Monday, February 24, 2020

-१६- पळवाट

(सर जेफ्री आर्चर यांच्या 'The Loophole' या कथेचे  मुक्त मुक्त रुपांतर) 

“पण मी ऐकलं ते वेगळंच होतं.” महिपतराव म्हणाले.

रिजन्सी क्लबच्या बार मध्ये एका बाजूच्या टेबलावर बसलेल्या मेंबरने हा आवाज कुठून आला त्या दिशेला वळून बघितलं, पण जेव्हा त्याला हे संभाषण कोणामध्ये होत आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यानं किंचित हसून नजर दुसरीकडं वळवली. रीजन्सी गोल्फ क्लब शनिवारी सहसा भरलेला असतो. दुपारच्या जेवणाची वेळ असते तेव्हा तर बसायला जागा मिळणं दुरापास्तच असतं. त्यामुळं महिपतराव शितोळे आणि संग्राम घाटगे हे दोन मेंबर क्लबमध्ये गर्दी व्हायच्या आधी त्यांचा दर शनिवारचा गोल्फ खेळ आटपून बार मध्ये बसले होते गप्पा मारत. पेयांचा दुसरा राउंडही मागवला होता दोघांनी.
 
“काय? काय ऐकलं होतं तुम्ही?” संग्राम घाटगेनी विचारलं.

“हेच की तुझा त्या प्रकरणात काहीच दोष नव्हता असं म्हणता येत नाही असं.”

“माझा दोष नव्हताच मुळी..... पण, काय म्हणायचंय काय तुम्हाला महिपतराव?”

“मला काही म्हणायचं नाही. पण लक्षात असू दे, तू माझ्याकडे मागे नोकरी करत होतास त्यामुळं तुझ्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते मला चांगलं ठाऊक आहे.”

“मी काही कुणाला खोटं सांगून फसवायचा प्रयत्न नाही केला,” संग्राम म्हणाला. “माझी नोकरी गेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि हे मी कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही.”

“मान्य, एकदम मान्य ! पण तुझी नोकरी कशामुळं गेली आणि त्यानंतर तुला दुसरी नोकरी का मिळू शकत नाही हे कुठं कुणाला माहीत आहे?”

“मला दुसरी नोकरी मिळू शकली नाही याचं साधं कारण आहे, राज्याचीच आर्थिक परिस्थिती अवघड असल्यानं सरकारी काय, नि खासगीत काय, नोकरभरती होतच नाही त्याला मी काय करणार? आणि हो, महिपतराव, तुम्ही आयुष्यात यशच मिळवत राहिलात आणि कोट्याधीश झालात. आनंद आहे. पण मी जसा आहे तसा आहे आणि त्यात मला वाईट वाटत नाही.”

“तू दरिद्री आणि नेहमी बेकार राहिलास हा काही माझा दोष नाही. अरे, नोकऱ्या हव्या तेवढ्या आहेत आणि मिळतातही, पूर्वीच्या मालकाचं चांगलं शिफारसपत्र जवळ असलं तर.”

आजूबाजूचे कितीतरी मेंबर्स आपापसातल्या गप्पा विसरून या दोघांमध्ये काय बोलणं चाललंय त्याच्याकडेच कान देऊन राहिले.

“काय सुचवायचंय तुम्हाला महिपतराव?” संग्राम म्हणाला.

“नाही रे बाबा. मला काहीही सुचवायचं नाही,” महिपतराव बोलायला लागले. “पण, तुला कुणी चांगलं सर्टिफिकेट देणाराच मिळत नाही हे खरंच आहे न? आणि हे मार्केटमध्ये सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे. मग तुला कशी नोकरी मिळणार?”

क्लबच्या हॉलमधल्या प्रत्येकाला काही हे ठाऊक नव्हतं. म्हणून जो तो कान टवकारून ऐकत होता.

“महिपतराव, माझी मागली नोकरी गेली ती कंपनीनं एकगठ्ठा नोकरकपात केली त्यात.” संग्राम जरा ठासूनच बोलला.

“तुझ्या बाबतीत नोकरकपात हे फक्त वरवरचं निमित्त होतं. खरं म्हणजे तुलाच डच्चू दिला होता तो.”

“कंपनीचा त्या वर्षीचा फायदा थोडा कमी झाला म्हणून नोकरकपात केली होती तेव्हा.”

“थोडा कमी? अरे नुकसानीत गेली होती ती कंपनी त्या वर्षी. मला चांगलंच ठाऊक आहे.”

“हो पण त्याला कारण होतं. दोन मोठी कंत्राटं आमच्या हातून जाऊन प्रतिस्पर्ध्याना मिळाली होती.”
“प्रतिस्पर्धी कोण? तुमची कंपनी टेंडरमध्ये काय किंमत भरणार आहे त्याची माहिती कुणाला तरी आनंदानं पैसे चारून मिळवणारेच ना?”

दोघांचेही आवाज आता हळू हळू चढत चालले होते, त्यामुळं बहुतेक सगळेच मेंबर्स त्यांच्या संभाषणाकडे कान देऊन होते.

