनी नाक मुरडलं. गावातले जो जो माणूस वांग चीला भेटला त्याला
त्याला वांग ची मधल्या उत्साहाची लागण
झाली. पण अनुसयाबाईना? नाव नको !
“पुरे आता. येतोय बघ तो. मी किचनमध्ये जाते चहाची तयारी करायला. इथं
दिवाणखान्यातच घेऊया चहा. ते टेबल आवर जरा. आणि मी आत असेपर्यंत पवारसाहेब आले तर
नीट स्वागत कर त्यांचं. हसूssन. बरं का.”
मावशी करत असलेल्या लाडांमुळं आजऱ्याच्या घरात तशी सुनीता आरामात आणि खूश
असायची. पण नाही म्हटलं तरी वांग चीच्या येण्यामुळं घरात अस्वस्थता वाढली आहे याची
कल्पना आलीच होती तिला. आठवड्याभराच्या सुट्टीत कंपनी म्हणून तिनं चांगला मित्र
असलेल्या वांग चीला बरोबर आणलं होतं खरं. पण हा चिनी काही फारशी छाप पाडू शकला
नव्हता मावशीवर. त्याला अर्थातच त्याची कल्पना नव्हती. आत्ताही वांग ची आला तो
रात्री शिकारीसाठी गेला होता तिथूनच. नेहमीपेक्षा जास्तच विस्कटलेला, मिचमिचे
डोळे, अस्ताव्यस्त केस, मळलेले कपडे, पण चेहरा उत्साहाने फुललेला. आणि त्याची
शिकार भरून आणायची बॅग आज जास्तच भरलेली दिसत होती.
“सू नी, ओळख मी आज काय मारून आणलंय ते.” वांग ची म्हणाला.
“कवडे? जंगली कबुतरं? ससे?” सुनितानं विचारलं.
“अंहं ! मोठा प्राणी आहे. त्याला तुम्ही काय म्हणता मला माहित नाही. तपकिरी
भुऱ्या रंगाचा, त्याच रंगाची पण जरा गडद शेपटी.”
“झाडावर रहातो? फळं खातो?” ‘मोठा प्राणी’ ही जरा अतिशयोक्ती असेल असं सुनीताला
वाटलं.
वांग ची हसला. “नाही नाही, माकड नाही.”
“पाण्यात पोहतो? मासे खातो?”
“नोss,” वांग ची बॅगेचा बंध सोडवण्याच्या प्रयत्नात लागला. “जंगलात, जमिनीवर
रहातो. ससे, कोंबड्या मारून खातो.”
सुनीता ओंजळीत तोंड लपवून मटकन खाली बसली. “अरे देवा, कोल्हा मारला यानं
!”
सुनीताची अवस्था बघून वांग चीची गाळणच उडाली. या शिकारीमुळे किती भयंकर परिणाम
होउ शकतील ते समजावून सांगायचा सुनीता महत्प्रयास करत असताना आपले मिचमिचे डोळे
जितके विस्फारले जातील तितके विस्फारून तो ऐकत राहिला. अवाक्षरही समजत नव्हतं
त्याला. पण काहीतरी धोका असणार याची कल्पना तेव्हढी आली.
“लपव, लपव ती बॅग आधी,” सुनीतानं बॅगेकडं बोट दाखवत ओरडून सांगितलं. “मावशी
आणि पवारसाहेब कुठल्याही क्षणी येतील इथं. ती दोघं यायच्या आधी फेक ती बॅग त्या
पेटीवर. तिथं नजर जाणार नाही त्यांची.”
वांग चीनं नेम धरून बॅग भिरकावली. पण ती वजनदार बॅग दुर्दैवानं टेबलाच्या
बरोब्बर वर, भिंतीवर लावलेल्या, पेंढा भरलेल्या सांबराच्या शिंगात जाऊन लटकली. आणि
त्याच क्षणी पवारसाहेब आणि अनुसयाबाई, दोघेही बरोबरच दिवाणखान्यात आले.
“सुनीते,” आणलेला नाष्ट्याचा ट्रे टेबलावर ठेवत अनुसयाबाई म्हणाल्या.
“पवारसाहेब उद्याच आपल्या उसाच्या फडात लपलेल्या कोल्ह्याला हुसकावून बाहेर काढणार
असं म्हणतायत. बरं होईल बाई, भिकू कातवड्यानं खात्री देऊन सांगितलंय गेल्या दोन
दिवसात तीन वेळा कोल्ह्याला बघितलं तिथं म्हणून.”
