(ओ हेन्रीच्या ‘After Twenty Years’ या इंग्रजी कथेचा मुक्त मुक्त अनुवाद)
बीटवरचा हवालदार मोठ्या तत्परतेनं आपलं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चं काम बजावत रस्त्यावर गस्त घालत होता. त्याची ही तत्परता कोणाला दाखवावी म्हणून
नव्हती हे नक्की ! कारण रस्त्यावर रहदारीच नव्हती. रात्रीचे दहाच वाजत आले होते.
पण कडाक्याची थंडी आणि बोचरं वारं या दोघांनी मिळून लोकाना घराबाहेर पडण्यापासून
परावृत्त केलं होतं हे खरं. त्यातून हे बीट
होतं व्यापारी पेठेत. म्हणजे इथं रहिवाशी कमी आणि कचेऱ्या, दुकानंच
जास्त. त्यामुळं त्यांची दारं केव्हाच कड्याकुलपांनी बंद झाली होती. क्वचित कुठं
एखाद्या हॉटेलचा किंवा पान बिडीच्या ठेल्यातला लाईट दिसायचा. तरीही हवालदार
हातातला दंडुका वेगवेगळ्या प्रकारे फिरवत,
मधूनच एखाद्या
दुकानाचं दार बंद आहे की नाही ते तपासत,
रस्त्याच्या दोन्ही
बाजूंवर नजर टाकत, रुबाबात आणि इमानेइतबारे आपली गस्तीची कामगिरी पार पाडत होता.
एका ब्लॉकसमोरून
जाताना मध्येच तो थबकला. हार्डवेअरच्या दुकानाच्या बंद दाराला टेकून उभ्या
असलेल्या माणसावर त्याची नजर गेली. एकटाच असलेला तो माणूस न पेटवलेली सिगारेट
ओठांत धरून निरुद्देश्य उभा असल्यासारखा
दिसत होता. हवालदार जवळ गेला तेव्हा त्या माणसानं घाईघाईनं ओठातली सिगारेट
चिमटीत धरून बाहेर काढली आणि म्हणाला,
“राम राम
हवालदारसाहेब. काही नाही हो. चालू द्या तुमची गस्त. मित्र यायचाय इथं भेटायला, त्याची
वाट बघत उभा आहे मी. तुम्हाला आश्चर्य वाटेल,
पण बघा,
आम्ही इथं भेटायचं ठरवलं होतं वीस वर्षांपूर्वी. आहे नं गंमत? त्याचं
असं झालं, हे हार्डवेअरचं दुकान आहे न,
तिथं वीस
वर्षांपूर्वी हॉटेल होतं एक, ‘बडेमिया अब्दुल हॉटेल’ या नावाचं.”
“हं, हं. होतं खरं. पाच वर्षं झाली ते बंद होऊन.” हवालदारसाहेब
म्हणाले.
माणसानं खिशातून
माचीस काढली आणि सिगारेट पुन्हा ओठात धरून ती पेटवण्यासाठी काडी सुलगावली.
तेव्हढ्या उजेडात माणसाचा चेहरा क्षणैक उजळून निघाला. फिक्कट वर्ण, चौकोनी
जबडा,
काळे चमकदार डोळे, आणि उजव्या भुवईच्या वर असलेला जखमेचा व्रण. ठसठशीत अंगठी होती बोटात, चेहऱ्याशी
आणि एकंदर जामानिम्याशी विसंगत असलेली,
पण हिऱ्याची !
“आज बरोब्बर वीस वर्षं झाली,” माणूस सांगायला लागला. “मी त्या बडेमिया अब्दुलच्या हॉटेलात जेवायला आलो होतो. माझा अगदी
जिवलग मित्र, लंगोटीयार, जांबुवंत वरुटे – जंब्या म्हणायचो आम्ही त्याला –
होता माझ्याबरोबर
जेवायला. मोठा दिलदार होता माझा दोस्त. मला मोठ्या भावासारखा होता अगदी. मी आठरा
आणि तो वीस वर्षांचा होता तेव्हा. इथंच कोल्हापुरात जन्मलो आणि इथंच वाढलो होतो
दोघेही. दुसऱ्या दिवशी मी जाणार होतो गुजरातेत सुरतला, नशीब
काढायला म्हणून. जंब्याला म्हटलं चल तू पण माझ्याबरोबर. पण त्याला ह्या गावाचं
कौतुक फार होतं. काही झालं तरी कोल्हापूर सोडायचं नाही हेच त्याच्या मनात !