“महिपतराव, नुकसानीची कारणं त्या वर्षीच्या ए.जी.एम्. मध्ये सविस्तर दिली होती कंपनीच्या सगळ्या भागधारकांना.”

“हो, पण कुणा एका अधिकाऱ्याने त्याला डच्चू दिला गेल्यानंतर अगदी थोड्या दिवसात लगेचच नवी कार विकत घेतली हे काही त्या सगळ्या भागधारकांना नव्हतं सांगितलं गेलं, विशेषत: पहिली कार असताना ती दुसरी घेतली गेली होती ते.”

“कार नवी नाही,” संग्राम बचावाच्या पवित्र्यात सांगायला लागला. “वापरलेली पद्मिनी कार आहे. मला नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या पैशातून घेतली मी ती. कंपनीची माझ्याकडे असलेली कार परत द्यायला लागली म्हणून. शिवाय माझ्या बायकोला, संगीताला स्वतंत्र गाडीची जरूर होतीच तिच्या बँकेतल्या जॉबला जाण्यासाठी.”

“खरं सांगायचं, संग्राम, तर संगीताला तू इतकं सोसायला लावलंयस की मला तिच्या सहनशीलतेची कींवच करावीशी वाटते.”

“मी सोसायला लावलंय तिला? काय म्हणायचंय काय तुम्हाला?”

“मला काहीच म्हणायचं नाही,” महिपतराव नेहमीच्या स्टाईलने सुरु करत म्हणाले. "पण तुला डच्च्यू मिळाला त्याच सुमारास एका तरण्या बाईलाही - मी नाव घेत नाही तिचं – नोकरीवरून काढलं हे खरं आहे. ती प्रेग्नंट होती ना रे तेव्हा?”

बारमनकडे गेल्या सात मिनिटांत ड्रिंकची एकही ऑर्डर नोंदवली गेली नव्हती, याचं कारण म्हणजे एव्हाना तिथं बसलेल्या जवळजवळ सगळ्याच लोकांचं लक्ष फक्त आणि फक्त त्या दोघांच्या बोलण्याकड लागलं होतं. कुणी कुणी तर अवाक् होऊन मान वळवून बघतच राहिले होते.

“हे बघा, माझी तिच्याशी अगदीच जुजबी ओळख होती.” संग्रामनं विरोध दर्शवला.

“हो, पण मी आधीही म्हटलं त्याप्रमाणं माझ्या कानावर आलं ते वेगळंच होतं. आणि शिवाय, नंतर जन्माला आलेल्या तिच्या मुलाचा चेहरा  तुझ्यासारखाच होता.”

“महिपतराव, हे जरा अतीच होतंय हं.”

“संग्राम, लपवतोयस तू.” महिपतराव पूर्ण गंभीरपणे बोलले.

“माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही, तुम्हालाही माहित आहे.”

“म, संगीताला कारच्या मागच्या सीटवर विखुरलेले सापडले त्या सोनेरी केसांचं काय? त्या बाईचे केसदेखील सोनेरीच होते.”

“गाडीत होते ते केस गोल्डन रिट्रीव्हर कुत्रीचे होते.”

“पण तुझ्याकडे तर गोल्डन रिट्रीव्हर कुत्री नाही.”

“हो पण गाडीच्या मूळ मालकाकडे होती.”

“गप्प रे, खात्रीनं ती कुत्री त्या मालकाची नव्हती. संगीतालाही तुझी ही थाप पचली नसेल.”

“तिनं माझ्यावर विश्वास ठेवला कारण मी सत्य तेच सांगितलं होतं.” 

“सत्य ? हूं: ! अरे सत्य या शब्दाची तुझ्यापासून फारकत होऊन किती तरी काळ लोटलाय. तुला नोकरीवरून काढण्यात आलं याचं कारण मी सांगतो. स्कर्टवाल्या तरुणींपासून तुझा हात कधीच दूर राहू शकत नाही. आणि पैशांचा ढपला केल्याशिवायही तू राहू शकत नाहीस हे मला ठाऊक आहे. माझ्या कंपनीतून तुला मी काढलं होतं ते याच कारणासाठी न?

संग्राम ताडकन् उठून उभा राहिला. त्याचे गाल आणि डोळेही महिपतराव पीत असलेल्या टोमटोज्यूसच्या रंगासारखे लाल झाले होते. महिपतरावाना हाणण्यासाठी हाताची मूठ वळवून उगारणार एवढ्यात क्लबचे प्रेसिडेंट कर्नल म्हात्रे धावून आले.


“गुड मॉर्निंग कर्नल.” महिपतरावानी  शांतपणे उठून कर्नल म्हात्रेना अभिवादन केलं.

“गुड मॉर्निंग मिस्टर शितोळे,” कर्नल म्हात्रे रुक्षपणे म्हणाले. “ तुमची ही गैरसमजुतीतली बाचाबाची जरा अति होते आहे हे लक्षात घ्या तुम्ही दोघंही.”

“कर्नल, हे महिपतराव माझ्याबद्दल काय अनापशनाप बोलतायत ऐकलत नं तुम्ही?”