“हां ना !,” पवारसाहेब मिशांवर उलट्या पंजानं ताव देत म्हणाले. “अहो
शिकारीच्या दृष्टीनं भाकड दिवसांची साखळी आता तुटायलाच पायजेलाय. आम्ही मास्टर
हंटर झाल्यापासून एक सुध्दा म्हणण्यासारखी शिकार मिळाली नाही. जो तो सांगतोय
कोल्हा आमक्या आमक्याच्या फडात घुसून ऱ्हायलाय भाडेकरुसारखा मुक्कामाला. पण आम्ही
जातो हुसकून काढायला तर त्याचं नावनिशाण न्हाई सापडत. परवाचीच गोष्ट बघा
अनुसयाबाई, बातमी आली म्हणून देसायांच्या शेतात गेलो माग काढायला तर त्याधीच
कोल्हा तिथनं गायब झालेला. एक तर निसटला तरी होता न्हाइतर त्याला ट्रयाप करून
कुणीतरी आधीच उडीवला तरी होता.”
“पवारसाहेब, माझ्या मळ्यात असं दुसऱ्या कुणी घुसून कोल्हं मारलं तर मी काय
त्याला अशी तशी सोडणार नाही बघा. अहो मास्टर हंटर म्हणून तुमचा मान आहे तो पहिला
बार टाकायचा. ऐऱ्या गैऱ्याचा नाही.” अनुसयाबाई बोलल्या.
सुनीता टेबलावर चहाबरोबर नाष्ट्यासाठी ताजं लोणी, कोल्हापुरी चटणी आणि
भाकऱ्याची चळत मांडून ठेवण्यात गुंतली होती, म्हणजे तसं दाखवत तरी होती. टेबलाच्या
एका बाजूला पवारसाहेब होते तर दुसरीकडे घाबरलेला बिचारा वांग ची. आणि वर ‘ती’ बॅग
! टेबलावरून नजर वर उचलायचीही तयारी नव्हती सुनीताची. कुठल्याही क्षणी पिशवीतून
एखादा रक्ताचा थेंब टेबलावर पडेल की काय अशी धास्ती वाटत होती तिला. मावशी नजरेनं
खुणावून तिला चेहरा हसरा ठेवायला सांगायचा प्रयत्न करत होती. पण सुनीताचा आटोकाट
प्रयत्न चालला होता आपला होत असलेला थरकाप लपवायचा.
“हं, मग आज काय मारून आणलंस बाबा वांग्या?” आज रोजच्यासारखा चर्पटपंजरी करत
नसलेल्या वांग चीची भरती (की भरता?) अनुसयाबाई नेहमी वांग्यातच करायच्या.
“काही विशेष सांगण्यासारखं नाही मावशी.” वांग ची कसाबसा पुटपुटला.
मावशीचा प्रश्न ऐकून सुनीताच्या जवळजवळ थांबलेल्या हृदयानं पुन्हा एकदा ठोके
देणं चालू केलं.
“अरे, एकदा तरी तुझ्याकडं काही सांगण्यासारखं असू दे की रे बाबा. आज काल जो
बघावा तो जीभ नसल्यासारखा गप्पच असतो.”
पवारसाहेब बोलले, “बाई, अहो तो भिकू कातवडी शेवटचं कोल्ह्याला कधी बघितल्याचं
म्हंटला होता आठवतंय का?”
“काल सकाळी. गडद तपकिरी रंगाची शेपटी दिसलेली असं म्हंटला होता.” अनुसयाबाईंनी
उत्तर दिलं.
“अरे वा. मग उद्या त्या गडद शेपटाचा पाठलाग करायला मजा येईलसं दिसतंय तर.”
पवारसाहेबांनी विनोद करून वातावरण मोकळं करायचा प्रयत्न केला. पण मग नाष्टा आणि चहापानात
पुन्हा एकदा सगळे निमूट झाले. कपात वाजलेल्या चमच्याचा आवाज तेव्हढा ऐकू यायचा
इतकी शांतता. आणि मग सुरु झालं ते दुसरंच संगीत. जॉनीचं, म्हणजे अनुसयाबाईंच्या
टेरियर कुत्र्याचं भुंकणं. अचानक मोकळ्या असलेल्या खुर्चीवर उडी मारून वर बॅगेकडं
बघत त्यानं असा काही भुंकायचा आणि उड्या मारायचा सपाटा सुरु केला की त्यामुळं
चहापार्टी उधळली गेली.
“काय झालंय काय जॉन्याला? एव्हढा का पिसाळलाय तो आज?” अनुसयाबाई वर बघत
म्हणाल्या, “वांग्या, अरे तुझीच न ती बॅग? तिथं वर काय करतीय ती. आं? काय आहे काय
बॅगेत तुझ्या?”