कोल्हापूर, हेच काय ते दुनियेत असलेलं एकुलतं एक मोठ्ठं गाव आहे असं वाटत असावं
त्याला. मग काय, आम्ही
दोघांनी त्या रात्री जेवण झाल्यानंतर जायला निघताना एकमेकाचे हात हातात धरून शपथ
घेतली, ‘आजपासून वीस वर्षांनी,
याच तारखेला, याच
वेळी आपण इथं भेटायचं, कुठंही, कितीही लांब असलो, कसल्याही परिस्थितीत असलो तरीही इथं येऊन भेटायचं.’ वीस
वर्षांच्या काळात आपल्या नशिबानं आपल्याला कशी आणि किती साथ दिली ते एकमेकाला
दाखवायचं.”
“अरे वा ! भारीच की,” हवालदार म्हणाला. “दोन भेटींमध्ये तब्बल वीस वर्षांचा अवधी ! पण काय हो,
तुमच्या दोस्ताकडून या काळात तुम्हाला काहीच खबरबात नाही मिळाली?”
“अगदी नाही असं नाही. सुरुवातीला काही काळ आम्ही पत्रापत्री करत होतो,” माणूस
म्हणाला. “पण मग वर्षा दोन वर्षांनी संपर्क तुटला. अहो, गुजरातची
बातच वेगळी ! प्रचंड मोठ्ठं, गजबजलेलं राज्य ! मी तिकडे गेलो तो तिकडेच गुंतून गेलो. सुरत, भडोच, नडियाद, अहमदाबाद,
बऱ्याच गावी फिरत राहिलो, धंद्याच्या मागे. त्यामुळं जंब्याची खबर घ्यायला जमलंच नाही. पण माझी
खात्री होती वीस वर्षांनी तो मला भेटणार,
जिवंत असला तर नक्की
भेटणार इथं म्हणून. अहो अगदी सच्चा,
सदाचारी, शब्दाचा
पक्का माणूस होता आमचा जंब्या. आख्ख्या जगात त्याच्यासारखा तोच ! विसरणार नाही मला
तो. हजारो मैल प्रवास करून मी, त्याचा दोस्त बाब्या, आज इथं आलो त्याचं सार्थक
होणार आहे आज आम्ही दोघं इथं भेटल्यावर.” माणसानं आपल्या शर्टाची बाही
वर करून मनगटी घड्याळाकडं बघितलं. अगदी भारी,
महागडं असावं ते घड्याळ.
“दहाला
तीन मिनिटं आहेत अजून. अगदी बरोब्बर दहाच्या ठोक्याला आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो
होतो त्या रात्री.”
“गुजरातेत फार चांगला जम बसलेला दिसतो आहे तुमचा?” हवालदारानं
शेरा मारला.
‘हो ना. खूपच चांगला. जंब्या निदान माझ्या निम्म्यानं तरी यशस्वी झाला
असेल अशी आशा आहे. काय आहे, अगदी कष्टाळू, नेक माणूस. पण धडाडी नव्हती हो त्याच्यात. अगदी थंड. ‘ठेविले
अनंते तैसेचि राहावे अशा टाईपचा माणूस’
! आताss, माझं
काय झालंs? मला पण धडाडी गुजरातनंच शिकवली म्हणा नं. जागरूकतेनं, चाणाक्षपणानं
रहायला शिकलो मी तिथं. आज माझ्याजवळ इतकं काही आहे कारण माझी धडाडी, तेज
तर्रार भेजा, कमालीचा चाणाक्षपणा. ही धार गुजरातमुळं आली माझ्यात. हे आहे माझ्या
यशाचं रहस्य !”