“शब्दन् शब्द ! मीच काय इथं असलेल्या सगळ्या मेंबर्सनी ऐकलं ते,” कर्नल म्हात्रे महिपतरावांकडे वळत म्हणाले. “मला वाटतं तुम्ही दोघांनीही शेकहँड  करून झाल्या गेल्यावर पडदा टाकावा हे उत्तम.  कम ऑन,  बी गुड बॉईज यू टू.”

"शेकहँड? या भानगडबाज, विश्वासघातकी माणसाशी? अजिबात नाही. कधीच नाही,” महिपतराव म्हणाले. “कर्नल, तुम्हाला सांगतो, हा माणूस या क्लबचा सभासद असायच्या लायकीचा नाही. तुम्हाला माहित नाही कसा आहे हा ते. सगळी स्टोरी ऐकली नाही तुम्ही."

कर्नल आणखी काही समजुतीचे शब्द बोलायला जाणार इतक्यात संग्राम महिपतरावांच्या अंगावर धावून गेला. कर्नल म्हात्रेंपेक्षा तरुण आणि भक्कम असलेल्या इतर तिघांनाही त्याला आवरणं अवघड गेलं. कर्नलनी आवाज चढवून दोघांनाही क्लबमधून बाहेर जायला सांगितलं आणि क्लब कमिटीकडे त्यांच्याविरुध्द  तक्रार नोंदवणार असल्याची समज दिली. कमिटी मीटिंग पुढल्या महिन्यात होणार असल्याने तोपर्यंत दोघांचेही सभासदत्व तात्पुरते रद्द करत असल्याचंही बजावलं. 

क्लब सेक्रेटरी जयराम हावळ दोघांना क्लबच्या बाहेर घेऊन गेले. महिपतराव लगेच त्यांच्या आलिशान टेस्ला गाडीत बसून क्लबच्या फाटकातून बाहेर पडले. संग्रामच्या होंडा सिटीने बाहेर जायला आणखी दहा बारा मिनिटे घेतली. गाडी सुरु करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीट वर बसून त्यानं शेजारच्या सीटवर असलेल्या वहीत बरंच काही लिहिलं ते लिहून झाल्यावरच गाडी सुरु करून तोही क्लबच्या फाटकाबाहेर पडला. तो गेल्यानंतरच जयराम हावळ क्लबमध्ये शिरले. क्लबच्या फाटकाच्या बाहेर त्या दोघांच्यात काय हाणामारी होईल तिच्याशी त्याना काही देणंघेणं नव्हतं.


क्लबच्या आतल्या संभाषणाचा रोख अजूनही प्रेसिडेंट कपचा संभाव्य विजेता कोण, किंवा महिला गोल्फच्या मानांकनाची यादी, किंवा नवतरुणांच्या आगामी गोल्फ स्पर्धेसाठी स्पॉन्सर कोण मिळेल या विषयांकडे वळलेला नव्हता. अजूनही संग्राम घाटगे आणि महिपतराव शितोळे यांच्यातल्या खडाजंगीवरच चर्चा चालू होत्या.


“अहो सकाळी जेव्हा मी सोळाव्या होलजवळून आलो तेव्हा हे दोघेही भेटले मला तिथं, एकमेकांशी खेळीमेळीच्या गप्पा मारत चालले होते.” जयराम हावळानी कर्नल म्हात्रेना माहिती पुरवली.

म्हात्रेनीही आपल्याला आश्चर्य वाटल्याचं कबूल करत म्हटलं, “अहो जवळजवळ दहा वर्षांपूर्वी हे दोघे क्लबचे सभासद झाल्या दिवसापासून मी बघतोय यांना. खरं तर अगदी भली माणसे आहेत ती.” कर्नल म्हात्र्याना त्या दोघांबद्दल प्रेम वाटत होतंच. दोघेही दर शनिवारी सकाळी गोल्फचा एक तरी राउंड खेळायचेच आणि एव्हढ्या काळात त्यांच्यात कधीही अशी भांडाभांडी झालेली कुणालाच दिसली नव्हती.

“वाईट झालं,” कर्नल म्हात्रे पुढं म्हणाले. “खरं तर मी महिपतरावांना विचारणार होतो नवतरुण गोल्फ स्पर्धेसाठी स्पॉन्सर व्हाल का म्हणून.”

“हो का? कल्पना चांगली होती, पण मला नाही वाटत आता ते शक्य होईल.”

“काय आलं दोघांच्या मनात देव जाणे.”

“असं असेल का, की महिपतराव एकदम यशस्वी झाले आणि संग्रामची परिस्थिती खालावली म्हणून असूयेपोटी हे वितुष्ट आलं असेल दोघांत?”

“नाही, नाही,” कर्नल म्हणाले. “यापेक्षा काही तरी वेगळंच कारण असणार. काय ते कळत नाही. पण आजच्या या प्रकरणाचा नीट खुलासा व्हायलाच हवा.”