एव्हाना पवारसाहेब उठून उभे राहिले होते. म्हणाले, “च्या मारी, काय रे?
रक्ताचा वास आला वाटतं कुत्र्याला. कसली शिकार आहे सांग तरी बाबा.”
आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या आणि अनुसयाबाईंच्या डोक्यात एकदम ट्युबा
पेटल्या. दोघंही एका सुरात किंचाळले, “तो कोल्हा मारलास तू ?”
सुनीता घाईघाईनं त्या दोघांचा चढत चाललेला पारा खाली उतरवायच्या प्रयत्नाला
लागली. पण दोघही तिचं काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत राहिले नव्हते.
पवारसाहेबांच्या संतापाला तर पारावार उरला नव्हता. त्यापायी काय बोलू? किती बोलू?
कसं बोलू? झालं होतं त्याना. पण शब्द फुटत नव्हते. बायका शॉपिंगला म्हणून मॉलमध्ये
जातात आणि एकामागून एक नवे कपडे ट्राय करत आरशात बघत राहतात तसं ते ‘ही शिवी देऊ
की ती शिवी?’ या चक्रातच अडकले होते बहुतेक. अस्वस्थपणे फेऱ्या घालता घालता समोर
दिसेल त्याला खाऊ की गिळू अशा नजरेनं बघत
होते. तशात अनुसयाबाईंचे चिडखोर उद्गार आणि कुत्र्याचं अविरत भुंकणं ! वांग चीला
यातलं ढ्ढिम् सुध्दा कळत नसल्यानं तो फक्त हातातल्या सिगरेटशी खेळत
रात्री नव्यानंच ऐकलेली अस्सल मराठीतली
शिवी मोठ्या प्रेमाने पाठ करत बसला होता. बांधून ठेवलेल्या चक्री
वादळासारखं घोंघावणाऱ्या पवारसाहेबाना खोलीतला फोन दिसला आणि त्यांनी तो झडप घालून
उचलला. त्याच सणकेत चंदगड हंटर्स असोसिएशनच्या सेक्रेटरीचा नंबर फिरवून त्याच्याशी
बोलले, “देवार्डेसाहेब, मी सुभानराव पवार बोलतोय. आत्ता या मिनटाला मी माझ्या
मास्टरहंटर पोझीशनचा राजीनामा देतोय. नोंद घ्या. का म्हणून विचारू नका. देतोय
म्हणजे देतोय. ब्बास झालं. पाणी गेलं डोस्क्यावरनं! ठेवतो.” अनुसयाबाईंच्या
हरकाम्यानं तोवर पवारसाहेबांचा घोडा दाराशी आणला
होता. इतरांशी अवाक्षरही न बोलता घोड्यावर मांड टाकली आणि टाच मारून मास्टरहंटर
रिटायर्ड सुभेदार सुभानराव पवार तिथून निघून गेले. अनुसयाबाईंचा आक्रस्ताळेपण
तेव्हढा थोडा वेळ पुढं चालू राहिला. पण पवारसाहेबांच्या संतापाची सर आणि जोर त्यात
नव्हता. व्हिलनबरोबरच्या हिरोनं केलेल्या तद्दन हाणामारीचा सीन झाल्यावर लगेच
त्याच हिरोनं हिरॉईनबरोबर झाडाभोवती घिरट्या घालायचा सीन दिसावा तसं वाटलं. आपला
आरडाओरडा एकदम पुचकट होतोय असं लक्षात आल्यावर अनुसयाबाई तणतणत कुत्र्याला फरफटत
नेत दिवाणखान्याच्या बाहेर गेल्या. दिवाणखान्यात आता एकदम शांतता पसरली.
वांग ची नं सुनीताला विचारलं, “सू नी, आता पुढं काय? काय करू त्या पिशवीतल्या
शिकारीचं?”
“पुरून टाक परसात.” सुनीता म्हणाली.
“तसंच पुरून टाकू?” वांग ची.
“मग? तुला काय भटाला बोलवून सोपस्कार करून पुरायचंय ते?” सुनीता तिरसटपणाने
बोलली.
वांग चीनं मुकाट्यानं परसदारी जाऊन लिंबोणीच्या झाडाखाली खड्डा खोदला आणि
बौध्द धर्मात जे काही शांतीबद्दलचे मंत्र म्हणायचे असत असतील त्यातले काही पुटपुटत
त्यानं त्या पिशवीतल्या मांजराच्या कलेवराला दु:खपूर्वक मूठमाती दिली.
****
No comments:
Post a Comment