हातातल्या
दंडुक्यानं दुकानाच्या दारावर ठकठक करून हवालदार जायला निघाला. “बरंय, चालतो
मी. बीटमध्ये गस्त घालायची आहे. तुमचा दोस्त ठरल्या वेळी येऊन भेटो तुम्हाला. दहा
म्हणजे अगदी दहाला येईल म्हणता?”
“नाही. अगदी तसंच काही नाही. आणखी अर्धा तास वाट बघेन मी त्याची. काय
आहे, जिवंत
असला तो तर आल्याशिवाय राहणार नाही साडेदहा पर्यंत तरी. तुम्ही चला हवालदारसाहेब.
ड्युटी आहे तुमची. राम राम.”
“राम राम. काय नाव म्हणालात तुम्ही तुमचं?” हवालदारानं
जाता जाता विचारलं.
“बाबू, बाबू सरोदे.”
“बरंय मग, रामराम बाबुराव.” रस्त्यावर दंडुका ठोकून हवालदार गस्तीवर निघाला.
कमालीचा गारठा तर
होताच, त्यात
दंव पडायला सुरुवात झाली होती. वारं पण शीळ फुंकल्यासारखा सूर लावून वाहत होतं.
एखाद दुसरा वाटसरु जाकिटाची कॉलर वर करून आणि दोन्ही हात खिशात घालून कुडकुडत जात
होता. हजार मैलांवरून आलेला बाबू सरोदे हार्डवेअर दुकानाच्या दारात उभा होता
आपल्या दोस्ताची वाट बघत आणि सिगारेटचे
झुरके मारून थंडी घालवायचा प्रयत्न करत.
वीसएक मिनिटं झाली
असतील. जाड ओव्हरकोट घातलेला एक माणूस घाईघाईनं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं आला
आणि सरोदेच्या समोर जाऊन उभा राहिला. कोटाच्या खिशातले हात बाहेर काढून चोळत चोळत
त्यानं सरोदेला विचारलं, “बाब्या? बाब्याच ना?”
“आं? हो. पण तू... जांबुवंत?...जंब्या, जंब्याच आहेस ना तू?” बाबू सरोदेनं उलट प्रश्न केला.
“वा वा ! देवा!.... माझा दोस्त बाबू, भेटला खरंच !” बाबूचे
दोन्ही हात आपल्या हातात घेत तो आलेला माणूस चित्कारला. “बाबू, बाब्याच
तू माझा. शंभर टक्के. माझी खात्री होतीच तू जिवंत असलास तर मला भेटायला नक्की
येशीलच याची. कसा आहेस दोस्ता? तब्बल
वीस वर्षांनंतर भेटतो आहेस. बघितलंस का?
आपलं ते बडेमिया
अब्दुल हॉटेल नाही इथं आता. असायला पाहिजे होतं रे. आज परत एकदा आपण जेवलो असतो
एकत्र. पण ते जाऊ दे. सांग, कसा आहेस? गुजरात मानवलं की नाही तुला?”
“मानवलं? अरे नुसतं मानवलं नाही,
मालामाल करून टाकलंय
मला गुजरातनं. आज सबकुछ है अपने पास मेरे दोस्त. बरं पण माझं जाऊ दे. तुझ काय? कसं
काय चाललंय? उंची वाढलेली दिसतेय गड्या तुझी तेव्हापेक्षा दोन तीन इंचानं तरी. होय
ना? आणि
पैसेवाला झालायस की नाही आतापर्यंत?”
बाबूनं सरबत्ती
केली.
“उंची? हो रे. विसावं पूर्ण झाल्यानंतर वाढली खरी जराशी.”
“आणि प्राप्ती? ती वाढली की नाही?”
“बऱ्यापैकी ! महाराष्ट्र सरकारच्या नोकरीत आहे. प्रमोशन पण मिळालंय.