क्लबमधल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे महिपतरावानी अगदी शून्यातून सुरुवात करून आज आपल्या धंद्याचा विस्तार प्रचंड साम्राज्यासारखा केला आहे. पंधरा वर्षांपूर्वी कुठल्याश्या कंपनीच्या स्वैपाकाच्या भांड्यांची दारोदार फिरून विक्री करणारे किरकोळ सेल्समन होते ते. नंतर ती नोकरी सोडून त्यानी रेडीमेड ‘पूर्ण स्वैपाकघर’ तयार करायचा छोटासा कारखानाच त्यांच्या घरामागच्या अंगणात काढला. वाढत वाढत कारखान्याचा विस्तार इतका झाला की त्यासाठी त्यांनी नदीच्या पलीकडे मोठी जागा घेऊन कारखाना तिकडे हालवला. आज कारखान्यात तीनशेहून जास्त कामगार काम करतात. महिपतरावांच्या पत्नी सुमंगलादेवी इंदिरा बालकरक्षण आयोगाच्या अध्यक्षा होत्या काही वर्षांपूर्वीपर्यंत. आणि त्यांचा मुलगा आज परदेशात शिकतोय. संग्राम घाटगे त्यांचा कॉलेजमधला मित्रही आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या कारखान्यात कामही करायचा. दोन वर्षांपूर्वी महिपतरावांनी कारखाना जॉन अँड लुईस कंपनीला सात कोटी रुपयांना विकला. त्यातूनच त्यांनी अगदी राजवाड्यासारखं घर बांधलंय आपल्या या क्लबपासून जवळच.
 
संग्राम घाटगेची परिस्थिती याच्या अगदी उलट. कॉलेज सोडल्यानंतर त्यानं बऱ्याच नोकऱ्या केला. अगदी सुरुवातीला वाघमारे कंपनीत ट्रेनी म्हणून लागला. त्याच वर्षी त्यानं डॉ. चौगुलेंच्या संगीता या मुलीशी लग्न केलं. लवकरच त्याना एक मुलगी झाली. तेव्हा संगीतानं ‘त्या नोकरीमुळं संग्राम  घरी फारसा राहू शकत नाही’ म्हणून कुरकुर करायला सुरुवात केल्यावर ती नोकरी सोडून शीतपेयांची निर्मिती करणाऱ्या स्थानिक  कंपनीत वेअरहाउस सुपरवायझर म्हणून लागला.  दोन की तीन वर्षं काम केलं असेल तिथं. पण त्याला डावलून त्याच्या असिस्टंटला एरिया मॅनेजरचं प्रमोशन दिल्यामुळं चिडून त्यानं ती नोकरीही सोडली. अशाच आणखी एक दोन नोकऱ्या केल्यानंतर महिपतरावांनी त्याला आपल्या ‘पूर्ण स्वैपाकघर’ कारखान्यात मुख्य विक्रेता म्हणून ठेवून घेतलं. पण महिपतरावांनी कारखाना विकल्यानंतर एक महिन्याच्या आतच  संग्रामनं काहीही कारण न देता नोकरी सोडली आणि बजाज मायक्रोवेव्ह ओव्हन्समध्ये अकाउंटंट म्हणून कामाला लागला. आता सेटल झाला असं वाटत होतं तोच कंपनीनं काहीही आगाऊ सूचना न देता नोकरकपात करत असल्याचं सांगत त्याला त्याची सेवा अनावश्यक असल्याचं सांगून नोकरीतून मोकळे केले. हां आता हे खरं आहे की कंपनीच्या त्या आर्थिक वर्षीच्या ताळेबंदात नफा निम्म्याने कमी झाल्याचे दिसले होते.
 
त्याच्या चार नोकऱ्या अशा प्रकाराने सुटल्यामुळं वैतागलेली संगीता आणखीनच निराश झाली. त्यांच्या मुलीला आता कलाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. तेव्हा पैशांची आवश्यकता नेह्मीपेक्षा जास्तच होती. त्यात ही नोकरकपात!

क्लबमधून घरी परतल्यानंतर संग्रामनं महिपतरावांबरोबर झालेल्या भांडणाचं वृत्त सांगितल्यावर धास्तावलेल्या संगीतानं त्याला विचारलं, “काय करणार आहात आता?”

आता फक्त एकच करायचंय मला,” संग्राम म्हणाला. “काही झालं तरी माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. हरामखोराला कोर्टात खेचणार आहे मी.”
 
“अहो किती भयंकर बोलताय तुम्ही तुमच्या सर्वात पुराण्या दोस्ताबद्दल. त्यातून आपल्याला कोर्टकचेरीचा खर्च परवडणार आहे का आता? महिपतराव कोट्याधीश आहेत आणि आपण निष्कांचन!”

“त्याला काही इलाज नाही,” संग्रामनं उत्तर दिलं. “मी त्याला कोर्टात खेचणार म्हणजे खेचणार. अगदी आपल्याकडं असेल नसेल ते सारं विकायची वेळ आली तरी.”

“मग आमचं काय? तुमच्याबरोबर मी आणि आपल्या मुलीनंही होरपळून जायचं तुमच्या ह्या भांडणात?”

“आपल्यातलं कुणीही होरपळणार नाही, कारण माझ्या अब्रूनुकसानीची मी मागेन ती किंमत मोजावी लागेल महिपतरावाला.”

“पण तुम्ही हा खटला हरलात तर? आधीच आपण अडचणीत आहोत. अन्नाला मोताद होऊन जाऊ.”

“मी हरणार? अगं शक्यच नाही ते. तो जे बोलला ते पन्नासहून जास्त साक्षीदारांसमोर बोललाय. सगळ्यांनी ऐकलंय ते, क्लब प्रेसिडेंट कर्नल म्हात्रे होते शिवाय ‘दैनिक अग्रणी’चा संपादकही होता तिथं हजर. त्यांनीही ऐकलंय, अगदी शब्दन् शब्द!

संगीताचं समाधान नाही झालं. पण पुढचे दोन दिवस संग्रामनं खटल्याचा विषय काढला नाही त्यामुळं तिला हायसं वाटलं. वाटलं आपल्या नवऱ्याला बहुतेक सुबुध्दी झाली वाटतं.

पण तिसऱ्या दिवशी दैनिक अग्रणीच्या अंकात ‘रिजन्सी गोल्फ क्लब मध्ये राडा’ या मथळ्याखाली शनिवारी जे काही घडलं त्याचा अगदी सावधगिरीनं वापरलेल्या शब्दातला वृत्तांत छापून आला. 

“ये हुई ना बात !” तिसऱ्यांदा तो मजकूर वाचून झाल्यावर संग्राम म्हणाला. त्याच दिवशी त्यानं स्थानिक वकील राजाभाऊ लोमटेची भेट घेतली. हादेखील त्याचा शाळकरी मित्रच. दैनिक अग्रणीच्या अंकात आलेल्या मजकुराच्या सहाय्याने संग्रामनं राजाभाऊला क्लबमध्ये काय घडलं होतं त्याचं वर्णन विस्तारपूर्वक सांगितलं, शिवाय त्यानं भांडणाच्या दिवशी गाडीत बसून लिहिलेल्या मजकुराची चार पानी प्रतही त्याला दिली.

राजाभाऊ लोमट्यानी नीट लक्षपूर्वक तो मजकूर वाचला आणि पृच्छा केली, “कधी लिहिलंस तू हे?”

“त्याच दिवशी रे. क्लबमधून आम्हाला बाहेर काढल्यावर गाडीत बसूनच मी सगळं लिहून काढलं.”

“अगदी डीटेलमध्ये लिहिलंयस तू एखाद्या सरावलेल्या वकिलासारखं, म्हणून विचारलं. असो. पण संग्राम, तुला माहित आहे न? कायदयाशी खेळ फार महाग असतो ते? अब्रुनुकसानीचा दावा करणं स्वस्तातलं काम असणार नाही, अगदी या मजकुरानुसार मजबूत असली आपली बाजू तरीही,” राजाभाऊ संग्रामच्या हस्तलिखितावर बोट टेकवत म्हणाला, “आणि हो, तू केस हरणारच नाही अशी गॅरन्टी नाही देता येत. त्याचं काय आहे संग्राम, हा आरोप सिद्ध करणं हे आजूबाजूच्या लोकाना काय आठवतंय किंवा आठवतंय ते कोर्टात शपथेवर सांगायला ते कितपत तयार असतात यावर अवलंबून असतं रे.”

“हे बघ. तरीही मला ही केस लढायची आहे. अरे, पन्नास तरी लोक होते त्यावेळी ते सारं ऐकत.” संग्रामनं हमी भरली.

“ठीक आहे. जशी तुझी मर्जी. पण मग मला वीस हजार रुपये लागतील, प्राथमिक खर्चासाठी आणि सगळी कागदपत्रं तयार करून कोर्टात गुदरायच्या फीसाठी म्हणून.”

संग्रामची थोडी चलबिचल झाली, तेवढ्यात लोमटे वकील पुढं बोलला, “अर्थात तू ही केस जिंकलास तर हे पैसे परत मिळतील.”  

संग्रामनं खिशातून चेकबुक काढलं आणि वीस हजार रक्कम लिहून सही करून राजाभाऊ लोमटेला दिला.

लोमटेच्या ऑफिसने दुसऱ्या दिवशी सकाळी महिपतराव शितोळ्यांना अब्रुनुकसानीच्या दाव्यासंबंधाने नोटीस पाठवली. एक आठवड्यानंतर शितोळ्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने ती स्वीकारल्याची पोच मिळाली.

क्लबमध्येही या नोटिशीची बातमी पोचली. आणि मग कोण चुकलं, कोण बरोबर होतं याची चर्चा नंतर रोजच होत राहिली. आपल्याला साक्षीसाठी बोलावलं जाईल काय याबद्दलही कुणाला काळजी वाटायला लागली तर काहीजणांना लोमट्यांच्या  ऑफिसकडून फिर्यादी आणि आरोपी दोघांपैकी कोण काय बोललं याचं  स्टेटमेंट देण्याविषयी पत्रही मिळाली.  त्यातल्या काहीजणानी काही आठवत नसल्याचं कळवलं तर उरलेल्यांनी रसभरित वर्णनं लिहून पाठवली. संगीताला आवडलं नाही तरीही संग्राम मोठ्या आवेशानं खटल्याचा पाठपुरावा करायला लागला.