बरं पण चल, इथं थंडीत कुडकुडायला नको,
माझ्या माहितीतल्या
एका जागी जाउया आणि मग घेऊया गेल्या वीस वर्षांचा आढावा. चल.”
दोघं हातात हात
घालून निघाले. बाबू वीस वर्षातल्या आपल्या कर्तृत्वाबद्दल मोठ्या फुशारकीनं
सांगायला लागला. ओव्हरकोटात गुरफटलेला दोस्त मात्र काही न बोलता नुसतं ऐकत राहिला
लक्षपूर्वक.
जोतीबा रोडवरून पुढं
आल्यावर भाऊसिंगजी रोडवरचं जुन्या राजवाड्याकडं जाणारं वळण आलं. तिथं दिवसरात्र
उघडी असणारी फार्मसी होती शेतकरी संघाची. फार्मसीतल्या दिव्यांच्या झगमगाटात
दोघांचे चेहरे उजळून निघाले. एकाच वेळी दोघांनी एकमेकांकडं बघितलं आणि बाबू थबकला.
त्यानं दोस्ताचा हात एकदम झटकून टाकला आणि म्हणाला, “थांब.
तू जंब्या नाहीस ! वीस वर्षांत उंची वाढू शकते पण बुलडॉगसारख्या चप्पट नाकाचं असं
धारदार, बाकदार कावळ्याच्या चोचीसारखं नाक नाही होऊ शकणार. कोण आहेस तू?”
“नाकाचं सोड. पण वीस वर्षांत चांगल्या माणसाचं रुपांतर वाईट माणसात होऊ
शकतं ना? बाबू सरोदेचा ‘रेशमी’ बाबू होऊन जातो,” बाबूचा हात पुन्हा धरत दोस्त म्हणाला. “बाबू
‘रेशीम’, मी
हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके. आपण चालायला लागल्यापासून तू माझ्या अटकेत आहेस.
गुजरात पोलिसांना खबर होती तू कोल्हापुरात येण्याच्या शक्यतेची. सुरतेच्या जेठामाल
हिरजी जव्हेरी या डायमंड मर्चंटच्या पेढीवर झालेल्या चोरीच्या संदर्भात तू त्याना
हवा आहेस. तुला अटक करायची त्यांच्याकडून विनंती आली होती. आमच्या जुना राजवाडा
पोलीस स्टेशनला तुझा फोटो आणि इतर माहिती मिळाली होती. तेव्हा आता मुकाट्यानं चल माझ्याबरोबर
चौकीत आणि तिथं काय बोलायचंय ते बोल. आणि
हो, माझ्याकडं
एक चिठ्ठी आहे. आमच्या गस्ती हवालदारानं दिलेय ती तुझ्यासाठी. ही घे. वाच.”
बाबू सरोदे उर्फ
बाबू ‘रेशीम’नं
तो घडी केलेला छोटा कागद ‘तो मी नव्हेच’ची कुरकुर करत हातात घेतला. फार्मसीच्या दाराजवळ उजेडात उलगडून
वाचल्यानंतर मात्र तो अवाक् होऊन गेला. चारच ओळींचा मजकूर होता चिठ्ठीत.
“बाबू,
आपल्यात
ठरल्याप्रमाणे मी आज बरोब्बर दहा वाजता तुला भेटायला आलो होतो. तू माचीस काढून
काडी पेटवलीस तेव्हा तिच्या उजेडात मला तुझा चेहरा दिसला - गुजरात पोलिसांना ‘वाँटेड’ असलेल्या
बाबू ‘रेशीम’चा.
पण माझ्याच्यानं तुला अटक करवलं नाही. म्हणून मी आमच्या चौकीतल्या वरिष्ठ पोलीस
निरीक्षकाना सांगून साध्या कपड्यातल्या मुख्य हवालदाराला ते काम करायला पाठवलं.
जंब्या.
हवालदार
जांबुवंत वरुटे,
बक्कल
नं २४९७३
महाद्वार
रोड बीट
जुना
राजवाडा पोलीस स्टेशन”
****
No comments:
Post a Comment