जवळजवळ एक महिन्यानंतर सकाळी संग्रामला राजाभाऊ लोमटेचा फोन आला, “महिपतरावांच्या वकिलाने भेटायला या असं कळवलंय.”

“आपण इतका जबरदस्त पुरावा दिल्यानंतर असं बोलावणं येणार यात नवल कसलं वाटतंय तुला?” संग्राम हसून म्हणाला.

“अरे, नुसतं भेटायला बोलवलंय, काहीही मान्य केलेलं नाही.”

“नुसतं बोलणं असो की आणखी काही, लक्षात ठेव, पन्नास लाखांखाली एक पैसाही कमी घेणार नाही मी.”

“बघू या. मला नाही माहित महिपत......” राजाभाऊ बोलायला लागले.
 
“मला माहित आहे.... गेली अकरा महिने मला कुठूनही इंटरव्ह्यूसाठी म्हणून सुध्दा बोलावलं जात नाहीय, याच नालायकामुळं,” संग्राम राजाभाऊचं बोलणं मध्येच थांबवून म्हणाला. “तेव्हा आता मी पन्नास लाख त्याच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही.”

“संग्राम, या परिस्थितीत नको तितका आशावादी दिसतोयस तू,” राजाभाऊंनी घोडं पुढं दामटलं. “पण ठीक आहे, मीटिंगनंतर विरुध्द पार्टीची काय प्रतिक्रिया होते ते मी तुला कळवीनच.”

संध्याकाळी संग्रामनं संगीताला ही बातमी ‘गुड न्यूज’ म्हणून दिली. लोमटे वकिलासारखीच ती देखील साशंक होती. योगायोगानं नेमकी  त्याच वेळी फोनची रिंग वाजली. संग्रामनं फोन उचलला. राजाभाऊ लोमटेचाच फोन होता. संगीताही जवळच होती त्यामुळं तिलाही पलीकडून लोमटे काय बोलतोय ते ऐकू येत होतं. महिपतराव पंचवीस लाख रुपये आणि खर्च द्यायला तयार झाल्याचं त्यांचा वकील म्हणतोय असं लोमटेनी सांगितलं.

संगीताने मान्य करा अशा अर्थी मान हलवली. पण संग्राम पन्नास लाखांपेक्षा एक छदाम कमी स्वीकारायला तयार नव्हता. म्हणाला,अरे, त्या हरामखोराला माहित आहे ही केस कोर्टात गेली तर त्याला किती महागात पडेल ते. समजत नाही का तुम्हाला? आणि मी अजिबात माघार घेणार नाही हेही त्याला कळलं असेलच एव्हाना. पटतंय का?"

राजाभाऊ लोमटे आणि संगीता, दोघांनाही पटत नव्हतं.

“हे बघ, संग्राम, तुला वाटतंय तितकं सोपं नाही हे,” लोमटे वकील बोलले. “अरे, महिपतरावाचं बोलणं हे केवळ मस्करीचा भाग होता असादेखील पवित्रा जज्ज घेऊ शकतात.”

“मस्करी? मं नंतर झाली ती मारामारी काय होती?” संग्राम.

“ती तू सुरु केली होतीस,” लोमटे ठासून म्हणाले. “अशा परिस्थितीत पंचवीस लाख ही रक्कम रास्त आहे रे.”

संग्राम पन्नास लाख म्हणजे पन्नास लाख हेच पालुपद धरून बसला आणि तोच अंतिम निर्णय असल्याचं सांगून त्यानं फोन खाली ठेवला. दोन आठवडे तसेच गेले आणि मग महिपतरावांकडून एक पाऊल पुढं टाकलं गेलं. मामला तातडीनं मिटवायचा म्हणून त्यांनी पस्तीस लाखांची रक्कम देऊ केली.

“तातडीनं मिटवायचाय मामला? मग त्याला सांग पन्नास लाख देणार असेल तरच मी तयार आहे. नसेल तर मी कोर्टातच भेटू म्हणाव.”

राजाभाऊ लोमटेनी कपाळावर हात मारून घेतला. या अडेलतट्टूपुढं कुणाचंच काही चालणार नाही हे आता ते पुरेपूर समजून चुकले.

पुढचे तीन आठवडे आणि दोन्ही वकिलांमध्ये डझनावारी फोन कॉल्स, वाटाघाटी इतक्या रामायणानंतर महिपतरावाना समजून चुकलं की पन्नास लाख द्यायचं मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. त्यांनी राजाभाऊला फोन केला.

राजाभाऊ लोमट्यानी ही बातमी संग्रामला देताना मात्र हे आपल्याच दूरदर्शीपणामुळं घडून आल्याचा आव आणला. या दृष्टीनं आवश्यक ती कागद पत्रं लागलीच तयार केली तर हा व्यवहार एकदोन दिवसातच पूर्ण करता येईल असंही सांगितलं. “आणि बरं का, या रकमेशिवाय तुझा झालेला खर्चही द्यायला तयार आहे महिपत.” अशी पुस्तीही जोडली.

“अर्थात. तो तर द्यायलाच हवा. काय उपकार करतोय काय तो हरामखोर,” संग्राम ठासून बोलला. “ठीक तर मग. आता सह्यांसाठी अॅग्रीमेंट तयार कर लागलीच.”

छोटसं पत्रक तयार करण्यात आलं आणि संग्राम व महिपतराव या दोघांच्या सह्या झाल्यावर दैनिक अग्रणी कडे प्रसिद्धीसाठी पाठवून देण्यात आलं. ते पत्रक दुसऱ्या दिवसाच्या अंकात पहिल्या पानावर छापलं गेलं:

“शितोळे-घाटगे अब्रुनुकसानी मामल्यात तडजोड
 
रिजन्सी क्लबमध्ये झालेल्या भांडणातून निर्माण झालेला अब्रुनुकसानीचा मामला  आता दोन्ही पक्षानी आपसात वाटाघाटी करून सोडवला आहे. फिर्यादी श्री संग्राम घाटगे याना बचाव पक्षाने, म्हणजे श्री महिपतराव शितोळे यांनी मोठी रक्कम (किती याचा खुलासा त्यांनी केला नाही) नुकसानभरपाई म्हणून देऊ केली आणि त्या दिवशी क्लबमध्ये घाटगे याना उद्देशून त्यांनी जे मानहानीकारक उद्गार काढले ते मागे घेऊन घाटगे यांची बिनशर्त माफी लेखी स्वरूपात मागितली. पुन्हा अशी आगळीक करणार नाहे असे आश्वासनही त्यांनी दिले. श्री संग्राम घाटगे यांचा या दाव्यापोटी झालेला संपूर्ण खर्चही देण्याचे श्री महिपतराव शितोळे यांनी मान्य केले आहे.”
 
महिपतरावांनी त्याच दिवशी कर्नल म्हात्रे यांनाही समक्ष भेटून दिलगिरीचे पत्र दिले. वादावादीच्या दिवशी सकाळी प्रमाणाबाहेर पेग चढवल्यामुळे बोलण्यात आपला तोल गेला असेही ते म्हणाले.  अशी बेजबाबदार वक्तव्ये पुन्हा कधी करणार नाही असे सांगून त्यांनी प्रेसिडेंट म्हात्रे यांची आणि पर्यायाने क्लबची माफी मागितली.

या सगळ्या प्रकरणात संगीताला मात्र फार वाईट वाटलं. “काय झालं ग संगीता? असं काय करतेस? अगं आपण केस जिंकलो आहोत. आपल्या सगळ्या आर्थिक चिंता आता मिटणार आहेत ना?” संग्राम तिला जवळ घेऊन म्हणाला.

“कळतंय मला,” संगीता म्हणाली. “पण केवळ पैशांसाठी इतक्या वर्षांचा आपला जिवाभावाचा मित्र गमवायचा?’

तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी संग्रामला रिजन्सी क्लब कडून एक पत्र हँड डिलीव्हरीनं मिळालं. त्यात लिहिलेलं होतं:

“प्रिय श्री संग्राम घाटगे,

काल क्लबची मासिक सभा पार पडली. शनिवार दि. १६ एप्रिल या दिवशी क्लबमध्ये तुमच्याकडून घडलेल्या अप्रस्तुत वर्तणुकीचा मुद्दा प्रेसिडेंट कर्नल म्हात्रे यांनी सभेत मांडला. उपस्थित सभासदांच्या मतांची  नोंद घेऊन सर्वांनुमते तुम्हाला आणि दुसरे सभासद श्री महिपतराव शितोळे याना या पहिल्याच अपराधाबद्दल कठोर समज देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अशा प्रकारची वर्तणूक पुन्हा घडल्यास तुमचे सभासदत्व आपोआपच कायमसाठी रद्द होईल याची नोंद घ्यावी. प्रेसिडेंट कर्नल म्हात्रे यांनी १६ एप्रिल रोजी तुमच्या क्लबमध्ये येण्यावर घातलेली तात्पुरती बंदी या पत्राद्वारे रद्द करण्यात येत आहे. कळावे.

जयराम  हावळ
सेक्रेटरी, रिजन्सी क्लब

***

“मी बाजारात जाते आहे हो,” संगीतानं ओरडून सांगितलं. “आज शनिवार आहे, तुम्ही काय करणार आहात सकाळी?”

“गोल्फ ! एक राउंड घेतो आज इतक्या दिवसांनंतर.” क्लबच्या पत्राची घडी करत संग्राम म्हणाला.

“वा. छान,” संगीता मनातल्या मनात स्वत:शीच म्हणाली आता कोण पार्टनर मिळणार आहे याना गोल्फसाठी देव जाणे.

पण बऱ्याच सभासदाना गोल्फ कोर्सच्या पहिल्या होलपाशी दिसले ते संग्राम आणि महिपतराव.

“बरं झालं ना हे खटल्याचं प्रकरण सगळ्याना समाधानकारकपणे सुटलं ते?” खिडकीजवळ उभे असलेले सेक्रेटरी जयराम हावळ कर्नल म्हात्र्याना म्हणाले.

“समाधान माझं नाही झालं जयराम. टोमॅटो ज्यूस कोणाला इतका चढेल असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही.” कर्नल म्हात्र्यानी शेरा मारला.

“च्यामारी, आता हे दोघे काय बोलत असतील एकमेकाशी असं हसत?” जयराम हावळनं आपल्यालाही आश्चर्य वाटत असल्याचं स्पष्ट केलं. कर्नल म्हात्र्यानी आपली दुर्बीण काढून डोळ्यांना लावली त्या दोन ‘प्रतिस्पर्ध्याना’ नीट बघायचं म्हणून.

“अरे, चार फुटांचा पट् करता आला नाही तुला महिपत? काय आज पण चढलेय काय रे गाढवा?” दोघंही जेव्हा पहिल्या हिरवळीवर पोचले तेव्हा संग्राम महिपतरावाना म्हणाला.

“संग्राम, तुला माहित आहे मी कधी सकाळी पीत नाही. तेव्हा आता तू जे खोडसाळपणानं बोललास ना त्यात माझी अब्रुनुकसानी होतेय हे लक्षात घे.” महिपतराव बोलले.

“हो का? पण साक्षीदार कोण आहे इथं?” दुसऱ्या होलजवळ पोचता पोचता संग्राम डोळे मिचकावून म्हणाला. “माझ्याकडे पन्नास साक्षीदार होते, विसरू नकोस.”

दोघेही मोठ्यानं हसले.  नंतर आठ होल्स खेळून होईपर्यंत दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. क्लबहाउस पासून जास्तीत जास्त दूर असलेल्या नवव्या हिरवळीवर येईपर्यंत दोघांनी आपसातल्या त्या भांडणाचा उल्लेख टाळला. तिथं पोचल्यावर दोघांनी आजूबाजूला कोणी ऐकणारं आहे का त्याचा अंदाज घेतला. सर्वात जवळचा गोल्फर आठव्या होलपाशी म्हणजे दोनशे मीटर्सवर होता. संग्रामनं त्याच्या गोल्फ बॅगमधून तीस लाख रुपयांच्या नोटा असलेलं एक जाडजूड खाकी कागदाचं पुडकं काढलं आणि महिपतरावांना दिलं. “थँक यू संग्राम, ” म्हणत त्यांनी ते पुडकं आपल्या गोल्फ बॅगमध्ये टाकलं. “आजवरच्या माझ्या कारस्थानांमधलं अगदी काळजीपूर्वकपणे पार पडलेलं असं हेच.”

“हो ना,” संग्राम हसत म्हणाला. “मला वीस लाख मिळाले आणि तुझंही काही नुकसान झालं नाही.”

“अरे माझं उत्पन्न इतकं आहे की इन्कम टॅक्स च्या सगळ्यात वरच्या स्तरांतला टॅक्सरेट लागतो मला. आता पन्नास लाखांची रक्कम मला अधिकृतपणे करमाफी (एग्झम्शन) साठी कायदेशीरपणे केलेला व्यवसायातला खर्च म्हणून दाखवता येईल.”

“मलादेखील पैसे अब्रुनुकसानीपोटी भरपाई म्हणून मिळालेले असल्यामुळं त्यांच्यावर टॅक्स भरावा लागणार नाही.” संग्राम म्हणाला.

“आपल्या चलाख वित्तमंत्र्यांनाही या पळवाटेची  कल्पना आली नव्हती.” महिपतराव गडगडून हसत आणि मिशीला पीळ देत म्हणाले.

“महिपत, वकील राजाभाऊला द्यायला लागलेली फी मात्र तुझ्यावर उगाचच बसली.”

“अरे नाही, तीसुध्दा एग्झम्शनमध्ये धरली जाईल. वाईट वाटून घेऊ नकोस,” महिपतराव म्हणाले. “म्हणजे बघ, संग्राम, माझं एका पैशाचं नुकसान झालं नाही आणि तुलाही टॅक्सफ्री वीस लाख मिळाले.”

“हो, तेही कुणाला पत्ता न लागता.” संग्राम महिपतरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
 
***

कर्नल म्हात्र्यानी डोळ्यांवरून दुर्बीण काढून बॉक्समध्ये ठेवली.

“कर्नल, काय हो” प्रेसिडेंट कपचा संभाव्य विजेता कोण असेल त्याचा अंदाज घेत होतात का?” सेक्रेटरी जयराम हावळानी विचारलं.

“नाही जयराम, या वर्षीच्या नवतरुणांच्या गोल्फ स्पर्धेसाठी स्पॉन्सर नक्की करत होतो.”

 * * * * * ***

1 comment: